नाताळ विशेषांक

-कामिल पारखे

दिवाळी येण्याआधीच दसऱ्याचा मुहूर्त साधून दिवाळी अंकांचं प्रकाशन केलं जातं. तसं आतापर्यंत डिसेंबरच्या मध्यात कॅरोल सिंगर्स दारापर्यंत पोहोचण्याआधीच दोन नाताळ विशेषांक हाती पडले आहेत. मराठी साहित्य विश्वात दिवाळी अंकांना एक वेगळेच महत्त्व आहे. मोबाईल युग सुरु झाल्यापासून आणि त्यानंतरच्या समाजमाध्यमांचं सार्वत्रिकिकरणामुळं पुस्तकं आणि नियतकालिकं वाचणं कमी झालं असलं तरी याहीवर्षी अनेकांनी उत्साहानं दिवाळी अंक काढलीच. आणि आता गडबड सुरु आहे ती ख्रिसमस विशेषांकांची.

नाताळ किंवा ख्रिसमस विशेषांक काढण्याची परंपरा तशी खूप जुनी असली तरी याविषयी अनेकांना कदाचित माहिती नसेलही. एक आहे मराठीतील सर्वाधिक जुने (स्थापना १८४२, बाळशास्त्री जांभेकरांचे `दर्पण’ १८३२ चे) आणि अजूनही प्रकाशित होणाऱ्या `ज्ञानोदय’ मासिक. डॉ. अनुपमा निरंजन उजगरे यांनी `ज्ञानोदया’ची संपादकाची धुरा घेतल्यानंतरचा हा पहिलाच नाताळ विशेषांक. यावेळी कांतिश प्रभाकर तेलोरे अतिथी संपादक आहेत.

हातात पडलेला दुसरा नाताळ विशेषांक आहे `निरोप्या’ मासिकाचा. मराठीतील हे दुसरे सर्वाधिक दीर्घायुष्य लाभलेले मासिक जेसुईट (येशूसंघीय) जर्मन धर्मगुरु आणि पुण्याचे आर्चबिशप हेन्री डोरींग यांनी अहमदनगर जिल्ह्यात राहुरीजवळ केंदळ येथे एप्रिल १९०३ ला मासिक सुरु केले होते. हे मासिक. पहिल्या महायुद्धाचा दहाबारा वर्षांचा काही काळ वगळता आजतागायत प्रसिद्ध होते आहे
पेपल सेमिनरीचे रेक्टर फादर भाऊसाहेब संसारे संपादक असलेले `निरोप्या’ हल्ली पुण्यातून नारायण पेठेतल्या `स्नेहसदन’ येथून प्रकाशित होतो. माझ्या लिखाणाची सुरुवातच मुळी ‘निरोप्या’तून झाली. श्रीरामपुरात मी शाळेत असताना १९७४ साली.`निरोप्या’ च्या या नाताळ विशेषांकात महात्मा जोतिबा फुले यांना आपल्या स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिकवणारे रेव्हरंड जेम्स मिचेल यांचे मी लिहिलेले चरित्र प्रसिद्ध झाले आहे. महात्मा फुले अभ्यासकांना हे चरित्र उपयुक्त ठरु शकेल.
मराठी पत्रकारितेच्या आणि नियतकालिकांच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेली मराठीतील सर्वांत जुनी असलेली ही दोन्ही नियतकालिके ही ख्रिस्ती संस्थांमार्फत चालवली जातात हे विशेष. अर्थात या संस्थांचं पाठबळ हे यामागचे प्रमुख कारण.

    त्याशिवाय वसई धर्मप्रांतातर्फे प्रकाशित होणाऱ्या `सुवार्ता’ मासिकाचा नाताळ विशेषांक आहेच. फादर डॉ अनिल परेरा `सुवार्ता’चे संपादक आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो अनेक वर्षे – जवळजवळ पंचवीस वर्षे – `सुवार्ता’चे संपादक होते. पुण्यातले माझे एक पत्रकार सहकारी दयानंद ठोंबरे `अलौकिक परिवार ‘ नाताळ विशेषांक प्रकाशित करत असतात. यावेळी रश्मी कालसेकर या विशेषांकांच्या अतिथी संपादक आहेत.पुण्यातून पिंपरी चिंचवड येथील फ्रान्सिस गजभिव `शब्द’ नाताळ विशेषांक गेली अनेक वर्षे प्रकाशित करत आहेत. त्याशिवाय वसई, अहमदनगर वगैरे ठिकाणी नाताळ विशेषांक प्रसिद्ध होतो.

नव्या डिजिटल युगात काही ख्रिसमस विशेषांक ऑनलाईन असतात. *ख्रिस्तायन* या ऑनलाइन नाताळ अंकाचे संपादक वसईचे ख्रिस्तोफर रिबेलो आहेत. त्याशिवाय वसईतील कादोडी या बोलीभाषेतसुद्धा रिबेलो एक नाताळ विशेषांक प्रकाशित करतात. या ‘कादोडी’ नाताळ अंकांची जन्मकथा संपादक ख्रिस्तोफर रिबेलो खालील शब्दांत सांगतात -“एका फेसबुक ग्रुपवर काही साहित्यप्रेमींची एकत्र येण्याविषयी चर्चा झाली, त्यानंतर “कुपारी कट्टा” या त्यांच्या स्थानिक समाजाच्या नावाने ते महिन्याला एकदा एकत्र भेटू लागले, जमणारे सर्व साहित्यप्रेमी हे एकाच, “कुपारी” समाजाचे आणि “कादोडी” (वसईच्या उत्तर पट्ट्यातील सामवेदी कुपारी समाजाची बोलीभाषा) ही एक भाषा बोलणारे असल्यामुळे ह्या भाषेच्या उद्धारासाठी काहीतरी केले पाहिजे अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि त्यातच ह्या भाषेच्या साहित्याला वाव देणारा अंक प्रकाशित करण्याची कल्पना पुढे आली.

“कादोडी” या भाषेला व्याकरण नाही, या भाषेत उत्तम गोडवा आहे, खूप सुंदर अशा कथा आहेत, अनेक प्रकारची गीते आहेत, पण हे सगळे मौखिक स्वरुपात आहेत. नव्या पिढीला हे सगळे अज्ञात आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचविता यावे, तसेच मौखिक स्वरुपात स्वरुपात असलेला साहित्याचा खजिना कुपारी समाजाच्या तळागाळात नेता यावा तसेच तरुण वर्गात आपल्या भाषेत नवीन लिहिण्याची आवड निर्माण व्हावी आणि यादृष्टीने प्रयत्न व्हावेत म्हणून गेली ११ वर्षे प्रथम त्रैमासिक आणि आता वार्षिक (नाताळ विशेषांक) ह्या स्वरुपात ‘कादोडी’ अंकाचे प्रकाशन होत आहे. ”
ख्रिसमसबरोबरच या नाताळ विशेषांकांचीही मी उत्सुकतेने वाट पाहत आहे.

(लेखक नामवंत पत्रकार व ब्लॉगर आहेत)
९९२२४१९२७४

[email protected]

Previous articleयोद्धा: फक्त ८४ वर्षांचा! 
Next articleआरक्षण जातीला नव्हे, मातीला द्या!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.