करोनाशी आमने-सामने…An Encounter with Corona

– आशुतोष शेवाळकर

गेले काही दिवस माझ्या ऑफिसमधले सात-आठ सहकारी पॉझिटिव्ह. त्यातला व्यवसायाच्या सुरुवातीपासून माझ्याशी जुळलेला असलेला एक गेला. दुसरा माझा उजवा हात असलेला एक हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची झुंज देतो आहे, घरी काम करणारी तीन लोकं पॉझिटिव्ह, माझी मुलगी व आई सुद्धा पॉझिटिव्ह, अशी सगळी परिस्थिती व प्रचंड शारीरिक, मानसिक, बौद्धिक धावपळ आणि ताण असं सुरू आहे.

त्यातच मग दिवसभरात ओळखीच्या लोकांचे फोन. ‘कुठल्या तरी हॉस्पिटलला बेड मिळेल का’?’ किंवा व्हेंटीलेटर वा रेमडेसिविर साठीची आर्जवं. यावर आपले प्रयत्न, त्यात अपयश या सगळ्याचा एक हताश असहायपणा याची भर. मध्येच  मोबाइलमधे एखादा नंबर कॉल आला तर कुणाची तरी काही इमरजन्सी असावी म्हणून तो उचलावा तर त्यात टेप वाजणे ‘‘आपके बाद आपके फॅमिली का क्या होगा ये आपने कभी सोचा है..??? एक करोड का टर्म इन्शुरेंस’’ वगैरे अशी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारी कुठल्यातरी इन्शुरन्स कंपनीची व्यापारी जाहिरात व त्याचं प्रचंड ‘इरीटेशन’ येणे, हे पण सुरू. अशा  सगळ्यातून थोडी उसंत मिळालेल्या काही वेळात मी हा मजकूर लिहितो आहे.

या सगळ्या दिवसांमधे या सर्व अनुभवातून जाताना, मला समजलेल्या, सापडलेल्या काही गोष्टींमध्ये काही तथ्यांश असेल तर त्याचा फायदा आता याच सगळ्यातून जात असलेल्या इतर काही लोकांना व्हावा एवढंच हे सगळं घाईनी लिहिण्यामागचा उद्देश आहे.

1) फॅबी-फ्लू आणि रेमडेसिविर

कोरोनावर काहीही औषध अजून सापडलेलं नाही आहे, असं सगळंच जग, सगळेच डॉक्टर्स सांगत आहेत. स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) च्या व्यतिरिक्त वाफ व गार्गल्स  हीच हे इन्फेक्शन मारण्याची हत्यारं आपल्या जवळ आहेत.

फॅबी-फ्लू हे ‘सार्स-२’ वरचे व रेमडेसीवीर हे ‘इबोला’ व्हायरस वरचे औषध आहे. मागच्या वर्षी जसे करोनाच्या रुग्णाला क्लोरोक्वीन हे मलेरियावरचे औषध देऊन पाहिले जात होते, तशी यावर्षी ही  दोन औषधं देऊन पाहिली जात आहेत. क्लोरोक्वीन व  आयव्हरमॅक्टिन एकत्र दिल्यामुळे परदेशात काही लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर क्लोरोक्वीन कोविड च्या ट्रीटमेंट मधून बाद करण्यात आलं. रेमडेसीवीर हे औषध सुद्धा आता ‘युरोपियन करोना प्रोटोकॉल’ मधून बाद करण्यात आलं आहे आणि भारतात फक्त 2(E) या कॅटेगरीच्या वरच्या  रुग्णांनाच ते औषध दिलं जावं असे निर्देश ‘आयसीएमआर’नी काढले आहेत. महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी पण इलेक्ट्रोनिक मीडिया वर याविषयी सविस्तर मुलाखत दिलेली आहे. करोनावर काही औषधच अजून सापडलेलं नसल्याने जे काही उपलब्ध आहे ते देऊन पाहा अशी ‘ट्रायल अँड एरर’ पॉलिसी आधुनिक वैद्यकीय शास्त्राला सध्या असहाय्यतेपोटी करावी लागत आहे.

        रेमडेसिविर हे ‘हायली टॉकसीक’ औषध असल्यानी त्याचा किडनीवर व लिव्हरवर वाईट परिणाम होऊ शकतो. काही   रुग्ण यात ‘टॉक्सिक शॉक’नी ताबडतोब मरू पण शकतात. त्यामुळे लिव्हर आणि किडनीच्या योग्य त्या चाचण्या केल्या शिवाय हे औषध खरं तर देण्यात येऊ नये. पण अनेक छोट्या मोठ्या हॉस्पिटल्समधून वा छोट्या गावांमधून वा रुग्णाच्या आप्तांच्या आग्रहामुळे हे औषध अशा चाचण्याविनाही कुठे कुठे दिले जाते आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून काही मृत्यू रेमडेसिविरमुळे पण झालेले असावेत, पण ते करोनाच्या नावानीच नोंदल्या गेले आहेत. करोनाच्या मृत्यूचे पोस्ट- मार्टेम करणे सध्या शक्यही नाही व तसा नियमही नाही. अन्यथा त्यातून अनेक इतर सत्य बाहेर येतील. ‘इबोला’ हा विषाणूच जगातून जवळपास संपुष्टात आल्याने या औषधांचा जमलेला साठा हा खरे तर या फार्मासुटीकल कंपन्यांसाठी प्रॉब्लेम होता. पण करोनामुळे त्यांचे नशीब आता फळफळले आहे किंवा जगाच्या आरोग्य संघटनांच्या नेटवर्किंगमधून त्यांनी ते  फळफळवून घेतलं आहे.

 या शिवाय वैद्यकीय शास्त्राच्या या ‘नोबल प्रॉफेशन’ मधे काही टक्के लोकांच्या व्यापारी वृत्तीनेही सध्याच्या परिस्थितीतडोकं वर काढलेलं आहे. त्यामुळे रुग्णाच्या आप्तांच्या चेहेऱ्यावरील भाव आणि खिशाची जाडी याप्रमाणे औषध योजना केली जाते आहे. त्यात मग ४०-४० हजारांचं एक अशी काही इंजेक्शन्स  पण आलीत.

आता २ कोटी कॅपिटेशन फी देऊन वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या नवीन पिढीला आपण कुठल्या तोंडानी त्यांनी ‘नोबल प्रॉफेशन’ करावं असं सांगू शकतो? या दैवी व्यवसायाला भ्रष्ट करण्याची सुरुवात आपण तिथूनच केलेली आहे. आधीच्या सारखे ऋषीतुल्य डॉक्टर्स निर्माण होणं आता हल्ली सध्याच्या काळात दुरापास्त होत चाललं आहे. त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय एक ‘नोबल प्रोफेशन’ आहे ही हळुहळू आता एक दंतकथा होत चालली आहे.

याशिवाय फक्त स्टेथोस्कोप, बी.पी. ॲपरेटस् आणि एक कंपाऊंडर घेऊन बसण्याच्या आधीच्या जमान्यात वैद्यकीय शास्त्राला  ‘नोबल प्रोफेशन’ म्हणून जगणं शक्य पण होते. पण कोट्यवधी रुपये लावून दवाखाना, महागडी उपकरणे, मशीनरी, व त्यांचं दर महिन्याला कोट्यवधी रुपये व्याज भरणाऱ्या हॉस्पिटल्सना धंद्यासारखी व्यापारी वृत्ती ठेवणं  मजबुरीने हळू हळू भागच होत जातं.

२)  माझा स्वतःचा याबाबतीतला अनुभव आणि अनुमान

माझ्या ऑफिस मधल्या सगळ्या सहकार्‍यांना त्यांच्या त्यांच्या डॉक्टरांनी आधी फॅबी-फ्लू दिले. त्या ९-५ – ४-३ अशा गोळ्या खाऊन त्यांचा थकवा प्रचंड वाढला व सिटी स्कोअर ६ चा ९ किंवा १२ वर गेला. यातल्या दोन सहकाऱ्यांना मग हॉस्पिटलला अॅडमीट करून रेमडेसीवीर दिलं गेले. त्यानंतर त्यांची तब्येत अजून खालावली आणि त्यातला एक गेला व दुसरा मृत्यूशी झुंज देतो आहे. रेमडेसीवीर घेऊनही त्यांच्या फुफ्फुसांतले इन्फेक्शन दिवसागणिक वाढतच गेले.

ही सगळी परिस्थिती आधीच झेलत असताना माझ्या घरचे ५ लोकं जेव्हा पॉझीटिव्ह आलेत तेव्हा त्यांना कोणती ट्रीटमेंट द्यावी, हॉस्पिटलला अॅडमिट करावे की नाही? या प्रश्नांनी  पहिल्या दोन दिवसांत माझ्या मनाची प्रचंड घालमेल, तडफड झाली.  कुठल्याही बाजूने निर्णय घेतला तरी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती.  आणि ताबडतोब काही निर्णय घेणं पण भाग होतं. अशा वेळेस मनाची जी तळमळीची द्विधा मनःस्थिती होते तिचं मी शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि त्यात ज्याविषयी निर्णय घ्यायचा आहे त्या क्षेत्राचं आपल्याला ज्ञान नाही, याला त्याला विचारून उधार उसनवारीच्या ज्ञानावर अवलंबून राहून हा निर्णय घ्यायचा असतो. मनाची कठोर परीक्षा घेणारा असा हा काळ होता.

शेवटी प्रचंड घालमेलीनंतर मी आतल्या आवाजाच्या मदतीने आपल्या घरच्या लोकांना ही औषधं द्यायची नाहीत व त्यांना हॉस्पिटलमधे अॅडमिटही करायचं नाही असा निर्णय घेतला. माझे डॉक्टर मित्र प्लॅटिना हॉस्पिटलचे डॉ.मुंधडा व अकोल्याचा डॉ.विवेक देशपांडे यांच्या मदतीने आणि नागपूरचे ऋषीतुल्य डॉक्टर उदय माहोरकर व  त्यांचा मुलगा डॉक्टर विराग यांच्या सल्द्यानी घरीच उपचार सुरू केलेत. ‘ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर’ भाड्याने मिळतो. काही इमरर्जन्सी आल्यास म्हणून तो ही घरी आणून ठेवला.

‘व्हायरल इन्फेक्शन’शी झगडताना आपल्या शरीराच्या लिंफोसाईटस् कमी होतात व म्हणून अशा परिस्थितीत ‘सेकंडरी बॅक्टेरीयल इन्फेक्शन’ होऊ शकतं म्हणून एजीथ्रोमायसीन हे  अॅंटीबायोटिक, आयव्हरमॅक्टिन हे जंतांसाठी असलेले औषध ‘व्हायरसच्या रिप्लीकेशन’ला बऱ्याच प्रमाणात थोपवतं असा ‘स्टडी’ असल्यामुळे ते व व्हीटामीन सी, बी, डी आणि झिंक यांच्या गोळ्या ही कोविडची ‘बेसिक ट्रीटमेंट’ मी या सगळ्या डॉक्टर मंडळींच्या सल्ल्याने घरच्या सगळयांना सुरू केली. ही सगळी लोकं आता बरं  होण्याच्या मार्गावर आहेत. माझ्या ऑफिसच्या दुसऱ्या एका सहकाऱ्याला मी त्याचं मन वळवून हॉस्पिटलच्या दारातून परत आणण्यात यशस्वी झालो. त्याला पण हीच ट्रीटमेंट सुरू केली व सीटी स्कोअर वर गेलेला तो पण आता बरा होण्याच्या मार्गावर आहे.

पांढराबोडीच्या झोपडपट्टीमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर सुनील गोलर या मित्रानी या काळात 70 रुग्णांना हीच ‘बेसिक ट्रीटमेंट’ दिली. त्यातला एक दगावला, बाकी ६९ रुग्ण बरे झालेत. सध्या होणाऱ्या मृत्यूचं मध्यमवर्गीयांच्या वर आणि गरीब यांची टक्केवारी असं एक सर्वेक्षण सुद्धा खरं म्हणजे ताबडतोब करून घेतलं पाहिजे. गरिबांमधे मृत्यू दर कमी असेल तर त्यांना न मिळणारी ही औषधं हे त्याचं एक मोठं कारण असू शकतं. स्मशानातल्या नोंदीवरून (गरीब-श्रीमंत सगळे शेवटी सरसकट तिथेच जातात) घरी झालेले मृत्यू आणि हॉस्पिटल्समधले मृत्यू असं ही एक सर्वेक्षण सहज होऊ शकतं. स्मशानांच्या नोंद रजिस्टर मध्ये रोग, ठिकाण हे सगळेच रकाने असतात. स्मशानतल्या कोविड मृत्यूंची एका दिवसाची नोंद २८८ आणि त्या दिवशीच्या कोविड मृत्यूंचा महानगरपालिकेनी जाहीर केलेला आकडा ८९ अशी  ‘शोध-पत्रकारिता’ करून नागपूरच्या एका वृत्तपत्रानी नुकतच सविस्तर वृत्त छापलं आहे.

या सगळ्या अनुभवातून गेल्यावर माझं स्वतःचं याबाबतीतलं अनुमान असं आहे. फॅबी-फ्लू, रेमडेसीवीर ही औषधे करोनाच्या जंतूच्या बाबतीत काम करत नाहीत हे तर डॉक्टर लोक स्वतःच सांगतात. मग कदाचित कोरोनाशी झगडणाऱ्या आपल्या शरीराला ही जड औषध देऊन आपण आणखी थकवत असू किंवा या औषधातच गुंतवून ठेवल्यामुळे कोरोनाशी लढण्याची आपली प्रतिकार शक्ती तेवढ्या अंशी कमी होत असेल व करोनाचा प्रादुर्भाव तेवढा मग वाढत जात असेल किंवा कदाचित ही औषधे आपल्या शरीरानी तयार केलेल्या कोरोनाशी लढणाऱ्या अँटीबॉडीजनाच मारत असतील व म्हणून कोरोनाचं इन्फेक्शन ही औषधं घेतल्यावर आणखी वाढत जात असेल, या दोन्ही शक्यता याबाबतीत विचारात घेतल्या पाहिजेत.

कुठल्याही रोगाचं ‘बॅक्टेरियल इन्फेक्शन’ झालं की जेव्हा आपण कुठलंही अँटि-बायोटिक घेतो तेव्हा त्या बॅक्टेरियाच्या जंतू सोबतच आपल्या शरीरातले अनेक उपयुक्त जंतू पण मरत असतात. यात आपल्या शरीराने तो पर्यंत तयार केलेल्या इतर रोगांच्या अँटीबॉडीज पण मरत असतात व त्यामुळे अँटि-बायोटिकचा कोर्स कुठल्याही कारणानी घ्यावा लागल्यावर  त्यानंतरच्या सहा-आठ महिन्यात आपण पुन्हा दुसऱ्या कुठल्या इन्फेक्शननी  आजारी पडतो, असा बऱ्याचदा अनुभव येत असतो हे इथे लक्षात घेतलं पाहिजे.

३) स्टिरॉइड

स्टिरॉइडनी व्हायरल इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते हे नक्कीच खरं आहे. पण स्टिरॉइडनी शरीरातलं बॅक्टेरीयल इन्फेक्शन वाढण्याची पण 50 टक्के शक्यता असते. शिवाय स्टिरॉइड घेतल्यानी आपल्या शरीरातली ‘शुगर लेव्हल’ पण वाढत असते व ‘शुगर लेव्हल’ वाढल्यानी पण इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हे स्टिरॉइड देण्याची रोगाच्या स्टेज मधली एक निश्चित वेळ असते व त्याच प्रमाणे त्याचा तसा डोस ठरवणं हे पण एक महत्वाचं काम असतं. ही गोष्ट अनुभवी व परिपक्व डॉक्टरच करू शकतात. त्यामुळे स्टिरॉइड सुरू करण्याचा निर्णय अशा योग्य डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कधीच घेऊ नये. माझ्या सध्या मृत्यूशी झुंज देत असलेल्या ३६ वर्षाच्या सहकाऱ्याला सुद्धा ताप उतरत नाही म्हणून एका खासगी डॉक्टरने संध्याकाळी स्टिरॉइडचे इंजेक्शन दिल्यावर एका रात्रीत त्याचं इन्फेक्शन इतकं वाढलं की दुसऱ्या दिवशी त्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास व्हायला सुरुवात होऊन त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलेलं आहे. व आता तर त्याला ‘एअर अॅम्ब्युलन्स’ नी ‘लंग ट्रान्सप्लांट’ साठी हैद्राबादला हलविण्याची वेळ आलेली आहे. आज रात्रीत किंवा उद्या दुपारी ते होईल.

४) एचआर सीटी स्कोअर

‘सीटी स्कोअर’ हा सध्या खूप चलनात आलेला शब्द आहे. हा स्कोअर म्हणजे काय आहे हेसुद्धा त्यासाठी स्वतः अभ्यास करून समजून घेतलं पाहिजे.

या स्कोअर मधे ‘डाव्या फुफ्फुसाचे खालचा व वरचा असे दोन भाग व उजव्या फुफ्फुसाचे खालचा, वरचा व मधला असे तीन भाग गृहीत धरून फुफ्फुसाचे एकूण पाच भाग करण्यात आलेले आहेत. या भागांमध्ये ५ टक्के इन्फेक्शन ला 1 मार्क, 5 ते 25 टक्के ला 2 मार्क, 25 ते 50 टक्के ला 3 मार्क 50 ते 75  टक्के ला 4 मार्क व 75 टक्क्याच्या वर इन्फेक्शन असल्यास 5 मार्क असा पाच भागाचा मिळून हा 25 चा स्कोअर आहे.

त्यामुळे सगळ्या भागात 26 टक्के इन्फेक्शन झालं असलं तरी त्या रुग्णाचा स्कोअर 15 येतो व 49 टक्के इन्फेक्शन असलं तरी 15 च!! या स्कोअर वर इतक्या प्रचंड संखेच्या रुग्णांवर पुढच्या ट्रीटमेंटचे निर्णय घेतले जात असल्याने हा स्कोअर थोडा अजून ‘स्पेसिफिक’ करायला पाहिजे असं वाटतं. 10-10 टक्के इन्फेक्शन ला 1-1 मार्क या प्रमाणे हा स्कोअर 100 पैकी किती असा खरं तर करायला पाहिजे. कुठल्या तांत्रिक कारणामुळे असं करणं शक्य नसेल तर त्याची मला कल्पना नाही.

५) अमरावती, विदर्भ, बंगाल नवीन स्ट्रेन

आता करोनानी स्वतःच म्युटेशन करून नवीन स्ट्रेन आणला आहे व त्याची सुरुवात अमरावतीपासून झाली आहे असं बोललं जातं. या स्ट्रेननी माणसाची इम्युनिटीच प्रभावित होते, फुफ्फुसाव्यतिरिक्त हा स्ट्रेन माणसाच्या ‘इम्युनिटी’वरच हल्ला करतो व त्यामुळे रक्तात गुठळ्या तयार होऊन माणसं मरू शकतात असं म्हटलं जातं आहे. असं म्हटल्या जाण्यामागचे कारण म्हणजे या रुग्णांच्या रक्त तपासण्यांमध्ये D-Dimer, CRP, IL-6, Ferritin  या इम्युनिटीच्या ‘बायो-मार्कर्स’  चा आकडा वाढून येत असल्याचे दिसते आहे.

या गेल्या काही दिवसात घरच्या व ऑफिसच्या सहकाऱ्यांच्या व्यतिरिक्त ज्यांना मदत पाहिजे आहे अशा आपसातल्या पन्नास-साठ लोकांचे ब्लड रिपोर्टस मी अभ्यासले  आहेत. ज्यांच्या फुफ्फुसांमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे  व त्यात अगदी 6 असा कमी स्कोअर आहे त्याही रुग्णांच्या बाबतीत या ‘मार्कर्स’ च्या व्हॅल्युज वाढलेल्या दिसून येत आहेत. पण यापैकी कुणाच्याच रक्तात अजून तरी गुठळ्या तयार झाल्याचे निदर्शनास आलेलं नाही.

करोना जंतूचा आत शिरकाव झाल्यावर हा कुठल्याही रक्त  वाहिनीला इजा करू शकतो म्हणून तिथे पंक्चर दुरुस्त करण्यासारखी जी ‘क्लॉट’ तयार करण्याची आपल्या शरीराची नैसर्गिक ‘डिफेन्स सिस्टिम’ असते, ती यंत्रणा कार्यरत होऊन त्यामुळे या व्हॅल्युज वाढलेल्या येऊ शकतात, ही शक्यता पण याबाबतीत विचारात घेतली पाहिजे असं मला वाटतं.

६) अल्टरनेटिव्ह थेरेपीज

मी घरी उपचार करत असलेल्या 5 रुग्णांना व तसेच हॉस्पिटल मधे अॅडमिट न झालेल्या माझ्या सहकाऱ्यांना व तसंच आणखी काही ओळखीच्या रुग्णांना, आयुर्वेदात पीएचडी असलेले अत्यंत अभ्यासू डॉक्टर देवपुजारी यांचा सल्ला घेऊन न्यूमोनॉर्म, पी-५, खोखो, गिलोय गुग्गुळ व ज्वारमेट ही आयुर्वेदाची ५ औषधं दिवसातून तीनदा दिलीत. हे सगळेच रुग्ण सध्या बरे आहेत. हा त्यांच्या रोगप्रतिकारक शक्ति, वाफ घेण्याचा आणि गार्गल्स नियमित करण्याचा परिणाम असू शकतो किंवा या आयुर्वेदिक औषधांची पण त्यांना काही मदत झालेली असू शकते.

माझा स्वतःचा आयुर्वेदावर विश्वास आहे. इतर कुणाचा तो नसला तर त्यांनी तो ठेवावा असा माझा आग्रह नाही. पण ॲलोपॅथीमधे करोनासाठी काहीच औषध सध्या नसताना दुसरा काहीच ‘साइड इफेक्ट’ नसलेल्या आयुर्वेद, होमियोपॅथी, निसर्गोपचार अशा ‘अल्टरनेटिव्ह थेरपीज’ ची पण आपल्या स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीला जोड देण्यास काहीच हरकत नसावी असं मला वाटतं.

७) सरकार 

मागच्या वर्षीपासून आपल्याला सांगितल्या जात असलेली माहिती म्हणजे करोनाच्या संसर्गाचा 80 टक्के लोकांना काहीच त्रास होत नाही, 10 टक्के लोकांना सर्दी, खोकला, ताप वगैरे असा त्रास होऊन ते तीन-चार दिवसात बरे होतात, 10 टक्के लोकांना हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागतं व यातले 1½ टक्के लोकं मरतात ही आहे. करोनाचा प्रसार रोखणं शक्य होत नाही आहे व त्यासाठी त्याच्यावर उपचार करण्याच्या उपाययोजनांचीच तयारी ठेवणं आवश्यकच, हे पण मागच्या वर्षीपासूनच आपल्याला कळतं आहे.

130 कोटी जनतेच्या देशात 10 टक्के म्हणजे 13 कोटी लोकांना हॉस्पिटलायझेशनची गरज पडू शकते हे आपल्याला मागच्या वर्षीपासूनच माहीत आहे. यांना ऑक्सिजन किती लागू शकतो याचा अंदाज काढणंही सहज शक्य आहे. मग 1 वर्ष लोटून जाऊन, आता आलेल्या परिस्थितीसाठी सध्या आपली काहीच तयारी नाही असं का आहे ??

आपल्या जवळ एवढी हॉस्पिटलस् नाहीत हे आपल्याला तेव्हाच माहीत होतं. शाळा, कॉलेज, होस्टेल्स अशा लॉकडाऊन मधे जवळपास बंदच असलेल्या इमारतींमध्ये तात्पुरती हॉस्पिटल्स उभी करणे, खासगी क्षेत्रांना कोविड हॉस्पिटल्स उघडायला ‘फास्ट ट्रॅक अप्रुव्हल’, सबसिडी, टॅक्स मधे सूट अशा काही योजना आखणे,  मेडीकल, नर्सिंग, पॅरामेडिकलच्या अन्डर ग्रॅजुएट च्या विद्यार्थ्यांना कोविड ट्रेनिंग देऊन येऊ शकणाऱ्या आपत्तीत त्यांचाही उपयोग होऊ शकेल इतपत सुशिक्षित, सुसज्ज ठेवणे, अॅम्ब्युलेन्स साठी कर्ज, रोड टॅक्स माफी, छोट्या ऑक्सिजन प्रकल्पांसाठी ‘इन्सेटीव्हज्’ अशा उपाययोजना या गेल्या वर्षभरात का करण्यात आल्या नाहीत? आता तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखं आपण ऑक्सिजन तयार करण्याचे नवीन प्रकल्प जाहीर करत आहोत हे आधीच का करण्यात आलं नाही ??

सुरुवातीच्या काळात खासगी दवाखान्यात कोरोना रुग्णांना ट्रीटमेंट करण्यापासून मनाई करण्यात आली होती. नंतर त्यांना ती परवानगी देण्यात आली आणि आता तर करोनासाठी बेड ठेवणे त्यांना ‘कम्पल्सरी’ करण्यात आलेले आहेत. सुरुवातीला खासगी हॉस्पिटलना करोंनाच्या लढाईत सहभागी न करून घेण्यामागे सरकारचं काय तर्कशास्त्र होतं हे कोणी सांगू शकेल का?  सुरुवातीपासूनच या खासगी रुग्णालयांना विश्वासात घेतलं असतं तर या वर्षभरात त्यांची क्षमता अधिक वाढून आता आलेली परिस्थिती कितीतरी अंशी कमी झाली असती.

आता हॉस्पिटल मधे बेडस् नाहीत, ऑक्सिजन नाही, औषधं नाहीत, स्टाफ नाही. अशी परिस्थिती आल्यावर, ‘लोकं नियम पाळत नाहीत म्हणून अशी परिस्थिती आली’ असं लोकांच्याच डोक्यावर खापर फोडताना सरकार म्हणून आपण सततचे लॉक-डाऊन जाहीर करण्या व्यतिरिक्त गेल्या वर्षभरात काय केलं याचं आत्मपरीक्षण सगळ्याच सरकारांना करावसं वाटत नाही आहे  का…?

८) विलगीकरण, हॉस्पिटलायझेशन वगैरे

घरातल्या कुणाची RTPCR  टेस्ट पॉझिटिव्ह आल्याबरोबर बहुतांशी कुटुंबातले लोक स्वतःच घाबरून जाऊन त्या रुग्णाला अजून घाबरवतात. भीतीनी अर्धमेला झालेल्या रुग्णाचं मन खचून त्याची रोगप्रतिकारक शक्ती मग अजूनच कमी होत असेल. अशा वेळी जेवणाचं ताट त्या रुग्णाच्या खोलीत बंद दारातून आत  सरकवणे किंवा त्यांला सरळ रुग्णालयात भरती करून स्वतःच्या सुरक्षेचा सुटकेचा श्वास सोडणे असं काही करण्याकडे बहुतांशी लोकांचा कल असतो. हे अतिशय अमानुष आहे. मरणाच्या भीतीपोटी आपण आपली माणुसकी सोडू नये असं मला वाटतं.

 हॉस्पिटल मधे अॅडमिट नाही करायचं हा निर्णय घेतल्यावर मी माझ्या कडे काम करणाऱ्या तीनही माणसांना त्यांच्या घरून सामान आणायला लावून माझ्या घरातच एक-एक खोली  राहायला दिलेली आहे. ते तीन व माझ्या घरचे दोन अशा पाच लोकांची सुश्रुषा मी व माझी पत्नी मनीषा गेल्या काही दिवसांपासून करत आहोत. त्यांच्या खोलीत जाताना डबल मास्क घालणे, ब्लड प्रेशर, शुगर वा ऑक्सिजन घेताना त्यांच्या शरीराला आपला स्पर्श झाल्यास बाहेर आल्यावर साबणाने हात धुणे एवढीच काळजी आम्ही या बाबतीत घेत आहोत. पी.पी.ई. किट वगैरे आम्ही कधीच घातलेली नाही. ‘नुट्रोफील्स’ आणी ‘प्लेटलेट्स’ वाढणे, लिंफोसाईटस् कमी होणे ईओसिनोफेलिया  वाढणे, अशी इन्फेक्शनची सुरुवातीची लक्षणे सोडल्यास अजून तरी आम्हा दोघाना फारसा गंभीर संसर्ग झाल्याची लक्षणं आलेली नाहीत. आम्ही नियमितपणे आमच्या रक्ताच्या तपासण्या करून घेत आहोत. करोना बरोबरची आमची ‘लिव्ह इन रीलेशनशिप’ आता पर्यंत तरी व्यवस्थित चाललेली आहे.

बऱ्याच वर्षांपासून सवय तुटलेलं स्वतःची कामं स्वतः करण्याचं स्वावलंबन हे आम्हाला अजिबात त्रासाचे मुळीच गेलं  नाही, उलट सुखद अनुभव देणारं ठरलं आहे. हे स्वावलंबन व आप्तांची सेवा, सुश्रुषा हेच या आत्यंतिक  ताणाच्या दिवसांत ‘रिलीफ’ देणारं ठरतं आहे. भीतीने अर्धमेले झालेल्या लोकांमधे आपलं जाळं पसरवणं करोनाला आणखी सोपं जात असेल व त्यामुळे  दवाखान्यात भरती होऊन एकटं न पडता आपल्या माणसांचा सहवास मिळत राहिला तर त्या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास पण मदत होऊन त्याची करोनाविरुद्धची लढाई अधिक सोपी होत असेल.

९) करोनाचा जंतू

जितकी त्याच्या बाबत ‘हाइप’ केल्या गेली आहे तितका करोना हा काही कर्दनकाळ, राक्षसी जंतू नाही. ‘झपाट्यानी पसरणं’ हा अवगुण सोडला तर गेल्या 20 वर्षात आलेल्या फ्लूच्याच ५-६ इतर जंतुपेक्षा याचा ‘मृत्यू दर’ फारच कमी आहे, ही नशिबाची खूप मोठी बाब आहे. आपल्यापैकी ९० टक्के लोक त्याच्यावर लीलया विजय मिळवीतच आहेत व ८.५० टक्के लोक थोड्या कष्टाने का होईना पण शेवटी विजय मिळवीतच आहेत. आपलं उणपुरं १४ दिवसाचं लाभलेलं आयुष्य जगण्यासाठी परजीवी असल्यामुळे दुसऱ्याच्या शरीराचा आसरा शोधणे आणि या काळात जमेल तितकी आपली प्रजा वाढवणे या पलीकडे या जंतूचा दुसरा काही ‘डीसट्रक्टीव्ह अजेंडा’ अजून दिसलेला नाही आहे. ‘सर्व्हायव्हल इनस्टींक्ट’ व प्रजनन हा वनस्पतींपासून सगळ्याच जीवमात्रांमधे निसर्गत:च असतो तोच आणि तेवढाच ‘नॅचरल इनस्टींक्ट’ त्याच्यात आहे. त्यामुळे सीटी स्कोअर २५ येऊन ७५ टक्क्यांच्या वर फुफ्फुस निकामी होऊन व्हेंटीलेटरवर असलेल्या लोकांचाही १६ व्या दिवशी आरटीपीसीआर निगेटीव्ह येतो आहे व मग व्हेंटीलेटर ते बायो-कॅप ते साधं ऑक्सिजन असा परतीचा प्रवास करत तेही लोक बरे होतात आहेत.

‘जिओमेट्रिक प्रोग्रेशन’ नी करोनाचं ‘रिप्लीकेशन’ होतं असं  म्हणतात तर मग १४ व्या दिवशी त्यांनी ‘रिप्लीकेट’ केलेले जंतू शरीरात आणखी पुढे १४ दिवस का नाही राहात आहेत? त्याचा अर्थ मधमाशांमधे ‘राणी माशी’ एकच असते व तीच पोळं तयार करू शकते तसं करोनामधे काही ‘राणा करोना’ असत असावेत  व तेच फक्त आपलं कुटुंब वाढवू शकत असावेत, असं असेल कां? आणि म्हणून १४ व्या दिवशी त्यांच्या कुटुंबासहित त्यांचा अवतार समाप्त होत असेल का? आपल्या अॅंटीबॉडीजची संख्या त्या जंतूपेक्षा जास्त व्हायला १४ दिवसांचा कालावधी लागतो असाही एक कयास या बाबतीत बांधणं शक्य आहे. पण हे खरं असलं तर ज्याच्या त्याच्या रोगप्रतिकारक शक्ती-प्रमाणे हा काळ मग कमी जास्त यायला पाहिजे. सगळ्यांच्याच बाबतीत तो नेमका १४ दिवसांचाच कसा येऊ शकतो? त्या अर्थी या जंतूंचं नैसर्गिक आयुष्यच १४ दिवसांचं असेल या शक्यतेचा विचार करणच जास्त संयुक्तिक आहे.

असं असेल तर हा ‘ राणा  करोना’ आपल्या शरीरात शिरल्यावर त्याला तिथेच मारण्यात ८० टक्के लोक यशस्वी होत असावेत म्हणून त्यांना काहीच लक्षणं येत नाहीत, हा आत शिरतो तेव्हाच नेमकी ज्या लोकांची अपुरी झोप, रिकामं पोट अशी ईम्युनीटी ‘कॉम्प्रमाइज्ड’ असते त्या १० टक्के लोकांना सर्दी, खोकला ताप असा त्रास होत असावा, या पहिल्या ५-६ दिवसांत ज्यांनी हयगय केली किंवा ज्यांच्यावर अतिरेकी औषधांचा मारा झाला यांच्यापैकी काहींमधे  इन्फेक्शन वाढून त्यांना अॅडमिट करावं लागत असावं व यांच्यामधे ज्यांना ‘कोमॉरबीडिटीज’ असतील अशांचा तो दुसरा रोग उचल खाऊन (उदा. फुफ्फुस, किडनी, कॅन्सर इत्यादी) त्या त्यांच्या मूळ रोगानी ते 1½ टक्के लोक मग मरत असावेत, असही असू शकतं. फुफ्फुस करोनानी पूर्णपणे खाऊन टाकलीत म्हणून कुणीच मरत नाहीत आहे. उलट करोना ज्याच्या फुफ्फुसात ज्या भागात राहून गेला त्या सीटी स्कोअर ९, १२, २२ आलेल्यांचेही फुफ्फुसांचे ते भाग २-३ महिन्यात पूर्ववत काम करायला लागले आहेत, ही खूप ‘एनकरेजिंग’ बाब आहे. करोनानंतर ‘फायब्रोसिस’  होऊन फुफ्फुसांचा काही भाग कायम स्वरूपी निकामी होण्याच्या घटना अतिशय दुर्मिळ आहेत. या केसेस चा ‘केस टु केस’ अभ्यास केला पाहिजे. करोनानंतरची फिजिओथेरेपी व्यवस्थित न करणे अशीही  त्याची काही कारणं असू शकतात.

त्यामुळे करोना झाला म्हटल्यावर भीतीने अर्धमेले होऊन आपण स्वतःची अर्धी आत्महत्या करून घेऊ नये, हे माझं कळकळीचं सांगणं आहे. मानवाची इच्छाशक्ती, कर्तृत्वशक्ती व जिद्द प्रचंड आहे. त्याच्या समोर हा व्हायरस चिल्लर आहे. तरीही स्वार्थानी बरबटलेल्या सगळ्या व्यवस्थांमुळे ‘एक साला व्हायरस आदमीको हिजडा बना देता है’. अशी आपली सध्या स्थिति झाली आहे.

पुढच्या वर्षी आपण सध्या डेंग्यूला घाबरतो तितकंच कदाचित करोनाला घाबरू व आणखी १-२ वर्षात ‘हर्ड इम्युनिटी’ येऊन याला दर सीजन मधे सर्दी-खोकल्यासारखा अंगाखांद्यावर खेळवू शकू. त्याआधीच येत्या ६ महिन्यात अमेरिकेच्या फायझर कंपनीचं करोनावर औषध किंवा निरुपद्रवी केलेल्या करोना जंतुला सरळ रक्तात  प्रवेश देणाऱ्या सध्याच्या लशींऐवजी नाकात थेंब टाकण्याची ‘नेझल ड्रॉप्स’ चीन मधे आली आहे .तशी लस निघाली तर या संकटातून आपण त्या आधीही बाहेर पडू शकतो.

सध्याच्या कसोटीच्या परिस्थितीत जगताना आपलं मनोधैर्य हीच कामात येणारी सर्वात मोठी ताकद आहे व ते स्वतःच टिकवणं व इतरांचं वाढवत राहणं हे आपल्यापैकी प्रत्येकानी सतत करत राहायला पाहिजे, हे हात जोडून सांगतो.

हेही वाचा-कोरोना कनफ्यूजन: काही प्रश्न, काही तर्क-https://bit.ly/3e6mz19

  १०) सारांश

सध्याची ही भीषण परिस्थिती, करोनामुळे २५ टक्के तर ७५ टक्के सर्वपक्षीय नेतृत्वामधे द्रष्टेपणा तर सोडाच पण दूरदर्शीपणा सुद्धा नसणे, शासकीय यंत्रणांचा गलथानपणा, आरोग्य यंत्रणांची सध्याची ‘ट्रायल अँड एरर’ परिस्थिती, या क्षेत्रातल्या काही टक्के लोकांची बाजारू वृत्ती, अतिरेकी औषध योजना, फार्मासुटिकल कंपन्यांना विकल्या गेलेल्या जगातल्या आरोग्य संघटना, या कारणांमुळे उद्भवलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे.

1½ टक्के सांगितला जाणारा मृत्यू दर सध्याच्या भीषण परिस्थितीत नक्कीच वाढून ५-६ टक्के झालाच असेल. यातले 1½ टक्के मृत्यू करोनाचे आहेत व बाकी ४-५ टक्के हे या सगळ्या व्यवस्थांनी केलेले निर्घृण खून आहेत. प्रत्येक संवेदनशील मनावर या मृत्यूंचे आसूड उमटतात आहेत. यांच्या उद्वेगानी या सगळ्याच व्यवस्था उलथवणारी ‘संपूर्ण क्रांती’ आली तरच हे सगळे मृतात्मे हुतात्मे ठरतील.

येत्या काळात मरणाऱ्या ५-६ टक्के लोकांमधे माझाही नंबर लागू शकतो ही शक्यता नाकारण्याइतका मी मूर्ख नाही. आणि यदाकदाचित तसं काही झालं आणि पुढचं बोलायला मी नसलो तरी याबाबतीत माझं हेच मत राहील हे मला आज ठामपणे नोंदवून ठेवायचं आहे. आणि Last but not the least, मरणाच्या 1½ टक्के शक्यतेच्या भीतीपायी जगणं सोडणं किंवा  माणुसकी सोडणं हे अगदीच अयोग्य आहे, हे मला शेवटी आवर्जून सांगायचं आहे.

(लेखक शेवाळकर डेव्हलपर्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत )

9822466401

आशुतोष शेवाळकर यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –आशुतोष शेवाळकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

 

 

Previous articleसमाधिस्त होण्यासाठीच या चौकशा !
Next articleआकाश अनावर झाले… क्षितिजांना पडल्या भेगा…!!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

2 COMMENTS

  1. लेख वाचून मानसिक ताण कमी झाला . आयुवेदीक औषधी वर आपण विश्वास ठेवायला हरकत नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here