समाज आणि व्यक्ती

(साभार: ‘साप्ताहिक साधना’ )

नामवंत लेखक व विचारवंत  सुरेश द्वादशीवार लिखित ‘एकाकी’ ही दहा भागांची लेखमाला गेल्या वर्षी साधना साप्ताहिकातून क्रमश: प्रसिद्ध झाली. त्यानंतर आणखी सात लेखांची भर टाकून, त्याच नावाचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून या आठवड्यात प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकात नव्याने समाविष्ट केलेल्या सात प्रकरणांपैकी दोन प्रकरणे येथे प्रसिद्ध करीत आहोत. – संपादक

गांधीजी म्हणायचे, ‘मार्क्स समाजापासून सुरू होतो आणि व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मी व्यक्तीपाशी सुरू होतो अन्‌ तिच्याजवळ थांबत असतो.’

व्यक्ती प्रगल्भ झाली अन्‌ विकसित झाली की, समाजाच्या विकासाचा वेगळा विचार वा प्रयत्न करावा लागत नाही. आताचे सारे प्रयत्न समूहांना, वर्गांना, समाजांना, धर्मांना आणि धर्मपंथांना दुरुस्त करण्यासाठी वा त्यांच्या विकासासाठी आखले जातात. गर्दीच्या या योजनांमध्ये व्यक्ती कोरडी राहते. लोहिया म्हणायचे, ‘दिल्लीहून निघालेला एक रुपया सामान्य माणसांपर्यंत पोहोचेपर्यंत पाच पैशांचा होतो.’ राजीव गांधींच्या शोधात तो पंधरा पैशांचा होतो, असे आढळले. सगळी यंत्रणा व व्यक्तींवर सकारण-अकारण नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था-संघटनाच तिच्या वाट्याचे सारे काही हिरावून घेतात. हे केवळ आर्थिक बाबतीतच होते, असे नाही. विचार, विकास, उन्नती, अभिक्रम या सगळ्याच गोष्टींत समाज व्यक्तीला मागे ठेवण्याचाच नव्हे, तर शक्य तो अनभिज्ञ ठेवण्याचाही प्रयत्न करतो. विकास योजनांचे देशात व अन्यत्र जे झाले, ते हे आहे. उत्पादन वाढले ते देशाचे, विकासाचा दर वाढला तो देशाचा, शिक्षणाचा प्रचार झाला तो समाजात वा त्यातील वरिष्ठ वर्गाचा. सामान्य माणूस अजून जिथल्या तिथे राहिला वा गेलाच असेल, तर फार थोडा वर गेला. माणसांचे आत्मसंतुष्टपण त्याला आहे त्या स्थितीत समाधानी ठेवते. त्याचमुळे हे दुष्टचक्र चालू राहते.

व्यक्ती स्वत:चा विचार करू लागली. आपल्या स्थितीचा आढावा घेऊ लागली. ‘ते तसे अन्‌ मी का असा?’ हा विचार तिच्या मनात येऊ लागला की, तिच्या खऱ्या विकासविषयक हालचालींना सुरुवात होते. ही स्थिती तिला समूहात गाठता येत नाही. धर्मात, जातीत, वर्गात वा तशा समूहात प्राप्त करता येत नाही. ती तिला एकाकी असणेच देत असते. समूह माहितीत भर घालतात, प्रसंगी मनाच्या कक्षा रुंदावतात; पण ज्ञानात भर घालत नाहीत. ती एकट्याची, एकाकी अवस्थेत गाठलेली उंची असते. तिथे आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. सोबतचा जोडीदार- मग ती स्त्री असो वा पुरुष- ही पायांतली एक मोठी बेडी असते. ती सुरक्षा देत नाही आणि उंचीही देत नाही. सोबतच्याने जवळ असणे व आपल्या ‘हो’ला ‘हो’ म्हणणे एवढेच मग तिला अपेक्षित असते. व्यक्तीला या जोडीची एवढी सवय होते की, ती स्वत:चा चेहराच नव्हे तर चवही हरवून बसते. जवळचे लोक त्यांचे ‘ते एकरूप झाल्याचे’ कौतुक करतात, पण ते एकरूप होत नाहीत. त्यांच्यातले काही तरी जसे वा तसेच असते. त्या दोघांचे ‘अर्धमेले’पणच त्यांची एकरूपता वा पूर्तता असल्याचे ते व इतरही समजत असतात.

स्वावलंबन जाणे आणि परावलंबन येणे, हीच स्नेहाची कसोटी असते काय? समाजही त्याच परावलंबनाने आपले विस्तारलेले रूप असतो काय? समूहांची व समाजांचीही एक गंमत असते. ते एकाच व्यक्तीवर विश्वास ठेवतात व तिलाच पूज्य मानतात. तिच्या जवळ असणारे तिचे प्रतिनिधी असणाऱ्यांविषयी त्यांना आस्था असते. पण ती निष्ठा त्या सर्वोच्च व्यक्तीवर असते, जी साऱ्यांच्या वाट्याला येत नाही. नेहरूंनी गांधीजींवर लिहिलेल्या एका ‘निनावी’ लेखाचे शीर्षकच ‘गांधी- जे मला आवडत नाहीत’ असे होते. त्यातले त्यांचे एक विधान येथे सांगण्यासारखे आहे. ते लिहितात, ‘‘लोक माझ्या सभांना लाखोंच्या संख्येने येतात, मला पाहून खूश होतात. माझे भाषणही मन लावून ऐकतात. पण सभेच्या शेवटी त्यातले कोणीही ‘जवाहरलाल नेहरू की जय’ म्हणत नाहीत, ते सारे ‘महात्मा गांधी की जय’ असेच म्हणतात.’’ आपल्या लोकप्रियतेचा खरा आधार नेहरूंना कळत होता.

हीच गोष्ट त्यांनी सुभाषबाबूंना लिहिलेल्या पत्रात म्हटली आहे. ‘आपण दोघेही लोकांचे लाडके आहोत. पण आपल्या लोकप्रियतेचा खरा आधार गांधी आहेत. त्यांच्यापासून कधी दूर जाऊ नकोस. तसे केलेस, तर तू जनतेपासून दूर जाशील व देशापासूनही तुटशील.’ व्यक्तीचे माहात्म्य सांगण्याचा हा प्रकार नाही. समाजजीवनातले वास्तव मात्र असे आहे. समाजाला एकच एक सर्वोच्च व्यक्ती नेतृत्वासाठी हवी असते. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत पंतप्रधान होण्याच्या योग्यतेची अनेक माणसे होती, पण त्यातले कोणीही गांधीजींची जागा घेऊन शकत नव्हते. गांधीजी एकाकी होते काय? समूहात, समाजात, पक्षात व लोकांत राहूनही त्यांच्या आत्म्याचाच आवाज त्यांना मार्गदर्शक का वाटायचा? तो सहकाऱ्यांच्या शब्दांहून त्यांना महत्त्वाचा का वाटायचा? आत्म्याचा आवाज हाही अखेर ‘एकाकीपणाचाच हुंकार’ असतो की नाही?

गांधीजींच्या पश्चात तो सन्मान नेहरूंना मिळाला; पण गांधीजींवरील जनतेच्या विश्वासात निष्ठा होती, नेहरूंविषयी तिला प्रेम होते… नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात राहिले. पण तुरुंगात असले तरी साऱ्या स्वातंत्र्यप्रेमी दक्षिण आफ्रिकन जनतेचे तेच खरेखुरे नेते होते. त्यांच्यावरील जनतेची निष्ठा देवदुर्लभ म्हणावी अशी होती. समाज व व्यक्ती यांचे असलेले नाते असेही या संदर्भात विचारात घ्यावे लागते. रामाविषयीची भक्ती, कृष्णाविषयीचे प्रेम, साधू-संतांविषयीची शतकानुशतके टिकणारी भक्ती ही तरी याच वास्तवाची उदाहरणे आहेत की नाहीत? ज्या काळात राजेशाही होती व ज्या देशात आजही वंशपरंपरागत ती शाही टिकली आहे, तिथे अशा आज्ञाधारकपणाला निष्ठा वा श्रद्धेची गरज नसते. हुकूमशहा आणि लष्करशहा यांनाही लोकांच्या निष्ठा फारशा लागत नाहीत. त्यांची दंडुकेशाहीच सारी प्रजा धाकात ठेवणारी असते. येथेच नमूद कराविशी महत्त्वाची गोष्ट ही की- समूहाची, वर्गाची, धर्माची वा वंशाची विचारसरणी त्यांच्या नेत्याला हुकूमशाहीकडे नेते. व्यक्तीसाठी ही हुकूमशाहीच असते. एकाकीपणाचा, एकेकट्या माणसाचा स्वतंत्र विचार जिच्यात असतो, ती विचारसरणी लोकशाहीच्या दिशेने जाते. जगभरचे वर्गशहा, धर्मशहा वा वंशवादी हे नेहमीच त्यांचे राजकारण द्वेषावर उभे करणारे दिसतात, उलट व्यक्तिवादी विचार विधायक प्रेमाचा व माणुसकीच्या मूल्याचा आढळला. हिटलर लोकशाही-वादी होऊ शकत नाही आणि गांधींना हुकूमशहा होता येत नाही.

एकाकीपण आत्मसंवाद साधणारे असते. मात्र तो संवाद सरळ व विधायक व्हायचा, तर त्या मनाला असूयेचा वा द्वेषाचा स्पर्श नसणे भाग असते. असूयेने पेटलेले मन स्वत:जवळ कधी जात नाही. ते त्याच्या असूयेच्या विषयाभोवती व व्यक्तीभोवतीच घुटमळत असते. असूया व द्वेष या प्रेरणा स्पर्धेची ऊर्जा देतात. प्रसंगी त्या स्पर्धा जिंकूनही देतात. मात्र अशी स्पर्धा जिंकणारे पहिल्या क्रमांकावर आले, तरी मनाने खूप खाली राहत असतात. विधायक मनच मोठे व उंच होत असते. त्याला विजय वा पराजयाची गरज नसते. ज्ञानदेवाची कुणाशीही स्पर्धा नव्हती, त्याचमुळे ‘दुरितांचे तिमिर जावो’ असे त्यांना म्हणता आले. कुणाच्या तरी तिमिराची इच्छा असणाऱ्यांना ज्ञानदेव होता येत नाही.

समूहात, कुटुंबात, पक्षात वा मित्रांत असणारी दु:खी व स्वत:च्या मनातच गुरफटून राहणारी माणसे आपण पाहिलेली असतात. याउलट एकटी, एकाकी असूनही आनंदात जगणारेही आपण पाहिलेले असतात. आपली मानलेली माणसे जवळच असावी लागणे त्यासाठी आवश्यक नाही. ती दूर असली तरी आपली असतात, ही भावनाही व्यक्तीच्या एकाकीपणाला सर्वस्पर्शी व आनंदी बनवत असते. ‘अणुरेणुहूनिया थोकडा, तुका आकाशा-एवढा’ ही भावना एका संताच्या मनात कशी येत असेल? ती त्याला कशी झेपत असेल? ती एक कविता असते, की त्याचे आत्मस्वरूप? आपल्या ठायी साऱ्यांना पाहता येणे, हेही एकाकीपणाचेच व्यापक रूप नाही काय? आणि आपल्या मनासारखे काहीही आपले नाही, हा भाग क्षुद्रपणाचा मानायचा की नाही?

एक विषय आणखीही. स्वत:ला दु:खी समजणारी व्यक्ती वा एकटी वा एकाकी माणसे आपल्या आनंदाचे अदृश्य निकष ठरवत असतात. ते तिच्या हाडीमांसी खिळलेले असतात. त्या निकषावर तिच्या आवडी-निवडीच नव्हे, तर सुख-दु:खेही निश्चित होतात. यातले चमत्कारिकपण असे की, हे निकष कायम स्वरूपाचे नसतात. ते बदलतात. काल आवडणाऱ्या गोष्टी व व्यक्ती आज आवडेनाशा का होतात? माणसाचे मन असे 180 अंशांनी का फिरते? त्यातला कोणता कोन खरा मानायचा, की ते सारेच तात्कालिक म्हणून पाहायचे?

आपल्याला आपले नातेवाईक निवडता येत नाहीत, तसे शेजारीही निवडून घेता येत नाहीत. जे मिळाले तेच आपले असतात. मात्र आपले मित्र व जोडीदार आपण निवडू शकतो. ते निवडस्वातंत्र्य आपल्याला आहे. अर्थात यातही एक अडसर आहे. ही निवड आपल्या मनाने करण्याचे स्वातंत्र्य किती जणांना असते? विशेषत: आपल्यातील स्त्रियांना? त्यातल्या अशिक्षित व मागास स्त्रियांची- ज्या वर्गात बालविवाह होतात, त्यातल्या स्त्रियांची- गणना यात करायची नाही. शिक्षित समाजातही आई-वडील, बहीण-भाऊ, ओळखीपाळखीचे, जातीतले, धर्मातले असे जोडीदार व मित्र निवडले जातात. ते नेहमीच आपल्याशी पुरते जुळतात काय? जुळले तरी त्यात स्वेच्छेचा, प्रेमाचा भाग किती अन्‌ नाइलाजाचा किती? आपल्या अवतीभोवतीच्या कुटुंबाकडे जरा लक्ष दिले, तरी त्यात मनातून एकमेकांना नावे ठेवीत नाइलाजाने जगणारी घरं आपण किती पाहतो? राजकीय पक्ष, संघटना व संस्था यांचेही असेच असते. पण तरीही समाज असतो. त्याचे सर्वसमावेशक व पारंपरिक निर्बंध अशाही साऱ्यांना एकत्र ठेवतात किंवा बांधून ठेवतात.

‘याला जीवन ऐसे नाव’ म्हणून मग आपण गप्प राहतो व आहे त्या व्यवस्थेशी जुळवून घेतो. मग पुरुषाला त्याचे जीवन अनुभवता येते. स्त्रीला त्यातला कितीसा भाग जगता येतो? एक दुष्ट गोष्ट अशी की, यात कोणी तरी कुणावर स्वार व्हायचे वा स्वत:वर कुणाला तरी स्वार होऊ द्यायचे, एवढेच असते की नाही? प्रेम म्हणायचे आणि त्यापलीकडे पाहायचे. समूह फक्त वाईटच नसतात; त्यात सहकार असतो, सहयोग असतो, भागीदारी असते. पण त्या प्रत्येकाची कुठली तरी मागणीही असते. ती नसेल, तर ते निरपेक्ष सहकार्य आनंददायी ठरते. मात्र ते फार अपवादाने लाभते आणि तेच खरे तर आयुष्यातील अंधाराला उजाळा आणते. हा सहभाग आयुष्यात काय आणतो? ज्ञान, अर्थ, स्नेह, जवळीक, मोठेपण? त्यातली काही माणसे अशी येतानाही त्यांचे मीपण आणतात आणि तापदायक होतात. तीही त्याचीच किंमत असते.

स्वयंशिस्त नावाचीही  एक शिस्तबद्ध व्यवस्था असते. मी ती जपानमध्ये पाहिली. रस्त्यावरचे लाल दिवे लागतात, गाड्या थांबतात. थांबताना त्या आपसात दहा फुटांचे अंतर ठेवतात. प्रवासातसुद्धा त्यांचे ते अंतर कायम असते. युद्धामुळे शिस्त आली, की शिस्तीच्या बळावर तो देश महायुद्ध करायला सिद्ध झाला- हे कळायला आज मार्ग नाही. पण स्वातंत्र्य व शिस्तबद्धता यांची सांगड घालणारी स्वयंशिस्तीएवढी दुसरी गोष्ट नाही, हे तेव्हा लक्षात आले. लोक श्रीमंत आहेत किती? तर, दर वेळी टॉयलेटमधून बाहेर पडताना हातात एक कागद येतो- त्यावर तुमचे बी.पी., शुगर, अल्कोहोल आणि प्रकृतीतील इतर लहान-मोठे बदल सांगितले असतात. शिवाय त्यावरचे तातडीचे उपायही त्यात असतात. जपान हे दुसऱ्या महायुद्धापूर्वी हुकूमशाही राष्ट्र होते, पण स्वित्झर्लंडचे तसे नाही. ते पूर्वापार स्वतंत्र, मुक्त व आंतरराष्ट्रीय संघटनांच्याही बांधणीबाहेरचे राष्ट्र आहे. प्रत्यक्ष लोकशाहीचा प्रयोग राबविणारा जगातला आज तो एकमेव देश आहे. त्याच्या जिनेव्हा या शहरातील मध्यवर्ती व तीन देश जोडणाऱ्या मोठ्या कालव्यातून सफर करताना मी सोबतच्या मंत्र्यांना विचारले, ‘‘तुमच्या लोकशाही देशाने 1968 पर्यंत स्त्रियांना मताधिकार का दिला नाही?’’ त्यावर ते शांतपणे म्हणाले, ‘‘त्यांनी तो मागितलाच नाही.’’ मी म्हणालो, ‘‘आमच्या देशाने त्यांना तो न मागताच स्वातंत्र्यानंतर दिला…’’ ते म्हणाले, ‘‘असेल, पण येथे त्यांची तशी मागणीच आली नाही.’’ स्वित्झर्लंड हा जगातला सर्वाधिक सुशिक्षित देश आहे. तिथे असे का व्हावे? त्या मंत्र्यांनी आणखीही एक धक्कादायक गोष्ट त्या वेळी सांगितली. ‘‘आमच्या स्त्रियांना 1978 पर्यंत बँकिंगचेही अधिकार नव्हते, कारण त्यांनी ते मागितले नव्हते. घरातल्या पुरुषांच्या अधिकारात त्या निर्धास्त होत्या.’’

माणसे देशपरत्वे वेगळी असतात काय? त्यांची मानसिकता भिन्न असते काय? जपान आणि स्वित्झर्लंड यातले प्रगत कोण व अप्रगत कोण आणि शहाणे कोण व समाधानी कोण? माणूस हाच कमालीचा बुचकळ्यात टाकणारा प्राणी आहे. त्यातून स्त्री ही तर फारशी कुणाला समजली नाही, असे अशा वेळी मनात आले तर काय? अशांचे एकाकीपण कोणाला उमजेल? त्यांची उंची, खोली, प्रगल्भपणा वा संकुचित असणे तरी कोणाच्या लक्षात येईल?

प्रवास आणि थांबलेपण

व्यक्तीच्या (म्हणजे एकाकी वा एकट्या माणसाच्या) संरक्षणासाठी निर्माण झालेले धर्म, राज्य, वंश, परंपरा आणि परमेश्वर याच संस्था वा संकल्पना व्यक्तीचे सर्वाधिक बळी का घेतात? युद्धे व्यक्तीत होत नाहीत, ती धर्मांमध्ये झाली व होतात, ती राज्यात झाली व होतात. सम्राट व राजे लढाया करायचे. आता जगातल्या महाशक्ती युद्धे करतात किंवा ती करण्याच्या तयारीसाठी शस्त्रस्पर्धा चालवतात. व्यक्तींना वाद घालता येतो, प्रसंगी हातघाईवर येता येते; पण त्यांच्यात युद्धे वा महायुद्धे होत नाहीत. ज्यांनी संरक्षण करायचे, त्या संस्था वा संघटना संरक्षणाच्याच नावाने माणसे मारतात. त्यातल्या बळींची इतिहासातील  संख्या अब्जावधींची आहे. त्याहून दुर्दैव हे की, त्या मेलेल्या माणसांतील अनेकांना आपण नेमके कशासाठी वा कुणासाठी लढलो आणि मेलो, हे कळलेही नाही.

जोवर या संस्था आहेत, तोवर युद्धे संपणारही नाहीत. घाऊक पद्धतीने माणसांचे बळी घेणाऱ्या यंत्रणा नाहीशाही होणार नाहीत. आज महायुद्धे होत नसली तरी स्थानिक, प्रादेशिक पातळीवरच्या लहानसहान लढाया चालू आहेत आणि त्यात दर दिवशी शेकडो माणसे बळीही पडत आहेत. महायुद्धे थांबली असल्याचे कारणही महाशक्तीतले वैर संपले हे नाही; त्यांना परस्परांजवळ असलेल्या अतिसंहारक शस्त्रांची भीती वाटते, म्हणून. छोटासा उत्तर कोरिया हा देश अमेरिकेला युद्धाचे आव्हान देतो आणि अमेरिका त्याच्याशी वाटाघाटी करायला राजी होते. चीनचे भारतावरचे आक्रमण चालूच असते आणि देशाचे पंतप्रधान त्या देशाशी बोलणी करतच असतात. नेपाळसारखा चिमुकला देशही भारतावर आक्रमण करतो. पाकिस्तानचा तो उद्योग सुरूच असतो. सगळे मध्य आशियाई देश, आफ्रिकेतील अनेक राष्ट्रे सदैव युद्धमग्न असतात. त्यांची सीमायुद्धे सतत सुरू असतात (सीमेच्या लढाया संपल्या की, देशांची सरकारे त्यांच्या विरोधकांचे मुडदे पाडतात). अशा वेळी या संस्थांना संरक्षक म्हणायचे की जीवघेण्या?

माणसांचे माणसांशी असलेले वैर एक वेळ समजून घेता येते, पण धर्मांचे धर्मांशी शत्रुत्व का असावे? एका धर्माचा ईश्वर दुसऱ्या धर्माच्या ईश्वराशी लढायला का निघावा? की, त्यांचे नाव समोर करून माणसेच स्वार्थाच्या हाणामाऱ्या करीत असतात? राजे त्यांच्या महत्त्वाकांक्षा खऱ्या करतात आणि जग जिंकण्याच्या ईर्ष्याही त्याचमुळे जन्माला येतात. या संस्था हिंसाचारी व मरणाचारी असतील, तर त्या टिकतात का आणि त्या टिकवण्याचा अट्टहास तरी का असतो? या संस्था-संघटना नसत्या तर एकटी व एकाकी माणसे अशी लढली व मृत्यू पावली असती काय? दर दिवशी सीमेवर मरणाऱ्यांना मृत्यूचे कारणही न कळता मरण आले असते काय? हिरोशिमा आणि नागासाकीत मेलेली दोन लाख माणसे- त्यांना लढायचे होते वा ती लढणारी होती म्हणून मृत्यू पावली नाहीत, त्या निष्पापांना आलेले मरण महासत्तांच्या व त्यांच्या सूत्रधारांच्या महत्त्वाकांक्षा यामुळे आले. माणसांनी नकळत मरायचे आणि त्यांना मरायला लावणाऱ्यांनी नेते वा जेते म्हणून आपली पाठ थोपटून घ्यायची आणि आपल्या देशालाही ती थोपटायला लावायची, हा मृत्यूचा खेळ कोण खेळतो? माणूस की धर्म, माणूस की राज्य, एकाकी जग की महासत्ता?

या संस्था नसत्या तर मनुष्यप्राणी इतर प्राण्यांच्याच अवस्थेत राहिला असता काय? आजवरची समाजाची प्रगती व्यक्तींचे संशोधन व शोधांमुळे झाली की, केवळ संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे? सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे असले, तरी शोध वा संशोधन हे समूहाचे काम नाही. समूह फार तर अशा वेळी मदतीला येतात, आवश्यक ती उभारणी करतात. प्रत्येक शोध वा संशोधन मात्र व्यक्तीचेच असते. अग्नी, शेती हे आरंभीचे शोध कोणी लावले आणि अण्वस्त्रांची निर्मिती कोणी केली? व्यक्ती एकाकी अवस्थेत काही नवे शोधते आणि ते उपयोगाचे म्हणूनच समाज तिचा स्वीकार करतो. समाजाचे स्वत:चे सामूहिक म्हणावे असे संशोधन कोणते असते? विचार, सिद्धान्त, कल्याणकारी मार्ग, द्रव्य हे त्याचे एकीचे मार्ग की आणखी काही?

प्लेटो म्हणतो, झुंडीला तिचे एक मानस असते. तिला बुद्धीचा व ज्ञानाचा स्पर्श नसतो. तिचे मानस वाऱ्यासारखे दिशाहीन व बरेचदा आंधळेही असते. झुंडींनी समाजाचे कधी कल्याण केले आहे काय? की, त्यात हिंसा व संहार आणले…? हां, एक गोष्ट झुंडीच्या बाजूने सांगता येते- तिला श्रद्धा व भक्तीचा मार्ग गवसला की ती दिंड्या काढते, मिरवणुका काढते. यात्रा आणि तशाच भक्तिमार्गाने जाते. पण तिचे जाणेही कुठवर असते? जे अगोदरच हाती लागले असते, तिथवर. त्याहून पुढे नाही.

समाजाचे कल्याण व प्रगती साधणारे संशोधन नेहमी व्यक्तींनी केले. नोबेल पारितोषिके त्यामुळे व्यक्तींनाच दिली जातात. समाज व राज्य या संशोधनाचे सार्वत्रिकीकरण तेवढे करतात. त्या विस्ताराचे श्रेय समूहाला दिले, तरी त्याच्या निर्मितीचे श्रेय व्यक्तीच्या पदरात टाकावे लागते.

खरे तर, समाज व राज्य यांच्या संरक्षणासाठी ज्या यंत्रणा निर्माण होतात, त्यांचाही शोध व्यक्तींनीच लावलेला असतो. इस्रोसारख्या वा नासासारख्या संस्था त्यांचे श्रेय स्वत:कडे घेत असल्या, तरी त्यांचे बीज व्यक्तींचेच असते. अणुबॉम्ब  ट्रुमन यांना वापरता येतो, पण त्याची निर्मिती शोपेनहॉवरकडून झालेली असते. समूहांना श्रेष्ठत्व देणारे समाज व्यक्तीचे मोठेपण कृपणतेने मान्य करतात. त्यांच्या निर्मितीचे जास्तीचे श्रेय ते देश, राज्य व समाजाला देतात. जाणकारांना मात्र यातले सत्य ठाऊक असते.

युद्ध वा संरक्षण सोडले आणि सामाजिक, सांस्कृतिक वा धार्मिक क्षेत्र घेतले तरी व्यक्तीचे नव्याच्या शोधाचे, पुढे जाण्याचे व ते क्षेत्र विकसित करण्याचे श्रेय  कुणाचे असते? व्यक्तीचे की समूहाचे? स्वातंत्र्याच्या वा समतेच्या लढ्यासाठी लोक संघटित होतात. पण ते संघटन एक गांधी वा एक आंबेडकर करीत असतो. आपला वारकरी संप्रदाय ज्ञानदेवापाशी सुरू होतो. हिंदू धर्माचे संरक्षण व संघटन शंकराचार्यांकडून होते. महावीर जैन धर्माची, बुद्ध बौद्ध धर्माची, पैगंबर इस्लामची आणि नानक शीख धर्माची स्थापना करतात; ती समूहाची निर्मिती नसते. समूहांना ती मोठे व संघटित करते, एवढेच. चित्रकला, संगीत, नाटक, चित्रपट ही कुणाची निर्मिती? तीत सारे जण गुंतलेले दिसत असले, तरी तिची प्रेरणा कुणा एकाचीच असते की नाही? या  स्वयंमेव एकाकी व्यक्तीला समूहाचे पाठबळ लाभते ते तिच्याच गुणवत्तेच्या व उपयुक्ततेच्या बळावर.

सत्तेला सत्य तसेही चालत नाही, तिला सोय हवी असते. तिचा आधार खरेपणा नसतो. श्रद्धा, भक्ती, अडाणीपण, चौकसहीनता आणि सत्तेची गुलामगिरी यावरच ती पुष्ट होत असते- मग ती  सत्ता कोणतीही असो. धर्मसत्तेला धर्मविरोधी वा त्याहून विसंगत विचार चालत नाहीत. विचार करा, पण तो वेदानुकूलच करा- या हिंदू धर्माच्या आदेशाने त्यात सत्यशोधनाच्या व तर्काच्या परंपरा वाढू दिल्या नाहीत. बायबलविरोधी विचार हे पाखंड आहे आणि ते मृत्युदंडास पात्र आहे, ही धर्माज्ञा त्या धर्मक्षेत्रात संशोधने वाढू देणारी नव्हती. एवढेच नव्हे, तर तिने पूर्वीच्या सॉक्रेटिस, ॲरिस्टॉटल आदींच्या तत्त्वपरंपरा मोडीत काढल्या. कुराण हा ईश्वरी ग्रंथ ठरला, तेव्हा सारे अरबी तत्त्वचिंतन इतिहासजमा झाले. अगदी अलीकडे आपल्या कल्पनांना छेद देणारे काही संशोधक स्टालिनने तुरुंगात टाकले व मारले. मार्क्सहून वेगळा विचार नको- ही मार्क्सवाद्यांची, हिंदुत्वाहून वेगळा विचार नको- ही हिंदुत्ववाद्यांची परंपरा हेच सत्य अधोरेखित करीत असते. परिणामी- स्वर्ग, नरक, ईश्वर, पूर्वजन्म आणि  पुनर्जन्मासारख्या भाकडकथाच मजबूत होतात.

श्रद्धा हा समूहाच्या एकजुटीचा, तर सत्य हा व्यक्तीच्या संशोधनाचा विषय आहे. काही व्यक्तींना समाजाने इतिहासात जो विरोध केला वा मृत्यू दिला, त्याची कारणंही सत्याच्या वा त्यांनी असत्यासी केलेल्या विरोधातच शोधावी लागतात. व्यक्ती पुढे का जाते? ज्ञान उंची का गाठते? आणि समूह स्थिर का राहतात? श्रद्धा जागच्या जागी होत्या, तशाच का राहतात? यांची उत्तरेही यातच सापडतात. सबब सत्याचे व तर्काचे महत्त्व वाढते व वाढवले पाहिजे. भारतात तर काही वर्षांआधी न्यायालयाच्या बदनामीच्या खटल्यात सत्य हा पुरावा म्हणूनही अमान्य केला जात होता. त्यामुळे बदनामी होते, एवढाच काय तो अपराध मान्य होत होता. ती नामुष्की आता संपली आहे. सत्य, तर्क, विचार, संशोधन, शोध हे व्यक्तीच्या वा एकाकी माणसाच्या कामाचे; तर श्रद्धा, भक्ती व अनुनय हे समूहाच्या भावनांचे क्षेत्र आहे.

प्रगती साधायची, तर यातला पहिला स्वार्थ साधायचा तर दुसरा मार्ग अवलंबायचा असतो. प्रसंगी त्यासाठी समूहापासून, संस्थांपासून- अगदी धर्मासारख्या श्रद्धाधारित संघटनांपासूनही दूर व्हावे लागते. असत्यावर प्रकाश टाकल्याखेरीज आणि खोटेपणावर उभारलेले इमले खाली आणल्याखेरीज खऱ्यापर्यंत जाता येत नाही. विकासाची वाटही सत्यापासूनच सुरू होते. ही वाट सरळ वा सोपी नसते. ती सत्तेच्या, धर्मांच्या, आपले म्हणणाऱ्या अनेकांच्या विरोधातून जाते. सारे तुटते. प्रसंगी जीव धोक्यात येतो. सत्यासाठी प्राणार्पण केलेल्या खऱ्या हुतात्म्यांची इतिहासातील लखलखती बाजू मोठी आहे. ती जळणारी आहे, पण समाजातले हीन जाळणारी आहे. मनाची फार मोठी तयारी व त्याआधी फार मोठी जिद्द मनात असल्याखेरीज या वाटेने जायचे नसते… मात्र जे जातात, तेच जगाचे उपकारकर्ते, नेते व मार्गदर्शक ठरतात. प्रसंगी त्यांना दैवतांचा मान मिळतो. मात्र ही वाटचाल त्या सन्मानासाठी करायची नसते, स्वत:च्या उन्नतीसाठी व समाजाच्या कल्याणासाठी करायची असते.

एकट्या माणसांनी जगाचा विनाश केला नाही, असे नाही. ती माणसेही बुद्धिमानच होती. पण त्यांच्या बुद्धीचे वळण वाकडे होते. उदाहरणार्थ- हिटलर, मुसोलिनी.  इतिहासात चंगेझखान, अनेक रोमन सम्राट, पोप अन्‌ राजांनीही जमेल तेवढा जगाचा विनाश केला. बर्नार्ड शॉ यांनी एका भाषणात म्हटले, ‘‘नेपोलियन एकच चांगली गोष्ट करू शकला असता, ती म्हणजे त्याने जन्मान न येणे.’’

मात्र अशा माणसांच्या तुलनेत जगात कल्याणकारी  माणसे अधिक झाली आणि कल्याणाची प्रक्रिया विनाशाहून अधिक परिणामकारक व प्रदीर्घ काळ टिकणारीही असते. विनाशी माणसांची नावे इतिहासजमा होतात, कल्याणकर्त्यांची इतिहासात कायम अन्‌ अजरामर होतात. आजचा समाज त्यांचेच नाव घेतो. उद्याचा काळही त्यांचेच नाव घेणार आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विचारवंत आहेत.)
98224 71646

—-

पृष्ठे : 110, किंमत : 100 रुपये

सुरेश द्वादशीवार यांच्या ‘एकाकी’ , ‘चार्वाक’ आणि ‘तुझ्यासवे …तुझ्याविना’ या नवीन पुस्तकांसाठी संपर्क – 

साधना प्रकाशन -४३१ , शनिवार पेठ , पुणे

020-24459635

M.7058286753

[email protected]

Previous articleगीला मन शायद बिस्तर के पास पडा हो..!
Next articleकाळ्या गव्हाची चकित करणारी कहाणी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.