टाटा उद्योगसमूहाचा नवा कर्णधार

नावामागे ‘टाटा’ नसलेला दुसरा माणूस 144 वर्षाचा गौरवशाली इतिहास असलेल्या टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदावर शुक्रवारी विराजमान होणार आहे. सायरस पालनजी मिस्त्री हे त्यांचं नाव. याअगोदर टाटा कुटुंबाशी थेट संबंध नसलेले सर नवरोजी सकलानवाला यांनी 1934 ते 38 अशी चार वर्षे या समूहाची धुरा सांभाळली होती. आता 4, 75, 721 कोटी रुपयांचं अवाढव्य साम्राज्याचे सहावे अध्यक्ष होत असलेले सायरस मिस्त्री हे केवळ ‘नॉन टाटा’च नाहीत, तर ‘नॉन इंडियन’सुद्धा आहेत. सायरस हे आयर्लडचे नागरिक आहेत. 2003 मध्ये त्यांना भारतीय नागरिकत्व सोडावं लागलं होतं. भारत सरकारने दोन देशाचं नागरिक होण्यास मंजुरी न दिल्याने मिस्त्री कुटुंबाने तेव्हा भारतीय नागरिकत्व सोडलं होतं. गेल्या वर्षी टाटा समूहाने रतन टाटांचा वारस म्हणून सायरस मिस्त्री यांचं नाव घोषित होण्याअगोदर मुंबईचं कॉर्पोरेट वतरुळ सोडलं, तर सायरस यांचं नाव कोणालाही माहीत नव्हतं. सायरस यांचे वडील पालनजी मिस्त्री हे बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व आहे. (आई आयरिश असून तिचं नाव पॅटसी पेरिश दुबशॉ असं आहे.) त्यांची ‘शापूरजी पालनजी अँण्ड कंपनी लिमिटेड’ ही कंपनी केवळ भारतातच नव्हे, तर जगात अव्वल मानली जाते. टाटा समूहापेक्षा तीन वर्षे अगोदर या कंपनीची ‘लिटलवूड पालनजी अँण्ड कंपनी’ या नावाने स्थापना झाली होती. ओमान सुलतानाच्या राजवाडय़ासह जगातील अनेक विख्यात इमारतींचं बांधकाम त्यांच्या कंपनीने केलं आहे. मुंबईच्या फोर्ट परिसरातील रिझर्व्ह बॅंक, स्टेट बॅंक, स्टॅण्डर्ड चॉर्टर्ड बँक, ग्रिंडले बॅंक आदी अनेक देखण्या इमारती या कंपनीनेच उभारल्या आहेत. जगातील सर्वात श्रीमंत पारशी माणूस असा बहुमान त्यांनी मिळविला आहे. जगभरातील श्रीमंतांची माहिती ठेवणार्‍या ‘फोब्र्स्’ या मासिकाच्या अंदाजानुसार शापूरजींची संपत्ती 9.8 बिलियन डॉलर्स एवढी आहे. टाटा समूहातही सर्वाधिक 18.5 टक्के शेअर त्यांच्या मालकीचे आहेत. (नवल वाटेल, पण रतन टाटा यांच्या नावे 1 टक्काही शेअर नाहीत.) वैयक्तिक संपत्तीचा निकष लावला, तर कुठल्याही टाटापेक्षा त्यांची संपत्ती कित्येकपटीने अधिक आहे.
 मात्र धनाढय़ अशा पालनजी मिस्त्री यांचे चिरंजीव एवढय़ाच एकाच पात्रतेवर सायरस मिस्त्रींची अध्यक्षपदी निवड झाली नाही. 48 वर्षाचे सायरस मिस्त्री आतापर्यंत शापूरजी पालनजी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सांभाळत होते. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी असलेल्या सायरस यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये व्यवसायाचे धडे गिरविले आहेत. घरच्या कंपनीसोबतच फोब्र्स् गोकाक अँण्ड युनायटेड मोटर्स अशा अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळांवर ते होते. 2006 पासून टाटा समूहातील सर्व कंपन्यांची मूळ कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळावर ते आहेत. टाटा सन्समध्ये सर्वाधिक शेअर, घराण्याचं भक्कम पाठबळ आणि अनुभव या जमेच्या बाजूच्या असल्या तरी सायरस मिस्त्रींची निवड एका रात्रीत झाली नाही. रतन टाटांनी 2009 मध्ये वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 2012 मध्ये आपण निवृत्त होणार अशी घोषणा केल्यानंतर टाटा समूहाच्या नवीन कर्णधाराचा शोध सुरू झाला होता. जवळपास दोन वर्षे ही प्रक्रिया चालली. टाटा समूहाच्या अध्यक्षपदासाठी रतन टाटांचे चुलतभाऊ नोएल टाटा, व्होडाफोनचे माजी सीईओ अरुण सरीन, पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नुयी, सिटीग्रुपचे विक्रम पंडित, गुगलचे निकेश अरोरा, क्लेटन डब्लिअरचे विंडी बांगा आदी अनेक नावांचा विचार झाला. नोएल टाटा यांच्याकडे सूत्रे येतील असा अंदाज होता. टाटा उद्योगसमूहाची सूत्रे कुठल्यातरी टाटांकडेच राहावीत, असे समूहातील अनेकांचे मतही होते. मात्र शेवटी शिक्कामोर्तब झाले ते सायरस मिस्त्रींच्या नावावर. स्वत: नोएल टाटा यांनीही सायरसचे नाव पुढे केल्याची माहिती आहे. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर 58 वर्षे राहिल्यानंतर जेआरडी टाटांनी रतन टाटांकडे सूत्रे सोपविल्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता. रतन टाटांची निवड त्यांच्या

प्रामाणिकपणामुळे केली का? त्यावर जेआरडींचं उत्तर मोठं विलक्षण होतं. ‘नाही, असं म्हटल्यास इतर प्रामाणिक नाहीत, असा त्याचा अर्थ निघतो. मी फक्त एवढंच सांगेल की, रतन हा इतरांपेक्षा अधिक माझ्यासारखा आहे.’ काहीसा असाच प्रकार या वेळीही झाला. सायरस मिस्त्रीचं आपल्यासारखंचं शांत, संयमित, लो-प्रोफाईल आणि व्यक्तीपेक्षा समूहाला भक्कम करण्याचा गुण रतन टाटांना अधिक भावला असल्याचं सांगितलं जातं. 
टाटा समूहाच्या अध्यक्षपदी टाटा नसणार याचं दु:ख काहींना निश्चितपणे असणार आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळालाही त्याची जाणीव आहे. म्हणूनच रतन टाटा यांना मानद अध्यक्षपद सोपविले जाणार आहे. नोएल टाटा हे संचालक मंडळावर असणारच आहेत. नवीन अध्यक्ष सायरस मिस्त्रीचं टाटांसोबत कुठलंच नातं नाही, असंही नाही. त्यांची छोटी बहीण अलूचं लग्न नोएल टाटा यांच्यासोबत झालं आहे. या अर्थाने ते टाटांचे मेहुणे आहेत. सायरस यांचं लग्न देशातील नामांकित वकील इकबाल छागला यांची कन्या रोहिका छागला यांच्याशी झालं आहे. सायरस यांना एक भाऊ आणि अलूसह दोन बहिणी आहेत. शापूरजी मिस्त्री हा त्यांचा मोठा भाऊ. आता शापूरजी पालनजी ग्रुपचा सर्वेसर्वा झाला आहे. त्याचा विवाह बेहरोझ सेठना यांच्याशी झाला आहे. लैला या त्यांच्या दुसर्‍या बहिणीने रुस्तम जहागीर यांच्याशी विवाह केला आहे. सायरस यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्वानाच उत्सुकता आहे. मात्र ते अलिप्त राहणेच पसंत करतात. ‘फॅमिली मॅन’ म्हणूनच ते त्यांच्या वतरुळात ओळखले जातात. सेलिब्रिटीच्या पाटर्य़ा आणि मीडियापासून सायरस कायम दूर राहतात. टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतरही आतापर्यंत त्यांनी कुठल्याही संपादक वा पत्रकाराला मुलाखत दिली नाही. तसंही टाटा समूहाचे आतापर्यंतच्या सर्व अध्यक्षांनी प्रसिद्धीपासून दूर राहणेच पसंत केले आहे. त्यांना गोल्फ खेळायला आणि आर्थिक घडामोडींवरील पुस्तकं वाचायला आवडतात. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पोर्ट युटिलिटी प्रकारातील कार हासुद्धा इंटरेस्टचा विषय आहे. कुटुंबात रमणे त्यांना आवडते. केवळ 48 वर्षाच्या सायरस मिस्त्रींच्या कारकिर्दीत टाटा समूह आणखी कुठली उंची गाठतो हा उत्सुकतेचा विषय असणार आहे. आज टाटा समूह जगभर विस्तारलेला आहे. कोरस, टेटली, जग्वार, लॅन्ड रोव्हर या जगातील आघाडीच्या कंपन्या गेल्या काही वर्षात टाटांनी खरेदी केल्या आहेत. मिठापासून कारपर्यंत आणि चहापासून पोलादापर्यंत हजारो वस्तूंची निर्मिती करणार्‍या टाटांनी इंग्लंडमध्ये खासगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती आहे. (ज्या इंग्रजांनी 150 वर्षे आपल्यावर राज्य केलं तेथील नागरिकांना आज टाटा रोजगार देतात, हा भारतीयांसाठी अभिमानाचा विषय आहे.) इंग्लंडसोबतच, अमेरिका, चीन, कोरिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड, इंडोनेशिया अशा अनेक देशांत टाटांचा कारभार पसरलेला आहे. आज संपूर्ण जगभर एक कोटी लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टाटांशी जोडले गेले आहेत. जगातील 750 कोटी नागरिकांपैकी जवळपास 300 कोटी नागरिक टाटांच्या कुठल्या तरी उत्पादनाचा वापर करतात. अशा प्रकारे जग व्यापणार्‍या टाटांचा हा वारसा सायरस मिस्त्री कसा सांभाळतात याकडे आता सार्‍यांचे लक्ष असणार आहे. 
                                                                   टाटांचा वारसा
जमशेटजी नुसेरवानजी टाटा यांनी 1868 मध्ये टाटा उद्योग समूहाची स्थापना केली. त्यांच्या मृत्यूनंतर 1904 मध्ये त्यांचा सुपुत्र सर दोराबजी टाटा यांच्याकडे समूहाची सूत्रे आलीत. 1934 मध्ये त्यांच्या निधनानंतर सर नवरोजी सकलानवाला हे अध्यक्ष झालेत. त्यानंतर 1938 मध्ये जेआरडी टाटा समूहाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. ते तब्बल 53 वर्षे टाटा समूहाचे कर्णधार होते. 1991 मध्ये त्यांनी राजीनामा देऊन रतन टाटांकडे कारभार सोपविला. आता तीच परंपरा कायम ठेवत रतन टाटा आपले सावत्र भाऊ नोएल टाटा यांचे मेहुणे असलेले सायरस मिस्त्री यांच्याकडे टाटांचा गौरवशाली वारसा शुक्रवारी सोपविणार आहेत.
                                                                  टाटांपेक्षा मोठा वाटा

टाटा सन्समध्ये कुठल्याही टाटांचे शेअर अगदी अल्पप्रमाणात असताना शापूरजी पालनजी कंपनीकडे 18.4 टक्के शेअर कसे याची अनेकांना उत्सुकता आहे. त्याची कहाणी रंजक आहे. जेआरडी टाटांचे लहान भाऊ दोराबजी टाटा यांनी जेआरडींसोबतच्या मतभेदातून एक दिवस रागाने आपले सर्व शेअर विकावयास काढलेत. त्या वेळी पालनजी मिस्त्रींनी ते खरेदी केलेत. तेव्हापासून टाटा सन्समध्ये टाटांपेक्षाही मोठा वाटा पालनजींचा राहिला आहे. मात्र याचा गैरफायदा त्यांनी घेतला नाही, असे उद्योग वतरुळातील जाणकार सांगतात.
(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)

Previous articleआपण अजूनही बहयाडबेलने त बहयाडबेलनेच !
Next articleखोडकेंची खरी परीक्षा 2014 मध्येच!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.