कचकड्याच्या दुनियेतील स्वप्नभंगाचे बळी

”मी तुझ्यावर जिवापाड प्रेम केले. त्याचे फळ मला काय मिळाले…तुझ्यावर प्रेम करण्याचे फळ म्हणून मला शिव्या, अत्याचार, रेप आणि अवहेलना मिळाली. तरीही मी हे सर्व सहन केले, कारण मी तुझ्यावर खरं प्रेम केले होते. पण मला तू काय दिले…दुरावा, धोका आणि अवहेलना. जिथे तुझे विश्‍व पाटर्य़ा आणि सुंदर मुलींच्या मिठीपर्यंत र्मयादित होते, तिथे माझे माझ्या कामावर प्रेम होते. माझ्या आयुष्यात केवळ तूच होता आणि माझे करिअर…पण आता मला असे जगायचे नाही. मी आता माझ्या दहा वर्षांच्या करिअरला अलविदा करून जगाचा निरोप घेत आहे. तू हे सर्व वाचत असशील त्या वेळी मी खूप दूर गेलेली असेल….”

हे शब्द आहेत अभिनेत्री जिया खानच्या सुसाईड नोटमधील. आत्महत्या करण्यापूर्वी आपला प्रियकर सूरज पांचोलीला (आदित्य पांचोली आणि झरीना वहाब यांचा मुलगा) लिहिलेल्या शेवटच्या पत्रातील हा मजकूर आहे. आपल्या पहिल्याच ‘नि:शब्द’ या चित्रपटात सुपरस्टार अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे सिनेरसिकांच्या चांगल्याच स्मरणात राहिलेल्या जिया खानच्या आत्महत्येने सिनेसृष्टीतील मान्यवरांसह सारेच हळहळले. न्यूयार्कमध्ये जन्मलेली आणि अमेरिका व ब्रिटनचं नागरिकत्व असलेली जिया ही केवळ अभिनेत्रीच नव्हती, तर उत्तम मॉडेल आणि ऑपेरा गायिकाही होती. तिच्या आत्महत्येने चित्रपटसृष्टीतील नातेसंबंध कसे भुसभुशीत पायावर उभे असतात, आणि त्यात कुठलीही कमिटमेंट कशी नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जीव झोकून प्रेम करणं याला सिनेइंडस्ट्रीत वेडेपणा समजला जातो. प्रेमाची उत्कटता येथे फक्त पडद्यावरच पाहायला मिळते. पडद्यामागे सारा व्यवहार शरीराचाच असतो. भूतकाळात डोकावलं, तर याची असंख्य उदाहरणं पाहावयास मिळतात. मीनाकुमारीपासून मधुबालापर्यंत आणि नर्गिसपासून रेखापर्यंत बहुतेकांच्या वाट्याला येथे प्रेमात निराशाच आली आहे. अर्थात गुरुदत्त, संजीवकुमार, जितेंद्र अशा काही अभिनेत्यांनाही प्रेमाच्या प्रांतात चोट खावी लागली आहे. ज्यांनी हा अनुभव पॉझिटिव्हली स्वीकारला, ते सावरलेत. मात्र बहुतांश प्रेमवीर दारूच्या आहारी जाऊन मृत्यूच्या स्वाधीन झाले किंवा त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला.

जियाचं मृत्युपूर्वी लिहिलेलं सहा पानी पत्र वाचलं, तर ती सूरजच्या बेवफाईमुळे प्रचंड दुखावली होती, हे लक्षात येते. सूरजकडून ती गर्भवती राहिली होती. त्याच्या इच्छेखातर तिने गर्भपातही केला होता. असे असतानाही तो लग्न करण्यास सतत टाळाटाळ करीत होता, ही गोष्ट तिला खूप जिव्हारी लागली होती. तिच्या पत्रात ती लिहिते, ”मी माझी सारी स्वप्नं तुझ्याभोवती रंगविली होती. मात्र तू ती सगळी तोडलीस. मी तुझ्यावर जिवापाड प्रेम करत राहिले. पण तू हसत राहिला. मला तुझ्याकडून केवळ प्रेम हवे होते. पण तू तो आनंदही मला दिला नाहीस. आता काहीच शिल्लक उरले नाही. तूच नाही, तर बाकी सगळे निर्थक आहे. आता मला झोपायचे आहे…कधीही जागे न होण्यासाठी.” जियाच्या या पत्रातून एक गोष्ट आवर्जून लक्षात येते की, सहा वर्षांपासून चित्रपटसृष्टीत राहूनही ती खूप संवेदनशील होती. त्या नाटकी दुनियेतही तिचा प्रेमाच्या कल्पनेवर विश्‍वास होता. जेव्हा त्याला तडा बसला तेव्हा तिने मरण जवळ केलं. असाच काहीसा प्रकार दिव्या भारती या अतिशय देखण्या नटीबाबत १९९३ मध्ये घडला होता. ‘दीवाना’, ‘दिल आशना है’, ‘गीत’, ‘रंग’, ‘शोला और शबनम’ या चित्रपटांमुळे सुपरस्टार होण्याच्या मार्गावर असलेल्या दिव्याने अवघ्या १८ व्या वर्षी निर्माता साजिद नाडियादवालासोबत लग्न केले. मात्र तिच्या प्रेमाचा रंग एक वर्षही टिकला नाही. ५ एप्रिल १९९३ ला वर्सोव्याच्या तुलसी अर्पाटमेंटमधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमधील बालकनीतून खाली उडी घेऊन तिने आत्महत्या केली होती. त्या काळात प्रचंड खळबळ माजलेल्या या प्रकरणात संशयाची सुई तिच्या नवर्‍याकडेच होती. मात्र या प्रकरणातील सत्य शेवटपर्यंत बाहेर आलं नाही. दुबईतील दाऊद गँगने तिची मागणी केली आणि तिचा नवरा त्यासाठी तिच्यावर दबाब आणत होता, अशी कुजबुज त्या वेळी होती. दिव्याने यासाठी ठाम नकार दिला होता. मात्र दबाव वाढल्याने तिने स्वत:ला संपविलं, असं मुंबईतील अनुभवी सिनेपत्रकार सांगतात. या प्रकरणाचा तपास पाच वर्षे चालला. शेवटी पुरावे मिळत नाही, म्हणून ती फाईल १९९८ मध्ये बंद करण्यात आली.

अशीच गाजलेली आत्महत्या परवीन बॉबीची होती. ‘दीवार’, ‘नमक हलाल’, ‘अमर अकबर अँन्थोनी’ अशा एकापेक्षा एक हिट चित्रपटाची नायिका असलेली १९९0 च्या दशकातील ही नामांकित अभिनेत्री आयुष्यभर सच्च्या साथीदाराच्या शोधात होती. महेश भट्ट, कबीर बेदी, डॅनी डेंझोप्पा यांच्यासोबत उघडपणे तिची प्रेमप्रकरणं चालली. अमिताभ बच्चनसोबतही काही काळ तिचं अफेअर असल्याचं सांगितलं जातं. मात्र यापैकी कोणताही पुरुष आयुष्यभराची साथ द्यायला तयार नाही, याची तिला खंत होती. मन:शांतीच्या शोधात ती अनेक वर्षे तत्त्ववेत्ते यू. जी. कृष्णमूर्ती यांच्यासोबत कॅलिफोर्नियात होती. मात्र तिला शांतता काही मिळाली नाही. शेवटी निराशावस्थेतच ती १९८९ मध्ये भारतात परत आली. येथे ती आली ती मानसिक रुग्ण बनूनच. तिला ‘पॅरानाईड स्क्रिझोफेनिया’ हा मानसिक रोग झाल्याचं सांगितलं जात होतं. या आजारात कोणीतरी आपला जीव घ्यायला निघालं आहे, असा माणसाला कायम भ्रम होत असतो. त्या अवस्थेत तिने अमिताभपासून बिल क्लिंटनपर्यंत, तर अमेरिका, ब्रिटन सरकारपासून वेगवेगळ्या गुप्तचर संस्था आपल्या जिवावर उठल्या आहेत, असे आरोप केले होते. कोर्टात तिने तशी याचिकाही दाखल केली होती. मात्र पुराव्याअभावी कोर्टाने ती फेटाळली होती. त्या तशा अवस्थेतच २२ जानेवारी २00५ ला ती तिच्या मुंबईच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली. जवळपास तीन दिवसपर्यंत ती तशा अवस्थेत असावी, असे पोलीस तपासात लक्षात आले होते. तिने निराशेतून आत्महत्या केली, असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र तीन दिवसपर्यंत काहीही न खाल्ल्याने उपासमारीने तिचा मृत्यू झाला, असा वैद्यकीय अहवाल होता. मात्र तिचा मृत्यूही रहस्यमयच होता.

‘सेक्स अँटमबॉम्ब’ म्हणून प्रचंड गाजलेली दक्षिणेतील मादक अभिनेत्री सिल्क स्मिता हिनेसुद्धा आत्महत्या करूनच आपली जीवनयात्रा संपविली होती. ‘सदमा’, ‘जीत हमारी’, ‘जानी दोस्त’ या हिंदी चित्रपटांसह जवळपास ४५0 दाक्षिणात्य चित्रपटांत तिने काम केले होते. मात्र ग्लॅमर ओसरल्यानंतर चित्रपट मिळणे कमी झाल्यानंतर तिला आर्थिक तंगी आणि निराशेने घेरले. दक्षिणेतील नामांकित अभिनेत्याने शरीर वापरून पाठ फिरविल्याने ती मनातून चांगलीच खचली होती. शेवटी ती दारूच्या आहारी गेली. त्या अवस्थेतच २३ सप्टेंबर १९९६ ला विष घेऊन तिने आत्महत्या केली. तिच्या जीवनावरचा ‘डर्टी पिक्चर’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रचंड गाजला होता. पुरुष अभिनेत्यामध्ये गुरुदत्तची आत्महत्या खूप गाजली होती. दारूच्या नशेत झोपेच्या गोळ्यांचा मोठा डोस घेऊन त्याने स्वत:ला संपविले होते. वहिदा रहमानसोबतचा प्रेमभंग आणि पत्नी गीता दत्तचा अबोला यामुळे निराश होऊन त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. हे सारे प्रसिद्ध कलावंत असल्याने यांच्या आत्महत्याही प्रचंड गाजल्या. मात्र सिनेइंडस्ट्रीत दरवर्षी किमान तीन-चार नवीन चेहरे निराशावस्थेत मृत्यूला जवळ करतात. यामध्ये महिला कलावंताचं प्रमाण अधिक असते.

मनोविकारतज्ज्ञ या आत्महत्यांचं नेमकं विश्लेषण करतात. नामांकित  नट- नटी व्हायला निघालेली ही मुलं-मुली सिनेइंडस्ट्रीत येतात, तेव्हा जेमतेम १८ ते २0 या वयोगटात असतात. या वयात शिक्षण अर्धवट झालं असतं. वाचनाचा दूरपर्यंत संबंध नसतो. जगाचा व माणसांचा कुठलाही अनुभव नसतो. अशा अवस्थेत चित्रपटातील कारकीर्द सुरू होते. काही जणी एका रात्रीत स्टार होतात. कालपर्यंत सामान्य असलेल्या या मुला-मुलींच्या पायाशी यश, पैसा, ग्लॅमर व प्रचंड प्रसिद्धी येते. रक्ताने पत्र लिहिणारे चाहते यांना भेटतात. हे सगळं पचविण्याची ताकद मात्र त्यांच्यात नसते. या काळात पडद्यावर ते जसं चकचकीत आयुष्य जगतात, तसंच आयुष्य प्रत्यक्ष जीवनातही जगत असतात. यशाची सोबत असल्याने सभोवतालची माणसं तेव्हा कुठल्या हेतूने जवळ आली आहेत, हे त्यांना कळत नाही. मात्र यशाची लाट ओसरायला सुरुवात झाली की, पैसा, ग्लॅमर, चाहते सारेच दूर जाण्याचा अनुभव त्यांच्यासाठी अपेक्षेपलीकडचा असतो. त्यातून बहुतांश स्टार कोसळतात. त्यात ज्याला आपलं वा आपली समजतो तो आपला नाही, त्याला आपला पैसा, ग्लॅमर व शरीरातच रस होता, हे समजताच मुळापासून उखडल्याची भावना होते आणि अखेर कचकड्याच्या दुनियेतील स्वप्नभंगाचे ते बळी ठरतात.

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे

कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Previous articleभारतीयांना नवजीवन बहाल करणारा मान्सून
Next articleमहात्मा गांधींची अनोखी प्रेमकहाणी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here