प्रेमाने विरोध केल्यास बदलाची शक्यता वाढते

-उत्पल व्ही. बी.

मी : जे सहसा, सदैव, विनाअट, विनाकारण आनंदी असतात ते मूर्ख असण्याची शक्यता अधिक असते हा सिद्धांत तुम्हाला कसा वाटतो?
गांधीजी : सिद्धांत?
मी : थिअरी हो थिअरी.
गांधीजी : हो, ते कळलं. पण असा सिद्धांत मांडण्याचं कारण?
मी : माझा ना एक मित्र आहे जुना.
गांधीजी : वाटलंच मला.
मी : काय?
गांधीजी : काही नाही, बोल तू.
मी : हा मित्र जामच पॉझिटिव्ह आहे हो.
गांधीजी : मग यात वाईट काय आहे?
मी : अहो, पॉझिटिव्ह असावं माणसाने, पण आपण ज्या बोटीतून चाललोय, त्या बोटीत पाणी शिरतंय हे कळल्यावरसुद्धा सगळं कसं आलबेल आहे असं म्हणणाऱ्याचं काय करणार?
गांधीजी : मला वाटतं हा प्रश्न तसा दुय्यम आहे.
मी : म्हणजे?
गांधीजी : बोटीतलं पाणी काढणं आधी महत्त्वाचं आहे. दॅट शुड बी द प्रायॉरिटी.
मी : अहो ते माहितीय मला. मी लोकांच्या अ‍ॅटिटयूडबद्दल बोलतोय.
गांधीजी : हं. म्हणजे लोकांचा अ‍ॅटिटयूड आणि त्याने तुला होणारा त्रास…
मी : त्रास समजा बाजूला ठेवा, पण असं बघा की लोक अशा वृत्तीमुळे सापळ्यात अडकू शकतात.
गांधीजी : म्हणजे कसं?
मी : म्हणजे लोक बहकतात. त्यांना राजकारणी लोक घोळात घेतात. सगळं छान चाललंय, धोका फक्त पाकिस्तानचा आहे अशी एक श्रद्धा अनेक लोकांच्या मनात निर्माण करून द्यायला आजचे सत्ताधारी यशस्वी ठरलेत ना.
गांधीजी : पण मग हे पॉझिटिव्ह कुठाय?
मी : सगळं छान चाललंय हे पॉझिटिव्ह नाही?
गांधीजी : पण पाकिस्तानचा धोका आहे ना? ती निगेटिव्हिटी नाही का?
मी : हो..पण…म्हणजे तुम्हांला काय म्हणायचंय?
गांधीजी : म्हणजे राजकारणी दोन्हीचा वापर करतातच. आजचे सत्ताधारी विशेष आहेत कारण त्यांच्यात प्रचंड पॉझिटिव्हिटी आहे. त्यापायी मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होतंय हे खरं आहेच. आणि ही पॉझिटिव्हिटी इतरांच्यात रूजवण्याचे जे विविध मार्ग आहेत त्यातला एक निगेटिव्हिटी हादेखील आहे. म्हणजे जवाहरलाल, काँग्रेस यांचा द्वेष किंवा मुस्लिम, ख्रिश्चन, पाकिस्तान यांची भीती वगैरे.
मी : हो ना, पण मग हे वाईट आहे ना…
गांधीजी : अर्थातच वाईट आहे.
मी : मग?
गांधीजी : मग काय?
मी : अहो, मग काय काय? त्यावर काहीतरी करायला हवं ना?
गांधीजी : तुम्ही करताच आहात की.
मी : काय करतोय आम्ही?
गांधीजी : भांडताय की सोशल मीडियावर आणि इतरत्र.
मी : म्हणजे भांडायला नको? विरोध करायला नको?
गांधीजी : विरोध करायलाच हवा. पण तो भांडूनच करता येतो का?
मी : हे काय आता? मग कसा करणार विरोध?
गांधीजी : प्रेमाने विरोध केल्यास किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर माणसाविषयी प्रेम ठेवून त्याला विरोध केल्यास बदलाची शक्यता वाढते कारण माणसातला विवेक जागवायला इतर कशाहीपेक्षा प्रेम अधिक उपयुक्त असतं या सिद्धांताबद्दल तुझं काय मत आहे?
मी : तुमचं अवघड आहे.
गांधीजी : अरे, उलट हे सोपं आहे.
मी : असेल. पण ते जमत नाही.
गांधीजी : मग बोटीचं अवघड आहे.

9850677875

Previous articleअमिताभ बच्चन: बोलबच्चन ते अबोलबच्चन
Next articleगांधी विरोधकांचा पंथ निर्माण करताना
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.