जैन साधूंच्या ‘मुखपट्टी’चा वैज्ञानिक शोध

– रघुनाथ पांडे

मास्क नावाच्या साधनामुळे जगाला विषाणूविरुद्ध लढण्याची ताकद मिळाली. म्हणूनच भगवान महावीरांच्या अनुयायांना याचे श्रेय देतानाच मानवजातीवरील त्यांचे उपकारही जाणले पाहिजेत. ज्यांनी अहिंसेच्या मुळाशी समाजाला जोडले.

—–

हा आताच्या घडीचा चपखल विषय. म्हणून शोध सुरू आहे; अर्थात तो अपूर्ण आहे. या कृतीमागे जगाला निरामय आयुष्य देण्याची भावना आहे आणि तत्त्वज्ञानसुद्धा! मग ते आयुष्य सूक्ष्म जीवांचे असो की मानवाचे. हे जेवढे महत्त्वाचे तेवढेच या सोप्या कृतीतून जगण्याचे बळ मानवी समूहाला मिळते. भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अनेक दार्शनिक तत्त्वांची चर्चा नेहमीच होत असते. पण, आजच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या क्षणी संपूर्ण जग ज्या ‘मास्क’ नावाच्या ‘मुखपट्टीने’ जगण्यासाठी धैर्य एकवटत आहे, त्या मुखपट्टीचा नायक जैन धर्म आहे. जैनांतील मूर्तिपूजक, ग्रंथपूजक किंवा श्वेतांबरी, दिगंबरी, स्थानकवासी अथवा तेरापंथी असा पंथीय भेद याक्षणी आपण बाजूला ठेऊ. असे भेद सर्वत्र आहेतच. या काळात आपण सुरक्षित आणि निरामय जगण्याची जी गुरुकिल्ली जैन मुनी, साधू आणि साध्वीनी दिली त्यावर महावीरांच्या जयंतीनिमित्त विचार करू.

प्रामुख्याने श्वेतांबरी जैन मुनी व साध्वी आपल्या तोंडाला कायम एक पट्टी बांधतात. ती हनुवटीपासून नाकापर्यंत असते. तिला ते मुखपट्टी म्हणतात. आपण सोप्या, आताच्या आणि लगेच समजणाºया शब्दात त्याला ‘मास्क’ म्हणू. हा मास्क आता प्रत्येकाच्या आयुष्यातील सुरक्षा कवच बनला आहे. पण हजारो वर्षांची परंपरा असलेले जैनमुनी ही पट्टी सतत बांधतात. मुनिवरांचा पूर्ण चेहरा अनेकांनी कधी पाहिलाही नसावा, इतके ते या पट्टीशी बांधील व एकनिष्ठ असतात. प्रश्न पडतो हे सुरक्षा कवच नेमके आले कुठून, कसे, कधी आले. आकार कसा तयार झाला, याचे तपशील रंजक असतीलही. पण हाती फार कमी माहिती लागली. अनेक मुनी, साध्वी, विचारवंत, अभ्यासकांशी चर्चा केल्यावर तेच ते मुद्दे सांगितले जातात. मुख्य मुुद्दा असा की, अहिंसा या सर्वोच्च तत्त्वातून मुखपट्टी जन्माला आली. आणि, आता ती कोरोनाच्या सावटात निरामय व सुरक्षित जगण्याचे महत्तम साधन बनली. ज्या कुणा दार्शनीकाला या पट्टीचे महत्त्व कळले असावे, त्याला सर्वांनी अभिवादनच करायला हवे. ही पट्टी ‘मास्क ’ बनून जगाला तारेल अशी भावना केवळ द्रष्टाच ठेऊ शकतो.

अभ्यासक सांगतात, वाणीचा संयम सांगणारी ही पट्टी आहे. त्याचवेळी शास्त्रीय आणि तांत्रिक कारणेही पुढे येतात. तोंडातून निघणाºया हवेमुळे वातावरणात पसरलेत्या सूक्ष्म जीवांची हिंसा होऊ शकते. त्यावर या पट्टीमुळे अंकुश लागतो आणि ‘जियो और जीने दो,’ हा प्रबळ विचार अधिक दृढ बनतो. आता, ही सवय केवळ मुनी, साध्वी किंवा संतांना नाही तर, जगण्याची धडपड करणाºया सर्वांनाच या पट्टीने तारले. तत्त्व महान, साधन सोपे आणि कृती समस्त मानवधर्माला ताकद देणारी आहे. तसे आपण बहुतेकवेळा बोलताना तोंडासमोर कापडी अस्तर ठेवत असतो. या कृतीचे कारण, आपल्यापुढ्यात असल्याच्या तोंडावर, अंगावर आपल्या तोंडातून, नाकातून उडणारे द्रव्य पसरू नये.

पण कालौघात आपण सगळ्यांनीच अशा चांगल्या सवयी वैचारिक भंगारात काढल्या. टीका केली, काय होतं असे म्हणून पारंपरिक व्यक्तिगत आणि सामूहिक स्वच्छतेला नख लावले. मात्र आता, निरामय जिंदगीची खात्रीशीर योजना म्हणजे – नाकातोंडाला जखडलेली ही पट्टी बनली आहे. भगवान महावीरांच्या अनुयायांनी जगण्याचे असे मौल्यवान साधन जनतेला दिले, याचे खरे मोल करण्याचा आजचा हा दिवस आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विश्वकोश संपादन करताना म्हटले की, भगवान महावीरांचे चरित्र म्हणजे साधुचरित्राचा प्रथम आदर्श आहे. तितिक्षा, क्षमा, अहिंसा, समता, त्याग आदी गुणांची परमावधी महावीरांच्या ठिकाणी झाली होती.जैन धर्माचे २३ वे तीर्थकर पार्श्वनाथ हे महावीरांच्या आधी २५० वर्षे होऊन गेले होते. पार्श्वनाथांनी सत्य, अस्तेय, अहिंसा व अपरिग्रह या चार तत्त्वांवर आपला धर्म उभारला होता. म्हणून तो चातुर्याम धर्म होता. महावीरांनी त्यात ब्रह्मचर्याची भर घालून त्याचे पंचयाम धर्मात रूपांतर केले. जुनी परंपरा खंडित करण्याऐवजी नव्या तत्त्वांशी तिचा मेळ घालण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. आज आपण ते सारे अनुभवत आहोत.

कर्मवाद सर्व धर्मांना मान्य असला आणि त्यांनी त्याचा पुरस्कार केला असला, तरी त्याची चर्चा जैन धर्माने जितक्या सूक्ष्म रीतीने व विस्तारपूर्वक केलेली आहे, तशी चर्चा अन्यत्र आढळत नाही. महबंध नावाचा ४०,००० श्लोकांचा प्राचीन ग्रंथ नुसत्या कर्मबंधाचे वर्णन करतो. म्हणूनच कर्मसिद्धांत हा जैन धर्माचा पाया आहे. जैन साधूला कोणताही परिग्रह म्हणजे घरदार, सामान, नोकरी, जमीनजुमला आदी ठेवता येणारी नाही, पण गृहस्थाला विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सर्व ठेवता येईल. लोभाचा त्याग हा अपरिग्रहामध्ये महत्त्वाचा भाग आहे आणि लोभाचा त्याग म्हणजे पुन्हा अहिंसा आलीच. सूर्यास्तानंतर न जेवणे, पाणी गाळून पिणे, मदिरात्याग, मितभाषण, जीवजंतू तोंडात जाऊ नयेत म्हणून मुखपट्टी बांधणे असे उपाय आले. आज संपूर्ण जग यातील काही परिग्रहशी अलगद जोडले जात आहे. मुखपट्टी हा त्याचाच एक वैज्ञानिक भाग. जो, ‘मास्क’ या आधुनिक नावाने वैद्यकीय बनला आहे. ताजे वैद्यकीय संदर्भ अठराव्या शतकातील शेवटीचे आहेत. पॅरिसमध्ये १८९७मध्ये फ्रेन्च सर्जन पॉल बर्गर यांनी प्रथम मास्कचा वापर केला. त्यानंतर सर्जिकल मास्क सुरू झाले. मुखपट्टीची ही शोधयात्रा अपूर्ण असली तरी, मास्क नावाच्या साधनामुळे जगाला विषाणूविरुद्ध लढण्याची ताकद मिळाली. म्हणूनच भगवान महावीरांच्या अनुयायांना याचे श्रेय देतानाच मानवजातीवरील त्यांचे उपकारही जाणले पाहिजेत. ज्यांनी अहिंसेच्या मुळाशी समाजाला जोडले.

(लेखक दैनिक पुण्य नगरीच्या विदर्भ आवृत्तीचे संपादक आहेत.)

संपर्क : ९८१८२१३५१५

Previous articleधर्मप्रसारक की रोगप्रसारक
Next articleइतिहास सत्ताधिशांच्या बाजूने असणारांचा असतो की विवेकाच्या?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here