मुलांचा वर्ग आणि पालकांची इयत्ता

– अतुल विडूळकर

—————————–

दहावी बारावीचे निकाल लागलेत. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीची चर्चा दरवर्षी होते, तशी आजही होत आहे. ही चर्चा नॉर्मल आहे.

विद्यार्थीच नव्हे तर पालकांच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा, इतकं महत्व या परिक्षांचं आहे. अपेक्षेपेक्षा पाच-दहा टक्के कमी मिळाले तर पालकांना चिंता वाटते. कारण इथून पुढला शैक्षणिक प्रवास सुरु होणार असतो. ही चिंता निश्चितच अनाठायी नाही.

मात्र, खरी चिंता असावी ती हा प्रवास थांबल्यानंतर पुढे काय ? पात्रतेनुसार नोकरी, व्यवसाय पदरी पडेल ते पडेल. पण, एक माणूस म्हणून सदसद्विवेकबुद्धी किती विकसित होईल या बद्दल कुणीही खात्री देऊ शकणार नाही. अशी परिस्थिती आहे.

कारण, एकीकडे कासवाच्या गतीने शैक्षणिक क्षेत्र विद्यार्थ्यांची सदसद्विवेकबुद्धी (conscience) विकसित करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे सशाच्या गतीने आपल्या ‘धारणा’ (Perceptions) निर्माण करण्यासाठी समांतर व्यवस्था काम करत असते. ही व्यवस्था धार्मिक, सामाजिक, राजकीय कोणतीही असू शकते. धारणा घट्ट व्हायला लागल्या की विचारांची वाढ थांबते.

आचार्य  विनोबांसारखे ऋषितुल्य व्यक्ती म्हणत की ‘माझ्याजवळ विचार आहेत, मतं नाहीत !’ आता आपल्या सभोवती नजर टाकली तर सहज लक्षात येईल की सगळीकडे विचारांच्या सिंचनाशिवाय मतांचं पीक आलं आहे. मतांच्या मुळाशी विचारांचा ओलावा नसेल तर धारणांचं तण झपाट्याने वाढते. हे तण कालांतराने तुमच्या मतांपेक्षाही अधिक उंच होते. धारणांच्या तणावर पूर्वग्रहदूषितपणाची कीड जलद वाढते.

एकदा धारणा आणि पूर्वग्रहदूषित मतं यांची युती झाली की माणसाचं स्वतंत्र अस्तित्व संपते. कारण, विचार वैयक्तिक देखील असू शकतात. पण धारणा अधिकांश सामूहिक असतात. त्यामुळे चुकीच्या धारणांनासुद्धा सामाजिक समर्थन मिळण्याची शक्यता अधिक असते. असं समर्थन मिळत गेलं की धारणांचं बहुमत होते आणि वैचारिकता अल्पमतात येते. वैचारिकता अल्पमतात आली की स्वतंत्र विचार करणे हा गुन्हा ठरतो. कधीकधी तो देशद्रोहदेखील ठरतो. अशाच समाजात विचारवंतांच्या हत्या घडतात.

धारणांवर आधारित मतांना सद्सद्विवेक नसतो. कारण, सामूहिक धारणामध्ये जी सुरक्षितता, समर्थन मिळते ते तुमच्या विवेकाला मिळेलच याची खात्री नाही. हा ‘कम्फर्ट झोन’ मग कुणीच तोडू शकत नाही. खरी समस्या इथे आहे. तुमच्या धारणांच्या मजबूत तटबंदीपुढे प्रबोधनाच्या तोफा कुचकामी ठरतात. आणि हा विजय असतो तुमचा मेंदू ताब्यात ठेवणाऱ्या त्या समांतर व्यवस्थेचा. तुम्ही जर या व्यवस्थेचे बळी  असाल तर तुमची पुढली पिढी याच व्यवस्थेची गुलाम असणार आहे, हे आजच पक्क समजा. मग तुमच्या लेकरांना आज ८०, ९० अगदी १०० टक्के गुण मिळाले तरी ते माणूस बनण्याच्या कामी शून्य आहेत.

आजच्या पालकांचा एक मजेशीर केमिकल लोचा झाला आहे. त्यांना त्यांच्या मुलांना आधुनिक शिक्षण द्यायचं आहे. स्टेट बोर्डवाले सीबीएससीचं स्वप्न बघत आहे, सीबीएससीवाले कदाचित एखाद्या इंटरनॅशनल अभ्यासक्रमाचं स्वप्न बघत असतील. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पालकांची इच्छा असते की मुलांचा जॉब, बिझनेस, त्याची लाइफस्टाइल एकदम मॉडर्न, आधुनिक असावी. पण सर्व आधुनिक जीवनमूल्यांशी मात्र पालकांचं बौद्धिक वैर. आईवडिलांना मुलांना आधुनिक जग द्यायचं आहे, पण तेच आधुनिक जग हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, परमत सहिष्णुता या आधुनिक मूल्यांवरच आधारित असेल याबद्दल त्यांचे घोर अज्ञान. कारण, त्यांच्या धारणा !!

द्वेषमूलक आधारांवर निर्माण झालेल्या आपल्या धारणाच आपल्या पुढल्या पिढीला द्वेषाने आंधळे झालेले जग देऊ शकते, याची जाणीव कुणालाच नाही. डिजिटल माध्यमांनी (फेसबुक, व्हाट्सअप) एकीकडे आपली Thought Process कुपोषित केली असतानाच दुसरीकडे प्रसारमाध्यमे मात्र राष्ट्रवादासारख्या अमूर्त (Abstract) गोष्टींचं स्टिरॉइड्स देऊन आपल्या मतांना सूज आणत आहे. या स्टिरॉइड्स पासून आज एकही देश वाचलेला नाही. जगातली चाळीस टक्के जनता राहत असलेल्या अमेरिका, रशिया, चीन, भारत, पाकिस्तान या देशाचं हे वर्तमान आहे.

या देशातील माणसांच्या रोजच्या जगण्यातील प्रेरणा या धर्म, वर्ण, वर्ग अशा आदिम गोष्टींच्या आधारावर विभागल्या गेल्या आहेत. देशप्रेम आणि राष्ट्रवाद यातील फरक कुणी समजून घेऊच नये, यासाठी अर्ध्या जगाची धडपड सुरू आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच ‘शत्रू’ नावाची नवीन गरज कधी निर्माण झाली हे कुणाच्याच लक्षात येऊ नये, इतक्या सहजपणे प्रत्येक देशाने आपापल्या जनतेसमोर शत्रू पोजेक्ट करून ठेवला आहे. हा शत्रू कधी राजकीय असतो तर कधी व्यावसायिक. अशीच परिस्थिती समाज म्हणून प्रत्येक समूहाची आहे.

भारताच्या बाबतीत बोलायचं तर, राष्ट्रीय चळवळ (National Movement), तिने जन्माला घातलेला भारत नावाचा देश, त्या देशाचा भौगोलिक पण सर्वसमावेशक राष्ट्रवाद, स्वातंत्र्यानंतर या देशाने घेतलेली भरारी, ती यशोगाथा हे सर्व काही मोडीत काढण्याची खुमखुमी तुमच्या पुढल्या पिढीला नेमका कोणता भारत देणार आहे, याचा विचार कुणा पालकांनी केला नसेल. एक देश म्हणून यश-अपयश आलंच असेल, पण स्वातंत्र्य चळवळ आणि देशाच्या विकासयात्रेचे स्टेअरिंग ज्यांच्या हाती होते त्यांच्याशी असलेले राजकीय वैर आणि मतभेद सांभाळण्यासाठी या देशाच्या इतिहासाचा तरी बळी देऊ नये, याचं भान राजकारणाला नसेलही.. पण ते आपण तरी सोडू नये, याचीही जाणीव कमी होत आहे.

महात्मा फुले, शाहू महाराज, राजा राममोहन रॉय, कर्वे, टिळक, रानडे, आगरकर, गोखले यांच्यापासून तर गांधी-आंबेडकर-नेहरू-पटेल-राजाजी पर्यंतचा वारसा नाकारून तुम्ही तुमच्या पुढल्या पिढीला चांगला भारत देण्याचा विचार कसे करू शकता ? स्वतंत्र विचार करणाऱ्या माणसांची स्वीकारार्हता संपवण्यासाठी रचलेल्या कथांना तुम्ही ‘कॉपी-पेस्ट-शेअर-फॉरवर्ड’ करत असाल तर तुमच्या मुलांना एक चांगलं जग मिळेल याची अपेक्षा तुम्ही कसे करू शकता ? देशात घडलेली औद्योगिक क्रांती, हरित क्रांती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, आर्थिक उदारीकरणानंतरचा मध्यम वर्गाचा उदय, टेलिकॉम क्रांती, लष्करी सामर्थ्य, पोखरण अणू चाचणी हे सारे टप्पे नाकारून तुम्हाला कसे काय वाटू शकते की आपल्या मुलांना मिळणारा भारत हा ‘विश्वगुरु’ असणार आहे ? धर्मनिरपेक्षता, पुरोगामीत्व आणि उदारमतवाद या मूल्यांकडे राजकारणाच्या चष्म्यातून पाहून टिंगल करणारी माणसं आपलं मूल येणाऱ्या जगात एखाद्या द्वेषमूलक व्यवस्थेचा बळी ठरणार नाही, याची खात्री कसे काय बाळगू शकतात?

आपापले स्वतंत्र राजकीय विचार बाळगण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण तेच राजकीय विचार आपल्या धारणा कोणत्या आधारावर निर्माण करत आहे, याचाही विचार करायला पाहिजे. जात, धर्म, पंथ, वर्ग, पक्ष, या आधारावर  सामाजिक आणि राजकीय लोकशाहीचा अनुबंध आपल्यामुळे धोक्यात येत असेल, तर त्या देशाला दुसऱ्या शत्रूची गरज नाही.

या लेखातील मुद्दे सर्वांना पटतीलच असे नाही. तसा आग्रह देखील नाही. तरीही पण आपल्या मुलांची मार्कलिस्ट बघताना Science मध्ये किती मार्क्स मिळाले हे जरूर बघा, पण त्याचं Conscience कसं विकसित होईल, याचाही विचार करा. विनोबा म्हणायचे, ‘दुसऱ्याच्या डोक्याने विचार करणे म्हणजे नेत्र विकून चित्र विकत घेण्यासारखं आहे’.

तुम्ही तुमची दृष्टी राजकारण्यांच्या हाती दिली, तर ते देतील तीच सृष्टी तुमच्या पुढील पिढीला स्वीकारावी लागणार आहे. त्यामुळे डोक्याच्या खिडक्या उघड्या ठेवा. थोडं तरी जजमेंटल व्हा… आज रिझल्ट आला  आहे ते ठीकच, पण उद्या ‘निकाल’ लागू नये, म्हणजे मिळवलं ! त्यासाठी मूल पुढल्या वर्गात गेलं तरीही आता आपली इयत्ता वाढवल्याशिवाय मुलांची खरी प्रगती शक्य नाही. पटते काय बघा !!!!

(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक आणि वेब पोर्टलचे उपसंपादक आहेत)

84088 58561

 

Previous articleधूर्त वृद्धांच्या कचाट्यातली काँग्रेस !
Next articleकोरोना व्हॅक्सिन खरंच लवकर येणार?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.