टिकटॉक व गुगलची अभद्र युती आणि भारतीयांच्या भावनेची माती !

-शेखर पाटील

कोट्यवधी युजर्सला वेड लावणार्‍या टिकटॉकच्या धोकेदायक पैलूंबद्दल अधून-मधून माहिती समोर येत असली तरी याला कुणी गांभीर्याने घेतले नव्हते. तथापि, आता भारतीय युजर्सनी टिकटॉकला पुअर रेटींग देऊन याचा बाजार उठविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होताच त्यांच्या मदतीला गुगल धावून गेल्याचे दिसून येत आहे. भारतीयांच्या भावनांना अक्षरश: फाट्यावर मारून गुगलने तब्बल ८० लाख रेटींग्ज व निगेटीव्ह रिव्ह्यूज डिलीट करून टाकले आहेत. यामुळे टिकटॉकचे रेटींग पुन्हा एकदा चारच्या पलीकडे गेले आहे. आपण कितीही ‘स्वदेशी…स्वदेशी’चा नारा बुलंद केला तरी बलदंड विदेशी टेक कंपन्या कुणालाही जुमानत नसल्याचे यातून पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. अमेरिकन गुगल आणि चीनी टिकटॉकची अभद्र युती हे याचेच ताजे उदाहरण आहे.

टिकटॉक विरोधात सोशल मीडियात उद्रेक झाला असून अनेक भारतीय युजर्सनी नकारात्मक प्रतिक्रिया देऊन या अ‍ॅपला फक्त एक रेटींग दिले असल्याने याची सरासरी रेटींग घसरल्याचे दिसून आले होते. याबाबतचे सविस्तर वृत्त आपण https://bit.ly/2WKaatg या लिंकवर क्लिक करून वाचू शकता. आता याच्या पुढील प्रकार हा अजून धक्कादायक आहे. लक्षावधी भारतीय युजर्सनी टिकटॉक अ‍ॅप डिलीट केले असून या आधी याला १ रेटींग दिली आहे. यामुळे काही दिवसांमध्येच टिकटॉकचे गुगल प्ले स्टोअरवरील रेटींग हे साडे चार वरून १.२ इतके घसरले होते. गुगल प्ले स्टोअरवरील रेटींग हे संबंधीत अ‍ॅपची गुणवत्ता व युजर्समधील पत दर्शविणारे असते. साधारणपणे एकच्या खाली रेटींग असल्यास गुगल हे संबंधीत अ‍ॅपला रिमूव्ह करू शकते. यामुळे भारतीय युजर्स टिकटॉकच्या मागे हात धुवून लागले होते. तथापि, हा सर्व प्रकार अगदी विकोपाला पोहचण्याआधीच टिकटॉकच्या मदतीला गुगल धावून गेले. गुगलने भारतीय युजर्सचे रेटींग आणि निगेटीव्ह कॉमेंटस या ‘स्पॅम/मास अटॅक’ या प्रकारातील असल्याचे सांगत जवळपास ८० लाख कॉमेंट आणि रेटींग्ज डिलीट करून टाकले. यामुळे टिकटॉकला गुगल प्ले स्टोअरवर आधी असणार्‍या आकडच्या जवळपास म्हणजे ४.४ इतकी रेटींग असल्याचे दिसून येत आहे.

बहुतांश टेक कंपन्या या विविध अ‍ॅप्स वापरण्यास देण्याआधी युजरकडून विविध परवानग्या घेत असतात. याचा काय दुष्परिणाम होईल याबाबत कुणी युजर सहसा विचार करत नाहीत. याच प्रमाणे अ‍ॅप्स वापरण्याच्या अटी-शर्ती-नियम हे देखील सर्वसामान्यांना फारसे समजत नाहीत. यामुळे भारतीयांच्या क्षुब्ध भावनेला ‘मास अटॅक’ ठरवून त्यांना ‘रिसायकल बीन’ दाखवतांना गुगलने देखील नियमांचाच आधार घेतला आहे. तथापि, टिकटॉकमधील त्रुटींकडे सोयिस्करपणे कानाडोळा करत, भारतीय युजर्सच्या भावनांशी खेळ करण्याचा अधिकार गुगलला कुणी दिला ? याचे उत्तर आपल्याला मिळणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात चीनी प्रॉडक्ट आणि टेक कंपन्यांबाबत जगभरात तीव्र जनक्षोभ उसळल्याचे दिसून येत आहे. असे असतांना, टिकटॉक सारख्या चीनी कंपनीच्या पाठीशी गुगलचे भक्कमपणे उभे राहणे अनाकलनीय आहे. म्हणजे व्यवसायापोटी गुगलने पत्करलेली ही शरणागती होय. खुद्द चीनमध्ये गुगलला बंदी असतांनाही भारतासारख्या त्रयस्थ देशात गुगलने टिकटॉकला केलेली मदत ही चीनी कंपन्यांच्या वर्चस्वाची ग्वाही देणारी ठरली आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे भारत सरकारची अशा प्रकरणांवरील चुप्पी होय. गत महिन्यात फेसबुकने रिलायन्स जिओमधील मोठा हिस्सा खरेदी केला आहे. तर आता गुगल देखील आयडियात गुंतवणूक करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. याचमुळे तर भारतात अजस्त्र गुंतवणुकीतून प्रवेश करणार्‍या टेक कंपन्या पारदर्शकतेच्या ठिकर्‍या उडवत असतांनाही त्यांना जाब विचारण्यास कुणी समोर येत नाही ना ? असा प्रश्‍न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

टिकटॉकने गेल्या महिन्यात दोन अब्ज म्हणजे २०० कोटी युजर्सचा टप्पा पार केला. यात चीन वगळता सर्वाधीक म्हणजेच तब्बल ६० कोटी युजर्स हे भारतातील आहेत. खरं तर हे अ‍ॅप आधीपासूनच वादात सापडलेले आहे. या अ‍ॅपवर युजर्सची गोपनीय माहिती चोरण्याचा आरोप लागलेला आहे. तर गेल्या वर्षी यावर आक्षेपार्ह कंटेंट आढळून आल्याने भारतासह काही देशांमध्ये यावर बंदी घालण्यात आली होती. भारतात काही दिवसांमध्येच बंदी उठविण्यात आल्यानंतर टिकटॉक सुसाट गतीने लोकप्रिय झाल्याचे आधीच स्पष्ट आले आहे. आता पुन्हा एकदा टिकटॉक विरोधात भारतीय जनमानस क्षुब्ध झाले असले तरी गुगलच्या मदतीने या अ‍ॅपने भारतीयांना वाकुल्या दाखविल्याचे दिसून येत आहे. बलाढ्य विदेशी टेक कंपन्यांना वेसण घालण्याची ताकद ना भारत सरकारमध्ये आहे ना भारतीय जनतेत ! आत्यंतीक कटू असले तरी हेच आजचे सत्य असल्याचे आपल्याला स्वीकारावे लागणार आहे. बाकी ‘स्वदेशी जिंदाबाद’… !

(लेखक नामवंत पत्रकार , ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत.)

92262 17770

https://shekharpatil.com

Previous article सूर्यकांता पाटीलांची निवृत्ती आणि मराठवाड्याचं ‘न’  नेतृत्व…
Next article ‘स्पेस एक्स’ ने घडविला इतिहास
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.