परंपरा आणि मी

-मिथिला सुभाष

लहानपणापासून ‘परंपरा’ या शब्दानं, जाणीवेनं मला बरंच काही दिलंय. थोडासा त्रास, भरपूरशी करमणूक, वाचाळ आणि चिकित्सक स्वभावाला यथेच्छ खाद्य आणि विचारांना, मेंदूला चालनाही. मी 12-15 वर्षांची असताना आमच्या शेजारी एक नवीन लग्न झालेलं जोडपं राहायचं. ती बाई संतोषीमातेचं व्रत करायची. माणसांचा जसा ‘पडता’ आणि ‘चढता’ काळ असतो, तसा देवांचाही असतो. तो काळ संतोषीमातेचा ‘चढता’ काळ होता. शुक्रवारी कांदा, लसूण आणि आंबट पदार्थ खायचे नाहीत असा त्या संतोषीमातेचा नियम. ‘श्री संतोषीमातेची कहाणी’ या पुस्तकात तसं लिहिलेलंच असायचं मुळी. आमची शेजारीण पट्ठी त्या दिवशी मासे आणि प्रॉन्स म्हणजे कोलंब्या तळून खायची..!! कालवण केलं तर कांदा-लसूण आणि आंबट काहीतरी घालावं लागणार ना, म्हणजे मग पाप लागणार..!! म्हणून तळून खायच्या. एक दिवस मी तिला विचारलं की, अग ताई, तू मच्छी कशी खातेस शुक्रवारी..? त्यावर ती म्हणाली, “मच्छी खाऊ नये असं कुठे लिहिलंय पुस्तकात? फक्त कांदा-लसूण आणि आंबट पदार्थच न खाण्याची परंपरा आहे, माझी आई पण असंच करायची..!” हे उत्तर ऐकून मी सपशेल चाट..!! अशा अनेक परंपरांनी मला वेळोवेळी ‘चाट’- चकित केलंय, दिपवलंय आणि विचार करायला लावलंय.

 

तसा माझा जन्म अत्यंत अपारंपरिक आईबापाच्या घरातला. दोन्हीकडच्या आज्या तरुणपणात विधवा झालेल्या. दोघीजणी आपापल्या नवऱयाच्या मृत्यूनंतर कौटुंबिक भाऊबंदकीपासून आपल्या पोरक्या पोरांचं रक्षण व्हावं या हेतूनं गावातून परागंदा (स्थालंतरित नाही, परागंदाच!) झालेल्या. वडलांची आई उत्तरप्रदेशातल्या जिल्हा इलाहाबाद, तहसील करछना, ग्राम आंमा-इकौनी इथून महाराष्ट्रातल्या अमरावती या गावी येऊन स्थिरावली, सोबत चार वर्षांचं पोरगं, माझे वडील. आईची आई कोकणातल्या राजापुरच्या आडिवरे गावातून अजाणत्या वयाची तीन पोरं घेऊन मुंबईत आली. दोघींनी आपापल्या कुटुंबाच्या आणि त्याकाळच्या समाजाच्या प्रस्थापित परंपरा मोडल्या. दोघी अल्पशिक्षित. अमरावतीची आजी कट्टर बामणीण, त्यामुळे तिला तिथल्या इर्विन हॉस्पिटलच्या स्वयंपाकघरात नोकरी लागली. कोकणातली आजी सारस्वत ब्राह्मण – शेणवी. तिनं तिच्या समाजातल्या परोपकारी लोकांना गाऱ्हाणे घालून मिडवाइफचं शिक्षण घेतलं आणि मुंबईतल्या डॉक्टर टिळकांच्या इस्पितळात नोकरी पत्करली. १९२० आणि ३० च्या दशकात नोकरी करुन आपापला संसार एकटीनं चालवणाऱ्या या दोन ‘अपारंपरिक’ आज्यांची मी नात. अमरावतीहून ‘लेखक बनायला’ मुंबईत आलेला बुद्धिमान हिंदीभाषक (‘भैया’) तरुण आणि मुंबईतल्या गुजराती-राजस्थानी रंगमंचाची त्याकाळातली विख्यात आणि प्रतिष्ठत मराठी ‘हिरॉईन’ यांचं लग्न १९४७ मध्ये प्रचंड गाजलं. हे माझे आई-वडील. म्हणजे अपारंपरिकतेच्या दोन पिढय़ांच्या परंपरेची मी वारसदार. आज त्याचा खूप अभिमान वाटतो. कारण आपापल्या कुटुंबापासून तुटलेल्या माझ्या आई-वडिलांनी नवीन जगाशी जुळवून घेणाऱ्या नव्या लखलखीत परंपरांची निर्मिती केली, आमच्यावर त्याचे संस्कार केले. त्यामुळे आमच्यात डोळसपणा आला, जुन्यातले चांगले ते घेऊन, त्यात सजगपणे नव्याची भर घालून ते वापरण्याची वृत्ती आली. पण लहानपणी जेव्हा हे कळत नव्हतं तेव्हा मात्र खूप गोंधळ उडायचा, आपण या जगाच्या बाहेरचे – आऊटसायडर – आहोत, असं वाटत राहायचं. ‘आमच्यात अमुक असतं,’ किंवा ‘आमच्या कुटुंबात तमुक गोष्ट अमुक पद्धतीनंच करतात,’ असलं काहीही आम्हा भावंडांकडे सांगायला नसायचं. कारण घरातला संस्कार-संस्कृतीसंकर! कदाचित म्हणूनच सगळ्या तथाकथित परंपरांकडे माझा ओढा वाढला. घरात मिळालेल्या डोळस वृत्तीनं त्या परंपरांकडे पाहण्याचा नाद लागला, वय वाढलं तसं वाचन वाढलं, विचार यायला लागले. प्रत्येक परंपरेचं मूळ शोधण्याचा ध्यासच लागला आणि मग सारं लख्खपणे समोर यायला लागलं.

आपल्याला आपल्या परंपरांचा अभिमान असतो. कारण एरवी ‘अभिमान बाळगण्यासारखं’ काहीही आपल्या समाजाकडे नाही आणि जगण्यासाठी असा काहीतरी लाल गोंडय़ाचा टेकू असावा लागतो, असा समज आपण करुन घेतलेला आहे. (यापुढे जेव्हा-जेव्हा ‘आपण, आपले, आपल्या’ ही सर्वनामं येतील तेव्हा ती खरोखर ‘सर्वांसाठी’च असून कुणाही एका व्यक्ती, वर्ग किंवा जाती-जमातीसाठी नसतील, याची कृपया नोंद घ्यावी. यापैकी कुणा एकावर नेम धरायचा झालाच तर तो नाव घेऊन धरला जाईल, याचीही खात्री असू द्या.) तर, आपल्याला आपल्या परंपरांचा अभिमान असतो. परंपरा धार्मिक असतात, पीढीजात कौटुंबिक असतात, वेगवेगळ्या जातींच्या असतात, सामाजिक असतात, राष्ट्रीयही असतातच. शिवाय काही परंपरांचे नव्यानं पायंडे घातले जात असतात, जे दोन पिढय़ांनंतर ‘परंपरा’ म्हणून मिरवले जातील. उदाहरणार्थ, नवश्रीमंतांच्या ‘रेव्ह पार्टय़ा’ किंवा पदरमोड करुन; एका रिंगमास्टरच्या ऑर्डरीबरहुकूम; परदेशातल्या इमारती, बागा आणि ‘चकाक’ रस्ते बघण्याचं आणि तिथे खुळचटासारखं उभं राहून फोटो काढून घेण्याचं मध्यमवर्गात फोफावलेलं वेड, हे सारं काही शे वर्षानंतर परंपरा झालेल्या असतील. (याला ‘पर्यटन’ असं म्हणतात आणि ही अशी प्रत्येक वारी संबंधिताच्या टोपीत रंगीत पिसासारखी खोचली जाते म्हणे!) ‘आमच्याकडे ना घटस्फोट घेतल्यानंतर मुलीने ‘स्टॅटय़ू ऑफ लिबर्टी’ला पाच नारळ वाहाण्याची परंपरा आहे, त्याशिवाय घटस्फोट पूर्ण झाला असं मानत नाहीत,’ असं ऐकायला मिळणारच नाही याची खात्री देताय? नाही ना? पण अशाच बनत असतात परंपरा. ज्या काळातला समाज जसा असतो, त्याची विचार आणि वर्तनाची तऱ्हा जशी असते, तसे त्यानं घातलेले पायंडे – परंपरा असतात. आणि आपल्याला आपल्या परंपरांचा अभिमान असतो!

 

कुठल्याही परंपरा सहजपणे एका पीढीकडून दुसऱ्या पीढीकडे जातात. त्यांचा लेखी दस्तावेज नसतो. त्यामुळे बहुतेक परंपरा ‘कानगोष्टी’च्या खेळांसारख्या होत जातात. मूळ कारण काळाच्या उदरात कुठेतरी गडप होतं आणि कर्मकांडं तेवढी शिल्लक राहतात. अशा परंपरा काही काळातच कालबाह्य़ होतात. काळासोबत चालण्याचा वकूब हरवल्यामुळे त्यांची ‘चाल’ बिघडते, हास्यास्पद होते. ‘बाबावाक्यम् प्रमाणम्’ मानणारी माणसं त्यांना रेटत राहतात आणि अनेकदा स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं आणि धर्माचंही हसं करुन घेत असतात. अशा फरफटत चालणाऱ्या अनिष्ट परंपरा जगभरात असतात. विवेकबुद्धि शाबूत असलेली माणसं त्यात आवश्यक तो बदल तरी करतात किंवा त्यांकडे दुर्लक्ष तरी करतात. पण बुद्धिप्रामाण्यवादी लोकात एक ‘प्रतिक्रियावादी’ गट गेली काही दशकं उदयाला आलेला आहे. हे लोक आपल्या शिक्षण, वाचन आणि ज्ञानाचा उपयोग आपल्या सोयीप्रमाणे कधी तलवारीसारखा तर कधी ढालीसारखा करतात. हाच गट समाजात सगळ्या प्रस्थापित परंपरांच्या उलट परंपरा रुजवू पाहतो. आंधळेपणानं परंपरा जपण्याचं वेड जितक्या जोमानं जोपासलं जातं, तितक्याच जोमानं त्याची ही विरुद्ध बाजूही वाढत असते. तिथं नवीन परंपरा बनत असतात. संकष्टीला मुद्दाम मासे खाणारे, ठरवून सर्वपितरी अमावस्येला लग्न करणारे वाढताहेत ते त्यामुळेच. सृष्टीचा नियम आहे, लोलकाला जितकं उजवीकडे नेऊन सोडाल, तिक्याच वेगानं आणि ईर्ष्येनं तो तितकाच अधिक डावीकडे जाणार! हा खेळ बडा गमतीशीर असतो… आणि विचार करायला लावणाराही!

 

परंपरा या खरं तर संस्कृतीच्या ब्रॅन्ड ऍम्बॅसेडर असतात. माझ्या ओळखीचं एक कोंकणी मुसलमान कुटुंब आहे. त्यांच्यात विवाहित बायका काळ्या मण्यांचं मंगळसूत्र घालतात. ही खरं तर भारतीय (धार्मिक नव्हे.) परंपरा. अधिक नेमकेपणानं सांगायचं झालं तर ही ‘द्रविडी’ परंपरा. स्वतःला कट्टर हिंदू समजणाऱ्या आणि आपल्यामुळेच जो काही हिंदू धर्म टिकलाय तो टिकलाय, अशा गफलतीत असणाऱ्या मित्रांना हे समजल्यावर त्रास होण्याची शक्यता आहे की, आर्य स्त्रिया कुंकूही लावत नव्हत्या आणि काळ्या मण्यांचं मंगळसूत्रही घालत नव्हत्या. हा सारा प्रताप; परंपरा आणि त्या बिनडोकपणे पाळत राहण्याच्या वृत्तीचा आहे. (मात्र, हल्लीच्या कोकणी मुसलमान नववधू असं मंगळसूत्र घालत नाहीत असं कळलंय. सांगणाऱ्यानं याचं कारणही सांगितलं, ते अत्यंत विलक्षण आहे. हिंदू समाजातले अनेक जण जसे स्वतःला थेट राम-कृष्ण-चाणक्य वगैरेंची अवलाद मानतात आणि ‘आर्यपुत्र’ असल्याच्या तोऱ्यात वावरत असतात, तसंच बहुतेक मुसलमान हल्ली स्वतःला तैमूर किंवा तत्सम कुणाचे तरी वंशज मानतात आणि त्या बहुतेकांची ‘मुळं’ पेशावर, अफगाणिस्तान वगैरे ठिकाणीच असतात. गेल्या काही वर्षात वाढलेल्या धार्मिक कट्टरतेचं हे फलित आहे. असो!) उत्तरेत आणि आता जवळ-जवळ सगळ्या भारतात वधूला जी मेंदी लावण्याची परंपरा आहे, ती मूळची मुसलमानी परंपरा आहे. त्यामुळे, ‘तेच आमच्या चालीरिती घेतात, कारण मूळचे ते आपलेच आहेत,’ वगैरे म्हणत नाकानं कांदे सोलण्याची काsssही गरज नाही, आपणही त्यांचं; भाषेतल्या शब्दांसह बरंच काही घेतलेलं आहे. या अशा परंपरांच्या देवाणघेवाणीमुळे संस्कृती समृद्ध होत असते. पण इथे पुन्हा एक कळीचा मुद्दा असतोच. परंपरा जशा आहेत तशाच स्वीकारायच्या की त्या गाठोडय़ातल्या जुन्या आणि कालबाह्य़ झालेल्या चिंध्या काढून टाकून तिथे नवीन भरजरी वाण घालून ते गाठोडं पुढच्या पीढीच्या हातात द्यायचं? पण हा मुद्दा ऐरणीवर आला की आपल्यातल्या एका मोठय़ा वर्गाचा करंटा कर्मठपणा डोकं वर काढतो आणि ते मग एकदम ‘संस्कृतीरक्षका’च्या भूमिकेत स्वतःला घालून घेतात. वास्तविक जुन्या परंपरा डोळे झाकून पाळत राहिल्यानं त्यांचं जतन जरी होत असलं तरी त्यात काळानुरुप बदल होणं अत्यंत आवश्यक असतं. अनेक वर्ष, अनेक परंपरा पाहात, त्यांचं विश्लेषण करत काही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला तर हेच जाणवतं की या परंपरा रुजवणारी माणसं अत्यंत डोळस आणि चतुर होती. करंटे आपण आहोत. कारण एकतर आपण त्या परंपरा हरवल्या तरी किंवा त्यांची मोडतोड तरी केली. अनावश्यक परंपरांचं विसर्जन करण्याचा उमदेपणा आपल्यात नाहीच.

कोकणात काही भागात अशी मान्यता आहे की ज्या घरात सून दोन्ही वेळ जेवताना मागचा ताक-भात प्रेमानं संपवते त्या घराची भरभराट होते. किती चांगली आहे ही परंपरा! भात हे कोकणातलं मुख्य अन्न. घरादारासाठी अविश्रांत खपणाऱ्या सासुरवाशिणीला पोटभर जेवण मिळावं, त्या जेवणात तिला कॅल्शियमचा भरपूर साठा असलेलं ताक वाढलं जावं म्हणून कुणातरी सहृदय पण चतुर माणसानं ही पद्धत सुरु केली असावी, जी कालांतरानं परंपरा झाली. पण सुनेला पोटभर जेवण मिळावं म्हणून जिथे ‘परंपरा’ सुरु कराव्या लागतात, अशा समाजात त्यातून पळवाटा काढणारे दळभद्री लोकही असतातच. सुनेला पहिला भात आवळ्याएवढा, दुसरा सुपारीएवढा वाढणारे लोक आहेतच की. याला म्हणतात, परंपरांची वाट लावणं! अशा वाट लागलेल्या अनेक परंपरा आजही रुढ आहेत. पहिला भात आवळ्याएवढा, दुसरा सुपारीएवढाच वाढायचा असतो, हीच काहींनी आपल्या कुटुंबाची परंपरा बनवून टाकली आहे. सोन्यासारखी माती आणि ‘सोनखता’सारखी माणसं हे भारताचं तसं जुनंच दुर्दैव आहे! ‘आम्हाला नवीन काहीतरी शिकायचं आहे,’ असा आव 99 टक्के लोकांनी आणलेला असतो, पण यातल्या 98 टक्क्यांना कुणी शिकवलेलं, सांगितलेलं आवडत नाही, ही खरी गोम आहे.

अशीच आणखी एक छान परंपरा मध्यभारतात पाहाण्यात आली. तिथल्या एका जातीत मधुचंद्राच्या रात्री नववधूच्या बारीक-बारीक 101 वेण्या घातल्या जातात. नवऱ्याने आधी त्या सगळ्या वेण्या सोडवायच्या आणि मगच मूळ कार्यक्रमाला सुरुवात करायची, अशी ती परंपरा आहे. हे सुरु करणारा माणूस किती बरं रसिक असावा! आणि समंजसही…! तेवढय़ा त्या 101 वेण्या सोडवताना ती दोघं गप्पा मारत असतील, एकमेकांशी ओळख वाढवत असतील, कदाचित ती त्याला त्या वेण्या सोडवायला मदतही करत असेल, किंवा, ‘आपण आधी ‘ते’ करु, मग तुझ्या वेण्या दोघं मिळून सोडवू’ असं जरी ठरवलं गेलं तरी हे सारंच किती गोड आहे हो! ते सांगण्याइतका धीटपणा येण्यासाठी 20-25 वेण्या तरी सोडवाव्याच लागत असतील ना? सुखी आणि समाधानी लैंगिक जीवनासाठी निहायत आवश्यक अशा ‘फोरप्ले’मधली गंमतही त्या दोघांना यानिमित्तानं कळत असेलच!

 

वर उल्लेख केलेल्या दोन्ही परंपरा पाहिल्यावर असं लक्षात येतं की माणसाला आनंद मिळावा, त्याच्या जगण्यात नमक-लवण-लावण्य यावं यादृष्टीनेच हे पायंडे-पद्धती-रीती-परंपरा सुरु झाल्या असाव्यात. पण काही परंपरा खरोखरच अत्यंत विकृत, अघोरी आणि लाज आणणाऱया, माणुसकीला चक्क काळिमा फासणाऱ्या असतात. पण त्याही जेव्हा पाळल्या जातात तेव्हा अशा लोकांना पाणी नाही तिथे फाशी देण्याची इच्छा होते. हरयाणा आणि राजस्थानाच्या पूर्व भागात असलेली ‘दूधपीती’ची परंपरा ही त्यातलीच एक. मुलीचा जन्म म्हणजे आईबापावर ओढवलेलं संकट, या अविचाराच्या अतिरेकातून आलेली ही परंपरा. या भागात जेव्हा एखाद्या कुटुंबात मुलगी जन्माला येते आणि तिची ‘दूधपीती’ करायची असं ठरतं तेव्हा घरात गावजेवणाच्या तयाऱ्या सुरु होतात. नातेवाईकांना ‘दूधपीती’ची निमंत्रणं जातात. ‘दूधपीती’च्या निमंत्रणाचा अव्हेर करणं वाईट मानलं जातं, त्यामुळे सगळे नातेवाईक येतातच. नामकरण सोहोळ्याला म्हणजे बारश्याला थोडा कमी अहेर नेला तरी चालण्यासारखे असतं, पण ‘दूधपीती’साठी भरपूर अहेर आणि नवजात छकुलीसाठी एखादा दागिना न्यावाच लागतो. समारंभाच्या दिवशी जेवणं आणि अहेराचे सोपस्कार पूर्ण झाले की अहेरात आलेले दागिने त्या नवजात मुलीच्या अंगावर घातले जातात. तिच्या बापानं, काकानं आणि मामानं कोणता दागिना तिला चढवला यावर प्रतिष्ठेची मोजमापं होतात. त्यानंतर एका मोठय़ा कढईत दूध तापवायला ठेवलं जातं, दुधाला उकळी आली की त्या छोटय़ा मुलीची आजी म्हणजे तिच्या बापाची आई स्वहस्ते त्या तान्हुलीला उकळत्या दुधात सोडते…! हो, ही परंपराच आहे! यावर भाष्य करणं म्हणजे ‘धर्म, धार्मिकपणा आणि समाज’ या वेगळ्याच फाटय़ावर गाडी न्यावी लागेल, त्यामुळे ‘अशा परंपरा पाहिल्यावर डोकं सुन्न होतं,’ असं एक निरुपद्रवी आणि षंढ वक्तव्य करुन ‘दूधपीती’चा विषय आवरता घेऊ.

निसर्गाचा तोल बिघडवणारी अशीच एक परंपरा म्हणजे वडाची फांदी घरी आणून ‘नवरा’ नावाच्या एका पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तीचं सात जन्मासाठी आगाऊ बुकिंग करणं. (इथे आगाऊ या शब्दाचे दोन्ही अर्थ घ्यावेत.) निसर्गपूजेचं महत्त्व सांगणारी ही परंपरा, पण ‘आपल्या सोयी’साठी त्याचेही तीनतेरा वाजवायला आम्ही मागेपुढे पाहात नाही.

मोठमोठाल्या परंपरांचं जतन आणि संवर्धन करायला मोठमोठाली धेंडं तत्पर असतात. त्यातून मग धार्मिक सोहोळे, सार्वजनिक उत्सव, महापूजा वगैरे होत असतात. त्याची चिकित्सा, विश्लेषण किंवा विचक्षणा करायला बडे विचारवंत आणि समाजसुधारकांची आपल्याकडे रेलचेल आहे. पण काही परंपरा खरोखरच व्यक्तिगत पातळीवर जपल्या गेल्या पाहिजेत, असं मनापासून वाटतं. त्यात खानपान आणि पेहरावविषयक परंपरांचा अग्रक्रम लागतो.

पारंपरिक पेहराव म्हंटलं की यच्चयावत सगळ्या मराठी लोकांना नऊ वारी साडी आठवते. आठवायलाच हवी. आपली परंपरा आहे म्हणूनच फक्त नाही, तर ते अत्यंत शालीन आणि सुटसुटीत नेसण आहे म्हणूनही. पारंपरिक नऊवार साडी जशी नेसायला हवी, तशीच जर ती नेसली गेली तर बाई आपोआप कुलीन दिसायला लागते. हल्लीच्या लोकांना हे पटणार नाही, कारण त्यांनी बहुधा नऊवारी ‘नेसलेल्या’ नाही तर ‘घातलेल्या’ बायका बघितलेल्या असतात. हो, हा पारंपरिक नऊवारीत केलेला सोयिस्कर बदल. ‘आपली सोय’ हे दोन शब्द आजचे परवलीचे शब्द आहेत आणि त्यासाठी आधुनिक माणूस कुठल्याही थराला जायला तयार असतो. मग ‘नेसण्याची’ साडी ‘घालण्याची’ केली तर कुठे बिघडतं? हल्लीच्या नऊवाऱ्या पायजाम्यासारख्या शिवलेल्या असतात. तंग स्लॅक्सवर त्या शिवल्या जातात. त्यामुळे त्या ‘घालणाऱया’ बाईला आतला ‘फील’ स्लॅक्सचा असतो. कमरेजवळ हुकने त्या घट्ट केल्या जातात, कासोटाही शिवलेला असतो. त्यामुळे नऊवार ‘नेसलेल्या’ बाईच्या हालचालीत जो सलज्ज सावधपणा असतो; ज्याची भुरळ राजा रविवर्मासारख्या जागतिक किर्तीच्या चित्रकारालाही पडली, तोच हल्लीच्या नऊवारीत हरवलाय. म्हणूनच आजची नायिका नऊवार नेसून तंगडय़ा फेकत नाचू शकते. पारंपरिक नऊवार नेसून तसे नाचता येत नाही. त्या नेसणात तिथल्या तिथे पावलं टाकत अदाकारी करावी लागते. तंग स्लॅक्स घालण्याला किंवा तंगडय़ा फेकत उत्तान नाचण्याला अजिबातच आक्षेप नाही. तुम्हाला परवडत असेल तर बिकिनी घालून नाचा. नावं ठेवणाऱ्यांच्या आयचा घो! पण त्या बिचाऱया पारंपरिक नऊवार साडीला कशाला वेठीस धरता? नाटकात नेसायला सोपी असावी म्हणून फार पूर्वीपासून नऊवारी साडय़ा ‘शिवल्या’ जात होत्या. पण हल्ली तर लग्न ठरल्यावर बाप मंगलकार्यालय शोधायला जातो आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी नऊवार साडी कुठे शिवून मिळते याची चौकशी करायला लागते. याला परंपरेचं संवर्धन म्हणत नाहीत, मोडतोड म्हणतात. गेल्या 20-25 वर्षात सुशिक्षित मध्यमवर्गाच्या कल्पनाशक्तीला जे ढोंगी आणि निर्लज्ज धुमारे फुटलेत, त्यातून निघत असतात असे प्रकार. सुशिक्षित मध्यमवर्ग आणि त्याचं ढोंग हा एक वेगळ्याच दीsssर्घ लेखाचा विषय आहे. या वर्गाने समाज आणि संस्कृतीचे जेवढे नुकसान आरंभले आहे, तेवढे तर परकीय आक्रमकांनी पण केलं नाही कधी. व्यक्तिगत पातळीवर चांगल्या परंपरांची मोडतोड करण्यात आणि टुकार परंपरा अधिक टुकार करण्यात हा मध्यमवर्गच आगेवान असतो हेही तितकंच खरं.

पेहरावातल्या परंपरांबद्दल बोलताना नऊवार साडी आठवणं क्रमप्राप्त होतं. दुसरा एक असा पेहराव; जो आजची परंपरा झालेला आहे, तो म्हणजे ‘जीन्स.’ ‘अत्यंत सुटसुटीत असतात,’ असं म्हणत घट्ट जीन्स घालणारी प्रत्येक व्यक्ती ती जीन्स काढल्यावर हमखास, ‘हाsss आता कसं छान मोकळं-मोकळं वाटतंय,’ असं म्हणते. अरे मग बाबांनो, जो पेहराव तुम्हाला तुरुंगातल्यासारखा अवघडून, बांधून टाकतो, तो सुटसुटीत कसा? पण नाही! आजची परंपरा आहे ती, मांडय़ांचं रक्ताभिसरण थांबलं तरी बेहत्तर, पण घालणार आम्ही घट्ट जीन्सच.

जागतिकीकरणानंतर जग जवळ आलं, तसं लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या. त्या इतक्या की मराठी माणसाच्या घरात इडल्या-डोसे होतात आणि ही मंडळी झुणका-भाकर-ठेचा खायला हॉटेलात जातात. सांगायचा अर्थ काय? घराघरात कितीही चायनीज, इटालियन वगैरे फूड (या फुडाला जेवण म्हणायचं नसतं, फूडच!) बनवण्याची परंपरा जरी रुजत असली तरी मराठी माणसानं आपली झुणक्याची परंपरा सोडलेली नाही बरं का! हाटेलात जाऊन का होईना, तो हे मराठमोळे पदार्थ खातो. यालाच परंपरा जपणं म्हणतात… हल्ली! वाढदिवसाला केक कापणं, त्याआधी फुंकर मारुन मेणबत्त्या विझवणं ही आपली परंपरा नाही, हे साऱ्यांना मान्य असतं. त्यातून मग अशी पळवाट निघते की सकाळी काय ते औक्षण वगैरे आटपून घ्यायचं आणि संध्याकाळी केक कापायचा. मंगळवार, गुरुवार असला तर आणि शाकाहारी कुटुंब असलं तर त्यांच्यासाठी खास बिनअंडय़ाचे केक मिळतात बाजारात. एखाद्या पाश्चिमात्य सखूनं बिनदुधाची खीर बनवली तर तुम्ही त्याला खीर म्हणणार का? नाही! कारण खिरीत दूध असायलाच पाहिजे, तशी परंपरा आहे. मग मित्रा, केकमध्येही अंडे असायलाच पाहिजे, तशी त्यांची परंपरा आहे. बिनअंडय़ाचा केक म्हणजे निव्वळ भट्टीत भाजून काढलेला शिरा, तोही मैद्याचा.

म्हणजे लक्षात येतंय ना? परंपरांचं जतन व्हायला पाहिजे असं मानणारी माणसं बिनडोकपणे माती खातात आणि ‘जुन्या परंपरा मोडीत काढा,’ असा कंठाळी आक्रोश करणारे तीच माती प्लेटमध्ये घेऊन चमच्यानं खातात. (‘या दोन्ही वर्गात सन्माननीय अपवाद आहेत,’ अशी एक सावध मेख मारुन ठेवायला हवी होती ना? ठीक आहे, मारली असं समजा..!!) पण या सगळ्या गोंधळात परंपरांचं जतन आणि संवर्धन मात्र राहूनच जातंय. जो-तो आपापल्या बौद्धिक, वैचारिक, सामाजिक, आर्थिक ऐपतीप्रमाणे परंपरांचं पालन तरी करत असतो किंवा त्या मोडीत तरी काढत असतो. परंपरा या कुठल्याही संस्कृतीचं संचितही असतात आणि वैभवही! हे दोन शब्द वरकरणी सारख्याच अर्थाचे वाटत असले तरी त्याच्या तपशिलात एक सूक्ष्म फरक आहे. संचिताचा संबंध थेट भूतकाळाशी असतो आणि वैभवाचा वर्तमानकाळाशी. त्यामुळेच परंपरा संस्कृतीच्या ब्रॅन्ड ऍम्बॅसेडर असतात असं वर म्हंटलंय. आपल्याकडे समाजाचे इतके वेगवेगळे वर्ग आहेत की त्यांचा विचार करताना चकित व्हायला होतं. वैचारिक, आर्थिक आणि सामाजिक वर्गांचाच फक्त विचार केला; जात आणि धर्म अजिबात त्यात आणली नाही तरी माणसांचे आणि विचारांचे इतके प्रवाह डोळ्यांसमोर येतात की भोवंडून जायला होतं. त्यामुळेच आपल्याकडे कुठल्याही गोष्टीत वैविध्य आलेलं आहे आणि त्यामुळेच कशाच्याच बाबतीत कधीच एकवाक्यता नसते. परंपरा पाळायला हव्यात की नको? मुळात हा मामला माणूस आणि मानवी सभ्यतेच्या किती जवळचा आहे? त्यांचं संवर्धन आणि जतन व्हावं का? ते कसं, कुणी करावं? त्यातल्या कुठल्या परंपरा कालबाह्य़ आणि कुठल्या कालातीत? या आणि अशा सगळ्या प्रश्नांना सर्वसंमतीनं फक्त एकच उत्तर कधीच मिळणार नाही. हे थोडं वन्ध्या-मैथुनासारखं आहे. दोन घटका करमणूक, दमछाक आणि घामट्या जबरदस्त.. आणि निष्पन्न कायमस्वरुपी शून्य!

-लोक नवनिर्माण दिवाळी-२०११ या अंकात पूर्वप्रकाशित

(लेखिका गृहिणी आहेत)

[email protected]

Previous articleअचानक शस्त्र म्यान केलेल्या सुषमा स्वराज
Next articleअसशील तर काहीच म्हणू नकोस!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.