नवीन कृषी विधेयक: शेतकऱ्यांचं आणखी वाटोळं होणार नाही, हे निश्चित!

-डॉ आशिष लोहे, वरुड, अमरावती

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार या आश्वासनासह सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने नवीन कृषी विधेयकं मंजूर केली आहेत. या विधेयकांबाबत देशभर उलटसुलट चर्चा सुरु झालीय.  नवीन कृषी  विधेयकांमुळे शेतकरी स्वतंत्र होईल , अधिक मजबूत होईल , असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगताहेत . दुसरीकडे विरोधी पक्ष मात्र या विधेयकाने  शेतकरी गुलाम होतील, असा दावा करत आहेत . या वाद – प्रतिवादात या विधेयकांमुळे नेमके काय परिणाम होऊ शकतात याचा घेतलेला हा अभ्यासपूर्ण वेध.

…………………………………………………………….

केंद्र सरकारने तीन कृषी विधेयक आणले आहेत, त्यापैकी पहिले विधेयक आहे – ‘बाजार समिती नियमन मुक्ती विधेयक’ .१९६०-७० च्या काळामध्ये शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या (एपीएमसी मार्केट) निर्माण करण्यात आल्या . या नवीन विधेयकाने शेतकऱ्याला कृषिमालाची विक्री एपीएमसीमध्ये करण्याचे बंधन राहणार नाही. शेतकऱ्यांना आता  नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे . तो आपला माल एपीएमसी मार्केटमध्ये विकू शकतो किंवा त्याला वाटत असेल तर तो मार्केटच्या बाहेरही विकू शकतो.  या कायद्याने एपीएमसी मार्केट संपवले नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे . मात्र  शेतकऱ्यांपुढे एक नवा पर्याय खुला झाला आहे.

शेतकऱ्यांचा यामुळे काय फायदा होईल, तर शेतमाल विकत घेण्यामध्ये जी एक मक्तेदारी निर्माण झालेली आहे त्याला आळा बसेल. कोणताही पॅन कार्ड धारक व्यक्ती किंवा संस्था शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेऊ शकतो. म्हणजे शेतमाल खरेदी- विक्रीत असणारे अडते मध्यस्थ यांना बाजूला सारून पारदर्शकपणे शेतकऱ्याला आपला शेतमाल विक्री करण्याचे स्वातंत्र्य हे विधेयक देते. यावर आक्षेप असे आहेत की, ‘हे एपीएमसी मार्केट कमिटी  संपवण्याचे षडयंत्र आहे.’  पण ते खरं वाटत नाही. काही जणांचे म्हणणे हे आहे की, बाजार शुल्क न मिळाल्यामुळे राज्याला तोटा होईल. आता राज्याला तोटा होईल म्हणून शेतकऱ्याला स्वातंत्र्य देऊ नये काय? म्हणून हाही मुद्दा गैरलागू आहे. अडते मध्यस्थ यांचे काय होणार, असे प्रश्न उभे राहतात. मात्र  अडते मध्यस्थ यांना शेतकऱ्यांनी का पोसावे?  एका अंदाजानुसार पंजाब आणि हरियानामध्ये दलालीपोटी दलालांना ६५४ कोटी एका वर्षात मिळाले आहे. या भरभक्कम रकमेमुळे तर त्यांचा विरोध  नाही ना, हेही तपासले पाहिजे. काही लोकांना असे वाटते की, बाहेर शेतकऱ्याची फसवणूक होईल? मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याची अजिबात फसवणूक होत नाही काय? ज्यांना हे स्वातंत्र्य नको आहे त्यांच्यासाठी एपीएमसीचा पर्याय खुला आहेच . उगाच शेतकरी हिताचा कळवळा आणण्यात अर्थ नाही. नवीन कायद्याने एपीएमसी संपवण्याचा घाट घातला आहे, हा आक्षेप सध्यातरी खरा वाटत नाही.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे .फक्त मार्केट कमिटी असून चालत नाही. फक्त हमीभाव देऊन चालत नाही. तर हमीभावाने शेतमाल विकत सुद्धा घ्यावा लागतो. आजपर्यंत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांचा सर्व शेतमाल हमीभावाने सरसकट विकत घेतला नाही.  जगातल्या कोणत्याही देशांमध्ये अशी व्यवस्था नाही. बिहारसारख्या राज्यामध्ये २००७ पासून मार्केट कमिटी नाही. १९६० पूर्वी शेतमाल हा बाजार कमिटीच्या बाहेरच विकला जात होता. म्हणून १९६० च्या आधीचा शेतकरी तुलनेने अधिक समाधानी होता. याचा विचार तरी निदान आपण करायला पाहिजे.

दुसरे विधेयक हे कंत्राटी शेतीबद्दल आहे.  या विधेयकानुसार आता शेती करार पद्धतीने करता येणार आहे.  शेतीत जो काही शेतमाल पिकविला जाईल , त्याच्या विक्रीचा करार आता शेतकऱ्यांना  एखाद्या संस्थेसोबत, भांडवलदारासोबत किंवा एखाद्या कारखान्यासोबत करता येणार आहे.  सध्याही हा प्रकार थोड्याफार प्रमाणात होत आहेच. आता याला कायदेशीर स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला आहे.  यामुळे शेतकऱ्याला आपला शेतमाल डायरेक्ट कोणत्याही कारखान्याला विकता येणार आहे. करार पद्धतीने शेती करणे यात काही वावगे नाही. उलट यामुळे ज्याला शेती करायची आहे तो शेती करू शकेल .एकंदरीतच हे एक अतिशय चांगले पाऊल आहे, असे म्हणायला हरकत नाही.

  आमच्या भागांमध्ये संत्रा पिकतो . येथे संत्रा ज्यूस फॅक्टरी होणार आहे. त्यांना सीडलेस संत्रा पाहिजे असतो. सध्या संत्रा उत्पादक शेतकरी  जे संत्रा उत्पादन घेतोय  त्यामध्ये सीड असते.म्हणून ज्यूस फॅक्टरी निर्माण करणाऱ्या कंपनीने या भागातील शेतकऱ्यांना सीडलेस संत्र लावण्यासाठी कलमा दिल्या.  त्यासोबत ते करार  करू इच्छितात की पाच वर्षानंतर येणाऱ्या संत्राला आम्ही कमीत कमी अमुक एका दरामध्ये विकत घेऊ. त्यापेक्षा जर जास्त भाव तुम्हाला दुसरीकडे मिळत असेल तर ते विकण्याचा पर्याय तुमच्यापुढे खुला आहे. अशा पद्धतीने जर करार होत असतील तर ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे नाही का?

काही लोकांना असं वाटतं की, मोठे उद्योगपती, कंपनी नंतर करार पाळणार नाहीत ,असं होऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतमालाच्या सौदेबाजीमध्ये असं अनेकदा होतं की घेतलेल्या सौद्यानंतर काही काळाने व्यापारी सौदा टाकून देतात.  मात्र सौदा होत असताना दिलेली अग्रीम रक्कम  शेतकऱ्याला रत करावी लागत नाही, हेही तेवढेच खरे आहे की नाही? काही लोक विचारताहेत की,  शेतकरी वाटाघाटी करण्यास सक्षम आहे का ?  याचे उत्तर असे आहे की, येणारी परिस्थिती, नवीन आव्हान माणसाला सक्षम बनवते .आतापर्यंत हा पर्याय त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे तो ते करण्यास सक्षम आहे किंवा नाही, हे तो येणारा काळच ठरवेल. दुसरा प्रश्न असा विचारला जातोय की, व्यावसायिक वा कंपन्या  छोट्या-छोट्या शेतकऱ्यांशी करार करणार काय? याचे उत्तर असे आहे की, आता शेतकऱ्याकडे करार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तो करार करायचा किंवा नाही करायचा, हे तो शेतकरी ठरवेल .यामुळे त्याला हा पर्यायच देऊ नका, हे उत्तर असू शकत नाही.

तिसरे अत्यंत महत्त्वाचं विधेयक आहे, आवश्यक वस्तूंच्या कायद्यामध्ये बदल करणारे ‘आवश्यक वस्तू कायदा सुधारणा बिल’. खरं तर हा पूर्ण कायदाच शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे  संपूर्ण कायदाच रद्द करायला पाहिजे होता.सध्याच्या या कायद्याने शेतमालाच्या भावांमध्ये हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार मिळतो . त्यामुळे सरकार कोणाचेही असो, ते वेळोवेळी शेतमालाचे भाव वाढल्यावर हस्तक्षेप करते आणि त्यामुळे  किमती पडतात. परिणामी शेतकर्‍याला त्याच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नाही . सरकारने आणलेल्या  धारणा विधेयकाने काही शेतमाल हा या कायद्याच्या बाहेर काढला आहे . निर्मला सीतारामन यांनी अशी घोषणा केली होती की शेतकऱ्याला भाव न मिळण्यामागे हा कायदा जबाबदार आहे. या कायद्याने भाव मिळत नाही म्हणून हा आम्ही कायदा रद्द करत आहोत. पंतप्रधानांनी सुद्धा हा कायदा शेतकर्‍याला पारतंत्र्यात ढकलणारा आहे आणि म्हणून आम्ही शेतमाल कायद्याच्या बाहेर काढणार आहोत, अशी घोषणा केली होती. या सुधारणा विधेयकावर शंका घेत असताना असं म्हटलं जात आहे  की, मोठ्या कंपन्या शेतमालाचा साठा करतील आणि मग ते चढ्या भावाने विकतील. अशाप्रकारचा साठा केल्यावर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने कारवाई करू नये ,असे शेतकऱ्यांचे अजिबात मत नाही. या कंपन्यांवर कारवाई करण्यास केंद्र वा राज्य सरकार सक्षम आहे. त्यांनी ती करावी अशा मताचे आम्ही आहोत.

आतापर्यंतचा अनुभव असा आहे की,  सरकारच्या काही घोषणा हवेतच विरतात. सरकार स्वतः एकीकडे सुधारणेचा आव आणते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणतात.  परंतु कृती नेमकी उलटी करतात.या विधेयकानुसार दिलेले स्वातंत्र विदेश व्यापार कायद्यांनीहिरावून घेतलेलं आपण नुकतच पाहिलं. आवश्यक वस्तू कायद्यामधून कांदा काढला. त्यामुळे आता कांदा निर्यातबंदी होणार नाही.  पर्यायाने शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील अशी आशा वाटत असतानाच विदेशी व्यापार कायद्याचा उपयोग करून कांदा निर्यातबंदी केली आणि कांद्याचे भाव पाडले, हे आपण सर्वांनी बघितलं.  म्हणून या सर्व कायद्याचा  उपयोग  सद्सद्विवेकबुद्धीने करणे, हे कोणत्याही राज्यकर्त्यांकडून अपेक्षित आहे. चुकीचा विचार, चुकीची कृती याचा विरोध आपण समजू शकतो. परंतु विरोधात असलो म्हणजे कायम विरोधच केला पाहिजे असे नाही. सरकारने आणलेले तीनही विधेयक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारे, स्वातंत्र्याकडे एक पाऊल पुढे टाकणारे आहे .आगामी काळात यामुळे काय -काय बदल घडून येतात, हे कळेल . एक गोष्ट मात्र निश्चित- कृषी सुधारणा विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे आणखी वाटोळं होणार नाही, हे नक्की.

(लेखक शेतकरीविरोधी कायद्याचे अभ्यासक व ‘किसानपुत्र’ आंदोलनाचे कार्यकर्ते आहेत) 

7775860581

Previous articleडोचुला पास: अप्रतिम निसर्गसौंदयाचा नजराणा
Next articleदुबळे पंतप्रधान अपायकारक, सामर्थ्यशाली पंतप्रधान अधिक अपायकारक!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

2 COMMENTS

  1. काल *संसदेत पारित झालेल्या कृषी विधेयका* बाबत *_शेतकरी भाऊसाहेब शेळके_* यांची बोलकी व चिंतनीय प्रतिक्रिया—
    आज संसदेत तीन कृषीबिल पास झाले. त्यावरून संसदेत मोठा गोंधळ झाला पण बहुमताच्या जोरावरच हे बिल कुणालाही न जुमानता कुणाचेही मत न मांडू देता मा .पंतप्रधान मोदी ‘जी’ नी पास करून घेतले .
    खरं तर शेती कामाच्या व्यस्ततेमुळे या बिलाचे फारसे समजून मला नाही घेता आले. परंतु यातून मला जे काही समजले आणि माझ्या विवेक बुद्धीला आकलन जेवढे झाले त्याचे पुढे शेतकऱ्यांना होणारे संभाव्य परिणाम मी मांडण्याचा प्रयत्न करतो; ते पुढे तसेच होईल याची मलाही खात्री नाही.
    पहिले तुमचा कोणताही राजकीय पक्ष असूद्या तो काही वेळ बाजूला ठेऊन मी खाली जे घटक सांगणार आहे त्यात तुम्ही येता का याचा विचार करा आणि मगच कॉमेंट्स नक्किच करा ती विरोधात असो वा नसो.
    या बीलामुळे कुणाचा रोजगार जाणार आहे .
    1: शेतकरी
    2: आडते
    3: किरकोळ फळ व भाजीपाला विक्रेते.
    4: शेतमजूर
    या तीन घटकाचा रोजगार स्लो पॉईझन प्रमाणे होईल .
    यांचे परिणाम कुणावर होणार आहे तर ज्या कुटुंबाला म्हणजे रोज जो भाजी विकत घेतो तो सर्वसामान्य माणूस. हॉटेल व्यवस्था व शेती मालापासून प्रक्रिया उद्योग करणाऱ्या छोट्या कंपन्याना.
    आता आपण विस्ताराने समजून घेऊ.
    आज जे विधेयक पास झाले त्यामुळे हळूहळू कार्पोरेट क्षेत्र शेतकऱ्यांकडून शेती ही करार पध्दतीने करार करून घेईल. शेती परवडत नाही म्हणून शेतकरी ही आनंदाने करार करतील. कार्पोरेट जेव्हा 100/2000/500 एकर असे प्लॉट तयार झाले की त्यावर मोठाले प्लॉट असल्यामुळे समजा 100 एकर पत्ता गोबी, 100 एकर गाजर, 500 एकर बटाटा याप्रमाणे लागवड करतील. विदेशात नवीन तंत्रज्ञानाप्रमाने मोठ्या मोठ्या मशिनरी आहे. त्याने फवारणी, कोळपाणी, तण काढणे व सगळ्यात महत्त्वाचे हार्वेस्टिंग जे की तुम्ही आम्ही सर्व वीडियो पाहलेले आहे ते कमी खर्चात कमी वेळेत जास्त काम करतात.
    म्हणजे एका बाजूला कार्पोरेट वाल्याचा चांगल्या प्रतीचा शेतीमाल दर्जा असलेला माल व जास्त प्रमाणात उपलब्ध असेल.
    दुसरी बाजू सामान्य शेतकऱ्यांचा म्हणजे माझा भाऊसाहेब शेळके चा तुलनेने त्या दर्जाचा माल नसेल. उत्पादन करण्यासाठी दुप्पट खर्च आलेला असेल आणि टणेज ची संख्या नसेल. मग मार्केट कुणाच्या हातात असेल.
    म्हणजे भाऊसाहेब शेळके चा माल त्या कॉर्पोरेट च्या दराच्या व दर्जाच्या व नम्बर च्या स्पर्धेत टिकू शकणार नाही, बरोबर का ? ? यात आपले काही वेगळे मत असेल तर सुचवा.
    दुसरी गोष्ट म्हणजे कॉर्पोरेट चे विक्री केंद्र स्वतःचे राहतील म्हणजे आडते गेले बारच्या भावात सोबत किरकोळ विक्रेते गेले. कारण त्या काॅर्पोरेट कंपन्यांची स्वतःची चेन तयार झालेली असेल म्हणजे तुम्ही 200 रुपये शेकडा मेथी घेऊन दहा च्या दोन ज्या विकत होता ना ते बंद म्हणजे बंद. फळ विक्रेते बंद.
    मोठमोठ्या मशीन असल्यामुळे मजूर फारच कमी लागेल आणि जे लागेल ते ठेकेदाराला दर ठरून.
    म्हणजे शेतकरी गेला, आडत्या गेला, किरकोळ विक्रेते गेले, शेतमजूर ……?
    आता राहिला ग्राहक समजा मार्केट मध्ये भाऊसाहेब शेळके चा कांदा हलक्या प्रतीचा 40 रुपया किलो आहे आणि रिलायन्स चा कांदा चांगल्या प्रतीचा 30 रुपये किलो मिळाला तर ग्राहक कोणता कांदा घेईल? सांगा बरं भाऊसाहेब चा घेईल की रिलायन्सचा? मग काय होईल हळूहळू भाऊसाहेब कर्जबाजारी होऊन शेवटी शेती विकायला काढिल, कोण घेईल बरं अदानी, अंबानीच घेईल ना! मग हळूहळू असे भाऊसाहेब संपले की मार्केट मध्ये कोण उरेल फक्त अदानी, अदानी, बिर्ला, आमूक-धमुक म्हणजे सर्व कार्पोरेट. *मग पहिले जो कांदा 30 रुपये किलोने विकला की नाही तोच कांदा आता भाऊसहेब संपल्यामुळे 200 रुपये किलो ने ग्राहकाला घ्यावा लागेल.* आणि हो काही मंद म्हणतील की भारतात लोकशाही आहे- *_अरे त्याच लोकशाही चा सोईस्कर आधार घेऊन हे आज झालेले तिन्ही कायदे एकमेकांचे सपोर्टर आहे ना_* आणि mla आणी mp हे कुणाचे निवडून येतील हे वेगळे सांगायला नको आज अतिशयोक्ती वाटत असेल तर कालाय तस्म्य नमः ! .🙏🙏
    *आणि म्हणून मी या बिलाचा निषेध करतो व 25 तारखेला जो संप आहे त्याला पाठिंबा देतो.*
    *_तुम्ही तुमचं ठरवा._*
    🙏🙏🙏
    — शेतकरी भाऊसाहेब शेळके
    ———
    नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदी बघता-
    आपल्या सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात गोरगरिबांच्या शाळांचेही असेच होणार आहे.
    *शेतकरी- शिक्षक*,
    *ग्राहक- गोरगरीब पालक…*

  2. मी आता manuel castells यांचे ‘the informational city’ (1989) वाचत आहे. भांडवशाहीच्या एका टप्प्यावर देशाची अर्थव्यवस्था भांडवली कंपनीच्या ताब्यात दिली जाते. भांडवलशाहीची पुनर्रचना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो , असे त्यांनी म्हटले आहे. सध्या मोदी तेच करीत आहेत. हे विधेयक आणल्यानंतर कृषी क्षेत्रात artificial intelligenceचा वापर केला जाणार आहे. २०१८ च्या निती आयोगाच्या अहवालात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत नमूद आहे. सामान्य शेतकरी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून शेती करणार नाही. देशात सर्व उद्योग – उत्पादन क्षेत्रे खुली करण्यात आल्यावर शिल्लक राहिलेले कृषी क्षेत्रही मोदी देशी व विदेशी कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात देण्याचे काम करीत आहेत. सर्वसत्तावादी आणि भांडवलदार एकमेकाच्या हातात हात घालून काम करीत असल्याचे पुस्तकात वाचले होते. ते भारतात प्रत्यक्ष घडत आहे. कॉर्पोरेट कंपन्या मानवतावादी आहेत, हे कुणी सांगितले. अन्यथा लॉकडाऊनमध्ये ५-७ वर्षाच्या मुलांनी २०० -३०० किलोमीटर आणि मोठ्यांनी १०००-१५०० किलोमीटरचा पायी प्रवास केला नसता. या पायपिटीत हालहाल होऊन १५०-२०० स्थलांतरित मजूर मरण पावले. कॉर्पोरेट कंपन्या किती निदर्यतेने व्यवहार करतात, हे पत्रकारांना सांगण्याची गरज नसावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here