समज वाढवा ! वैर संपवा !

सौजन्य-साप्ताहिक चित्रलेखा

लेखक : ज्ञानेश महाराव

भीमा-कोरेगाव हिंसाचार, हे एक मोठं षडयंत्र होतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे. ते षडयंत्र होतंच. पण त्याचा सुगावा आपल्या अखत्यारितल्या गृहखात्याला कसा लागला नाही ? हे षडयंत्र रचणारे नेमके कोण ? या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली नाहीत. भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी बाहेरगावहून आलेल्या आंबेडकरी जनतेवर ज्याप्रकारे हिंसक हल्ला झाला, तो निश्चितपणे नियोजित होता. म्हणूनच भीमा-कोरेगावच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावरील घरांच्या गच्च्यांवर दगड-गोटे जमवण्यात आले होते. हे कारस्थान संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी घडवून आणले, असा आरोप ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी त्वरित केला. तशाप्रकारचे गुन्हेही या दोघांवर दाखल झाले. हे गुन्हे ना-जामीनपात्र आहेत. मात्र घटनेला तीन आठवडे उलटले तरी भिडे-एकबोटेंना अटक झालेली नाही. याउलट, भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारीला उत्स्फूर्त महाराष्ट्र बंद झाला; त्यावेळी झालेल्या तोडफोडीला जबाबदार म्हणून आंबेडकरी कार्यकर्त्यांची पोलीस धरपकड करीत आहे. ही विसंगती आहे. ती तडजोडीत भिडे-एकबोटे यांची सुटका करून घेण्यासाठी करण्यात येत आहे का ? अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सामाजिक सलोख्याची अपेक्षा करतातच कशी ? ह्या सामाजिक सलोख्याचा बिघाड काही भीमा-कोरेगावनंतर झालेला नाही. मोदी सरकार सत्तेत आलं, तेव्हापासून हा बिघाड सुरू झालाय. तो सरकार पुरस्कृत आहे. केवळ घरात गोमांस आहे, या संशयापोटी उत्तर प्रदेशातील अखलाक या तरुणाची झुंडीने हत्या करण्यात आली. गुजरातेतील उना भागातील दलित तरुणांना अमानुष प्रकारे झोडपून काढण्यात आलं. या घटनांतून मुस्लीम-दलितांत दहशत बसवण्यासाठी त्याचं व्हिडियो शूटिंग करून ते सोशल मीडियातून व्हायरल करण्यात आलं. मुसलमानांना हिंदू धर्मात आणणारे घरवापसीचे कार्यक्रम झाले. भगव्या वस्त्रधारी राजकीय नेत्यांच्या तोंडातून हिंदूधर्मातील सनातनी नालायकी गौरवाने सांगणारे विषारी फूत्कार सोडण्यात आले. आताही मोदी सरकारच्या धोरणावर टीका करणारे कर्नाटकातील अभिनेते प्रकाश राज यांच्या कार्यक्रमानंतर भाजपचे कार्यकर्ते स्टेजवर चढून गोमूत्र शिंपडतात, हा प्रकार बाष्कळ असला तरी अपमान करणारा आहे. गेल्या साडेतीन वर्षांतल्या अशा अनेक घटनांनी आणि त्यावरच्या चर्चांनी अवघ्या देशातला सामाजिक सलोखा भंगलाय. महाराष्ट्रात तो भीमा-कोरेगावच्या क्रिया-प्रतिक्रियांतून व्यक्त झाला, एवढंच. तिथे घडलेला हिंसाचार हा दलित-मराठा यांच्यातील असल्याचा दाखवण्याचा आटापिटा मीडियाने केला. तसंच, ‘जाणता राजा’चं दूषण वापरत, भीमा-कोरेगावचा हिंसाचार शरद पवार यांनीच घडवून आणला, अशीही चर्चा सुरू झाली.

          तथापि, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणी भिडे-एकबोटे यांनाच जबाबदार धरल्याने मीडियातल्या भटशाहीची मोठी पंचाईत झाली. टीव्ही पत्रकारितेची उरली-सुरली विश्‍वासार्हता भिडेंच्या मुलाखतींतून बाहेर पडलेल्या पंचगव्याच्या सड्याने संपवलीय. १ जानेवारीला भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर तिसर्‍याच दिवशी झालेला महाराष्ट्र बंद यशस्वी झाला. यावरून तरी हिंसाचार घडवण्याचा आरोप असलेल्या भिडे-एकबोटे व त्यांच्या पाठीराख्यांच्या विरोधातील दलित आणि मराठा समाजाचं मत एकसारखंच आहे, ह्याचा अंदाज मीडियाला आला असणार ! परंतु, मराठी मीडिया हा भटीभेजाचा असल्याने त्याने भीमा-कोरेगाव हिंसाचाराचं विश्लेषण जातीय ध्रुवीकरणाच्या अंगाने केलं. तथापि, सत्ताप्राप्तीसाठी जातीय बेरीज-वजाबाक्या काय व कशा केल्या, ते देवेंद्र फडणवीस यांना ठाऊक असल्याने त्यांनी ‘येणार्‍या काळात भीमा-कोरेगावसारखी जातीयवादी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते,’ अशी भीती व्यक्त केलीय. खरं तर, त्यांनी अशी भीती व्यक्त करून समाजात भय आणि जाती-जातीत संशय निर्माण करण्यापेक्षा, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. सामाजिक सलोख्यात जातीय तेढ कारण ठरत असेल, तर त्यांच्या मूळावर घाव घालावा. मानवी विकासाच्या प्रक्रियेत सामाजिक संघर्ष अटळ आहे. तो होणारच. पण तो आजच्या आधुनिक काळात जात या अमानवी लांछनास्पद मुद्यावर असू नये, असं अनेकांना वाटतं. पण असं वाटून, यावर लिहून-बोलून काडीचाही उपयोग नाही. त्यासाठी जात-वर्ण्य-व्यवस्था समूळ नष्ट करण्यासाठी शंकराचार्यांची शेंडी पकडली पाहिजे. त्यांच्याकडे ‘जात-वर्ण्य-व्यवस्था कालबाह्य झाली असून, ती आता संपली,’ असं जाहीर करण्यासाठी कृतिशील आग्रह धरला पाहिजे. जाती-धर्माच्या भिंती शाबूत ठेवून सामाजिक सलोख्याची अपेक्षा ठेवणं, हे चपात्यांना पोळ्या म्हणून आपल्या सुसंस्कृततेचं प्रदर्शन करण्यासारखं आहे. जातिवादाचं खापर हे राजकीय नेत्यांच्या जाती तपासून त्यांच्या माथ्यावर फोडलं जातं. तथापि, भारतातल्या जातीवादाचं मूळ हे इथल्या बहुसंख्याकांच्या धर्मवादात आहे. त्याला भाजपने हिंदुत्वाचं गोंडस रूप देऊन आपलं सत्ता मिळवून देणारं राजकारण केलंय. त्या हिंदुत्वाचे फाजील उमाळे किती फसवे होते; त्याचं दिव्य दर्शन शिवसेनासारख्या प्रादेशिक पक्षाप्रमाणेच अनेक जाती-जमातींनाही घडतंय. याच्या परिणामाची झलक भीमा-कोरेगावच्या प्रकरणातील क्रिया-प्रतिक्रियेने दाखवलीय. यातील दोन्ही बाजू सरकार पक्षाच्या विरोधात एक झाल्या होत्या. धर्माचं राजकारण खेळणार्‍यांना अंतर्विरोध होतो, तेव्हा असेच तोंड फोडून घ्यावे लागते. धर्माच्या आधारे सत्ता प्राप्त करून राष्ट्रीय ऐक्य समर्थ करण्याच्या बाता मारणार्‍यांनी आता तरी मानवी इतिहास अभ्यासावा. रशियासह संपूर्ण युरोप ख्रिश्चनधर्मी आहे, पण त्यांचं एक राष्ट्र होऊ शकलेलं नाही. युरोपातली बहुतेक राष्ट्रं भाषिक राष्ट्रं आहेत. धर्मापेक्षा भाषा अधिक प्रभावी आहे, हे यातून स्पष्ट होतं. छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात जो राष्ट्रवाद समर्थपणे उभा केला, त्याला नामदेव-ज्ञानदेव-तुकोबा-एकनाथ आदि मराठी संतांनी जागवलेल्या प्रादेशिक भाषा भावाचा प्रभावी पाया होता. या संतांनी हिंदू धर्माला भक्ती आंदोलनाद्वारा महाराष्ट्र धर्माचं अधिक मोकळं आणि प्रेरणादायी रूप दिलं. शिवाजी महाराजांच्या पश्‍चात संभाजीराजांना लिहिलेल्या पत्रात समर्थ रामदास म्हणतात –
मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा
याविषयी न करता तकवा | पूर्वज हासती –
याऐवजी रामदासांना आपला वैदिक धर्म वाढवावा, हिंदू धर्म वाढवावा असं लिहिता आलं असतं. पण त्यांनी ते जाणीवपूर्वक टाळलं. संतांनी जो महाराष्ट्र धर्म मराठी माणसात रुजवला, तो महत्त्वाचा आहे. न्या. महादेव गोविंद रानडे शिवाजीराजांना महाराष्ट्राच्या राष्ट्रवादाचा जनक म्हणतात. इतिहासाचार्य राजवाडे हेदेखील तसंच म्हणतात. कारण शिवरायांनी सर्व जाती-धर्मातल्या लोकांना एकत्र करून त्यांना मावळेपण दिलं आणि स्वराज्य निर्माण केलं. ते नीटपणे समजून घेतलं की, संभाजीराजांच्या अत्यंविधीशी संबंधित गोविंद महार हा अस्सल मराठ्यांना वेगळा वाटत नाही. तो वाटूही नये. हिंदुत्वाच्या फाजील उमाळ्यांना भुलून महाराष्ट्राने आपसात का लढावं ? मराठींनाच का मारावं ? पानपतावर अब्दालीला रोखण्यासाठी महाराष्ट्राने एक पिढीच्या पिढी गमावली आणि मराठे आक्रमक आहेत असा लौकिक प्राप्त केला. तेव्हापासून मरायला मराठे आणि चरायला बाकी सगळे हा प्रकार आजतागायत होतोय. दरवेळी आपले पानपत कशासाठी करून
घ्यायचे ? याचा विचार हिंदुत्वाच्या दलदलीत फसलेल्यांनी जरूर करावा. त्यासाठी समज वाढवा, वैर संपवा.

सौजन्य-साप्ताहिक चित्रलेखा

लेखक : ज्ञानेश महाराव

९३२२२२२१४५

Previous articleकोरेगाव आणि वृत्तवाहिन्यांची ‘गुरु’दक्षिणा
Next articleयोगी भांडवलदार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.