‘मॅरेज स्टोरी’ : वेगळं होण्यातली प्रेम कहाणी…

– सानिया भालेराव

“मॅरेज स्टोरी” हा नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित चित्रपट खूप कारणांसाठी खास आहे. Noah Baumbach (नोहा बॉम्बॅक) या दिग्दर्शकाचा हा चित्रपट..गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये या चित्रपटाला सहा नॉमिनेशन्स मिळाले आहेत. घटस्फोट या अतिशय किचकट विषयावर हा चित्रपट असला तरी ही गोष्ट आहे नवरा- बायको आणि त्यांच्या लग्नाची आणि त्यांच्या प्रेमाची. सुरवातीला दोन स्वतंत्र असलेलं जीव एकत्र येतात, लग्न करतात आणि मग त्यांचं एकजीव होणं असं काहीसं होऊन जातं की त्यांच्यातला एकच फक्त दिसत राहतो आणि दुसरा स्वतःच असणं विसरून जातो. एकरूप असूनही स्वतःच अस्तित्व कायम ठेवणं जेंव्हा जमत नाही.. तेंव्हा ती साथ.. साथ राहत नाही… गेल्या काही वर्षांत लग्न किंवा नवरा बायकोमधलं नातं यावर भाष्य करणारा इतका सुरेख चित्रपट मी पाहिला नाहीये. लग्न तसही अत्यंत मोनोटोनस गोष्ट. खऱ्या माणसांच्या, खऱ्या नात्यावर चित्रपट बनवणं आणि तो ही इतक्या पारदर्शकपणे हे कमाल स्किल आहे.

……………………………………………………………….

चार्ली (ऍडम ड्रायव्हर) आणि निकोल (स्कार्लेट जोहानसन) हे पती पत्नी. चित्रपट सुरु होतो तेंव्हा त्याच्या पहिल्या सेकंदापासूनच आपण चार्ली आणि निकोलच्या आयुष्याचा एक भाग बनून जातो. चार्ली निकोलमध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत हे सांगतो आहे आणि निकोल चार्लीमध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत हे सांगते आहे. हे सगळं बॅकड्रॉपला चालू असतं त्यांच्या डिवोर्सच्या.. चित्रपटाची वेगळी अशी कथा सांगण्यासारखी नाहीये कारण साधारणतः लग्न ज्या फेजेस मधून जातं, त्या फेजेस दिग्दर्शकाने अचूक घेतल्या आहेत. पण हा चित्रपट पाहताना आत सतत काहीतरी भिरभिरत राहतं आणि टोचत राहतं. स्कार्लेट जोहानसन, ऍडम ड्रायव्हर यांचा उत्तम अभिनय या चित्रपटाची जमेची बाजू.

“And they lived happily ever after”… हा विचार अत्यंत पोकळ आणि कुचकामी आहे असं मला कायम वाटत आलं आहे. लग्न माणसाला बदलतं. चांगलं आणि वाईट दोनीही पद्धतीने. आपल्याकडे जर असा पिक्चर करायचा झाला तर तो किती मॅडछाप मेलोड्रॅमॅटिक करतील हा विचार मनात आला. दोन लोक जे प्रेमात होते, मग त्यांनी लग्न केलं, मूल झालं आणि आता त्यांना एकत्र राहवं वाटत नाहीये. कारण काय… आणि या कारणात सगळी मेख आहे. कारण कधीच एक नसतं आणि कित्येकदा ते एक असेल तर वेगळं होणं सोपं सुद्धा असतं. पण जिथे कित्येक वर्ष एकत्र घालवलेली असतात, एकमेकांच्या चांगल्या गोष्टींचीच नाही तर नको वाटणाऱ्या त्रासदायक गोष्टींची सुद्धा सवय झालेली असते.. तिथे वेगळं होणं हे किती त्रासदायक आणि तरीही मोकळं करणारं असू शकतं हे या चित्रपटात फार सुरेख पद्धतीने दाखवलं आहे.

निकोलला जेंव्हा असं वाटतं की मला चार्लीकडून प्रेम मिळत नाहीये, मला जे हवं आहे ते काम करता येत नाहीये तेंव्हा ती ठरवते की आपण वेगळं व्हावं. विवाहबाह्य संबंध आहेत म्हणून लग्न मोडणं हे तसं प्रचलित कारण. आणि सहसा एक समाज म्हणून मान्य करता येण्यासारखं. कित्येकदा त्यापलीकडे जाऊन लग्नामध्ये आणि दोन जणांमध्ये एक डीसफंक्शनॅलिटी असते. म्हणजे लग्नात राहून इतर ठिकाणी प्रेमप्रकरणं करणं हे चालूवून घ्यायला पाहिजे असं नाही. लग्न म्हणजे मोनोगॅमीला संमती इतकं सरळ इक्वेशन आहे खरं तर. ज्याच्याशी लग्न केलं त्या व्यक्तीशीच आयुष्यभर संग करणं हे लग्नाचं बेसिक तत्व आहे. तसं नको असल्यास माणसाने लग्न करायच्या भानगडीत पडू नये. पण कित्येकदा विवाहबाह्य संबंध हे एकच कारण नसतं वेगळं होण्यासाठी. एकमेकांवर प्रेम आहे पण एकत्र राहणं अशक्य होतं.. अशी वेडछाप कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन या चित्रपटात दिसते आणि ती रिलेटेबल वाटते कारण भावनिक पातळीवर हा चित्रपट आपल्याशी संवाद साधतो.

एकमेकांना समजून घेणं म्हणजे काहीतरी कॉम्प्रमाईझ करणं असं जे गणित झालं आहे आजकाल त्यामुळे लग्न टिकणं अवघड होत चाललं आहे. म्हणजे मागच्या पिढ्यांमध्ये संसार म्हणजे फार आनंदी, सफल वगैरे होते असं नाही.. पण निभावून नेणं त्यांना कदाचित जास्त जमायचं. टिकवून ठेवणं वगैरे.. हे खाद्यपदार्थांच्या बाबतीत ठीक आहे.. पण लग्न टिकवावं लागणं.. हे एक नात्याच्या दृष्टीने खरंच चांगलं लक्षण आहे का? नातं टिकवून ठेवावं लागत असेल, निभावून न्यावं लागत असेल तर सामंजस्य नक्की कशात आहे? ते नातं तसंच ओढून नेण्यात की त्या नात्याला मोकळं करण्यात? ‘आमच्या वेळी नव्हतं बाई असं’.. हे असं जेंव्हा म्हंटल्या जातं तेंव्हा नक्की काय नव्हतं त्या वेळी? त्यावेळी जोडीदाराचं मन मारलं जायचं नाही की नात्यामधील आदर कमी होत जाईल असं वर्तन व्हायचं नाही, बेडरूममधलं राजकारण व्हायचं नाही की फक्त आपापल्या नातेवाईकांचंच गुणगान गाणं आणि दुसऱ्याच्या नातलगांचं उणं – दुणं काढल्या जायचं नाही, पोरांवरून इमोशनल ब्लॅकमेल केलं जायचं नाही?…. जर काही नसेलच त्यावेळी तर ‘कसं तरी काढायचं’ या ऐवजी ‘चागलं, आनंदी, सहज नातं ठेऊन जगावंसं वाटणं’ हा दृष्टीकोन!

‘मॅरेज स्टोरी’ सारखे चित्रपट आवश्यक यासाठी आहेत की हे चित्रपट वेगळं होण्यातला जो त्रास आहे, ज्या लिगॅलिटीज आहेत, त्या लिगॅलिटीज.. दोन जणांमधलं नातं जे आधीच मोडकळीस आलेलं असतं.. त्या नात्याला अजून किती कडवट करतात हे जाणवून देतात. वेगळं होणं हे दोघांच्या संमतीने जरी असलं तरी त्यात भरडल्या जाणं विशेषतः ज्यांच्यामध्ये प्रेम अजूनही शिल्लक आहे अशा जोडप्यांसाठी किती वेदनादायी असू शकतं हे जाणवतं. निकोलचं चार्लीवर असलेलं प्रेम, चार्लीला निकोलबद्दल वाटणारी काळजी, चार्लीचं त्याच्या मुलावर हेन्रीवर असलेलं प्रेम, मग कोर्टामध्ये एकमेकांचे वकील जेंव्हा कोण सरस आहे हे दाखवून देण्याच्या झटापटीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या चिंध्या करतात त्या सीनमध्ये जे काही दाखवलं आहे ना… दोन टोकाला अस्वथपणे खुर्चीवर बसलेल्या निकोल आणि चार्लीमध्ये.. ते जे बोलून कळणार नाही.. कदाचित पाहून सुद्धा कळणार नाही.. ती अव्यक्त हेझिटन्ट तडफड.. वेगळं व्हायचं असूनही वेगळं होता न येणाऱ्या जीवांची… ती आहे मॅरेज स्टोरी…

पटत नसतांना जळत बसणं, दुसऱ्याला जाळत बसणं, कुढणं, रडणं, एकमेकांना ओरबाडणं, रडवणं, वेडं करणं, भांडून जीव नकोसा करणं, टोचून बोलणं, घालून पाडून बोलणं, वागण्यात दुरावा आणणं.. दोन लोक जे एकमेकांबरोबर आयुष्य घालवू इच्छितात ते कसे बरं या टोकापर्यंत पोहोचतात? लग्न म्हणजे विधिवत झालेले सोपस्कार नसतात. त्यात हजारो क्षण असतात एकत्र जगलेले. आरशावर लावलेली तिची टिकली, बेडवर पडलेला त्याचा ओला टॉवेल, अस्ताव्यस्त झालेलं तिचं कपाट, चहा पिऊन तसाच ठेवलेला त्याचा कप, तिच्या असंख्य कपड्यांनी भरलेलं कपाट, दाराच्या मागे टांगलेले त्याचे बेल्ट्स, मूल झाल्यावर त्याचा चेहरा बघताना त्या दोघांनी एकमेकांकडे टाकलेला कटाक्ष, पोर आजारी पडल्यावर सगळी कामं सोडून येणारा तो, मूल रडत असताना कासावीस होणारी ती, त्याला आवडतं ते बनवणारी ती, तिच्या आवडीची साडी घेऊन येणारा तो, एखाद्या संध्याकाळी बाहेर मस्त हवा असताना गरम गरम चहाचा कप आणून देणारी ती, तिची पाठ दुखत असताना तिला मलम लावून देणारा तो, रविवारी एकत्र बसून पोरांबरोबर गप्पा मारता जेवताना मधूनच एकमेकांकडे बघणारे ते दोघं.. हजारो, लाखो क्षण एकत्र अनुभवलेले ते दोघं… हे सगळं सगळं म्हणजे लग्न.. यातून मोकळं होता येणं इतकं सोपं नाहीच.. डिव्होर्स हा जसा शब्द तसा लग्न हा सुद्धा.. या शब्दांच्या पलीकडे या जाणाऱ्या गोष्टी.. जसं लग्न म्हटलं की एकरूप होणं नसतं तसंच डिव्होर्स म्हटलं की वेगळं होणं सुद्धा नसतं.. नाती म्हणूनच कमालीची असतात आणि लग्न म्हणूनच जगातलं सगळ्यात चमत्कारिक नातं आहे.. केवळ जे दोन लोक या नात्यात असतात त्यांनाच तो विचित्रपणा माहित असतो.

संसार करणं.. हे जर स्किल असेल तर कालातंराने माणूस कसा तेच तेच काम करून कसा त्यात निपुण होतो.. तसा तो होत असेल कदाचित यातही. मग संसार उत्तम करणं हा स्किलसेट्स मधला एक गुण झाला. बस्स. पण ते तितकंच असतं का? आणि बिनसलं म्हणून डाव मोडला तरी तो मोडायच्या आधी खेळताना जो आनंद मिळाला होता, जे क्षण अनुभवले होते.. त्या क्षणांचं काय? आणि अशा कित्येक प्रश्नांवर हा चित्रपट विचार करायला लावतो. टिपिकल चौकट असणाऱ्या लोकांनी हा चित्रपट पाहूच नये. चाकू हळुवारपणे आत घुसत असतांना कसं वाटेल.. तसं काहीसं हा चित्रपट पाहताना होतं.. आता वाटतं की जखम खूप खोलवर झाली आहे.. चाकू पटकन काढून एकदाचं आपल्याला मोकळं करावं.. पण तसं होत नाही.. आता तो चाकू पहिल्यापेक्षा अधिक संथपणे बाहेर येतो.. आपल्याला वाटतं की आता अजून जास्त इजा होईल, दुखेल.. पण तसं होत नाही.. तो चाकू बाहेर येतो.. पण त्याला रक्त नसतं लागलेलं.. उलट वेगळंच मोकळं वाटायला लागतं.. डोळ्यात पाणी आणि ओठावर हसू.. ज्यांना हे झेपेल त्यांच्यासाठीच.. वेगळं होण्यातली प्रेम कहाणी.. A devastating, surreal tale of love,pain and togetherness…”Marriage Story”!

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे )

[email protected]

Previous articleस्वातंत्र्यवीर का स्वातंत्र्याचे शत्रू?
Next articleगाडगेबाबांच्या कीर्तनातील ‘अँटी व्हायरस सॉफ्टवेअर’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.