-श्याम मानव
डॉ० स्वप्ना सिंधू मुरार यांच्या लेखणीतून सहज, सुलभ, ओघवत्या भाषेत स्रवलेला ‘मीरा मास्टरमाईंड – टीम सुपरमाईंड’ हा कथासंग्रह तुमच्या हातात देताना आनंद होतो आहे. साऱ्याच कथा ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर बेतल्या आहेत. वाचताना चपखलपणे ह्या कथा तार्किक बुद्धीला जागृत करत, वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवण्याचं अत्यंत मौलिक कार्य, सहजपणे करून जातात.
या कथा वाचताना, ‘माझ्या बालपणात असं काही मला का वाचायला मिळालं नाही, नव्हतं ‘ याची खंत तीव्र होत गेली. बालपणापासून मी अधाशी वाचक होतो. वर्ध्यात माझ्या घरापासून ‘गांधी ज्ञान वाचनालय’ किमान ४ किलोमीटर , तर शाळेपासून १ किलोमिटर अंतरावर होतं. एकावेळी दोनच पुस्तकं मिळत असत. पण मी आठवड्यातून किमान ५ वेळा जाऊन १० पुस्तकं तरी आणून वाचत असे. सर्वांपासून चोरून, अभ्यासाच्या पुस्तकात इतर पुस्तके घालून, वाचण्याची सवय अनेकदा मार देववून गेली. खूप खूप खूप वाचले. पण वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवू शकेल, असं काही वाचायला मिळालं नाही. किमान वयाच्या पंचेविसाव्या वर्षांपर्यंत तरी. तार्किक बुद्धीला चालना मिळेल अशा अकबर, बिरबल वा पंचतंत्रासारख्या काही तत्सम कथा मिळाल्या वाचायला. पण त्यातून फक्त बुद्धीचातुर्याला चालना मिळाली असावी. बाकी सारं फॅन्टसीचं जगत निर्माण करणारंच साहित्य होतं. स्वप्नरंजनात गुंगवून टाकणारं साहित्य होतं. विज्ञानकथाही बऱ्याच वाचल्या. प्रामुख्याने एच. जी. वेल्स यांच्या बऱ्याच कथा-कादंबऱ्या मराठीत उपलब्ध होत्या. साऱ्या वाचून काढल्या. फॅन्टसी वर्ल्ड अधिक विस्तारलं, पण कुठेही वैज्ञानिक दृष्टिकोणाला हात घातला गेला नाही. टारझन (एडगर राइस बरोज) चे १० भाग, अरेबियन नाईट्स हे सारं कल्पनाविश्व अधिक साहसिक करणारे साहित्य, त्या काळच्या आमच्या बालविश्वाचं, अविभाज्य अंग होतं.
