गांधीजी आणि मीम

-उत्पल व्ही . बी .

गांधीजी : मीम म्हणजे काय रे?
मी : मीम म्हणजे…व्यंगचित्रच एक प्रकारचं. पण हाताने काढत नाहीत.
गांधीजी : मग?
मी : कंप्यूटरवर क्रिएट करतात. रेडिमेड इमेज वापरून. कधी फोटोशॉप वापरतात तर कधी दुसरं काही…
गांधीजी : फोटोशॉप?
मी : फोटोशॉप म्हणजे….तुम्ही हे सगळं का विचारताय?
गांधीजी : अरे, एका लेखात उल्लेख होता. गेल्या महिन्याभरात हा प्रकार बराच गाजला म्हणे.
मी : हो. राजकारणाच्या पार्श्वभूमीवर.
गांधीजी : सत्तास्थापनेतील राजकारणाच्या?
मी : राइट.
गांधीजी : अच्छा. म्हणजे तिकडे तुम्ही राजकारण करा, इकडे आम्ही मीम करतो असंच ना?
मी : मीम, वार्तांकन, विश्लेषण – सगळंच…
गांधीजी : यात तुला काही बेसिक घोळ नाही वाटत?
मी : हं.
गांधीजी : म्हणजे निवडणूकपूर्व युती निकालानंतर तुटते…राष्ट्रपती राजवट अचानक अंधारात संपते, शपथविधी चोरून होतात…
मी : हं.
गांधीजी : आमदार विकले जातात. त्याला सर्रास मान्यता मिळते. वर त्याला निर्लज्जपणे ‘ऑपरेशन लोटस’ वगैरे म्हटलं जातं.
मी : हं.
गांधीजी : आणि तुमच्या हातात मतदानावाचून काही नाही.
मी : हं.
गांधीजी : म्हणजे राजकीय व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व्ह व्हायची, सुधारणा करण्याची, त्यासाठी एकविसाव्या शतकातला तुमचा प्रगत मेंदू वापरायची तुम्हांला मुभा नाही. ती मिळावी यासाठी तुम्हीही काही प्रयत्न करताना दिसत नाही.
मी : हं.
गांधीजी : राजकीय पक्षांचे चिअर लीडर्स हीच काय ती तुमची ओळख.
मी : अजून किती टोचून बोलणार आहात? मला कळतंय तुम्हांला काय म्हणायचंय ते. दुखऱ्या नसेवर सारखा हात ठेवू नका.
गांधीजी : ठेवावा लागतो अरे.
मी : का?
गांधीजी : कारण त्याशिवाय नस दुखते आहे हेही तुम्हांला कळत नाही हल्ली.

Previous articleशरद पवारच सेनानी, नव्या स्वातंत्र्यसंग्रामाचे!
Next articleआठवणीतील विद्यार्थी: उद्धव ठाकरे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.