व’संत’ नामदेव !

प्रतिभावंत कवी,लेखक,विचारवंत, नामदेव ढसाळ यांचा काल पाचवा स्मृतिदिन होता. त्यनिमित्त संपादक महेश म्हात्रे यांनी ढसाळांच्या सर्वव्यापी संवेदना व प्रतिभेचा घेतलेला आढावा -संपादक
 
-महेश म्हात्रे
गावकुसाबाहेरील आडरानात उगवलेल्या दुर्लक्षित प्रतिमाचिन्हांनी, लोभस शब्दफुलांनी आणि जीवघेण्या जाणिवांनी मराठी भाषा संपन्न करणारा महाकवी म्हणजे ‘नामदेव ढसाळ.’ मध्यमवर्गीय वर्तुळात घाण्याच्या बैलाप्रमाणे, गोल-गोल फिरणार्‍या आत्ममग्न मराठी वाङ्मयाला आपल्या मर्यादित अनुभवविश्वाच्या पलीकडे काय सुरू आहे, हे दिसत नव्हते. वर्षानुवर्षाच्या या झापडबंद जाणिवांमुळे अवघ्या संवेदना बोथट बनल्या होत्या. परिणामी पुचट आणि पुचाट साहित्यकृतींचा सुळसुळाट झाला होता. त्या काळात, साठोत्तरी साहित्य चळवळीच्या ज्या प्रमुख शिलेदारांनी लघुअनियतकालिकांच्या (लिटील मॅगझिन्स) माध्यमातून प्रस्थापित मध्यमवर्गीय मानसिकतेला अक्षरश: हादरे दिले, त्यात ढसाळ आघाडीवर होते. अरुण कोलटकर, दि. पु. चित्रे यांच्यासारख्या तगड्या प्रतिभावंतांच्या साथीने त्यांनी सदाशिव पेठी मानसिकेतेत अडकलेल्या मराठीला साहित्याला वैश्विक जाणिवांच्या उंचीवर नेऊन ठेवले होते. आज डिजिटल युगात इंग्रजीच्या अपरिहार्यतेने झपाटलेल्या घरा-दारात, सरकारी कार्यालयात, दुकानात आणि काही प्रमाणात मराठी बुद्धिवंतांच्या मनात अगदी सर्वत्र मराठी भाषेची उपेक्षा होत असताना ढसाळांची आठवण तीव्रतेनं होते.
प्रतिभावंत त्यांच्या हयातीत समाजाला समजत नाहीत. समजले तरी उमजत नाहीत. ज्या समाजाला ‘समज’ नसेल, त्या समाजाला कलावंत आणि प्रतिभावंत समजणे शक्य नाही. आपल्या मराठी लोकांचे दुर्दैवसुद्धा मोठे! आम्हाला सतराव्या शतकात होऊन गेलेला तुकाराम एकविसाव्या शतकात ‘थोडा फार’ कळला, पण स्वातंत्र्योत्तर काळात मराठीला खर्‍या अर्थाने ‘स्वतंत्र’ करणार्‍या कवी, लेखकांना आम्ही अजूनही समजून घेतलेले नाही. त्यात सगळेच मोठे प्रतिभावंत येतात.
बा. सी. मर्ढेकर, पु. शि. रेगे आणि शरदचंद्र मुक्तिबोधांनी यंत्रयुगाने आणलेल्या नव्या सामाजिक चौकटीला मराठीच्या परिघासोबत जोडले आणि साठोत्तरी साहित्य चळवळीतून प्रगटलेल्या कोलटकर, ढसाळ, चित्रे या त्रिमूर्तीने नारायण सुर्वे, ग्रेस, मनोहर ओक, तुळशी परब, वसंत गुर्जर, विंदा करंदीकर, ना. धों. महानोर आदी कवी आणि भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये प्रभृतींच्या साथीने मराठीला चारही बाजूंनी वेढा दिला. जमेल त्या पद्धतीने आणि ताकदीने ‘शब्दांचे अग्निबाण’ सोडून त्यांनी सारे पारंपरिक बुरूज फोडले आणि मराठीचे अवकाश ‘मोकळे’ केले. ढसाळ या साऱ्या रणधुमाळीत आघाडीवर होते. आमच्या तमाम रूढीबद्ध आणि पर्यायाने निर्बुद्ध साहित्यिक-समीक्षकांनी या प्रचंड हल्ल्याची गरजेपुरती दखल घेतली; पण या साहित्यिक बंडखोरीला सातत्याने दलित, विद्रोही, ग्रामीण असे लेबल चिकटवून प्रस्थापितांनी मराठी भाषेचा विश्वासघात केला. म्हणून आजही ढसाळ गेल्यानंतर त्यांच्या वैश्विक जाणिवांचे कौतुक करण्यापेक्षा बहुतेक लोक त्यांचे दलितत्व आणि विद्रोहाचे गोडवे गातात, त्यावेळी मराठी लोकांच्या करंटेपणाचे हसू येते.
आम्हा करंट्यांना जसे हे नव्या दमाचे लेखक-कवी कळले नाहीत त्याचप्रमाणे भाऊ पाध्ये, नेमाडे यांची ताकदही आम्ही समजून घेतली नाही. प्रतिभेच्या साधनेत अखंड रमणार्‍या या अशा शेकडो तार्‍यांनी मराठी भाषेचे अवकाश लख्ख प्रकाशमान केले; पण आम्हाला त्यांच्या जिंदगानीची परवड कधीही कळली नाही. कारण प्रतिभावंतांच्या कलाकृती समजण्यासाठी जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा जास्त मोठे मन त्यांचे जगणे समजून घेण्यासाठी लागते. युरोपीय साहित्यविश्वात धुमाकूळ घालणारा जॉ जेने नावाचा एक भन्नाट कादंबरीकार, लेखक, कवी आणि कार्यकर्ता त्याबाबतीत भाग्यवान ठरला. नामदेव ढसाळ ज्या काळात ‘गोलपिठा’, ‘मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले’ आणि ‘गांडू बगीचा’ या कवितासंग्रहांच्या माध्यमातून अवघे मराठी अनुभवविश्व हादरवून सोडत होते. अगदी त्याच सुमाराला जॉ जेने यांच्या पाच दणदणीत कादंबर्‍यांनी युरोपातील उपेक्षितांची दु:खे आभाळभर मांडली होती. ढसाळांनी जशी कवितेसोबत ‘दलित पँथर’ची स्थापना करून रस्त्यावरची लढाई छेडली होती, त्याचप्रमाणे जेनेसुद्धा फ्रान्समध्ये येणार्‍या निर्वासितांच्या बाजूने लढत होता. परिणामी ढसाळांप्रमाणे वादग्रस्त ठरत होता. त्यांच्या भन्नाट जगण्याचा आवेग सर्वसामान्यांच्या चाकोरीबद्ध जीवनापेक्षा भलताच वेगळा आणि वेगवान होता. त्यामुळे साहित्य प्रांतात, सामाजिक वर्तुळात जेने ‘नको त्या कारणांसाठी’ चर्चेत असे, पण तरीही त्यांच्या कर्तृत्वाचे मोल जाणणारा फ्रेंच विचारवंत ज्यॉ पॉल सार्त् गप्प बसला नाही. त्याने ‘संत जेने’ हे खास पुस्तक लिहून जॉ जेनेच्या विलक्षण प्रतिभाशक्तीचा मागोवा घेतला आणि त्याचे मोठेपण समाजासमोर मांडले. तेवढे भाग्य नामदेव ढसाळ यांना मिळाले नाही. त्यांच्या प्रतिभेची झेप जोखण्याएवढे पंख असणारे विचारवंत मराठीत दुर्मीळ असल्यामुळे ढसाळांच्या हयातीत त्यांचे म्हणावे तसे ‘मूल्यमापन’ झाले नाही. सध्याच्या पिढीतील कवी श्रीधर तिळवे किंवा विष्णू सूर्या वाघ यांच्याकडे ती ताकद आहे. नाही म्हणायला तिळवेने ‘नामदेव ढसाळ : एक अढळ कवी’ या ‘परममित्र’ दिवाळी अंकातील आठ-नऊ पानांच्या लेखात एक प्रयत्न केलेला दिसतो, पण ढसाळांच्या बहुआयामी काव्यविश्वाचा आणि बहुचर्चित जीवनशैलीचा धांडोळा घेण्यासाठी एका पुस्तकाचीच गरज आहे. त्याशिवाय ढसाळ पुढच्या पिढयांना कळणार नाहीत.

साठच्या दशकात उसळलेल्या साहित्य चळवळीने ग्रामीण तसेच शहरी बोलीभाषेला प्रथमच लिखाणात आणले होते. त्या आधी सर्वच पारंपरिक लेखन पुस्तकी, सांकेतिक किंवा संस्कृताळलेले असायचे. कोलटकर, चित्रे, नेमाडे, पाध्ये, सुर्वे, ग्रेस आणि ढसाळ यांच्यासारख्या दिग्गजांनी आपल्या बोलीभाषांना ‘अक्षररूप’ दिले. मुख्य म्हणजे हे सारे कवी-लेखक शहरी, खरे तर महानगरीय वास्तवाला साहित्यात खेचून आणत होते. त्यामुळे कोलटकर, सुर्वे, ढसाळ यांच्या कवितांमध्ये बम्बईया हिंदी, भाऊ पाध्ये यांच्या लिखाणात हिंदी-इंग्लिश, मुबलक प्रमाणात उमटत होते आणि नव्या ‘रोखठोक’ लेखनशैलीने तर मराठी वाचक काही काळ नक्कीच बधिर झाला असेल. त्यात भर पडली सामाजिक असंतोषाच्या वास्तव दर्शनाची. लघुअनियतकालिकांच्या या सार्‍या उद्रेकाने समाजमनाच्या तळाशी दडून बसलेले जात-वर्ग कलहाचे दु:ख उसळून वर आले होते. सामाजिक पृष्ठभागावर स्थान मिळवण्यासाठी दलित कवितेने प्रथमत: धसमुसळेपणा दाखवणे साहजिक होते. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी विद्रोहाचा मार्ग पत्करणार्‍या या वर्गाने वाङ्मयाच्या पारंपरिक साच्यालाही ठोकारले आणि त्यातूनच ‘मुक्तछंदाने मला मुक्त केले’ अशी मोकळी भावना व्यक्त होत गेली. स्वत: गावकुसाबाहेरील घरात जन्माला आल्यानंतर ग्रामीण आणि मुंबईच्या महानगरी वातावरणात घेतलेल्या भयानक जीवनदर्शनाने ढसाळ भयसंतप्त झाले होते. मुंबईत टॅक्सी चालवताना प्रस्थापित विश्वाची सुबत्ताही त्यांनी डोळ्यांनी टिपली. त्यामुळेच १९७५मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले’च्या प्रस्तावनेत ढसाळ लिहितात, ‘कला ही दोन जगात विभागलेली आहे. एक जग आहे घमेलेवाल्यांचं, दुसरं जग आहे डबुलंवाल्यांचं. मी जर कविता लिहितो, छापतो तर या दोन्हीपैकी एका जगाचा मी निश्चित आहे आणि ते माझं जग आहे घमेलेवाल्यांचं.’ त्यांची ही जगभरातील दुबळ्या, शोषित, पीडितांच्या बाजूने उभे राहण्याची भाषा अखेरच्या काळापर्यंत कायम होती आणि फक्त कवीच या सगळ्यांचा तारणहार बनून उभा राहू शकतो. हा त्यांचा दुर्दम्य आशावाद होता. त्यामधूनच ‘मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे’ या कवितासंग्रहाच्या पहिल्या पानावर त्यांचे शब्द येतात..

दुष्टांनी पोहचवली आहे पृथ्वीला इजा
कवी जाणतात हे सर्व
कवीच पृथ्वीला वाचवू शकतात
सर्वनाशापासून!
कवी आणि कवितेविषयी ढसाळांना वाटणारा आशावाद हा फोल किंवा दिखाऊ नाही. तो त्यांच्या मनमोकळ्या आणि साध्या सरळ स्वभावातून आलेला दिसतो. बहुतांश जगणे मुंबईत गेलेले असूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात खेड्यातील सहजसुलभता मन मोहून घेणारी होती. अगदी छोट्या कार्यकर्त्यांशी, नवख्या पत्रकाराशी किंवा एखाद्या अनोळखी माणसाशी ढसाळ ज्या प्रेमाने बोलायचे, त्याला तोड नाही. आपल्या कवितेत शिव्यांच्या विजा पेरणारा, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्याना आग लावण्याची चिथावणी देणारा आणि अवघी प्रस्थापित व्यवस्था उलटून टाकण्यासाठी बाह्या सरसावून उभा असणारा कवी प्रत्यक्षात कोमलहृदयी होता. विरोधकाला खडे बोल सुनावून झाल्यावर चहा पाजण्याची जगावेगळी दानत ढसाळांपाशी होती. त्यामुळे काव्यप्रांत असो वा सत्तेचे राजकारण कुठेच त्यांना स्वत:चा कंपू निर्माण करता आला नाही. त्यांच्या डोळ्यादेखत ‘पँथर’, रिपाई’ आणि एकूण आंबेडकरी चळवळीचे तुकडे होत गेले. त्यामुळे त्यांच्यातला कार्यकर्ता अस्वस्थ असे; पण या सगळ्या प्रतिकूल काळातही त्यांची कवितेवरील निष्ठा तुकाराम महाराजांप्रमाणे अभंग होती. म्हणूनच ते एका कवितेत अगदी स्पष्टपणे सांगतात,
‘मला नाही बसवायचे वेगळे बेट
माझ्या प्रिय कविते, तू चालत -हा सामान्यांतल्या
सामान्य माणसासोबत थेट त्याचे बोट पकडून
मूठभरांच्या सांस्कृतिक मिरासदारीचा मी आयुष्यभर केला द्वेष
द्वेष केला अभिजनांचा, त्रिमितीय सघनतेवर भर देत
नाही मी रंगवले चित्र आयुष्याचे मी
सामान्य माणसांसोबत त्यांच्या षडविकारांवर प्रेम केले
प्रेम केले श्वापदांवर आणि किडामुंगीवरसुद्धा
मी अनुभवले सर्वच संसर्गजन्य आणि साथीचेही रोग
हुल्कावणी देणार्‍या हवेला ठेवले अलगद ताब्यात
सत्य-असत्याच्या झुंजीत मी हरवून बसलो नाही, मला माझा आतला आवाज,
माझा खराखुरा रंग, माझा खराखुरा शब्द मी जगण्याचे रंगानी नव्हे,
संवेदनेने कॅनव्हॉस रंगविले…
ढसाळांच्या या सर्वव्यापी संवेदनेला तुकोबांच्या भावविश्वाची एक अनामिक प्रेरणा असावी, असा सातत्याने भास होतो. ‘संत फॉकलँड रोड’ ही अवघी कविता तुकोबांच्या आकर्षणातूनच आलेली दिसते. खरं सांगायचे तर या ‘नामदेवा’ने तुकाराम महाराजांचा काव्यवसा आधुनिक युगात चालवून धमाल उडवून दिली. नाही म्हणायला, तुकोबांनाही काव्यप्रेरणा तेराव्या शतकात होऊन गेलेल्या संत नामदेव महाराजांनी दिली होती. एका अभंगात स्वत: तुकोबाच म्हणतात की, ‘नामदेव महाराजांनी मला स्वप्नात येऊन शतकोटी अभंग करण्याची आज्ञा दिली होती.’ म्हणजे तेराव्या शतकापासून सुरू झालेला हा बंडखोर कवींचा सिलसिला नकळतपणे नामदेव ते नामदेव व्हाया तुकाराम असा सुरू होता. त्यामुळे बिकट परिस्थितीतही मराठीला आधार होता. सध्याच्या काळोखधर्मी भवतालाला सुर्यसन्मुख करून नव समाज निर्मितीचा आशावाद अधिक मजबूत करणारी कविता नामदेव ढसाळ नामक  महाकवीने पेरून ठेवली आहे. आता
पुढच्या पिढ्यांनी हिरव्यागार वसंताची वाट पाहायला हरकत नाही….
@लेखक हे जेष्ठ्य संपादक आहेत
9870303430
#namdevdhasal #mediawatch
Previous articleकुतूहल निर्माण करणारा कुंभमेळा
Next articleअसंवेदनशील कोण? डॉक्टर की सरकार ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here