दीपिकाचा ‘चॉईस’ हवाय कोणाला ?

माझं शरीर, माझं मन, माझी निवड Deepika
मी माझ्या पसंतीचे कपडे घालते; पण
माझ्या आत्म्याला कपड्याची काही सक्ती नाही
ही माझी निवड आहे
………………………………………..
माझी मर्जी की, मी झिरो साईज राहील किंवा साईज पंधरा
तुझ्याजवळ माझ्या आत्म्याच्या कपड्याचं कोणतं माप नाही
आणि कधी असणारही नाही.माझ्या आत्म्याला कॉटन आणि सिल्कमध्ये बंदिस्त करणे म्हणजे…
ब्रह्मंडाला वाढू देण्यास अटकाव करणे होय.
किंवा सूर्याला मुठीत बंद करण्याचा प्रयत्न करण्यासारखं ते आहे.
तुझा मेंदू पिंजर्‍यात बंद आहे त्याला मोकळं कर
माझं शरीर बंदी नाही, त्याला असंच राहू दे
शेवटी ही माझी मर्जी आहे
…………………………………….मी लग्न करायचं की नाही
ही माझी मर्जी आहे
मी लग्नाच्या आधी सेक्स करेल किंवा लग्न झाल्यानंतरही…
किंवा सेक्सच करणार नाही… ही माझी मर्जी आहे.
मी काही क्षणांच प्रेम करेल किंवा कायमस्वरूपी वासनेत चिंब भिजेल
ती माझी मर्जी असेल
मी एखाद्या पुरुषावर प्रेम करेल किंवा बाईवर… किंवा दोघांवरही
लक्षात ठेव… ती माझी पसंती असेल.
लक्षात ठेव तू माझी पसंती आहे…मी तुझी संपत्ती नाही.
…………………………………………………
माझ्या कपाळावर कुंकू, माझ्या बोटात अंगठी
माझ्या नावासमोर तुझं आडनाव जोडणे…
या गोष्टी बदलल्या जाऊ शकतात.
मात्र माझं प्रेम बदलू नाही शकत
त्याला सांभाळून ठेव… मात्र शेवटी ती माझी मर्जी आहे.
ही माझी मर्जी असेल की, मी घरी केव्हा येईल
मी जर पहाटे ४ वाजता घरी आली तर त्रस्त नको होऊ
आणि जर सायंकाळी ६ वाजता घरी आली
तर जास्त आनंदी होऊ नको
शेवटी ती माझी मर्जी आहे
मी तुझं अपत्य जन्माला घालायचं की नाही…
करोडो माणसातून तुझी निवड करायची की नाही…
ही माझी मर्जी असेल.
…………………………………………………………………
माझा आनंद कदाचित तुला दु:ख पोहोचवू शकतो
माझा अंदाज तुला चुकीचा वाटू शकतो
जे तुझ्या नजरेत पाप आहे ते मला पुण्य वाटू शकते
माझी पसंती माझ्या बोटाच्या ठशाप्रमाणे आहे
जे मला जगात वेगळी ओळख देतात
मी एक वृक्ष आहे, जंगल नाही
मी बरसणार्‍या बर्फाचा एक कण आहे… तो तूही आहे.
जागा हो… जुन्या रितीरिवाजातून बाहेर ये
मी कोणाच्या दु:खात सामील होईल किंवा नाही
शेवटी माझी स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे
मी ब्रह्मंड आहे.. विश्‍व आहे
मी प्रत्येक दिशेत अनंत आहे, अफाट आहे
शेवटी ही माझी मर्जी आहे.
……………………………………………………..

आजची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोन हिच्या सोशल मीडियावर सध्या गाजत असलेल्या ‘माय चॉईस’ या व्हिडीओत तिच्या तोंडी असलेलं हे मनोगत आहे. या व्हिडीओवरून सध्या परस्परविरोधी मतांचा गदारोळ उठला आहे. मी लग्नाच्या आधी सेक्स करेल किंवा लग्न झाल्यानंतरही… किंवा सेक्सच करणार नाही… मी काही क्षणांच प्रेम करेल किंवा कायमस्वरूपी वासनेत चिंब भिजेल… मी एखाद्या पुरुषावर प्रेम करेल किंवा बाईवर… किंवा दोघांवरही…हे आणि यासारखे व्हिडीओतील मुद्दे वादाचे ठरले आहेत. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने तयार केलेला हा व्हिडीओ महिलांना स्वैराचारासाठी प्रोत्साहन देणारा आहे, अशी जोरदार टीका संस्कृतीरक्षकांकडून होत आहे. सिनेइंडस्ट्रीतूनही सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे . ‘कपड्यांची निवड आणि सेक्सचं स्वातंत्र्य म्हणजे महिला सक्षमीकरण नाही’, असा उपदेशाचा डोज त्यांनी दीपिकाला पाजलाय. दुसरीकडे टोकाचे स्त्री मुक्तीवाले दीपिकाचं काय चुकलं? स्त्रीला तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार हवाच. पुरुष जसं त्याला हवं ते करू शकतो. तसाच अधिकार स्त्रियांनाही हवा, असा युक्तिवाद करत आहे. सर्वसामान्य स्त्री-पुरुषांच्या आकलनापलीकडच्या या विषयावर इंग्रजी वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाच्या भिंतींवर मस्त धुमश्‍चक्री रंगली आहे.
हा व्हिडीओ ‘फाइंडिंग फॅनी’, ‘बीईंग सायरस’ हे चित्रपट बनविणार्‍या होमी अदजानिया यांनी तयार केला आहे. यात दीपिकासोबतच दिग्दर्शक फरहान अख्तर व विधू विनोद चोप्रांच्या पत्नीशिवाय हाय सोसायटीतील इतरही अनेक महिला आहेत. आता ही नावं वाचल्यानंतर या प्रकारचा व्हिडीओ आणि त्यातील महिलांच्या चॉईसबाबत आश्‍चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण अशा प्रकारचा चॉईस ठेवणे किंवा मर्जी राखणे हे त्यांनाच पेलू शकते आणि परवडूही शकते. अर्थात असा ‘चॉईस’ किंवा अशी ‘मर्जी’ इतर वर्गातील महिलांच्या डोक्यात डोकावतच नसणार असं मात्र अजिबात नाही. मात्र अशा प्रकारची मर्जी राखण्यासाठी खूप काही गोष्टी अनुकूल लागतात. सर्वात प्रथम म्हणजे त्या स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य हवं. दुसरं म्हणजे लोक वा समाज काय म्हणतो किंवा कुटुंब काय विचार करतं, याची अजिबात चिंता न करणारी वृत्ती हवी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मर्जीच्या नावाखाली जे काही करायचं आहे, त्याचे परिणाम भोगायची तयारी हवी. हे सगळं बोलून दाखवणारी वा प्रत्यक्ष जगणारी दीपिका ही काही पहिली महिला नाही. सिनेमा, फॅशन आणि ग्लॅमर इंडस्ट्रीत बर्‍याच स्त्रिया अशा जगतात. अनेकजणी त्यातून आयुष्यभर आनंद घेतात. त्यापेक्षा अधिक बरबाद होतात. शेवटी हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा विषय असतो.
या विषयात संस्कृतीरक्षक काय म्हणतात, हे गंभीरतेने घ्यायची अजिबात गरज नाही. संस्कृती आणि संस्काराच्या नावाखाली या देशात काय काय प्रकार चालतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ज्यांच्या घरी २४ तास ३६५ दिवस संस्कृतीचा जयघोष चालू असतो त्या घरातील महिलांनी लग्नाआधी सेक्स केला नसतो किंवा लग्नानंतर त्यांच्या डोक्यात परपुरुषांचे विचार येतच नाही, असे काही नाही. त्यांच्या मनात काय काय येतं हे कधी चुकूनमाकून जरी उघड झालं तरी संस्कृतीरक्षकांचे ब्रह्मंड डळमळून जाईल. शेवटी हे सारं नैसर्गिक असतं. त्यामुळे धक्का बसावा असं काही नाही. फक्त ज्यांना ते पेलतं आणि ज्यांची परिणाम भोगायची तयारी असते त्या दीपिकासारख्या मुली एका वर्षात चार-चार बॉयफ्रेंड बदलविण्याची आणि फिल्मी पाटर्य़ात रात्री उशिरापर्यंत दारू ढोसण्याची निवड करू शकतात. अर्थात हे सगळं करते म्हणून दीपिकाच्या व्यक्तित्वात कुठलं न्यून येत नाही किंवा तिच्या कामातही ती कुठे कमी पडते, असं होत नाही. अभिनयाचं तिचं काम ती अतिशय मेहनत आणि निष्ठेने करते. बाकी वैयक्तिक आयुष्यात कसं जगावं ही मात्र तिची मर्जी आहे. बाकी कोणाच्याही जगण्याच्या विषयात सरसकट एक असा कुठला नियम लावता येत नाही. सर्वसामान्य माणूस स्खलनशील असतो आणि एखाददुसरा अपवाद वगळता बहुतेकांचे पाय मातीचे असतात.’ज्यांनी आयुष्यात कुठलंच पाप केलं नाही, त्यांनाच दुसर्‍यावर खडा उगारण्याचा अधिकार आहे’, हे येशू ख्रिस्ताचं वाक्य आपण सर्वांनीच कायम लक्षात ठेवायला हवं.
बाकी दीपिकाच्या व्हिडीओने महिला सक्षमीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या व्हिडीओच्या निमित्ताने दीपिकावर जी टीका होत आहे त्यातील एक मुद्दा तेवढा खरा आहेतो म्हणजे, दीपिका म्हणते तसं झिरो साईज, लग्नापूर्वी किंवा लग्नानंतरही सेक्स, कोणापासूनही अपत्य.. अशा निवडीचं स्वातंत्र्य किमान सर्वसामान्य स्त्रियांना नको आहे. त्यांना फक्त पुरुषांप्रमाणेच एक माणूस म्हणून जगण्याचं तेवढं स्वातंत्र्य हवं. सर्वात प्रथम एका मुलीच्या गर्भाला गर्भाबाहेर येण्याचं स्वातंत्र्य हवं. जगात आल्यानंतर बरोबरीच्या नात्यानं निकोप वाढ होण्याचं स्वातंत्र्य तिला हवं. त्यानंतर हवं ते शिक्षण घेण्याची मर्जी तिला असली पाहिजे. नोकरी वा अर्थार्जन कुठल्या क्षेत्रात करायचं याची निवड तिला करता आली पाहिजे. त्यानंतर तिला हवा तो जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं आणि लग्नानंतर छोटे-मोठे निर्णय स्वत:चे स्वत: घेता येईल एवढी निवड करण्याची मर्जी ती बाळगू शकली तरी खर्‍या अर्थाने ‘इट्स माय चॉईस’ असं ती म्हणू शकेल.
अविनाश दुधे
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Previous articleमाहितीमारेकऱ्यांचा मुखभंग
Next articleबाबासाहेब, आम्हाला माफ करा !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here