मूलतत्त्ववादी, सनातनी आणि आधुनिक विज्ञान

(साभार: साप्ताहिक साधना)

-रामचंद्र गुहा

एकविसाव्या शतकातील या जीवघेण्या आजाराबाबत वैज्ञानिकतेच्या कसोटीवर सिद्ध न झालेले अनेक उपाय सांगण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेते आणि अपप्रचारक यांच्यात जणू अहमहमिकाच लागली आहे. माझ्या राज्यातही भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार विजय संकेश्वर यांनी ऑक्सिजनला पर्याय म्हणून नाकपुड्यांत लिंबाचा रस टाकून श्वास घेण्याचा ‘उपाय’ सुचवला. उत्तर कर्नाटकात आधीच ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा होता. त्यात संकेश्वर यांनी पत्रकार परिषदेत, या उपायामुळे (लिंबाचा रस नाकपुड्यांत घातल्यामुळे) शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीत 80 टक्क्यांची वाढ होते, असे सांगितले. इतकेच नाही तर या घरगुती उपायांमुळे, त्यांच्या सहकारी व नातेवाईकांसह दोनशे व्यक्तींना फायदा झाला आहे, असे त्यांचे निरीक्षण असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र हा उपाय कऱणारे या नेत्याचे अनेक अनुयायी कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत.

………………………………

या महिन्याच्या सुरुवातीला कोरोना महामारीच्या संकटात लोकांनी आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, याबद्दल आयुष मंत्रालयाने काही सूचना दिल्या. या जीवघेण्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आयुष मंत्रालयाने विशिष्ट सूचनांची एक यादीच दिली. ‘दररोज सकाळ-संध्याकाळ नारळाचे किंवा तीळाचे तेल किंवा तूप दोन्ही नाकपुड्यांना लावणे’ ही एक सूचना. ज्यांना हे जमणार नाही, त्यांच्याकरता पर्यायही सुचवण्यात आला. ‘एक चमचाभर नारळाचे किंवा तीळाचे तेल तोंडात घ्यायचे, ते तेल न गिळता दोन तीन मिनिटं तोंडात घोळवायचे आणि मग थुंकून टाकायचे, त्यानंतर गरम पाण्याच्या गुळण्या करायच्या.’ याशिवाय कोरोनाचा सामना करण्यासाठी च्यवनप्राश, हर्बल टी इत्यादींचे नियमित सेवन, दररोज वाफ घेणे हे उपाय आयुष मंत्रालयाने सांगितलेले आहेतच. या उपायांच्या प्रसारापर्यंतच आयुष मंत्रालय थांबले नाही तर, जे देशभक्त या उपायांची अंमलबजावणी करतील त्यांना कोरोनाची लागण होणार नाही, असेही सांगितले गेले. हे पारंपरिक उपाय अंमलात आणल्यास तुमच्या शरीरात कोरोनाचा विषाणू शिरकाव करणार नाही, असेही सांगण्यात आले.

एकविसाव्या शतकातील या जीवघेण्या आजाराबाबत वैज्ञानिकतेच्या कसोटीवर सिद्ध न झालेले अनेक उपाय सांगण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेते आणि अपप्रचारक यांच्यात जणू अहमहमिकाच लागली आहे. माझ्या राज्यातही भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार विजय संकेश्वर यांनी ऑक्सिजनला पर्याय म्हणून नाकपुड्यांत लिंबाचा रस टाकून श्वास घेण्याचा ‘उपाय’ सुचवला. उत्तर कर्नाटकात आधीच ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा होता. त्यात संकेश्वर यांनी पत्रकार परिषदेत, या उपायामुळे (लिंबाचा रस नाकपुड्यांत घातल्यामुळे) शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीत 80 टक्क्यांची वाढ होते, असे सांगितले. इतकेच नाही तर या घरगुती उपायांमुळे, त्यांच्या सहकारी व नातेवाईकांसह दोनशे व्यक्तींना फायदा झाला आहे, असे त्यांचे निरीक्षण असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र हा उपाय कऱणारे या नेत्याचे अनेक अनुयायी कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. ‘द हिंदू’ने याबाबतचे वार्तांकन केले आहे.

यापेक्षा अधिक प्रभावशाली असलेले भाजपचे कर्नाटकातील नेते आणि पक्षाचे सचिव बी.एल. संतोष यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी पाण्याची वाफ घेणे कसे फायदेशीर आहे, हे मोठ्या उत्साहात सांगितले. केवळ हा उपाय करणारे पोलीस अधिकारी गर्दीतही कसे विनामास्क काम करत आहेत, याचे फोटोही त्यांनी फिरवले. भाजपशासित मध्य प्रदेशमधील सांस्कृतिक मंत्री उशा ठाकूर यांनी तर कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी होम हवन करण्याचा ‘खात्रीशीर’ उपाय सांगितला. यावर कडी म्हणजे ‘वातावरण शुद्ध करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी यज्ञ करा. प्राचीन काळापासून अशा महामारीला दूर करण्यासाठी आपल्याकडे होम हवन करण्याचीच प्रथा होती’ असं या मंत्रीमहोदयांनी म्हटले. ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्रात याबद्दलचा वृत्तांत आला आहे.

या मंत्रीमहोदयांचा सल्ला खरोखरीच संपूर्ण ‘परिवाराने’ गांभीर्याने घेतलेला दिसतो. काळ्या टोप्या आणि खाकी विजारी घातलेल्या अनेक स्वयंसेवकांनी, घरोघरी हे होम हवन कसे करावे, त्यात कडूलिंबाच्या पानांचा, लाकडाचा वापर आवर्जून करावा, हे सांगणारे अनेक व्हिडिओ वायरल केले. नथुराम गोडसेला सच्चा देशभक्त मानणाऱ्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनीही असाच एक अजब दावा केला. आपण दररोज गोमुत्र प्राशन करतो, म्हणून आपल्याला अजूनपर्यंत कोरोनाची लागण झालेली नाही, असा त्यांचा दावा. भाजपशासित गुजरात राज्यात तर साधूंच्या एका गटाने दररोज अंगाला गायीचे शेण फासून घ्यायला सुरुवात केली, शेणामुळे विषाणूला रोखून धरता येईल आणि संसर्ग होणार नाही, असा त्यांचा दावा.

अशा फसव्या प्राणघातक उपायांमध्ये ‘कोरोनील’नामक औषधाचाही समावेश आहे. सरकारी संत रामदेव यांनी मागच्या वर्षी दोन वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत या औषधाचे अनावरण केले. यापैकी एक मंत्री म्हणजे आपले विद्यमान आरोग्यमंत्री आणि दुसरे विज्ञान-तंत्रज्ञान खात्याचे मंत्री. सुरुवातीला कोरोनीलचा प्रचार करताना, ‘या औषधाच्या सेवनाने सात दिवसात कोरोना पूर्णपणे खात्रीशीररीत्या बरा होतो.’ असा चुकीचा आणि अवैज्ञानिक दावा करण्यात आला. याबाबत काही स्थानिक माध्यमांनी सविस्तर वार्तांकन केले आहे.

पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रमुख अनुराग वार्ष्णेय, यांनी तर या ‘जादुई औषधाला’ आवश्यक ती सर्व प्रकारची वैज्ञानिक मान्यता मिळाल्याचाही दावा केला. ‘हे औषध घेऊनही जे सात दिवसात करोनामुक्त झाले नाहीत, त्यांनाही मानसिकरीत्या आजाराशी सामना करण्यासाठी, शारीरिक ताकदीसाठी या औषधाचा फायदा झाला, अशा लोकांपैकी 60 टक्के लोक पुढे करोनातून मुक्त झाले, त्यामुळे या औषधाची परिणामकारकता उत्तम आहे.’ असा दावा वार्ष्णेय यांनी केला.

आणखी काही मुद्यांवर चर्चा करण्याआधी मी इथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. वैद्यकीय क्षेत्रातील विविध प्रकारच्या उपचारपद्धतींवर माझा विश्वास आहे. केवळ आधुनिक पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राकडेच सर्व प्रकारच्या मानवी आजारांवर उत्तरे आहेत, असे मी मानत नाही. प्राचीन काळापासून चालत आलेले आयुर्वेद, होमिओपॅथी, योगा यांसारख्या उपचारांनी, दीर्घकालीन अस्थमा, पाठदुखी, ऋतुमानानुसार होणाऱ्या काही एलर्जी यावर काही प्रमाणात आराम पडतो, असे माझे स्वत:च्या अगदी खासगी अनुभवातून बनलेले मत आहे. आयुष्यात अनेक टप्प्यांवर मी याचा अनुभव घेतला आहे.

कोविड-19 हा पूर्णपणे एकविसाव्या शतकातला विषाणू आहे. जुन्या काळापासून आयुर्वेद, योगा, युनानी तसेच सिद्ध उपचारपद्धती, होमिओपॅथीचे संशोधन करणाऱ्यांना हा विषाणू अपिरचित आहे. शिवाय या विषाणूशी आपण सामना करत आहोत, याला फार फार तर एक वर्षाचा काळ लोटला आहे. त्यामुळे कडुनिंबाची पाने जाळल्याने वा गोमूत्र प्राशन करण्याने, झाडपाल्याच्या गोळ्या खाल्याने किंवा एखाद्याने अंगाला शेण फासल्याने, नाकपुड्यांमध्ये नारळाचे तेल वा तूप घातल्याने या आजाराला प्रतिबंध करता येतो, हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे सध्या उपलब्ध नाहीत. किंवा लागण झालीच तर उपायांनी हा आजार पटकन बरा होतो, असं सिद्ध करणारेही कोणतेही वैज्ञानिक पुरावे आपल्यासमोर नाहीत.

कोरोनापासून प्रतिबंधाचे दोन खात्रीशीर उपाय मात्र आपल्याला माहीत आहेत. व्यक्तींपासून शारीरिक अंतर राखणे आणि प्रतिबंधक लस घेणे. या दोन उपायांनी मात्र कोरोनाला प्रतिबंध केला जाऊ शकतो, हे सिद्ध करणारे अनेक वैज्ञानिक दाखले आपल्यासमोर आहेत. आणि नेमके हे दोन उपाय करण्याबाबत हिंदुत्ववादी सरकारने आपली घोर निराशा केली आहे. सरकारने, गर्दी करणाऱ्या मोठमोठ्या राजकीय सभा, रॅलींना केवळ परवानग्याच नाही तर प्रोत्साहनही दिले. याउलट स्थानिक पातळीवर लसनिर्मितीचा वेग वाढवण्यासाठी, भारतातील नवीन लशींकरता मान्यता देण्यासाठी मात्र सरकारने ही कार्यतत्परता दाखवली नाही.

मी शास्त्रज्ञांच्या कुटुंबात वाढलो. माझे वडील आणि आजोबा दोघेही शास्त्रज्ञ होते. ते दोघेही शिवी वा अपशब्द म्हणून एक दोनच अपशब्द वापरत असत. ‘मूर्खपणा’ आणि ‘अंधश्रद्धा’ हे दोनच अपशब्द त्यांनी आयुष्यभर वापरले. वडील आणि आजोबा आता हयात नाहीत. पण आताच्या वातावरणात, विशेषत: सत्ताधारी पक्षाकडून कोविडशी मुकाबला करण्याच्या नावाखाली खोटेनाटे पसरवले जाण्याच्या या परिस्थितीत माझे वडील आणि आजोबा आज असते, तर त्यांनी काय विचार केला असता? असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. खरे   सांगायचे तर हे खोटेनाटे, अंधश्रद्धा, मूर्खपणा ही काही कोणा एका मंत्र्याची किंवा राज्य पातळीवरील एखाद्या राजकारण्याची मक्तेदारी नाही.

हे सारे संघ परिवार आणि परिवाराचे प्रमुख असलेले पंतप्रधान स्वत: पसरवत आहेत. मागच्या वर्षी मार्चमध्ये या महामारीने आपले अक्राळ-विक्राळ रूप दाखवण्यास सुरुवात केली, तेव्हा पंतप्रधानांनी आपल्याला, संध्याकाळी पाच वाजता, पाच मिनिटे थाळ्या वाजवायला सांगितले होते. त्यापुढील महिन्यात, जेव्हा कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती किती गंभीर आहे, हे अधिक स्पष्ट होत होते, तेव्हा त्यांनी एके दिवशी, रात्री नऊ वाजता बरोब्बर नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून मेणबत्या पेटवण्याचा कार्यक्रम लोकांना दिला. आता या उपायांनी, उत्तर अमेरिकेपासून अगदी युरोपपर्यंत पसरलेल्या या विषाणूपासून आपण कसा बचाव करणार होतो, या आजाराला कसा प्रतिबंध करणार होतो, हे कदाचित पंतप्रधानांचे ज्योतिषीच सांगू शकतील.

संघ परिवारासाठी श्रद्धा आणि हटवादीपणा या दोन बाबी तर्क आणि विज्ञानापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत. नरेंद्र मोदी आता जे करत आहेत, त्यातून त्यांची ज्या विचारसरणीच्या मुशीत घडण झालेली आहे, तिचा संकुचितपणा, कोतेपणा दिसतो. २०१४ दरम्यान पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असताना, निवडणूक प्रचारादरम्यान, त्यांनी बाबा रामदेवचे उघडपणे आणि भरपूर कौतुक केले. रामदेव यांच्या ठायी असलेली ‘तळमळ आणि ध्येयनिष्ठा’ याचे त्यांनी कौतुक केले, ‘त्यांच्या ध्येयाप्रती मला आस्था वाटते’ असेही ते (मोदी) म्हणाले होते. तेव्हापासून हा रामदेव राजसत्तेचा लाडका संत बनला, हा केवळ योगायोग नाही. तेव्हापासून पंतप्रधान अशा तथाकथित देवमाणसांच्या सान्निध्यात राहू लागले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ संबंध असलेल्यांना शिक्षण, आरोग्य, विज्ञान-तंत्रजान यांसारख्या महत्त्वाच्या खात्याची मंत्रिपदे देऊ लागले.

या वर्षी भरवलेला कुंभमेळा हे हिंदुत्ववादी तर्कटाचे जणू प्रतीकच होते. ज्योतिषांनी आग्रह केला म्हणून या वर्षी, महामारी टिपेला पोहोचलेली असतानाही कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले कारण रास्वसंघ आणि भाजपला त्याचे सामाजिक आणि राजकीय भांडवल करायचे होते. आता उत्तर भारतात विशेषत: खेड्यांमध्ये पसरलेला कोरोना आणि या कुंभमेळ्याला दिलेली परवानगी यातील थेट संबंध एखाद्याच्या सहज लक्षात येऊ शकतो, किंबहुना यातील संबंध समजून घेतलाच पाहिजे. एकीकडे केंद्र सरकारने, भाजपने कुंभमेळ्याला दिलेली परवानगी आणि दुसरीकडे उत्तरेत नद्यांमध्ये वाहणारे, नदीकिनारी वाळूत इतस्तत पडलेले असंख्य मृतदेह! ही भयावह शोकांतिका घडण्यापासून रोखणे पंतप्रधान, राजकीय यंत्रणा व नेत्यांपासून अगदी सरसंघचालकांपर्यंत अनेकांच्या हातात होते, परंतु त्यांनी ते केले नाही; कारण श्रद्धा आणि हटवादीपणाला त्यांच्या लेखी तर्क आणि विज्ञानापेक्षाही जास्त महत्त्व आहे.

दोन वर्षांपूर्वी एप्रिल २०१९ मध्ये याच स्तंभात मी मोदींना असलेल्या विज्ञानाच्या तिटकाऱ्याबद्दल लिहिलं होतं. या तिटकाऱ्याने, तुच्छतेने वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या भारतातील संस्थाचे कसे राजकीयीकरण होत आहे, हे त्यात दाखवले होते. ‘अशाने भारतातील, ज्ञानवर्धन आणि नवे संशोधन करणाऱ्या संस्थांचे पद्धतशीर अवमूल्यन केले जात आहे, त्यामुळे मोदी सरकार देशाच्या सामाजिक आणि आर्थिक भविष्यापुढेच अतिशय वाईट पद्धतीने धोका निर्माण करत आहे. बुद्धिप्रामाण्यावादावर केल्या जाणाऱ्या या क्रूर प्रहारांची किंमत भारतीयांना आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांनाही मोजावी लागेल.’ असेही तेव्हा लिहिले होते. हे लिहिले तेव्हा कोविडसारखी महामारी भविष्यात आ वासून समोर उभी असेल, अशी कल्पनाही केलेली नव्हती, आता या महामारीने कळस गाठलेला आहे आणि मोदींचे क्रूर व्यवहारांचे सत्र सुरूच आहे. बुद्धिप्रामाण्यवादावर घाव घालणे सुरूच आहे. दोन वर्षांपूर्वी मी वर्तवलेले अंधारे भविष्य आता अधिकच अंध:कारमय झाले आहे. या महामारीचा मुकाबला करताना आपला देश आणि सारे भारतीय यापेक्षा आणखी कठीण काळातून जातील. केंद्र सरकारने आणि सत्ताधारी पक्षाने विज्ञान, तर्कशुद्धपणा यांप्रती दाखवलेल्या अनास्थेने, उर्मटपणाने ही लढाई फारच अवघड आणि जीवघेणी बनली आहे.

(रामचंद्र गुहा हे नामवंत इतिहासकार असून समकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर तसेच पर्यावरणावर आणि क्रिकेटच्या इतिहासावर त्यांनी विपुल लेखन केले आहे) 

अनुवाद : प्रियांका तुपे 

Previous articleगजानन घोंगडेंच्या व्यंगचित्रकलेची ३१ वर्षे!
Next articleसायबरदुनिया तुमच्यात काय बदलं घडविते?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.