संघाची लबाडी: संघाने उभे केले महात्मा फुले यांचे नकली [डमी] वंशज

-प्रा. हरी नरके

सुमारे साडेचार वर्षांपुर्वी संघाने पुण्याजवळ एक मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. तेव्हा गोदीमिडीयाला हाताशी धरून खोट्या बातम्यांचा पाऊस पाडण्यात आला. त्यातली एक फुसकी म्हणजे अर्धी चड्डी घातलेल्या काही बनावट लोकांचे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करण्यात आले. ते महात्मा फुल्यांचे वंशज असल्याची दवंडी पिटण्यात आली. स्वत: जोतीरावांनी आपल्या हयातीमध्येच असे लिहून ठेवले होते की “हे लोक आपले वारस नाहीत,” अशांच्याच पुढच्या पिढ्यांना भजनी लावून ते जोतीरावांचे वारस असल्याची प्रसिद्धी संघ देत आहे. महात्मा फुल्यांचे अपहरण करण्याचा हा बनाव साडेचार वर्षांपूर्वी मी उधळून लावला होता.

पुण्याचे एक पत्रकार शैलेंद्र परांजपे यांना यासाठी हाताशी धरण्यात आले. ते आमच्याशी खाजगीत बोलताना संघाची टर उडवायचे. वर्षानुवर्षांची ओळख. पण त्यांनी कधी कळूच दिले नाही की ते संघवाले आहेत. जशी मोदीफडणविसांची सत्ता आली तसे यांचे खरे रूप उघडे पडले. परांजपे चक्क संघाची तळी उचलून धरायला लागले. त्यांनी डी.एन.ए.मध्ये ही बातमी दिली. मी तात्काळ खुलासा केला, बातमी खोटी आहे. महात्मा फुल्यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता. त्याला मुलगा झाला नाही. त्यामुळे फुले आडनावाचे कोणीही फुले वंशज शिल्लकच नाहीत. केवळ आडनाव हा पुरावा मानायचा तर प्रत्येक भोसले आडनावाचा माणूस छत्रपती शिवरायांचा वंशज मानावा लागेल.

महात्मा फुले यांच्या हयातीतच काही भाऊबंद, फुले मंडळी, जमिन आणि घरदाराच्या लोभाने, पिढीजात वादांमुळे किंवा सनातन्यांचे हस्तक म्हणून जोतीराव -सावित्रीबाईंच्या विरोधात गेलेले होते. क्रांतिकारक विचार पेलायला काळीजही मोठे लागते. छटाकभर काळजाचे लोक सनातन्यांचे हस्तक बनू शकतात. क्रांतिकारक नाही. त्यातल्या काही बुटक्या लोकांना हाताशी धरून संघ हाच फुले विचार चालवतो असं वदवणं हे किळसवाणं होतं. ज्यांनी महात्मा फुले वाचले नाहीत, त्यांचे पुस्तकही हातात धरलेले नाही असे लोक टिव्हीवर येऊन फुलेविचार आणि संघ किती जवळचे आहेत यावर पोपटपंची करीत होते. पढवलेले सुमार लोक दुसरं काय करणार?

स्वत: जोतीरावांनी आपल्या हयातीमध्येच आपल्या मृत्यूपत्रात स्पष्ट केलेले आहे, की आपले कोणीही भाऊबंद हे आपले वारस नाहीत, अशांच्याच पुढच्या पिढ्यांना संघ फुलेवारस म्हणून प्रसिद्धी देत होता. आजही हे कारस्थान चालूच आहे. डी.एन.ए.चे संपादक उदय निरगुडकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यावर त्यांनी माझा खुलासा संपादित स्वरूपात प्रकाशित केला.

अशाच खोट्या बातम्या लोकमत दैनिकातही झळकळ्या होत्या. लोकमतचे मुख्य संपादक दिनकर रायकर यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर लोकमतनेही माझा खुलासा छापला.

ह्याच खोडसाळ बातम्या ए.बी.पी. माझा वाहिनीवरही देण्यात आल्या होत्या. तिकडेही संपादक श्री राजीव खांडेकर यांच्याकडे मी पाठपुरावा केल्यावर त्यांनी माझ्या खुलाशाचा बाईट बातम्यांमध्ये दाखवला. मात्र तो ऑनलाईनवर ठेवण्यात आला नसल्याने त्याची लिंक उपलब्ध नाही.

त्यावेळी आय.बी.एन. लोकमतवर यानिमित्ताने संपादक मंदार फणसे यांनी एक “बेधडक” चर्चा घेतली होती. तिच्यामध्ये मी सहभागी झालेलो होतो. त्या चर्चेत मी संघाचा खोटेपणा सप्रमाण उघडा पाडला होता. [ पाहा- परिशिष्ट ३]

यावेळी संघाची असत्यकथन, सत्यापलाप आणि खोटा इतिहास रचण्याची साखळी उघडी पाडणारा ब्लॉगही मी लिहिला होता.

“Is RSS trying to cash in on Jyotiba Phule’s legacy using wrong lineage ” असा लेख मुंबई मिरर [ दि. 12 january 2016, mumbai mirror] या इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता. त्यात मिररच्या प्रतिनिधी अलका धुपकर यांनी माझा दावा नोंदवला होता.

लोकमतने माझे म्हणणे विस्ताराने छापले होते, ” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात झालेल्या ‘शिवशक्ती संगम’ कार्यक्रमात थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या वंशजांनी हजेरी लावल्याच्या बातमीवरून सध्या बरेच चर्वित-चर्वण सुरू आहे. मात्र, महात्मा फुले यांच्या साहित्याचे संपादक व अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत ही बातमी वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा केला आहे. प्रा नरके म्हणतात, ‘ प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गणवेशात उपस्थित असणारे हे वंशज महात्मा फुले यांच्या कुटुंबातील नाहीत.

‘नरके यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:

१) महात्मा फुले यांना मुलबाळ झालेले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतलेला होता, त्याचेही हे वंशज नाहीत.

२) जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते. त्यांनाच आज फुल्यांचे वंशज/कुटुंबिय म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

३) जो थोरला भाऊ महात्मा फुले यांच्यासोबत राहात नव्हता, जो विभक्त होता आणि स्वतंत्र होता, फुले हयात असतानाच ज्याचा मृत्यू झाला होता, त्यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीतील आजच्या सदस्यांना महात्मा फुले यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणता येणार नाही.

४) महात्मा फुले यांनी त्यांचे मृत्यूपत्र तयार करून ते २५ जुलै १८८७ रोजी ब्रिटीश सरकारच्या नोंदणी कार्यालयात नोंदवले होते. ते मी स्वत: २५ वर्षांपुर्वी शोधून “महात्मा फुले: समग्र वाड्मय” या राज्य शासन प्रकाशित ग्रंथात प्रसिद्ध केले आहे. ते पृष्ठ ६३५ ते ६४८ वर उपलब्ध आहे. त्यात फुले यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केलेले आहे.

५) महात्मा फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा आजच्या मंडळींच्या पूर्वजांनी केला होता. तेव्हाही तो स्वत: सावित्रीबाईंनी अमान्य केला होता. जोतीरावांच्या अंत्ययात्रेचे नेतृत्व स्वत: सावित्रीबाईंनी केले.

६) राजाराम फुले यांच्या चौथ्या व पाचव्या पिढीने कोणत्या संघटनेत काम करावे याचे त्यांना स्वातंत्र्य आहे, मात्र त्यांनी आपण महात्मा फुल्यांचे कुटुंबिय/ वारसदार म्हणून दावा करणे उचित नाही.

मी माझ्या ब्लॉगमध्ये लिहिले होते, “स्वत: सावित्रीबाई व महात्मा फुले यांना मूलबाळ झाले नव्हते. त्यांनी एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेतला होता. त्याला त्यांनी डॉक्टर केले. पण आपला वारसा त्याच्याकडे सोपवतानाही त्याला काही अटी घातल्या. त्यावरून स्पष्ट होते की, फुले जैविक वारसा महत्वाचा मानत नव्हते. तर वैचारिक वारसा महत्वाचा मानत होते.

हे लोक डॉ.यशवंत जोतीराव फुले यांचेही वंशज/ वारस नाहीत. ते जोतीरावांच्या भाऊबंदापैकी असलेल्यांचे वंशज/ वारस आहेत.

जे भाऊबंध फुल्यांच्या हयातीत त्यांच्या विरोधात होते त्यांनाच फुल्यांचे वंशज म्हणुन पुढे आणण्याचा प्रयत्न करणे हे नैतिकदृष्ट्या उचित नाही.

2. महात्मा फुले यांचे मृत्यूपत्र त्यांनी सरकार दरबारी नोंदवले होते. ते मी स्वता: 25 वर्षांपुर्वी शोधून “महात्मा फुले :समग्र वाड्मयात” प्रसिद्ध केले आहे. { पाहा, पृ.635 ते 648 } त्यात फुल्यांनी त्यांचे थोरले बंधू राजाराम तसेच राजारामचा मुलगा गणपत हे आपले वारसदार नाहीत असे स्पष्ट केले आहे. आज याच घराण्यातील मंडळी फुल्यांचे वारसदार म्हणून मिरवित आहेत हे अनैतिहासिक होय.

3. आपला मयत भाऊ राजाराम व आपण स्वतंत्र होतो, तो आता वारलेला आहे पण त्याच्या मुलाचा गणपतचा आपल्या मालमत्तेवर हक्क किंवा दावा नाही. तसेच तो आपला वारस नाही असे फुले यात नोंदवतात. फुल्यांच्या निधनानंतर जेव्हा भाऊबंध आपण फुल्यांचे वारस असल्याचा दावा करू लागले तेव्हा तो सावित्रीबाईंनी अमान्य केला व स्वत: अंत्ययात्रेचे नेतृत्व केले. तेव्हा जे भाऊबंद कधीच फुल्यांसोबत नव्हते ते जर आपण फुल्यांचे वारस आहोत असा दावा करीत असतील तर ते हास्यास्पद आहे.

4. फुल्यांचे सच्चे वैचारिक वारसदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म.वि.रा.शिंदे, रा. शाहू छत्रपती, कर्मवीर भाऊराव, ना.मे.लोखंडे आणि केशवराव विचारे हे होते. पुढच्या काळात हा वारसा गं.बा.सरदार, य.दि.फडके, गो.पु.देशपांडे, बाबा आढाव, भा.ल.भोळे, शरद जोशी, रावसाहेब कसबे, भालचंद्र नेमाडे आदींनी पुढे नेला.

जे कधीच फुल्यांच्या चळवळ व विचारांसोबत नव्हते ते फुल्यांच्या मृत्यूनंतर 125 वर्षांनी आज अचानक वारसा सांगायला पुढे सरसावले आहेत हे हास्यास्पद आहे.

रा.स्व.संघाला अशा बनावट आणि तकलादू मना्च्या श्लोकांची रचना करावी लागावी हे त्यांच्यासाठी लज्जास्पद आहे. विद्यमान फुले मंडळींनी कोणत्या संघटनेत जावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. ते महात्मा फुल्यांचे वारसदार असल्याचा नकली दावा करीत आहेत. फुलेविचारांच्या बोगस प्रमाणपत्रांचे वाटप ते करू शकत नाहीत. तो नैतिक अधिकार महात्मा फुले व सावित्रीबाईंचा ध्येयवाद सच्चेपणाने पुढे नेणारांनाच आहे. इतर लांडग्यांना नाही.

संघाच्या घृणास्पद वर्तनाचे असे कितीतरी पुरावे देता येतील. तेव्हा बलाढ्य रा.स्व. संघाला माझ्यामुळे [मी त्यांचा खोटापणा सिद्ध केल्याने] माघार घ्यावी लागल्याने संघ संतापणे स्वाभाविक आहे. संघ तोंडघशी पडला तो माझ्यामुळे नाही, त्यांच्या लबाडीमुळे. असत्याचा सहारा घेतल्याने.

महात्मा फुले सत्यमेव जयते चे पुरस्कर्ते होते. संघाने तेव्हापासून आपल्या चेल्याचपाट्यांकरवी अफवा पसरावायला सुरूवात केली. तेच ते त्यांचे गेल्या ९५ वर्षांचे जन्मापासूनचे अफवातंत्र. अहो, कळलं का, हरी नरके तर आमचेच आहेत.

अरे लबाडांनो, मी तुमचा होतो म्हणून तुमचा खोटारडेपणा जगाच्या वेशीवर टांगला काय? जो सज्जड पुराव्यांनिशी तुम्हाला उघडं पाडतो, तुम्हाला जाहीरपणे चॅलेंज करतो तो तुमचा असतो म्हणून काय? मी संघाला गेल्या ३२ वर्षात अनेकवेळा उघडं पाडलं पण संघाच्या लबाड्या काही थांबत नाहीत.

(लेखक फुले व आंबेडकर साहित्याचे अभ्यासक आहेत)

[email protected]