मैत्री कुणासारखी असावी?

-रेणुका खोत

मैत्री कशी करावी आणि कशी असावी ती कशी टिकवावी चालवावी ह्याची घडाभर अक्कल पुरषांकडे असते पण स्त्रियांकडे फक्त ती खडाभर असते. स्त्रियांमधल्या मैत्रीत प्रचंड कारस्थानं, शिळेपणा, तोचतोचपणा, अनुमान निष्कर्षावर येण्याची खाज, सगळं सुधारायची हौस, त्यात दबाव, ब्लॅकमेलिंग, ताण हे सगळं असतं. स्त्रिया ह्या अजिबात पुरषांसारख्या कूल नसतात. त्यांना लेट गो करता येत नाही. स्त्रियांच्या मैत्रीला त्या स्वत:हून आवतण देऊन मागून अश्व लावून घेतात आणि मग तोंडाने खिंकाळत बसतात. स्त्रियांनाा त्यांच्या मैत्रीची किंमत नसते. त्याउलट पुरूष हा मैत्रीत फार सहज असतो, भावनांचे फालतू लिप्ताळे नसतात. ते एंजॉय करण्यावर भर देतात. काही मॅटर झालाच तर तो सॉल्व्ह करण्यावर त्यांचा भर असतो. बायकांना मैत्रीला फोडण्या देऊन त्यावर मीठ मोहरी घालून दादरा लावून त्याचं लोणचं करून बरण्यांमध्ये भरून ठेवण्याची हलकट सवय असते. त्या फक्त फुगून बसू शकतात. पुरूष मॅटर बोलून निपटावू शकतात. ह्याबाबतील स्त्रिया त्यांच्यापुढे किस झाड की पत्ती आहेत. पुरषांमधली मैत्री वर्षानुवर्षा टिकते कारण ते एकमेकांच्या फटेल्यात नको तसा पाय घालत नाहीत. ते खरोखर काळजी असेल तर थांबतात वाट पाहतात, मित्राला सोडत नसतात.
स्त्रिया वयाने कितीही वाढल्या तरी तुझं घर ऊन्हात गं बाई ऊं ऊं ऊं. तुझ्याशी कट्टी गं बाई…. ऊं ऊं ऊं इतपत त्यांची मजल जाते. एक घाव दोन तुकडे तिथल्या तिथे बोलून विषय संपवणं, समोरच्याचं ऐकून घेणं, त्यावर विचार करणं आणि मग बोलणं, आपली चूक असेल तर मान्य करून पुढे जाणं हे स्त्रियांना बापजन्मात जमणार नाही. त्यांना फतकल मारून तिथल्या तिथे बसायची सवय असते. त्यांचा खुंट पुढे सरकत नाही. स्त्रिया अच्चानक भयावह प्रेमात येतात पण एकमेकांच्या कामाची तारीफ करणे, त्याबद्दल बोलणे, जाणून घेणे ह्यात विशेष रस घेत नाहीत. पुरषांचे बरेचसे बोलणे हे कामाविषयक, त्यांच्या आवडीनावडीविषयक असते त्यामुळे ते चर्चा एंजॉय करतात. स्त्रियांच्या बहुतांश गप्पांमध्ये विष भरलेले असते जे त्यांच्यावर उलटते. स्त्रिया घट्ट मैत्रीत बायको व्हायचा प्रयत्न करतात आणि पुरूष मित्र झाले की ते मित्रच असतात आणि हक्क गाजवतात. इथे तसं नसतं. इथे जरा मनाविरूद्ध झालं की स्त्री मैत्रीण तलाक तलाक तलाक असं न बोलता ते प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवतात.
स्त्री मैत्रिणी ह्या महापझेसिव्ह व पॉलिटिकली करेक्ट राहण्याचा अतोनात बावळट शौक असतो त्यांना. ह्याचं विशेष कौतुकही त्यांस असते. हे सत्य त्यांना दाखवले तर त्यावरून त्या भयानक भांडण कधीही सुरू करू शकतात. पुरूष मित्रांना त्याच्या दुसऱ्या  मित्राच्या अजून कुणी जवळ आलं तरी स्वत:बद्दल झाट भीती नसते. तो विषयच नसतो. पुरूष बऱ्यापैकी खुला असतो. पुरष मित्रांना काही अपेक्षा नसतात विशेष. भेटा बसा प्या प्लॅन करा फिरा. मग आपल्या डेनमध्ये परत. त्यांचा हिशेब सरळ असतो. पुरूष हे चिलयोगी असतात. स्त्रियांना मैत्रीत भयंकर मूड स्विंग्ज असतात त्यामुळे भयानक फालतुगिरी होते. स्त्रियांना मॅटर झाला की मनवणे, समजूत घालणे, नमते घेणे, आहे ते नीट करणे ह्याची झाट काही कला अवगत नसते. पुरूष मॅटर झाला की तो तिथल्या तिथे पुरून पुढच्या पेजवर येतात. कारण त्यांना एंजॉय करण्यात फार स्वारस्य असतं. पुरषांना हे कळलेलं असतं की मैत्रीत येणार वादळं फारच निरर्थक असतात त्यांना किती महत्व द्यावं न द्यावं हे त्यांस कळतं. बायका ह्याबाबतीत काला अक्षर भैस बराबर असतं.
खूप वाद झाले तरी एकमेकांना वाट्टेल ते बोलून, चार शिव्या घालून एकमेकांचा ऐ भैण काढून पुरूष शांत होतात आणि ‘ बसतात ‘. पण त्याच मित्राला उद्या जरा काही झालं तर त्याला दवाखान्यात घेऊन जायाला तडक एका कॉलमध्ये हजर होतात. स्त्रियाचं किनई कसं बाई किस बाई किस. मोकळं व्हायचं नसतं. दळण दळत बसायचं. ज्या गोष्टीमुळे खरं इतकं काही होण्याची गरज नव्हती असं वाटावं तिथे त्या फालतू अहंकार कुरवाळत बिळात घुसून अंडी देत बसतात.
दोन पुरूष गॉसिप नंतर करतात. आधी तुझं काय चांगलं नी माझं काय चांगलं ह्यावर बोलतात. तसच तुझं काय पटत नाही आणि पटतं ह्यावर बोलतात. त्यांचे त्यांचे विषय असतात आणि मग तारा जुळतात. स्त्रिया आधी सुरवातच ही कशी वाईट ती कशी वाईट आणि त्यांच्यापेक्षा तू कशी ना चांगली हे दाखवून वाकड्या बोटाने तूप काढायचा सव्यापसव्य करतात. मग तूप संपलं की बोट अडकलं म्हणून बोंबलतात. पुरूष हे त्यांच्या पुरूष व स्त्री दोस्तांचे खूप चांगले अप्रिसिएशन करू शकतात, मनोबल वाढवू शकतात. स्त्री दोस्तांना आपसातच एकमेकांची स्तुती करायला, खुल्या मनाने कौतुक करायला जड जातं . आधी तुझे हे वाईट, ते खराब ह्यावर सातत्याने मारा. तू माझ्यासाठी हेच केलं नाही, तू असं वागशील असं वाटलं नव्हतं, तू हे बोललीस मी विश्वासच ठेऊ शकत नाही. ???? असा कायम धक्का बसल्यामुळे आश्चर्य केल्यासारखा त्यांचा चेहरा असतो. मित्र म्हणजे पुरूष मित्र इतका कूल असतो की त्यांच्या समोर वा मागे त्याचा वाईटपणा केला तरी तो म्हणतो मला काही फरक पडत नाही. मित्राला आपल्याबद्दल चार वाईट गोष्टी बोलण्याची सवलत असू शकते हे पुरषाला जितकं चांगलं कळतं तितकं स्त्रियांना… विषयच नाही. त्या लगेच विश्वासघातकी किंवा हिंमत आहे तर समोर बोल ना पर्यंत जाता. अगदीच चिघाळा. च्यायला माझी एखादी मैत्रीण माझ्यामागे माझ्याबद्दल बिनधास्त बोलेल अगदी गॉसिप करेल तरी आमच्या मैत्रीत फरक पडणार नाही, असा ठामपणा स्त्रीकडे कधी यायचा.
स्त्रिया मैत्रीत सरड्यासारखे रंग बदलतात, अत्यंत अनप्रेडिक्टेबल असतात. ज्याला त्या त्यांचा एटिट्युड मानतात. ज्यावर थुकू पण नये इतक्या घाणेरड्या एटिट्युडचा त्यांना गंड असतो. पैशाचा, कामाचा, यशाचा माज मैत्रिणालाही दाखवायला त्या मागेपुढे बघत नाहीत. एक गरीब मित्र आपल्या श्रीमंत मित्रालाही सगळ्यांच्या समोर जोरात ए गांडू म्हणून हाक मारू शकतो. स्त्रिया त्यामानाने काही अपवाद वगळता फार खुज्या मनाच्या असतात.
वाईट वाटणं, बोअर होणं, चिघळवणं ह्याला स्त्री मैत्रीत अनन्यसाधारण थोर महत्व आहे. ह्या गुणाचा पुरषांमध्ये तसा अभावच. म्हणून मला पुरषांतली मैत्री आवडते. आदर्श वाटते. स्त्रियांसारखे सरड्यासारखे रंग बदणारे आणि मैत्री दुषित करणारे पुरूषही असतात नाही, असं नाही. ते कमनशिबी म्हणायचे, अजून काय दुसरं.

[email protected]

Previous articleअक्षय इंडिकरचा ‘त्रिज्या’ इस्टोनियातील ‘ब्लॅक नाइटस्’मध्ये
Next articleबाळासाहेब आणि पवार साहेब -एक दिलदार यारीदुश्मनी!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here