सॉक्रेटीस, प्लेटो,ॲरिस्टॉटल

-सुनील तांबे

सॉक्रेटीस

युरोपियन तत्वज्ञानाच्या अनेक संस्थापकांमध्ये सॉक्रेटीसचं नाव घेतलं जातं. सॉक्रेटीसबद्दल त्याच्या समकालीनांनी जे काही लिहीलं आहे त्यावरून आपल्याला सॉक्रेटीसची माहिती मिळते. ही माहितीही पुरेशी विश्वासार्ह नाही कारण संवाद आणि नाटक ह्या स्वरुपात ती उपलब्ध आहे. एरिस्टोफेनिसच्या एका नाटकात सॉक्रेटीसचं चित्रण हेराफेरी करणारा आणि तरुणांना फसवाफसवीचं तंत्र शिकवणारा असं करण्यात आलंय. सॉक्रेटीसचा शिष्य प्लेटो. त्याने सॉक्रेटीसबरोबरचे संवाद लिहून ठेवले आहेत. झेनोफेन आणि प्लेटो ह्यांनी केलेलं सॉक्रेटीसचं चित्रण ठसठशीतपणे वेगळं आहे. तत्कालीन अथेन्समधील सर्वात शहाणा आणि न्यायी पुरुष म्हणजे सॉक्रेटीस असं वर्णन प्लेटोने केलं आहे.

पाश्चात्य तत्वज्ञानाचा संस्थापक अशी सॉक्रेटीसची ख्याती आहे. मात्र सॉक्रेटीसने कधीही एक ओळही लिहीलेली नाही. त्याने कधीही उपदेशही केला नाही. तो फक्त प्रश्न विचारायचा. उत्तरांमधील तार्किक विसंगतीवर तो बोट ठेवायचा. शिक्षणाच्या ह्या पद्धतीला सॉक्रेटीसची पद्धत म्हटलं जातं. आजही शिक्षणाच्या ह्या पद्धतीचा अवलंब केला जातो कारण त्यामधून शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचंही शिक्षण होतं.

सॉक्रेटीसचा बाप शिल्पकार किंवा दगडफोड्या वा वडार होता. सॉक्रेटीसही ही कामे करत असे. अथेन्समधील पार्थेनान ह्या मंदिराच्या उभारणीत त्याच्या बापाने काम केलं होतं. त्याशिवाय सॉक्रेटीसने तीन युद्धातही भाग घेतला होता. निवृत्त झाल्यानंतर सॉक्रेटीसने शिक्षक म्हणून काम करू लागला. सॉक्रेटीस हा अथेन्समधील सर्वात शहाणा मनुष्य आहे ही घोषणा केली डेल्फीच्या ओरॅकलने. अपोलो देवतेच्या मंदिरातील ही पुजारीण देवांचा संदेश लोकांना सांगत असे. अवघ्या युरोपातून या मंदिरात भाविक येत असत. ह्या देवतेने असं जाहीर केलं की कोणीही माणूस सॉक्रेटीस एवढा शहाणा नाही. त्यामुळे सॉक्रेटीसची ख्याती वाढली. मात्र दस्तुरखुद्द सॉक्रेटीस त्यामुळे हुरळून गेला नाही. पुजारणीने केलेली घोषणा हे कोडं आहे अशी त्याची धारणा होती. शहाणा माणूस कोणाला म्हणायचं, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. त्यावेळच्या अथेन्समधील शिक्षक, राज्यकर्ते, कलावंत ह्यांना तो भेटला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सॉक्रेटीस अशा निष्कर्षाला आला की ह्या सर्व पुरुषांची अशी धारणा आहे की ते ज्ञानी आहेत. मात्र त्यांना जे माहीत नाही ह्याबाबत ते पूर्णपणे अज्ञानी आहेत. मला जे माहीत नाही, ते विचार करूनही मला कळत नाही, असं सॉक्रेटीस म्हणत असे. सर्व पामरांप्रमाणेच आपणही अज्ञानी आहोत ह्याबद्दल सॉक्रेटीसची खात्री होती. मात्र आपण अज्ञानी आहोत हे त्याला कळलेलं होतं म्हणून तो शहाणा माणूस ठरला, असं त्याचं म्हणणं होतं.

सॉक्रेटीस ठेंगणा आणि लठ्ठ होता. आपले बटबटीत डोळे बाहेर काढून तो डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारत असे, असं वर्णन प्लेटोने करून ठेवलं आहे. सतत प्रश्न विचारून दुसर्‍यांना भंडावून सोडणार्‍या या कुरुप अजागळ माणसाला अथेन्समध्ये फारसे मित्र नसावेत. सॉक्रेटीस सोफीस्ट पंथाचा आहे अशीही वदंता होती. तरुणांना बंडाची शिकवण देणारे सोफीस्ट समजले जात. अथेन्समधील तरुणांना बहकवण्याचा, त्यांना नास्तिक बनवण्याचा आरोप सॉक्रेटीसवर ठेवण्यात आला. रितसर तक्रार करण्यात आली. खटला चालवण्यात आला. ह्या खटल्यात सॉक्रेटीसने आपली बाजू मांडली. आपण नास्तिक असल्याचा आरोप त्याने नाकारला. अथेन्समधील उन्नत आचरणाचा पक्ष मी नेहमीच घेतला आहे, असं त्याने ठासून मांडलं. मात्र त्याने युक्तिवाद केला नाही. निवाडा करणारे पंच विचार करण्यात अतिशय सुमार बुद्धिचे आहेत असं त्याने आपल्या खास शैलीत मांडलं. पंचानी सॉक्रेटीसला दोषी ठरवलं आणि देहांताची शिक्षा फर्मावली. त्यावेळच्या अथेन्सच्या कायद्यानुसार गुन्हेगाराला पर्यायी सजा सुचवता यायची. सॉक्रेटीसलाही ही संधी मिळाली. तो म्हणाला देहान्त शासनाऐवजी अथेन्सने त्याला मेजवानी द्यावी. केवळ आदरणीय आणि थोर पुरुषांनाच अशी मेजवानी देण्याची रीत होती. टिंगल करण्याची एकही संधी सॉक्रेटीस सोडत नसे. मात्र त्यामुळे पंचांनी देहदंडाची सजा कायम केली. सॉक्रेटीसच्या अनुयायांना रडू कोसळलं. तुरुंगातून पळून जाण्याची गळ त्यांनी सॉक्रेटीसला घातली. देहांताची शिक्षा ठोठावलेला गुन्हेगार पळून जाणं ही स्वाभाविक बाब मानली जात असे. मात्र सॉक्रेटीसने ती सूचना धुडकावून लावली. मी नेहमीच अथेन्सच्या कायद्याचं पालन केलं आहे, असं तो म्हणाला आणि शांतपणे मृत्यूला सामोरा गेला.

सॉक्रेटीसचा शिष्य प्लेटो आणि प्लेटोचा शिष्य ॲरिस्टॉटल.

सॉक्रेटीस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल ह्यांच्यामध्ये मतभेद होते, मतभिन्नताही होती. मात्र त्या वादविवादातून ग्रीक तत्वज्ञानाची जडण-घडण झाली.

विवेकशक्ती

सोफीया म्हणजे शहाणपणा. मुंबईमध्ये पेडर रोडवर सोफीया महाविद्यालय आहे.

ग्रीक भाषेत फिलिया सोफिया म्हणजे शहाणपणावर असणारं बंधुप्रेम. अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया या शहराचा नामापुरता संबंध शहाणपणा आणि बंधुतेशी आहे.

फिलॉसॉफर ह्या शब्दाचा अर्थ शहाणपणावर प्रेम आणि निष्ठा असणारा.

शहाणपणाची शिकवण देणारे म्हणजे योग्य काय अयोग्य काय, नैतिक काय अनैतिक काय ह्याबाबत प्रश्न विचारणारे ते सोफीस्ट.

वादविवादातून सत्याप्रत जाता येतं अशी सोफीस्टांची धारणा होती.

त्याचा एक अर्थ असा की सत्य म्हणजे काय ह्याची पूर्वनिश्चिती करून त्या दिशेला चर्चा वा वाद न्यायचा नाही तर युक्तिवाद करत पुढे सरकायचं.

म्हणून तर सॉक्रेटीसवर सोफीस्ट असल्याचा आरोप करण्यात आला.

सोफीस्ट हे व्यापारी आणि कारागीर होते. त्यापैकी काही चांगले शिक्षक होते तर काही वाईट शिक्षक होते. आजचा ग्रीस आणि प्राचीन काळातला ग्रीस वेगळा. भूमध्य समुद्रातील हजारो बेटांवर ग्रीक पसरले होते. डोंगराळ, खडकाळ प्रदेश. लागवडीयोग्य जमीन खूप कमी होती. त्यामुळे ग्रीकांनी नौकानयनात नैपुण्य मिळवलं आणि व्यापारात मुसंडी मारली. धातुकामातही ते प्रवीण होते. सायप्रस या बेटावर तांब्याच्या खाणी होत्या. जस्त यायचं अफगाणिस्तानातून. या दोन धातूंच्या मिश्रणातून ब्राँझ हा अधिक मजबूत मिश्रधातू मिळतो. शस्त्र ब्राँझची होती. शस्त्रं आणि शस्त्रास्त्र विद्या म्हणून सैनिकी पेशातही ग्रीकांनी प्राविण्य मिळवलं. ग्रीस नावाचं एक राष्ट्र-राज्य नव्हतं. ग्रीक भाषा बोलणारे,ग्रीक संस्कृतीतील देव, पुराणकथा ह्यांना मानणारे ग्रीक लोक ह्या बेटांवर आणि भूमध्य समुद्राच्या दक्षिण किनार्‍यावर पसरले होते. त्यांची राज्यं म्हणजे नगर-राज्य होती. त्या नगरराज्यांचा कारभार लोकशाही पद्धतीने चाले. कारण ती राज्यं छोटी होती. ह्या राज्यांमध्ये कष्टाची कामं गुलामांकडे सोपवली जात. युद्धकैद्यांना गुलाम बनवण्याची प्रथा होती. वरकड उत्पादन वा उत्पन्न हवं असेल तर गुलामांशिवाय पर्याय नव्हता कारण तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं.

प्रत्येक शहराची म्हणजे नगर-राज्याची एक देवता होती. उदाहरणार्थ अथेन्सची देवता होती अथेना. त्याशिवाय अनेक देव-देवता होत्या. त्यांच्या पुराणकथा होत्या. ग्रीकांचे देव माणसांसारखे होते. दयाळू, लोभी, सामर्थ्यवान, कपटी, व्यभिचारी. ह्या देवांच्या शिकवणुकीला काय अर्थ आहे, असा प्रश्न सोफीस्ट करत. प्रत्येक नगर-राज्याचे कायदेकानून वेगळे होते. सामर्थ्यशाली, सत्ताधारी लोक त्यांच्या हिताचं रक्षण करण्याकरता कायदेकानून बनवतात, अशीही सोफीस्टांची टीका होती. ग्रीक संस्कृतीमध्ये सोफीस्ट हे आद्य विद्रोही होते.

प्लेटो हा सॉक्रेटीसचा शिष्य. प्लेटो आणि सॉक्रेटीस दोघांनाही सोफीस्टांचं आकर्षण नव्हतं. असलाच तर तिटकारा होता. मात्र शहाणपणा वा विवेक नावाची शक्ती असते ह्यावर त्यांचा विश्वास होता. प्लेटोने ह्या शक्तीला रॅशनॅलिटी वा विवेक ही संज्ञा दिली. प्लेटोच्या मते पंंचेद्रियांनी ज्याचं आपण आकलन करून घेतो ते वास्तव जग नाही. वास्तव जगाचं आकलन पंचेद्रियांनी होऊ शकत नाही. वीटांचं बांधकाम त्यावेळीही केलं जायचं. प्रत्येक वीट वेगळी असते. प्रत्येक विटेची लांबी, रुंदी, उंची एकच असली तरीही वेगळी असते. रंग, पोत किंवा अन्य कारणांमुळे. ते वेगळेपण दिसतं. वस्तुतः वीट ही एक संकल्पना आहे. उत्तम वीट ही संकल्पना वेगळ्या जगात मूर्त झालेली आहे.  त्या संकल्पनेबरहुकूम वीट बनवण्याचा आपण प्रयत्न करतो. आपल्याला दिसणारी वीट, वेगळ्या जगात मूर्त झालेल्या संकल्पनेची प्रतिकृती असते. वास्तव म्हणजे वेगळ्या जगात मूर्त झालेली संकल्पना. तिचं आकलन आपल्याला पंचेद्रियांनी होऊ शकत नाही. हे आकलन केवळ विवेकशक्तीने होऊ शकतं. भूमिती वा गणित ह्यांचं आकलन आपल्याला पंचेद्रियांनी होऊ शकत नाही. दोन गुणिले दोन म्हणजे चार ही संख्या येते हे आकलन आपल्याला पंचेद्रियांनी झालेलं नाही. हे आकलन आपल्याला विवेकाने होतं. ही विवेकशक्ती म्हणजेच दैवी मन (डिव्हाईन माइंड). ह्या विवेकशक्तीमुळेच विश्वाचा कारभार सुरू असतो असं प्लेटोचं म्हणणं होतं.

प्लेटोने हा मुद्दा एका उदाहरणाद्वारे स्पष्ट केला आहे. एका गुहेत कैद्यांना असं बांधून ठेवलं आहे की ते फक्त भिंतीकडे पाहू शकतील. भिंत आणि कैदी ह्यांच्यामागे आग पेटवली आहे. आगीच्या आणि कैद्यांच्या मध्ये एका फळीवर दैनंदिन वापरातल्या वस्तु ठेवण्यात आल्या आहेत. कैद्यांना त्या वस्तु दिसत नाहीत, मात्र त्यांच्या भिंतीवर पडलेल्या सावल्या दिसतात. डोळ्यांनी कैद्यांना वास्तवाचं आकलन होत नाही तर वास्तवाची प्रतिकृती वा फॉर्म दिसतो, असा प्लेटोचा युक्तिवाद आहे. दैनंदिन जीवनात आपण ज्या वस्तुंना पाहतो, स्पर्श करतो, हुंगतो, ऐकतो त्याद्वारे वस्तुंच्या वास्तव रुपाचं आपल्याला आकलन होत नाही. वास्तवाचं आकलन करून घेण्यासाठी विवेशक्तीचाच वापर करावा लागतो. सौंदर्य, न्याय, समता ह्या संकल्पना विवेकशक्तीद्वारेच समजतात. म्हणून शाळा हवी. त्यासाठी प्लेटोने अॅकॅडमी नावाची शाळा काढली. अकादमी हा शब्द आता भारतीय भाषांमध्येही रुळला आहे मात्र भारतीय समाजात विवेकशक्तीची उणिव आहे.

(लेखक नामांकित पत्रकार आहेत)

9987063670 

Previous articleएकाकीपण की समाजविन्मुखता?
Next articleथप्पड: गोष्ट विवाहसंस्थेतील कॅज्युअल सेक्सिझमची आणि सोयीस्कर दुर्लक्षाची!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. लेख खूप अभ्यासपूर्ण आहे . मात्र लेखात ‘उत्तम ‘ विट असा शब्द आला आहे,तो Ideal चे भाषांतर म्हणून आला आहे का?तसे असेल तर त्या ठिकाणी Ideal म्हणजे विटेचे विश्वात्मक (Universal ) किंवा चिद्रूप असे भाषांतर अधिक योग्य झाले असते ( आधार : अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र – गो. वि. करंदीकर )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here