एका ‘रोमांचक’ पुस्तकाची गोष्ट !

-प्रवीण बर्दापूरकर

ही नोंद एका पुस्तकाच्या गोष्टीची आहे . ते पुस्तक वाचायला मिळालं कसं त्याचीही एक गोष्ट आहे पण , ती नंतर सांगतो .

पुस्तकाचं नाव आहे ‘यशवंत बाळाजी शास्त्री’. लेखकाचं नावही तेच आहे .  खरं तर या पुस्तकाला नाव ( Title )च नाही मुखपृष्ठावर आहे ते केवळ लेखकांचं नाव !  . यशवंत बाळाजी शास्त्री हे नाव मी सर्वप्रथम नागपूरला ऐकलं . १९७७ साली मी पत्रकारितेत आलो आणि २६ जानेवारी १९८१ ला पुढील पत्रकारिता करण्यासाठी नागपुरात डेरेदाखल झालो . नागपूरच्या अगदी सुरुवातीच्या दिवसातच यशवंत बाळाजी शास्त्री हे नाव आणि त्यांच्या विषयीच्या धाडसी तसंच कांहीशा रंगतदार कथा ऐकायला मिळाल्या . ते कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी होते हे कळल्यावर  तर त्यांच्याविषयी ऐकण्यात उत्सुकता वाटत असे . कधी कधी त्या कथा दंतकथा वाटत इतका भक्तीभाव संगणाऱ्याच्या बोलण्यात असे . यशवंत बाळाजी शास्त्री यांच्या आठवणी सांगणाऱ्यात ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचे आमचे तत्कालीन मुख्य वार्ताहर , कसदार बालसाहित्य लिहिणारे लेखक म्हणून तेव्हा ओळखले जाणारे  दिनकर देशपांडे यांच्यापासून ते बुजुर्ग दि . भा . उपाख्य मामासाहेब भुमरे अशा अनेक मान्यवरांचा समावेश होता .

यशवंत बाळाजी शास्त्री या पुस्तकाची प्रथम आवृत्ती डिसेंबर १९७५ मध्ये प्रसिद्ध झाली . म्हणजे हे पुस्तक प्रकाशित झाल्याला आता जवळजवळ ४८ वर्षे होत आहेत . ज्या पुण्याच्या प्रेस्टिज पब्लिकेशन्स हे पुस्तक प्रकाशित केलं ती प्रकाशन संस्थाही आता बंद झाली आहे . २१८ पानांच्या या पुस्तक वाचनाचा अनुभव एका शब्दांत सांगायचा तर ‘रोमांचित’ करणारा आहे . ११ जानेवारी १९११ ला जन्मलेल्या यशवंत शास्त्री यांचं हे आत्मचरित्र म्हणजे अनेक अफलातून आठवणींचा खच्चून भरलेला खजिनाच आहे . मध्यप्रदेशातल्या सागर जिल्ह्यातल्या देवरी या छोट्याशा गावी यशवंत शास्त्री यांचा जन्म झाला . त्यांचं शिक्षण विदर्भात झालं . मुंबई , पुणे , नागपूर अशा तीन ठिकाणी त्यांनी पत्रकारिता केली . याशिवाय अनेक क्षेत्रात त्यांचा वावर होता . चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या कामाच्या निमित्ताने उत्तर भारत आणि पाकिस्तानातही ते भरपूर फिरले तेव्हाच्या महागड्या हॉटेलात त्यांनी वास्तव्य केलं . त्यांना भेटलेली सगळीचं माणसं माझ्या पिढीला नावानिशी माहिती आहेत पण ,  त्यापैकी अनेकांना प्रत्यक्ष भेटता आलेलं नाही यशवंत शास्त्री मात्र त्या अनेकांना केवळ भेटलेच नाही तर त्यांच्यासोबत त्यांनी कांही केलं . त्यात आचार्य अत्रे , नानासाहेब परुळेकर , पांडोबा भागवत यांच्यासारखे संपादक आहेत मीनाकुमारीपासून अनेक अभिनेत्री-अभिनेते , चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आहेत . महत्त्वाचं म्हणजे ती सर्व माणसं आणि त्या काळात आलेल्या अनुभवांना यशवंत बाळाजी शास्त्री अतिशय धाडसानं सामोरे गेलेले आहेत . खरं तर काही अनुभवांच्या बाबतीत रंगेलपणे सामोरे गेले असंही म्हणता येईल कारण केवळ धूम्रपान आणि मद्यपानच नव्हे तर आयुष्यात आलेल्या स्त्रिया आणि काहींच्या ‘उत्कट सहवासा’ विषयीसुद्धा यशवंत बाळाजी शास्त्री यांनी अतिशय नितळपणे लिहिलं आहे . किती नितळपणे , तर त्यांच्यावर एका स्त्रीकडून झालेल्या बळजोरीची हकिकतही ‘स्त्री कडून पुरुषावर झालेला बलात्कार’ म्हणून त्यांनी सांगून टाकली आहे .  कुठलीही लपवाछपवी त्यांनी केलेली नाही .  महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ( दुसऱ्या ) पत्नी शालिनी शास्त्री यांच्या केवळ पुढाकारानंच नव्हे तर त्यांच्या निवेदनासह हे पुस्तक यशवंत बाळाजी शास्त्री यांच्या मृत्युपश्चात प्रकाशित झालेलं आहे . शालिनी आणि यशवंत शास्त्री या दांपत्याच्या परस्परांतील विश्वास , सामंजस्य आणि खुलेपणाचा एक प्रातिभ अविष्कार म्हणूनही या पुस्तकाकडे पाहता येईल.

मी धर्मश्रद्ध आहे पण , धर्मांध नाही . ईश्वरावर माझा विश्वास आहे पण , मी मूर्तिभंजक नाही . मला माणसाचे दैन्य पाहावत नाही . कारण मी दारिद्याचा अनुभव घेतला होता .’ अशी भूमिका ( पृष्ठ ४३ ) मांडत यशवंत बाळाजी शास्त्री व्यक्त झालेले आहेत . उल्लेखनीय म्हणजे व्यक्त होण्याच्या त्यांच्या या भूमिकेविषयी ते ठाम आहेत .

ज्या नागपूरच्या ‘तरुण भारत’ दैनिकासाठी यशवंत बाळाजी शास्त्री यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली ते दैनिक तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र नव्हतं . ‘तरुण भारत’ संघाचं  मुखपत्र कसं झालं याची यशवंत बाळाजी शास्त्री यांनी दिलेली माहिती वाचनीय आहे . ती माहिती देतांना यशवंत बाळाजी शास्त्री म्हणतात, ‘मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी आकस नाही . आयुष्यात वेळ मिळाला असता तर कदाचित मी संघाचा स्वयंसेवकही झालो असतो . ’ हे सांगून रा.स्व. संघ एखादी संस्था ताब्यात कशी घेतो त्याचे तंत्रही सांगून यशवंत शास्त्री मोकळे होतात . प्रख्यात साहित्यिक ग . त्र्यं . माडखोलकर यांनी सुरु केलेलं  ‘तरुण भारत’ हे दैनिक संघाचं मुखपत्र  कसं  झालं  हे कथन करतांना  त्यांनी म्हटलं आहे , ‘एखादी संस्था संपूर्ण हस्तगत करावयाची झाल्यास , त्यासाठी संघाचे तंत्र मोठे मासलेवाईक असते . संघाची माणसे एका मागून एक अशी त्या संस्थेत  शिरकाव करुन घेतात आणि हा हा म्हणता शिरजोर होतात . बाळासाहेब देवरस ( राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन  सरसंघचालक ) यांच्या हाती ‘तरुण भारत’ची सूत्रे गेली आणि द्रुतगतीने ‘तरुण भारत’चे स्वरुप पालटत गेले . संघाचे तंत्र आणि मंत्र उपयोगात आणला जाऊ लागला .  ’(पृष्ठ ११६)

नलिनी शास्त्री , यशवंत बालाजी शास्त्री आणि ग . त्र्यं . माडखोलकर

एक मोठी अद्भूत म्हणावी अशी घटना यशवंत बाळाजी शास्त्री यांनी कथन केली आहे . शेवटचे मोगल सम्राट आणि गझलकार बहाद्दूर शहा जफर यांची अजरामर ‘ना मैं किसी की ऑख का नूर हूँ , न किसी के दिल का करार हूँ ’ ही गझल यशवंत बाळाजी शास्त्री यांच्या हाती कशी पडली आणि पुढे अमीनाबाई यांनी ती गाऊन प्रसिद्धीचे ‘चार चाँद’ कसे झळकावले ही सविस्तर हकिकत    ( पृष्ठ ७६ ) मुळातूनच वाचण्यासारखी आहे .

आणखी एक मोठी खळबळजनक घटना यशवंत बाळाजी शास्त्री यांनी कथन केली आहे आणि ती आहे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर झालेल्या हल्ल्याची . ( या घटनेविषयी नागपुरातील ज्येष्ठ  संपादक-पत्रकारांनी आम्हाला अनेकदा सांगितलं आहे पण प्रत्येकाच्या सांगण्यात तपशील वेगळे असत . नेमकी घटना या पुस्तकात आहे . ) १२ मार्च १९५५ रोजी नागपुरात ही घटना घडली होती . भारत सेवक समाजाच्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरु नागपूरला आले होते . विमानतळावरुन पंडित नेहरु राजभवनाकडे जात असतांना जेल रोडवर रहाटे  कॉलनीनजीक बाबुराव कोचरे या इसमाने पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला . पोलिसांनी त्याला लगेच पकडले . ही घटना अर्थातच खळबळजनक तसंच आंतरराष्ट्रीय महत्त्व असणारी होती  . पंतप्रधानांच्या दौऱ्याचं वृत्तसंकलन करण्यासाठी त्यांच्या ताफ्यातील एका मंत्र्याच्या कारमधे तेव्हा असलेले यशवंत बाळाजी शास्त्री या घटनेचे एक पत्रकार म्हणून हे एकमेव साक्षीदार होते . नागपूर आणि परिसराची संदेश वहन यंत्रणा खंडित होण्याच्या आत यशवंत बाळाजी शास्त्री यांनी ती बातमी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी ‘ब्रेक’ केली हे सर्व  तपशील असलेली ती  हकीकत केवळ पत्रकारांनीच नाही तर सर्वांनीच ‘जर्नालिस्टिक थ्रीलर’ म्हणून वाचण्यासारखी आहे . ( पृष्ठ १३९ )

महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे यांच्यासोबत घडलेल्या ‘जर्नालिस्टिक चकमकी’सह अशा अनेक आठवणींचा खजिना म्हणजे यशवंत बाळाजी शास्त्री हे पुस्तक आहे . अर्थात यशवंत बाळाजी शास्त्री यांच्या सर्वच मतांशी सहमत होता येत नाही हेही तेवढंच खरं . राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द  केल्याच्या कृतीवर टीका करणारा  माझा  ब्लॉग प्रकाशित झाला आणि ट्रोल्सनी  धुमाकूळ घातला . नेमक्या त्याचं काळात ‘यशवंत बाळाजी शास्त्री’ वाचतांना मला धैर्य आणि बळ मिळालं . पुस्तकं सच्चे सोबती कसे असतात यांचाच  प्रत्यय जणू या पुस्तकानं  दिला .

■■

हे पुस्तक कसं प्राप्त झालं याचीही एक गोष्ट  सांगायलाच हवी – अद्याप भेट न झालेले माझे एक वाचक मित्र आहेत . पृथ्वीराज चव्हाण हे त्यांचं नाव . ( माजी मुख्यमंत्री नव्हेत ! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही पुस्तकांत रमणारे खूप चांगले वाचक राजकारणी आहेत . )  हे पृथ्वीराज चव्हाण मुळचे साताऱ्याचे  आणि आता पुण्याला स्थायिक आहेत . शिक्षणानं  अभियंता तसंच  व्यवस्थापन  शास्त्राचे पदवीधारक म्हणजे उच्च विद्याविभूषित आणि  एका खाजगी उद्योगात उच्चपदस्थ आहेत . त्यांच्या घराण्याची नाळ सत्यशोधक चळवळीशी  जुळलेली असल्याची परंपरा आहेत . त्यांचे पणजोबा नारायणराव चव्हाण या चळवळीचे एक नेते होते त्यांनी सातारा जिल्ह्यातील वाईचं नगराध्यक्षपदही भूषवलं      आहे .  वडील शिक्षक होते . पृथ्वीराज यांच्यावर वाचनाचा संस्कार त्यांच्या आई-वडिलांकडून झाला . त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून म्हणजे १९८८-८९ पासून ते माझ्या लेखनाचे वाचक आहेत . अधून-मधून आम्ही फोनवर संपर्कात असतो .  

यशवंत बाळाजी शास्त्री’ हे पुस्तक प्रकाशित करणारी प्रेस्टिज पब्लिकेशन्स ही सर्जेराव घोरपडे यांनी सुरु केलेली एकेकाळची आघाडीची पुण्याची प्रकाशन संस्था . डॉ . राम मनोहर लोहिया यांच्या लेखनाचे अनुवाद गोविंदराव तळवलकर यांची अशी असंख्य महत्वाची पुस्तकं प्रेस्टीजनं अतिशय देखण्या स्वरुपात  प्रकाशित केलेली आहेत .  आता ही प्रकाशन संस्था बंद झाली आहे . प्रेस्टिज पब्लिकेशन्सची कांही पुस्तके पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाती लागली ; ‘यशवंत बाळाजी शास्त्री’ हे एक . हे पुस्तक वाचल्यावर त्यांना माझी आठवण झाली , ‘यशवंत बाळाजी शास्त्री’ हे पुस्तक भेट म्हणून पाठवतांना पृथ्वीराज  चव्हाण यांनी म्हटलं आहे , ‘My pleasure to send autobiography of a journalist to a journalist whom I like and respect .’

अशी पुस्तकं पाठवणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे ग्रंथप्रेमी  मित्र सगळ्यांना लाभोत . कुणाला जर ‘यशवंत बाळाजी शास्त्री’ हे पुस्तक हवे असेल तर त्यानं पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी ९८६०५१०००१ या सेलफोनवर सकाळी १० ते सायंकाळी ६ ही कार्यालयीन वेळ  वगळून  संपर्क साधावा .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleअखंड भारताचे स्वप्न : एक दिवास्वप्न
Next articleफिलॉसॉफर किंग
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.