पाणबुडीमध्ये लढाऊ विमाने

-अमित जोशी

पाणबुडीमध्ये लढाऊ विमाने ?Submarine Aircraft Carrier

असं वाचल्यावर तुम्हाला धक्का बसला असेल. अरे, हे काय आहे ? असं शक्य आहे का ? असं कोणता देश करेल का ? लढाऊ विमाने पाणबुडीमध्ये ठेवणे व्यवहार्य आहे का ?

उत्तर आहे… होय!

असं झालं आहे. अचाट कल्पनेतलं अशक्य ते शक्य जपानने करून दाखवलं होतं. दुसऱ्या महायुद्धात जपानने ही करामत करून दाखवली होती. तेव्हाच्या जपानच्या नौदलात लढाऊ विमानांना आपल्या कवेत – खरं तर पोटात घेणाऱ्या ३ पाणबुड्या जपानने युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात युद्धात उतरवल्या होत्या. मात्र या दरम्यान जपानची कोंडी अमेरिकेने केली, अण्वस्त्र टाकत जपानचा पराभव केला, नाहीतर जपानने एकूण १८ पाणबुड्या बांधण्याची तयारी ठेवली होती.

 दुसरे महायुद्ध हे अनेक तंत्रज्ञान – संकल्पनांना जन्म देऊन गेले. जपानचा पराभव करण्यासाठी समुद्राचा मोठा टप्पा पार करण्यासाठी युद्ध ऐन भरात असतांना अमेरिकेने विमानवाहू युद्धनौका बांधणीचा सपाटा लावला होता. एवढंच नव्हे तर विविध युद्धनौका, पाणबुड्या बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता.  जर्मनी आणि जपानचा भर हा पाणबुड्यांवर जास्ती होता. जर्मनीच्या पाणबुड्यांनी  दीर्घकाळ इंग्लंड आणि मित्र राष्ट्रांची कोंडी केली होती. जपानच्या पाणबुड्यांनी काही काळ अमेरिकेच्या युद्धनौकांनाही हैराण करून सोडलं होतं.

१९४१ च्या शेवटी जपनानं पर्ल हार्बरवर हल्ला करत अमेरिकेच्या पॅसिफिकमधल्या अमेरिकेच्या नौदल ताफ्याला मोठा तडाखा दिला होता. यामागचे सुत्रधार होते जपानच्या नौदल ताफ्याचे प्रमुख ऍडमिरल यामामोटो. तेव्हा आता अमेरिकेच्या भूमीवर थेट बॉम्बहल्ला कसा करता येईल या महत्वाकांक्षेने ऍडमिरल यामामोटो यांनी पाणबुडीतून विमाने नेत हल्ला कऱण्याची योजना मांडली. विमानवाहू युद्धनौकांना टिपणे  सहज शक्य असल्याने जपानने लढाऊ विमाने वाहून नेणाऱ्या पाणबुड्यांच्या निर्मितीवर काम करायला सुरुवात केली. या पाणबुड्यांना I-400 ( आय -400 ) असे सांकेतिक नाव देण्यात आले.

त्या काळांत डिझेलवर चालणाऱ्या पाणबुड्या या जास्तीत जास्त २००० टन वजनाच्या होत्या. मात्र जपानने तंत्रज्ञान – अभियंत्रिकी कौैशल्याची कमाल करत तब्बल ६५०० टन वजनाच्या १२० मीटर लांबीच्या I-400 पाणबुड्या बांधल्या. इंधन ( डिझेल ) पूर्ण भरल्यावर एका दमात पृथ्वीची एक प्रदक्षिणा मारण्याची या पाणबुडीची क्षमता होती. पाणबुडीवरुन हवेत झेप घेण्याची क्षमता असलेले M6A1 नावाचे खास विमान हे I-400 साठी विकसित करण्यात आले होते. ५०० किमी पेक्षा अंतर कापत टॉर्पेडो डागत किंवा बॉम्ब फेकत परतण्याची या विमानांची क्षमता होती. समुद्रात उतरल्यावर एका क्रेनच्या सहाय्याने परत पाणबुडीमध्ये ठेवण्याची सोयही करण्यात आली होती. एका वेळी तीन M6A1 विमाने सामावून घेण्याची क्षमता I-400 पाणबुडीमध्ये होती.

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात जपानची आर्थिक कोंडी झाल्याने जपान I-400 वर्गातील फक्त तीन पाणबुड्या बनवू शकली, तर एकाची अर्धवट निर्मिती केली. I-400 वर्गातील तीन पाणबुड्या महायुद्धाच्या अगदी शेवट्या टप्प्यात युद्धात उतरवल्या गेल्या, त्यांना प्रत्यक्ष लढण्याची संधी मिळालीच नाही.

शरणागती पत्करल्यावर या अजस्त्र I-400 वर्गातील पाणबुड्या बघुन अमेरिकेला आश्चर्याचा धक्काच बसला. महायुद्ध संपल्याने सोव्हिएत रशियाकडून या पाणबुड्याच्या पाहणीची मागणी लक्षात घेता या पाणबुडीच्या तंत्रज्ञानाची कागदपत्रे जपून ठेवत अमेरिकेने या पाणबुड्यांना जलसमाधी दिली. आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागणाऱ्या अणु पाणबुड्यांची निर्मिती होईपर्यंत I-400 ने सर्वात मोठ्या पाणबुडीचा मान मिरवला.

आजही विमानांना सामावून घेणाऱ्या I-400 सारख्या पाणबुड्या बांधणे हे आव्हानात्मक असतांना दुसऱ्या महायुद्धाच्या काळांत उपलब्ध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अवघ्या चार वर्षात अजस्त्र I-400 पाणबुड्यांची निर्मिती करत जगाला जपानने धक्का दिला होता.

जपानच्या I-400 या पाणबुडीवर आधारीत काही माहितीपट हे यु ट्युबवर उपलब्ध आहेत. त्याची लिंक देत आहे. Enjoy……

https://www.youtube.com/watch?v=mBx2Bu-jnOs

https://www.youtube.com/watch?v=bEPs9EDJGH4

https://www.youtube.com/results…

(लेखक ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीत कार्यरत आहेत)

9833224281

Previous articleमेड इन जपान: ‘सोनी’ च्या संस्थापकाची वाचायलाच हवी अशी कहाणी
Next articleआज गीतों को बाजार में ले आया हूँ…!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here