द हिल वी क्लाईंब

– शर्वरी कलोती-जोशी

अमेरिकेत काल पार पडलेल्या प्रेसिडेंट जो बायडन यांच्या ‘प्रेसिडेंशियल इनाॅगरेशन सेरेमनी’ (आपल्याकडे शपथविधी) मधील अनेक लक्षवेधी घटनाक्रमांदरम्यान युवा कवयित्री आमंडा गाॅमन सर्वाधिक चर्चेत राहिली ती तिच्या द ‘हिल वी क्लाईंब’ या कवितेमुळे . काय होतं खास असं तिच्या कवितेत?

अमेरिकेची नेमकी नस काय आणि दुखरी रगही काय, अमेरिकन संस्कृती म्हणजे नेमके काय, कोरोना महामारीतून सावरणारा व त्याच वेळी राजकीय नरेटिव्हज ने अभूतपूर्व विभाजन झालेला, कॅपिटाॅल वरचा हिंसक हल्ला झेलूनही लोकशाहीचा जागर पुन: नव्या ताकदीने करणारा सर्वसमावेशक अमेरिकन युवा काय विचार करतो, त्याच्या/तिच्या अमेरिकेकडून काय अपेक्षा आहेत हे अत्यंत तरलतेने तिच्या कवितेत तिने उधृत केले.

अमेरिकेचे पूर्व अध्यक्ष बराक ओबामा, विख्यात टाॅक शो होस्ट आॅप्रा विन्फ्रे व अनेक दिग्गजांनी आमंडाचे मुक्तकंठाने कौतुक केले. या घटनेचे ‘ऐतिहासिक’ असे वर्णन अमेरिकेतील बहुतांश माध्यमांनी केले आहे.

आमंडा चे हे काव्यवाचन पाच एक मिनिटांचे आहे. एवढा वेळ प्रेसिडेंशियल इनाॅगरेश सारख्या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमात कविता सादर करण्यासाठी तिला कसा काय मिळाला? कोण ही आमंडा?

१९९८ साली कॅलिफोर्नियातील लाॅस एंजेलिस मध्ये जन्मलेल्या आमंडा हिला व तिची बहिण गॅब्रिएल ला त्यांच्या शिक्षिका असलेल्या एकल मातेने वाढवले. मोठी होता होता लेखन व वाचन यात आमंडा गर्क राहू लागली. कविताही लिहायची अधून मधून!

वयाच्या सोळाव्या वर्षी तिला ‘यूथ लाॅरेट पोएट आॅफ लाॅस एंजेलिस’ असे संबोधले जाऊ लागले. पुढे हार्वर्ड विद्यापीठांत समाजशास्त्रात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असताना तिला ‘राष्ट्रीय यूथ पोएट लाॅरेट’ हा सन्मान मिळाला.

गेल्या महिन्यात बायडेन यांच्या इनाॅगरल कमिटीने आमंडाशी संपर्क साधला. बायडेन यांची पत्नी जिल यांनी आमंडाचे ‘लायब्ररी आॅफ काॅंग्रेस’ मधले काव्यवाचन ऐकले होते व त्या खूप प्रभावित झाल्या होत्या. त्यांनीच आमंडाचे नाव कमिटीला सुचवले होते.

युनायटेड अमेरिका ही ‘इनाॅगरल सेरेमनी’ ची संकल्पना आहे एवढेच आमंडाला सांगितले गेले. बाकी कविता कुठली वाचायची याविषयीचे संपूर्ण स्वातंत्र्य तिला दिले गेले.

वर्णविद्वेषाचा अमेरिकेचा एक बिभत्स चेहराही आहे त्याचाही संदर्भ तिच्या कवितेत आहे. तो टाळणे म्हणजे सत्याशी प्रतारणा करणे असे आमंडा म्हणते. त्याच बरोबर अमेरिकेला आत्यंतिक मेहनतीने सर्वसमावेशकतेकडे नेणाऱ्या गतकालीन नेतृत्वावर अब्राहम लिंकन, मार्टिन ल्यूथर किंग यांसारख्यांचेही ऋण ती मानते.

तिच्या कवितेचा भावानुवाद-

आपण रोज विचारतो स्वत:लाच की या सनातन अंधाऱ्या वाटेवर

प्रकाशाचा कवडसा कुठे आहे?

खूप काही गमावून आपण हिंस्त्र पशूचा वधही केला आहे पण

त्या लढाईनंतरची उजेडाची वाट कुठे आहे?

हे कळतंय आपल्याला की मौन म्हणजे शांतता नव्हे

न्यायाची व्याख्या म्हणजे प्रत्यक्ष न्याय नव्हे

आपण केवळ दुभंगलेला देश च बघतोय असं नव्हे

एक अपूर्ण देश म्हणू यात हवं तर!

गुलामीत खितपत पडलेले माझ्यासारखे कैक कृष्णवर्णीय

जे एकेकट्या मातांनी जन्माला घातलेत व पोसलेत

स्वप्न पाहू शकतो आपण राष्ट्राध्यक्ष बनण्याचं!

आपल्यात असंख्य कमतरता असतील, आपण शुभ्रकांती नसू देत

परंतु पूर्णत्वाच्या पूर्ततेसाठी धडपडतो आहोत

आपला देश जगातील सर्व धर्म, वंश, वर्ण व विपरीत परिस्थिती यांना सामावून घेईल आणि आपल्यातील भेदांना भेदून उभा राहील सर्वात बलाढ्य देश म्हणून!

आपण सर्वांना हाका मारू

एकमेकांना हात देऊ , साथ देऊ, एकोप्याने भेदभावाला मात देऊ

आपण खुडलो गेलो वारंवार तरीही

तग धरू

जीवन असेल वेदनांनी झाकोळलेले तरीही आशेने जग भरू

पोथ्या पुराणे सांगतात काय

आपणच आपले भविष्य होय

आपणच विजेते असू

जर संघर्षाचा हा पर्वत आपण हिमतीने चढू

तलवारीच्या पात्यांपेक्षा सद्भावनांचे पूल बांधून लढू

देशाचा सन्मान आपल्यालाच जपायचाय

भूतकाळाला मागे टाकून

भविष्याला उभारायचंय

आपल्या देशाला दुभंगणाऱ्या शक्तींना

शिकवायला हवं पुन्हा एकमेकात वाटून घ्यायला

लोकशाहीची पताका

पुन: दिमाखात फडकवायला

लोकतंत्रही कधीकधी जरी हेलपाटते

उशीरा का होईना पण नक्कीच सावरते

याच केवळ सत्यावर , याच निर्मळ

विश्वासावर

इतिहासाची नजर जरी आपल्यावर

अविचल राहू आपण भविष्याच्या मार्गावर

भयानक भूतकाळ मागे ठेवू

नवे अध्याय, नवी सूक्ते गाऊ

जे घडून गेले ते सोडून देऊ

जे व्हायला हवे ते घडवून घेऊ

आपला देश जखमी झाला पण मोडून पडला नाही,

धाडसी असला तरी क्रौर्याला थारा नाही

आक्रमक असला तरी मुक्तीचाच अर्थ वाहू

आता कोणीही उधळून टाकू शकत नाहीत आपली स्वप्नं

आपले शैथिल्य किंवा ऊर्जाच ठरवतील आपली स्थानं

आपले प्रमाद भविष्याचे ओझे होऊ नयेत

भूतकाळाच्या चुकांना पुन:पुन्हा मिरवू नयेत

चला तर आता भविष्यासाठी

अधिक सह्रदय देश आपण मागे सोडून जाऊ

नवनिर्मितीच्या ध्यासाने तुटलेले जोडून घेऊ, पुन: उभारी घेऊ

आता जेंव्हा दिवस उजाडेल

असीम काळोख नसेल

असेल तेवणारी ज्योत

निर्भयपणे पाऊल पडेल

आपणांस प्रकाश दिसायला हवाय

तर तेवढे शूर व्हावेच लागेल

आपणांस प्रकाश दिसायला हवाय

तर आपल्याला उजेड बनावेच लागेल

– (लेखिका मुक्त पत्रकार आहेत)

Previous articleकृष्णराज आणि ई.पी.डब्ल्यू
Next articleअदानी आफ्टर गांधी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.