रोबो आर्टीस्ट : नव्या युगाची चाहूल

-शेखर पाटील

रोबोटिक्स हे भविष्यातील हार्डवेअर तर आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स हे सॉफ्टवेअर असल्याची बाब नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आपण संगणक ( विंडोज/लिनक्स वा अन्य ) व स्मार्टफोन ( अँड्रॉइड, आयओएस वा अन्य) असा हार्डवेअर व सॉफ्टरवेअरचा मिलाफ आधीच वापरत आहोत. आता आपण रोबोटिक्स आणि ‘एआय’ यांच्या संगमातून तयार करण्यात आलेली उपकरणे वापरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. अर्थात, याचा वापर प्रचलीत होण्याआधीच याचे अनेक भन्नाट प्रकार आपल्या समोर येत आहेत.

रोबो अर्थात यंत्रमानव आता विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत झाले आहेत. याचीच पुढील आवृत्ती रोबो आर्टीस्टच्या माध्यमातून समोर आली आहे. ‘एआय-दा’ या नावाच्या यंत्र चित्रकाराच्या छायाचित्रांचे प्रदर्शन सुरू झाले असून ही बाब ऐतिहासीक मानली जात आहे. आयदोन मिलर या कलाप्रेमी दालन संचालकाने ‘आय-दा’ला इंजिनिअर्ड आर्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने विकसित केले आहे. ही महिला यंत्र कलावंत आहे. प्रथम महिला गणितज्ज्ञ म्हणून ख्यात असणार्‍या अदा लोव्हेलॅस आणि कंप्युटींगचे जनक अ‍ॅलन टुरींग यांच्या नावांवरून हिला एआय-दा हे नाव देण्यात आले आहे. ही ‘ह्युमनाईड’ या प्रकारातील अर्थात हुबेहूब मानवाच्या आकृतीसमान बाह्यांग असणारी रोबो आहे. अगदी सध्या प्रचलीत असणार्‍या फॅशननुसार तिची वस्त्रे आहेत. ती अगदी मानवाप्रमाणे हालचाली करू शकते. ती कलेबाबत भाष्यदेखील करते. अथवा तिच्या कलाकृतींची माहितीदेखील ती देऊ शकते.

एआय-दा च्या डोळ्यांमध्ये अतिशय तीक्ष्ण आणि संवेदनशील असे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यांच्या मदतीने हव्या त्या व्यक्ती अथवा परिसराचे स्केच काढण्यासाठी यात कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र अल्गॉरिदम विकसित केला आहे. आपल्या रोबोटिक आर्मच्या मदतीने एआय-दा ही साध्या स्केचेसपासून चित्रकलेच्या विविध प्रकारांमधील कलाकृती सहजपणे तयार करते. ती पेन्सील, पेन तसेच विविध आकारमानांचे कुंचले हाताळू शकते. चित्रांच्या रेखाटनासह ती शिल्पदेखील तयार करते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे व्हिडीओ चित्रीकरणातही ती पारंगत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात सध्या सुरू असणार्‍या अनसिक्युअर्ड फ्युचर या नावाने भरविण्यात आलेलया प्रदर्शनात तिच्या २० कलाकृती प्रदर्शीत करण्यात आल्या आहेत. यात एका शिल्पाचाही समावेश आहे. तर ती नृत्य, गायनादी परफॉर्मींग आर्टमध्येही पारंगत असली तरी याबाबत सध्या तरी जास्त माहिती देण्यात आलेली नाही.

ह्युमनाईड रोबो हे लवकरच विविध क्षेत्रांमध्ये प्रचलीत होणार असल्याचे संकेत आधीच मिळाले आहेत. याआधी रोबो जर्नालिस्ट, रोबो न्यूज अँकर आदी क्षेत्रांमध्येही यंत्रमानव कार्यान्वित झाले आहेत. मध्यंतरी सोफिया या रोबोला व्यापक प्रसिध्दी मिळाल्याचे आपल्या लक्षात असेलच. तथापि, पहिल्यांदाच एखाद्या पारंगत कलावंताप्रमाणे कलाकृतीची निर्मिती करणारी एआय-दा ही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे. मानवाची जागा ज्याप्रमाणे यंत्रमानव घेण्याची शक्यता कमी असली तरी यामुळे प्रॉडक्टीव्हिटी वाढविणे शक्य असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. याच पध्दतीत भलेही खर्‍याखुर्‍या कलावंतांची जागा आय-दा अथवा अन्य रोबो घेणार नसले तरी कलेतील एक नवीन आयाम या माध्यमातून उघडला असल्याची बाब लक्षणीय आहे. फोटोग्राफीचा शोध लागल्यानंतर चित्रकला अस्तंगत होणार असल्याची भाकिते करण्यात आली होती. असे न होता फोटोग्राफी हीच कलेची नवीन शाखा म्हणून उदयास आली. याच प्रकारे रोबो आर्टीस्ट हे कलेच्या क्षेत्रात एका नवीन शाखेची सुरूवात करणार असल्याचे दिसून येत आहे. एआय-दा च्या कलाकृतींच्या जाहीर प्रदर्शनातून याची नांदी झडली असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.

(लेखक नामवंत पत्रकार , ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत.)

https://shekharpatil.com

 

Previous articleआमचा कांबळे…
Next articleहरवलेल्या टिळकांचा शोध
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.