शोषित, वंचित समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी राजकीय सत्ता आवश्यक असते हे ओळखून दलित उपेक्षितांच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मुक्तीसाठी ते राजकीय सत्ता हस्तगत करण्याच्या हेतूने निवडणुकांच्या राजकारणाकडे बघतात. निवडणुकीतील पराभव हे खेळातील पराभवासारखे असतात, त्याने नाउमेद न होता पुन्हा नव्या जोमाने खेळायचे असते असे ते म्हणतात. दलितांनी व मागासवर्गियांनी आपली करारपात्रता (Bargaining Power) वाढविल्याशिवाय त्यांना समान वाटा मिळणार नाही असे ते स्पष्ट सांगतात. आंबेडकरांची सत्तासंकल्पना संघर्षातून नव्हे तर समन्वयातून साकार होणारी आहे. त्यांच्या राजकारणाचा संपूर्ण रोख समाजबदलावर होता. बळकट विरोधी पक्ष, वृत्तपत्र स्वातंत्र्याचे जतन आणि निवडणुकांद्वारेशांततामय मार्गाने सत्तांतर यावर त्यांचा सारा भर होता.