देवाचे गद्दार! भाजपात उद्धार!

 -ज्ञानेश महाराव

———————————–

राजर्षि शाहू महाराजांच्या काळात दासराम जाधव नावाचे ‘सत्यशोधक’ लेखक होते. त्यांनी वर्तमानाला भिडेल, असं काव्य लिहिलंय-उठा उठा हो, बंधू जन हो।

काळ नव्हे हा, निजण्याचा-

झोपे खाली, जीवन गेले।

नाश जाहला राष्ट्राचा॥१

झोप नव्हे हा, काळच जाणा।

अखेरची ही, नाश घडी –

भोंदू-कपटी, तुम्हां फसविण्या।

एकमते मारिती, मिठी॥२

सर्वपरीने, नागविले तरी।

शुद्ध न तुम्हां, अजून का?

कंठ शोषला, जागृत व्हाया।

मारू आम्ही, किती हाका?॥३

देव-दैव ह्या, अफाट थापा।

पतनाची ती, नशा असे-

बुद्धिपुढती, सर्व फिके हो।

स्वादावीण, पक्वान्न जसे॥४

असत्याचा वेध-भेद घेणारं सत्य किती टोकदार-धारदार असतं, त्याचा हा अस्सल नमुना आहे. कुठल्याही संत-सुधारकांनी देव देवळात आहे; मूर्तीत आहे; असे सांगितलेले नाही. महात्मा फुले स्पष्टपणे सांगतात,

कल्पनेचे देव, कोरिले उदंड।

रचिले पाखंड, स्वार्थासाठी॥

थोतांडे रचुनी, अज्ञा फसविती।

भटे लाच खाती, राजरोस॥

हे अंजन दीडशे वर्षांपूर्वी घातलंय. याआधी, म्हणजे आजपासून ८०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर ‘अमृतानुभव’मध्ये म्हणतात-

देव हे कल्पित, शास्त्र हे शाब्दिक।

पुराणे सकळ, बाष्कळिक ॥

असे अनेक दाखले देता येतील. ते जगजाहीर असूनही; देव-धर्माचा पगडा ‘धर्म- भक्ती- अध्यात्म- सत्संग’च्या नावाखाली लोकांच्या डोक्यात घट्ट ठोकून, त्यांचे सामाजिक, आर्थिक आणि संधी मिळताच लैंगिक शोषणही केले जाते. अयोध्येतल्या मंदिर-मशीद वादापासून गेले ३० वर्ष मेंदूचा दगड बनविणाऱ्या देव-धर्माचा वापर राजरोसपणे राजकारणासाठी आणि सत्ताकारणासाठी केला जातोय. त्याचाच साक्षात्कार म्हणून या वर्षाच्या सुरुवातीला गोवा राज्याची विधानसभा निवडणूक झाली, तेव्हा ’काँग्रेस’ने आपल्या उमेदवारांकडून निकालानंतर सत्तेच्या खेळात पक्षविरोधी कृती करणार नाही; अशी खात्री देणारी प्रतिज्ञापत्रे घेतली. तसेच, ज्या मतदारसंघात उमेदवारी दिलीय, तेथील जागृत देवस्थानात जाऊन ’आमदार झाल्यावर काँग्रेस सोडणार नाही,’ अशा जाहीर शपथा उमेदवारांना घ्यायला लावल्या. कारण, २०१७च्या विधानसभा निवडणूक निकालात ‘काँग्रेस’ने बहुमत प्राप्त केले नाही, तरी ४० पैकी १७ जागा जिंकून ‘क्रमांक एक’चा पक्ष झाला होता. ‘भाजप’ला १३ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस’ श्रेष्ठींनी सत्ता हाती घेण्यासाठी तातडीने हालचाली केल्या पाहिजे होत्या. पण ते बहुमतासाठी उर्वरित अपक्ष व छोट्या पक्षातील आमदारांतून स्वत:हून कुणी येतं का, याची वाट पाहात बसले. ती संधी ‘भाजप’ने साधली. ‘म.गो. पक्ष’, ‘गोवा फॉरवर्ड पार्टी’ आणि अपक्ष आमदारांना साथीला घेऊन ‘भाजप’ने बहुमत गाठले. हे आघाडी सरकार टिकवून ठेवण्यासाठी मनोहर पर्रिकर केंद्रीय संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा देऊन गोव्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी लवकरच ‘काँग्रेस’चे काही आमदार फोडून ’भाजप’मध्ये आणले आणि आपले सरकार अधिक भक्कम केले. तेच काम गोव्याचे सध्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेय.

मार्च २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘भाजप’ने २० आणि ‘काँग्रेस’ने ११ जागा जिंकल्या. ’भाजप’ला स्पष्ट बहुमत मिळाले. पण स्थिर सरकारसाठी ’भाजप’ने ‘महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष’चे आमदार रामकृष्ण ढवळीकर व जीत अरोलकर; आणि चंद्रकांत शेट्ये, ऍलेक्सियो लॉरेंन्सो व अँटिनियो वास ह्या अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवला. त्यामुळे ‘भाजप’ सरकारचे संख्याबळ २५ आमदारांचे झाले. प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्री झाले. तरीही ’येत्या १० ते १५ महिन्यांत आमचं सरकार येईल,’ असा दावा ‘काँग्रेस’ आमदार व विरोधी पक्षनेते असलेल्या मायकल लोबो यांनी केला होता.

तथापि, गेल्या आठवड्यात मायकल लोबो हे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह ८ आमदारांना घेऊन ‘भाजप’मध्ये गेले. ‘काँग्रेस’ गयारामांची ही संख्या दोन-तृतीयांश असल्याने हे फुटीर ’पक्षांतर बंदी’ कायद्याच्या कचाट्यातून सुटले. ह्या ८ आमदारांतील संकल्प आमोणकर हे आपण ’कट्टर निष्ठावंत काँग्रेसी’ असल्याचे दाखवत होते. पण ते फुटल्यानेच फुटिरांचा गट कायदेशीर झाला. ह्याचा अर्थ, सत्तेसाठी आसुसलेल्यांना निष्ठा, प्रतिज्ञापत्रे, देवापुढे घेतलेल्या शपथा, ह्याचं काहीही घेणं-देणं नसतं. त्याची उठाठेव त्यांना मत देणाऱ्या मतदारांना असते. म्हणूनच दिगंबर कामत यांना पत्रकारांनी ‘देवळात घेतलेल्या शपथेबाबत’ विचारताच, ते म्हणाले, ”भाजपमध्ये सामील होण्यासाठी मला देवानेच परवानगी दिलीय!” ही बुवाबाजीला साजेशी थाप आहे.

’काँग्रेस’मधील विविध पक्षांच्या ३७ उमेदवारांनी आपापल्या धर्माच्या देवळात आणि चर्च-दर्ग्यात जाऊन, ‘भाजप’मध्ये कधीही जाणार नाही, अशी शपथ घेऊनही २६ आमदार पराभूत होत असतील आणि त्या आणाभाकांकडे ज्याच्या-त्याच्या देवाचे दुर्लक्ष होत असेल; तर त्याच्या नावाने थाप मारायला हरकत नाही, असा विचार दिगंबर कामत यांनी केला असावा. विशेष म्हणजे, तो त्यांच्या मतदारांनाही पटला असावा. त्यामुळेच देवाला दिलेल्या शब्दाशी गद्दारी करणारे आमदार हिंदू देव-देवता रक्षक ‘भाजप’ला चालले! किंबहुना, ‘भाजप’च अशा देवालाही खोटे ठरविणाऱ्या आमदारांचा रक्षक-उद्धारक झाला आहे. ते चालायचंच. पण ‘शपथ मोडणाऱ्याचे वाटोळे होईल,’ असा थयथयाट ‘काँग्रेस’मधूनही उठला नाही, ह्या चुपकीला काय म्हणावं?

——————

देवाचे भय-भूल कुणाला?

भाजप’ आणि ‘काँग्रेस’ ह्या दोन्ही ’राष्ट्रीय’ पक्षांच्या सारख्याच लायकीच्या चालूगिऱ्या चव्हाट्यावर आणण्याचं काम मनोज परब यांच्या ’रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी’ने (आरजीपी) केले. हा पक्ष म्हणजे पूर्वीच्या ‘शिवसेना’ची गोव्यातली प्रतिकृती आहे. गोव्यातल्या भूमिपुत्रांना नोकरी-धंद्यात प्राधान्य मिळालं पाहिजे, यासाठी ते आग्रही आहे. परराज्यातून नोकरी-धंद्यासाठी आलेली लोकं सरकारी जमिनीवरच्या अतिक्रमणासाठी आणि मतदानासाठी कशाप्रकारे वापरली जातात, ह्याचा भंडाफोड मनोज परब आणि त्यांचे सहकारी सातत्याने करीत असतात. आंदोलनाच्या माध्यमातून शासक- प्रशासकांच्या भ्रष्टाचाराची चिरफाड करतात. ह्या लोकजागृतीसाठी ‘सोशल मीडिया’ प्रभावीपणे वापरतात.

ह्या जनप्रबोधनाच्या माध्यमातूनच ‘आरजीपी’ची निर्मिती झालीय. ३७ वर्षांचे मनोज परब हे ‘आरजीपी’चे संस्थापक आहेत. ते उच्चशिक्षित असून इंग्रजी, कोंकणी, हिंदी व मराठी प्रभावीपणे बोलतात. तरुणांत ते लोकप्रिय नेते आहेत. प्रशासनावर दरारा आहे. ह्या बळावर त्यांनी मार्च २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत ४० पैकी ३६ मतदारसंघात ’आरजीपी’चे उमेदवार उभे केले. या उमेदवारांत सर्व धर्म-जातीचे उमेदवार होते. त्यांची टक्कर ‘भाजप’ व ‘काँग्रेस’ ह्या राष्ट्रीय पक्षांशी होती; तशीच ‘म.गो.पक्ष’ व ‘गोवा फॉरवर्ड पार्टी’ या प्रादेशिक पक्षांबरोबरही होती. सोबत, दिल्लीत सत्ता असलेल्या ‘आप’, पश्चिम बंगालमध्ये सत्ता असलेल्या ‘तृणमूल काँग्रेस’ आणि महाराष्ट्रातील ’शिवसेना’ व ’राष्ट्रवादी काँग्रेस’ या पक्षांविरोधातही ‘आरजीपी’ लढत होती.

यातील ’म.गो. पक्षा’चे व ‘आप’चे प्रत्येकी दोन आमदार; तर ‘गोवा फॉरवर्ड’ आणि ‘आरजीपी’चा प्रत्येकी एक आमदार विजयी झाला. ‘आरजीपी’चे हे यश ’राष्ट्रवादी काँग्रेस’, ’तृणमूल काँग्रेस’ आणि ’शिवसेना’ पक्षाच्या तुलनेत तोलले पाहिजे. हे पक्ष त्यांच्या राज्यात तेव्हा सत्ताधारी होते. तरीही त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही. ‘आरजीपी’चे *वीरेश बोरकर* हे ‘आंद्रे’ मतदारसंघातून विजयी झाले; तर मनोज परब हे ’वळपई’ मतदारसंघातून पराभूत झाले. ‘आरजीपी’च्या अनेक उमेदवारांनी दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली. त्यामुळे ‘आरजीपी’ आपली संघटितशक्ती वाढवत गोव्यात काम करतोय. ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच गोव्यातल्या ताज्या पक्षांतराला कडाडून विरोध केला. ”काँग्रेस’ आणि ’भाजप’ ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत,” हे मनोज परब यांनी ठणकावून सांगितले आहे.

सत्ता मिळवायची-टिकवायची तर संघटनशक्ती वाढवावी लागते. अशी जमवाजमवी करूनच ’काँग्रेस’ने देशात आणि राज्यात आपली सत्ता अनेक वर्षे टिकवून ठेवली होती. तोच उद्योग आता ‘भाजप’ करतोय. कारण सत्ता नसल्यामुळे ’काँग्रेस’वाल्यांना जमवाजमवीचं राजकारण करणं अवघडच नाही, तर अशक्य झालंय. म्हणून पळापळी सुरू आहे. सगळ्याच ’काँग्रेस’ पुढाऱ्यांना समाधान देईल, अशी सत्तेची खुर्ची हवी असते. कुणाला तिरडीवरून जाईपर्यंत खुर्ची हवी असते. कुणाला मुलाची, पुतण्याची, मुलीची, जावयाची, मेहुण्याची ’आमदार’ म्हणून सोय लावायची असते. यासाठी आपसात लढून मरण्याची सवय असलेल्या ‘काँग्रेस’वाल्यांकडे सध्या सत्ताधारी ’भाजप’ पक्षाशी लढण्याचे बळ उरलेलं नाही. त्यापेक्षा त्यांना ‘भाजप’ पुढे शरणागती पत्करणे सोयीचे वाटते. तेच गोव्यात ‘काँग्रेस’च्या ८ आमदारांनी केले. कर्नाटक व मध्य प्रदेशात असेच ‘ऑपरेशन लोटस’द्वारे सत्ताबदल घडवण्यात आला. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये थोडे वेगळे घडले.

एकनाथ शिंदे ४० आमदार आणि १२ खासदारांसह उद्धव ठाकरे यांच्या ‘शिवसेना’पासून दूर झाले. ’शिवसेना’चा वेगळा गेट बनवला आणि ’भाजप’ बरोबर सरकार बनवून मुख्यमंत्री झाले. तर बिहारच्या नितीशकुमार यांना ’सरकार’मध्ये बरोबर असलेला ’भाजप’ आपल्या- ’जनता दल’ (संयुक्त) आमदारांत फूट पाडून सत्ताबदल घडवेल याचा अंदाज येताच; त्यांनी तेजस्वी लालूप्रसाद यादव यांच्या ’राष्ट्रीय जनता दला’शी युती केली आणि आपले मुख्यमंत्री पद वाचवले.

सत्तेसाठी राजकारणी देव-धर्माची फिकीर न करताना सरड्यापेक्षाही जलद रंग बदलतात ; पक्षबदल करतात. देवा-धर्माचे भय एक दिवसाच्या मतदार राजाला ! तशी संस्कार-संस्कृतीची भूल दिलेली असते ना !

—————–

निष्ठा-शपथवीरांना सत्तेचे जुलाब

गद्दारांचाही उद्धार करणाऱ्या देवांना काळीज नसेल ; पण मेंदू-बुद्धी आहे का,असा प्रश्न अलीकडे वारंवार पडतो. ‘देवा घरचे ज्ञात कुणाला’ असं म्हणून आपण गप्पही बसतो. पण थोड्या वेळाने ’संत जनाबाई’चे शब्द ओठावर येतात-

अरे विठ्या विठ्या ।

मूळ मायेच्या कारट्या-

तुझी रांड रंडकी जाली।

जन्मसावित्री चुडा ल्याली-

तुझे गेले मढे ।

तुला पाहुनी काळ रडे ॥

असे म्हणण्याची वेळ देव जनाबाईसारख्या ‘संत’ माणसावर का आणतो? आपली सुख दुःख दूर ठेवून लोकांसाठी झटणारी माणसं झाली म्हणून तर आपण स्वातंत्र्य-लोकशाही पाहू शकलो. या स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी झगडणार्या लोकनेत्यांनाही देव पारखून घेतो का? कारण ही मंडळी सत्तास्वार्थासाठी ‘देव सर्वशक्तिमान आहे,’ हा समज खोटा असल्याचे आपल्या वर्तन-व्यवहाराने वरचेवर दाखवून देत असतात. तरीही शब्दाला खोटा ठरलेला नेता मोठा होतो! ह्यात चूक कुणाची देवाची की खोट्या देवाला मानणाऱ्या लोकांची?

देव सर्वशक्तिमान असता, तर त्याने जगातल्या कित्येक गोष्टी सुधारल्या असल्या. त्याने लुळी-पांगळी-आंधळी मुलं जन्माला घातली नसती. माणसाला सर्वार्थाने हीन-दीन बनवणारे दारिद्र्य त्याने आवरले असते. रोगराईला आळा घातला असता. निदानपक्षी त्याने म्हाताऱ्यांना शिल्लक ठेवून त्यांच्या मुलांना उचलण्याची अघोरी दया तरी दाखवली नसती. देवसुद्धा भारतातल्या मतदारांसारखाच दुबळा- असहाय्य असला पाहिजे. देवालाही दयनीय करणाऱ्या कुठल्या तरी दुष्टशक्ती-महाशक्ती कार्यरत असाव्यात.

देवाबद्दल विचार करायला लागलं की अनेकांचं मन असं गोंधळतं. मग ’देव-दानवा नरे निर्मिले’ हे ठणकावून सांगणारे कविश्रेष्ठ केशवसुत आठवतात. ‘जे न देखे रवि, ते देखे कवि’ अशी म्हण आहे. या कवी मंडळींना जे सर्वसामान्य लोकांना दिसत नाही, ते दिसत असावं. कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या मृत्यूच्या दोन दिवस आधी एक मनोगत व्यक्त केले होते.

ते म्हणाले होते, ”हे परमेश्वरा, तुझा माझ्यावर केवढा अनुग्रह आहे, हे मी कसं सांगू? तू मला जीवन दिलंस, ते मिळवण्याची कसलीही पात्रता माझ्यात नव्हती. तू मला श्वास दिलास, तो मिळवण्याचा अधिकार मला नव्हता. तू मला सौंदर्याचे, आनंदाचे अनुभव दिलेस, त्यासाठी मी खरोखरच पात्र नव्हतो. मी धन्य झालोय. तुझ्या अनुग्रहाच्या ओझ्याखाली दबून गेलोय. तू दिलेल्या या जीवनात जे काही दुःख मला झाले; जी काही पीडा मला भोगावी लागली, ज्या चिंता मला लागल्या; ती सारी माझीच चूक आहे. कारण, तू दिलेलं जीवन केवढं आनंदमय होतं. दुःख-पीडा-चिंता माझ्याच चुकीने मला लाभल्या. ‘मला मुक्ती दे’ असं मी विनवणार नाही. जर तुला मी योग्य वाटत असेल, तर मला पुन्हा पुन्हा जीवनाकडे पाठव. माझं जीवन अपार आनंदपूर्ण होते. मी तुझा अनुग्रहित होतो!”

सारं भोगणं लक्षात घेऊन जगणं, ह्यात निर्मळ आनंद असतो. तो सत्तेचे गुलाम झालेल्यांना लाभत नाही. म्हणून त्यांना देवालाच खोटा ठरवणाऱ्या शपथा घ्यावा लागतात; आणि देवाचीच साक्ष काढून त्या मोडाव्याही लागतात. सत्तेच्या जुलाबाने ‘शिवबंधनं’ही तुटतात.

(लेखक साप्ताहिक ‘चित्रलेखा’ चे संपादक आहेत)

9322222145

Previous articleबारामती जिंकणे किती अवघड आहे ?
Next articleभावनांवर चालणारी बाजारपेठ!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.