कुर्ग: भारताचे  स्कॉटलंड

   -राकेश साळुंखे

         ‘भारताचं स्कॉटलंड’ अशी ओळख असलेलं ‘कुर्ग’ हे कर्नाटक राज्यात दक्षिणेकडे वसलेले आहे. येथील हवामान बाराही महिने थंड असल्याने पर्यटकांनी सदैव ते गजबलेले असते . मात्र  आपल्याकडे अजूनही बऱ्याचशा लोकांना कुर्गबद्दल फारशी माहिती नाही .मेडिकरी हे कूर्गच्या जिल्ह्याचे ठिकाण. मेडिकरी म्हैसूर ते मंगलोर या महामार्गावर म्हैसूरपासून अडीच तासाच्या   अंतरावर आहे. मंगलोरपासून ते १३८ किमी अंतरावर आहे.

पहिल्यांदा मी जेव्हा कुर्गला गेलो, त्यावेळेचा अनुभव हा न विसरता येण्यासारखा आहे . मंगलोरवरून कूर्ग ला जाताना वाटेत घाट लागतो . त्या प्रवासात हलकासा पाऊस, नजरेला सुखावणारे दोन्ही बाजूचे कॉफीचे मळे, मधूनच लागणारी गच्च हिरवीगार झाडी , सुखद थंड हवा  सारेच सुंदर व विलक्षण होते. त्या प्रवासाची आठवण आजही  मनाला आजही ताजेतवाने करते .

 कुर्गलाच कोडागू असेही म्हटले जाते . केरळच्या वायनाड या प्रदेशाला लागूनच हा भाग येतो . कॉफीच्या मळ्यांनी वेढलेला हा भाग आहे .येथील कॉफी जगप्रसिद्ध आहे . चिकमंगळूर खालोखाल येथे कॉफीचे मळे आढळतात . कुर्गवर निसर्गाने दोन्ही हातांनी मुक्त उधळण केली आहे.  जैव विविधतेने संपन्न असलेला हा प्रदेश वन्यजीव संरक्षित विभाग आहे . या भागात ब्रम्हगिरी, तळकावेरी ,पुष्पगिरी या तीन वाईल्ड लाईफ सेंच्युरी व नागरहोळे नॅशनल पार्क आहे .

म्हैसूरवरून जाताना वाटेतील कुशलनगरला भेट देऊनच पुढे जावे. येथे तिबेटीयन नागरिकांची मोठी वसाहत आहे . जणू  तिबेटची छोटी प्रतिकृतीच आहे . येथे असलेली बौद्ध मॉनेस्ट्री म्हणजेच गोल्डन टेम्पल पाहण्यासारखे आहे. ही मॉनेस्ट्री खूप मोठी आहे . प्रार्थनागृह खूप मोठे असून तेथे तीन भव्य सोनेरी  पुतळे आहेत . पद्मसंभव , गोतम बुद्ध व अमितायुस यांचे हे पुतळे आहेत . जर आपल्याकडे वेळ असेल तर याच्या आसपास असणारा दुबारे एलिफंट कॅम्प व निसर्गधाम नॅशनल पार्क या ठिकाणांनाही अवश्य भेट द्यावी .

मेडिकरी शहराची ठेवण ही इतर कोणत्याही थंड हवेच्या ठिकाणांची असते, साधारणपणे तशीच आहे .चढ-उताराचे व पर्यटकांनी गजबजलेले रस्ते , अरुंद गल्ल्या , हॉटेल्स तसेच निरनिराळे खाद्यपदार्थ, मसाले, होममेड चॉकलेट्स , होममेड वाईन,  सोव्हेनिअर यांची रेलचेल असलेली दुकाने मोठ्या प्रमाणात दिसतात . या शहराच्या जवळ ‘राजाज सीट ‘ हा लोकप्रिय टुरिस्ट स्पॉट आहे . रंगीबेरंगी रंगांची उधळण करणारी कारंजी व दरीतून वर येणारे थंड हवा-धुके मनाला ताजेतवाने करतात . पूर्वी राजा या ठिकाणी बसून समोरच्या दरीतील सुंदर देखावा न्याहाळत असे म्हणून या ठिकाणाला ‘राजाज सीट’ हे नाव पडले आहे . शहरात मध्यवर्ती भागात प्राचीन व भव्य असे ओंकारेश्वर मंदिर आहे . येथून जवळच मर्करा फोर्ट आहे . १७ व्या शतकाच्या शेवटी मदुराजा याने हा किल्ला बांधला. नंतर टिपू सुलतानाने या किल्ल्याची पुनर्बांधणी केली . आता जो फोर्ट आपल्याला पहायला मिळतो तो इंग्रजांनी पुनर्ररचना केलेला आहे . तिथे सध्या सरकारी कार्यालये, तसेच एक चर्च आहे .या इमारतींचे बांधकाम गॉथिक शैलीतील आहे. मेडिकरीच्या आसपास तळकावेरी, भागमंडला , ऍबी फॉल्स, मंडलपट्टी , पुष्पगिरी अशी सुंदर सुंदर ठिकाणं आहेत . कूर्गला मुक्काम करून ही ठिकाणे आपण पाहू शकतो.

  एकदा परिवारासोबत कूर्ग ला गेलेलो असताना सर्वांना घेऊन मला तळकावेरीला जायचे होते  . दुपारच्या जेवणानंतर सर्वजणच सुस्तावलेले होते .  त्यावेळी त्या हॉटेलचे मालक असलेले माझे मित्र ‘हरून’  यांनी लगेच मला सांगितले की सगळ्यांना पटकन आवरायला सांगा . कारण ४ वाजता ब्रह्मगिरी बंद होतंय. तुम्ही उशिरा जाऊन काहीच उपयोग नाही. त्यांनी अक्षरशः सर्वांना  गाडीत घालून पाठवलेच. पोहोचलो तेव्हा चारला पाच मिनिटे कमी होती . गेट बंद होत होते म्हणून पळापळ झाली. तेवढ्यात  शर्ट पॅन्ट चालणार  नाही , लुंगी घाला या नियमाचा बडगा उभारला गेला. पैसे देऊन सर्व पुरुषांनी लुंगी घातली. नंतरच आत सोडले आणि गेट बंद केले. येथे कावेरी नदीचे उगमस्थान आहे . या नदीच्या  उगमस्थानी ब्रह्माचे मंदिर आहे. प्रत्येक नदीचे जरी मूळ सांगता येत नसले तरी एक विशिष्ट ठिकाणी उगम सांगितला जातो. त्या ठिकाणी मंदिर व कुंड असते.  या मंदिराच्या आवारातही एक कुंड आहे. त्यात येणारे झऱ्याचे पाणी हाच कावेरी नदीचा उगम मानला जातो. कावेरी नदीला ‘दक्षिणेची गंगा’ म्हणतात . कोडावू लोकांचे हे तीर्थस्थान असल्याने तेथे सतत  भाविकांची वर्दळ असते . शेजारीच ब्रम्हगिरी नावाची डोंगरवजा टेकडी आहे . पायऱ्या चढून वर गेल्यावर ३६० डिग्री कोनातून सभोवतालचा निसर्ग दृष्टीक्षेपात येतो. भरगच्च झाडीने भरलेली जंगले ,डोंगर, दऱ्या तसेच सोबतीला दरीतून वर येणारा आल्हाददायक वारा यामुळे हा परिसर खूपच आकर्षित करतो.

     मेडीकरीपासून ३८ किमी अंतरावर भागमंडला हे तीन नद्यांच्या संगमावर वसलेले कोडावू लोकांचे आणखी एक तीर्थक्षेत्र आहे . निसर्गाच्या सानिध्यात असलेले भागंडेश्वराचे मंदिरही आकर्षक आहे .मंदिराचे बांधकाम  बहुतांश लाकडी पद्धतीचे असून त्यात शिव ,सुब्रमण्यम ,गणेश यांच्या मूर्त्या आहेत .मंडलपट्टी व पुष्पगिरी ही निसर्गसंपन्न आकर्षणे मेडीकरी पासून साधारणपणे २० किमी अंतरावर आहेत . मंडलपट्टीचा अर्थ स्थानिक भाषेत ‘धुक्याचे आगार’ असा होतो . मंडलपट्टीला जाण्यासाठी कुर्गमधूनच जीप घ्यावी . आपले वाहन जावू शकते. परंतु रस्ता खूपच खराब असल्याने तसेच जंगलातून जायचे असल्याने स्थानिक वाहन व ड्रायव्हर घेतलेले फायद्याचे ठरते . मंडलपट्टीच्या वर शिखरापर्यंत गाडी जावू शकते. पण त्यासाठी वन विभागाची  परवानगी आवश्यक असते. येथून सूर्योदय पाहणे व तोही धुक्याचा अडथळा न येता पाहता येणे म्हणजे एक पर्वणीच ठरते . हिरव्यागार विस्तीर्ण पठारावर धुक्यातून चालण्याची मजा काही औरच असते . तेथून जवळच पुष्पगिरी हा आणखी एक फुलांची व धुक्याची सहल घडवणारा स्पॉट आहे . पुष्पगिरी हे सातारा जवळील कास पठारासारखेच रानफुलांनी बहरणारे पठार आहे .

      पुष्पगिरी वरून परतत असताना वाटेत Abbey Waterfall लागतो . खाजगी कॉफी प्लॅन्टेशनमध्ये हा धबधबा आहे . याला पावसाळ्यात भरपूर पाणी असले तरी इतर वेळीही बऱ्यापैकी पाणी असते . त्याच्या पाण्याच्या उडणाऱ्या तुषारांनी मस्तपैकी भिजायला होते . या धबधब्याला कॉफीच्या मळ्यातून रस्ता जातो . इथे एक छोटासा ट्रेकच घडतो . या धबधब्याच्या विरुद्ध बाजूला अतिशय जुना लाकडी झुलता पूल होता. पण २०१८ च्या अतिवृष्टीमध्ये तो वाहून गेला. एका इंग्रज अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावावरून Abbey हे नाव या धबधब्याला दिले आहे .पुष्पगिरीच्या जवळच कोट्यबी हा एक छोटा धबधबा आहे . येथे पाण्याचे जे कुंड आहे त्यात भरपूर मोठे मासे आहेत. परंतु ते पकडण्याचा  किंवा खाण्याचा कोणी प्रयत्न करत नाही . याचे कारण देताना महाभारतातील द्रौपदीच्या शापाशी निगडित एक दंतकथा सांगितली जाते. परंतु हे मासे बहुदा विषारी असावेत . दाट झाडीत लपलेला हा धबधबा पहाण्यासाठी आपल्याला थोडी वाकडी वाट करावी लागते.

      कोडावा लोकांच्या चालीरीती ,सण – उत्सव वेगळे आहेत. येथे कोणत्याही धार्मिक विधीसाठी ब्राह्मण पुरोहित नसतो. कोडावा लोक हे लढाऊ म्हणून प्रसिद्ध आहेत. हे लोक लढाऊ असले तरी खूपच अगत्यशील आणि अदबीने बोलणारे आहेत. येथे सैनिक स्कूल असून लष्करात खूप लोक आहेत . जनरल थिमय्या व जनरल करिअप्पा हे दोन लष्कर प्रमुख या भागातीलच होते .अशा या आगळ्यावेगळ्या प्रदेशाला भेट देऊन  येथील होममेड चॉकलेटची चव जिभेवर घोळवत बंदीपूर अभयारण्यातून किंवा वायनाडमार्गे उटीला जाता येते .

नक्की पाहा- COORG SCOTLAND OF INDIA | KARNATAKA

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनचे संचालक आहेत)

84849 77899

Previous articleराजस्थानातल्या फसलेल्या बंडानंतर…  
Next articleकमलादेवींचा वंश भारतीयच; पण आपला वंश कोणता?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.