– समीर गायकवाड
खरे तर, या स्त्रिया म्हणजे खोल काळजातल्या अंधारयक्षिणी होत!
‘रेड लाईट डायरीज’च्या प्रवासात मला भेटलेल्या काही अफलातून हृद्य स्त्रियांचे हे विलक्षण शब्दचित्र तुम्हाला अस्वस्थ करेल आणि खडबडून जागे करेल.
या बायका जगण्यामरण्याच्या पलीकडे गेल्या होत्या, तरीही त्या जिवंत होत्या? का जगत होत्या हे असलं खंगत चाललेलं जिणं?
अंतःकरणातून वाचलंत, तर या प्रश्नाचे उत्तर नक्कीच गवसेल. इथे तुम्हाला अश्लीलता, मादकता वा उन्मादक उत्तेजित असं काही सापडणार नाही,
जे काही डोळ्यातून काळजात उतरेल, ते कायमचे मस्तकात राहील.
सावित्री.
१९९८
जमखंडी – मिरज
मिरजेतल्या उत्तमनगर वस्तीत एका केसस्टडीच्या वेळेस बागलकोटजवळील जमखंडीची सावित्री भेटली होती. एकदम कजाग.
दिवसातून दहा वेळा तंबाखू मळणारी. पदराचे भान नसणारी.
बोलताना उजव्या हाताच्या तळव्यावर डाव्या हाताची मूठ आपटणारी.
वेळप्रसंगी आपल्या गिऱ्हाईकाला गच्चीला धरून बाहेर काढणारी आणि बाका प्रसंग असेल, तर लाथेने तुडवून काढणारी. ओठातून हवा उडवावी तशी ओठाच्या डाव्या कोपऱ्यातून थुंकीची पिचकारी उडवणारी.
बोलताना मध्येच थांबून डोळे रोखून बघणारी.
लाडात आली की, हातातल्या बांगड्यांचा चाळा करणारी डावरी.
खुर्चीवर पाय सोडून बसली की, तबला वाजवावा तसा एक सलग पावलं बडवत राहणारी.
रागात असली की, भिताडाकडे तोंड करून बसणारी आणि आनंदाचा ओव्हरडोस असला की, दोन टॅंगोपंच आरामात रिचवून आपल्या फळकुटाच्या खोलीच्या साम्राज्यात बिनघोर लोळत पडणारी.
निर्ल्लजतेची सीमा गाठली की, अनावृत्त होऊन दाराआडून डोकावणारी.
केसाचे कधी बोचके करणारी, तर कधी मस्त आवरून सावरून गजरा माळून अंबाडा घालणारी.
जेवायला बसली की, मचामचा आवाज करणारी.
चहा पिताना फुर्र फुर्र करणारी, इच्छा असेल, तरच धंद्याला बसणारी नाहीतर सिनेमा थेटरात जाऊन बसणारी. कधीही कुणाच्याही भांडणात मध्ये न पडणारी, पण संकटात मदत करणारी.
कधीही कुण्या लहान लेकराच्या गालावरून हात न फिरवणारी, पण वस्तीतल्या खुडूक झालेल्या रंडीला आपल्या कमाईतली मोठी नोट देणारी सावित्री एक अजब रसायन होतं.
रंगाने बऱ्यापैकी काळी होती ती. देखणी तर अजिबात नव्हती, पण तिच्या मते सौंदर्याच्या व्याख्या ज्याच्या आधारे ठरवल्या तो एक चापलुसीचा वासना बनाव होता.
तिच्या चेहऱ्याची ठेवण वेगळीच होती. व्हंडगुळ्या कपाळाची, बसक्या नाकाची आणि दात पुढे आलेल्या काळ्या मोठ्या ओठाची काहीशी अनाकर्षक अशी.
चपटी हनुवटी आणि वर आलेले गाल, यामुळे तिला सगळे चौकटची काळी राणी म्हणत!
तिला कुणी असं तोंडावर बोललं आणि तिचा मूड असला, तर ती हसायची आणि मूड नसला, तर तिच्या हाती चप्पल असायची. तिला आपल्या दिसण्याचे काहीही सोयरसुतक नसे.
मिचमिच्या डोळ्यात ती भलं मोठं काजळ घालून बसायची.
तिच्या काळ्या रंगाला खुलून न दिसणाऱ्या साड्या घालायची, ब्लाऊज आणि साडीच्या रंगाचा मेळ नसे, कशाचाही ताळमेळ न लागेल अशा प्रकारचे कपडे ती घाली.
कधी कधी तर परकर पोलकं आणि त्यावर टॉवेल असं भयंकर कॉम्बिनेशन असे!
इतक्यावरच ती थांबत नसे. लिपस्टिकपासून ते पावडरपर्यंत जाम लेप फासाफाशी ती कधी करायची, तर कधी काहीही न लावता एकदम कोरा काळा तुकतुकीत चेहरा.
थोडीशी भीड चेपल्यावर तिला विचारलं, ‘‘सावित्रे अशी का राहतेस? तुला लोक हसत असतील, असं वाटत नाही का?’’
सावित्रीने दिलेलं उत्तर प्लेटो, ऍरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राच्या तोडीचं होतं –
‘‘दुनियेने पैसे दिले की, मी त्यांच्याखाली झोपते. इथवरच माझा आणि त्यांचा संबंध …
काम झालं की पब्लिक निघून जातं…
माझ्यावर मालकी नाही कुणाची न कुणाची ताबेदारीही नाही, मी काळी असली म्हणून काय झालं ?
मला जे रंग आवडतात, त्याच रंगाच्या साड्या मी नेसणार.
नटल्या-सजल्यावर जगाला मी कशी दिसते, याला घेऊन मी काय करू?
मला जसं आवडतं तसं मी सजते, नटते. माझी वासना, माझी भूक, माझं नटणं, माझं जीवन हे सर्वतोपरी माझं आहे. संसारी बायकासारखी माझ्यावर कुणाची बंधने नाहीत, मी मुक्त आहे, स्वतंत्र आहे, मी माझ्यासाठी जगते.
मी साडी काळी नेसली की पांढरी, याचे जगाला काय वाटत असेल या विचाराने मला फरक पडत नाही.
कारण एकेक करून सगळी वस्त्रे मी उतरवते, ती पण माझ्या मर्जीने! …
आता तूच सांग, सगळीकडं चालती का अशी बायांची मर्जी ? ..
मी माझ्या मर्जीची राणी आहे. मग ती चौकट असो वा इस्पिक, मला घेणं देणं नाही.
ज्या जगाने मला इथे लांडग्याच्या हवाली केले त्या जगासाठी मी माझं जगणं आणि माझ्या आवडी निवडी का सोडू?’’…
उंट छाप बिडी, हा तिचा आवडता धूरसोड्या ब्रँड होता.
त्याची वलये हवेत सोडत ती समोरच्याच्या डोक्याचा ताबा घेई.
कधी कधी काही लोक आपल्याला खूप काही शिकवून जातात त्यातीलच ही एक वल्ली.
सावित्रीच्या तळहाताला मोठे घट्टे होते, बालपणी दगडखाणीत कामाला होती ती.
आपल्या मर्जीने पळून आली होती आणि मर्जीने जगत होती. तिचा मार खाणारा म्हणायचा, ‘बाईचा हात आहे का दगड!’ पण, असं कुणी म्हटलं की, तिचं दगडी बालपण तिला आठवे आणि मग दार बंद करून ती स्वतःला कोंडून घेई…
सावित्रीने एकदा का दार लावून घेतलं की तासंतास ते बंद राही, आत तिच्या मेंदूत ज्वालामुखी फुटत राही आणि दाराबाहेर स्मशान शांतता. सावित्रीला शांत व्हायला खूप वेळ लागे. ही अवस्था तिच्यासाठी सर्वात त्रासदायक ठरे. ही मूक सावित्री खूप अस्वस्थ करून गेली.
*****
सलमा.
२००२.
बिदर. कर्नाटक. ५८५४०१.
सावित्रीची ही मौनावस्था जशी लक्षात राहिली, तशीच सलमाची जीवघेणी अखेरही स्मरणात राहिली.
मागे एके ठिकाणी एका मित्राने देशभर गाजलेल्या एका मोठ्या बलात्कार प्रकरणानंतर खुनशीपणाने विचारले होते की, ‘‘तुम्ही अमुक एका बलात्कारावर खूप व्यक्त झालात आणि तमुक एका बलात्कारावर कमी व्यक्त झालात. असं का?’’
त्याचा प्रश्न ऐकून काही क्षण मी अबोल झालो. कारण लोक आता बलात्कार, शोषण आणि अत्याचाराच्या घटनांना जातधर्माचे. राजकारणाचे संदर्भ जोडण्यात तरबेज झालेत, खेरीज त्याचे त्यांना वैषम्य वाटण्याऐवजी त्यात ते अस्मिताबिंदू शोधू लागलेत.
पीडित स्त्रीचा धर्म कोणता आहे, यावरून निषेध वा धिक्कार नोंदवण्याची हिडीस प्रथा आपल्याकडे सुरू झालीय. याचा आविष्कार त्या प्रश्नात झळकत होता.
आपल्या वा आपल्या आवडीच्या जातीतील स्त्रीवर बलात्कार झाला, तरच आक्रोश करायचात; मात्र अन्य जातीतील महिलेवर बलात्कार झाला, तर तोंडात मिठाची गुळणी धरून बसून राहायचं, हा सोयीस्कर धर्मवेडा आणि अमानवी ट्रेंड आता आपल्याकडे चांगलाच रुळला असल्याचे गमक या प्रश्नात होते.
वेश्येकडे जाताना कुणी तिची जात, धर्म विचारत नाही.
स्त्रीदेहाच्या खुणा तिच्याकडे आहेत, हे एकच कायासत्व पुरेसं असतं.
त्यामुळे या प्रश्नाचं दुःखही वाटलं आणि वैषम्यही वाटलं. असो!
त्या प्रश्नांवर काही क्षण मी अबोल झालो.
मात्र सर्रकन रंगमंचाचा पडदा ओढला जावा, तसं भूतकाळात ओढलो गेलो.
प्रश्नकर्त्याने विचारणा केलेल्या अभागी पीडित स्त्रीहून अनेक पटीने अनंत यातना भोगलेल्या कैक बायका आठवल्या. त्यातही कालपरवा मेलेली सलमा आठवली.
सलमाला मरून आता पाचेक महिने झालेत.
धंदा करायची ती.
कर्नाटकातील बिदर शहरातील जुन्या गावठाण भागातील किल्ला परिसरालगत चांदनी चबुतरा इलाख्यात घरगुती जागेत हा कुंटणखाना होता.
सलमाची उमर पंचविशीतली असेल.
अंगकाठी मध्यम, गव्हाळ वर्ण. बऱ्यापैकी देखणंपण तिला लाभलं होतं. चेहऱ्याची सुबक ठेवण.
आखीव रेखीव बांधा, लाघवी बोलणं आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असल्याने तिच्याकडे कस्टमर्सचा ओघ असायचा.
तिच्या गुत्त्यावरची मालकीण शिवम्मा एक नंबरची हरामी बाई होती.
एकदम उलट्या काळजाची. ती सगळ्या पोरीबाळींची झडती घ्यायची.
कुठेही बेलाशक हात लावायची. कधी सगळ्यासमोर, तर कधी खोलीत नागवं करायची.
देखणी सलमासुद्धा अपवाद नव्हती.
कस्टमरने वरख़ुशी काही दिली असेल, तर त्यातही आपला हिस्सा आहे, असं तिचं शिवम्माचं म्हणणं.
पण, तिला चकवा देत सलमाने एक आयडिया लढवली होती…
१९९० नंतर गुटखा सगळीकडे हळूहळू पसरू लागला आणि २००० सालापर्यंत तर त्याने सगळीकडे आपले बस्तान बसवले. दारू, जुगार आणि वेश्यावस्तीत गुटखा अधिक जलद गतीने सेटल झाला.
या गुटख्यानेच तिने शक्कल लढवली आणि यानेच तिचा घात झाला.
कस्टमर जास्त वेळ थांबून गेला की, शिवम्माला संशय येई.
पैसे सापडेपर्यंत ती समोरच्या मुलीचे कपडे सर्वासमक्ष उतरवत राही.
यावर डोकं लावताना सलमाने कस्टमरने दिलेले खुशीचे पैसे गुटख्याच्या रिकाम्या पाकिटात ठेवून ते तिच्या अंतर्भागात ठेवायला सुरुवात केली. झडती घेऊन झाल्यावर ती ते पाकीट टाकून देई.
पोट वाईट असतं, काहीही करायला लावतं, हे रेड लाईट एरियातल्या बायकांसारखं कुणीही ठासून सांगू शकत नाही…
बरीच वर्षे सलमाने तिच्या हक्काच्या खुशीच्या पैशांना शिवम्माला हात लावू दिला नाही.
तिची ही युक्ती तिला तिचे हक्काचे पैसे देऊन गेली.
शिवम्माच नव्हे तर कुणालाही याची कानोकान खबर लागली नाही.
मात्र, नियतीने याची दखल घेतली. नुसती दखलच घेतली नाही, तर कठोर शिक्षा दिली.
काही काळानंतर सलमाला मासिक पाळीत जेव्हा भयानक त्रास होऊ लागला तेव्हा तिने आधी अंगावर काढले पण त्रास सहन होईनासा झाला तेव्हा नाईलाजाने डॉक्टरांना दाखवले.
डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या आणि ते अक्षरशः चक्रावून गेले.
तिच्या योनीमार्गात गुटख्याच्या रिकाम्या पाकीटातून बारीक कण पसरत गेल्याने सगळीकडे गाठी होऊन त्या फुटायच्या बेतात आल्या होत्या !
तिला कॅन्सर झाला होता. ती लास्ट स्टेजमध्ये होती.
एनजीओच्या मंडळींनी तिला बिदरमधील नेहरू स्टेडियम रोडवरील गुदगे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
तिने साठवलेले पैसे याच कामासाठी वापरले जावे, हा दुदैवी योग होता.
सलमाच्या आजाराचे कारण कळताच शिवम्माच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
तिच्या प्रछिन्न अवस्थेचीही तिला दया आली नाही. तिने पुरते अंग काढून घेतले.
सुदैवाने तिचे फार दिवस हाल झाले नाहीत.
काही दिवसच ती जगली आणि एका पहाटे ती अल्लाहकडे गेली.
सलमाच्या मृत्यूनंतर तिचे रिश्तेदार असल्याची बतावणी करणारे काही लोक तिच्या राहिलेल्या रकमेवर हक्क सांगायला आलेले, पण सजग कार्यकर्त्यामुळे ते पैसे सलमाच्या इच्छेनुसार यतीमखान्यास दिले गेले.
मौतीनंतर सलमाला दोजख भेटले की जन्नत मिळाली, हे कळायला मार्ग नाही.
पण, बाईपणाच्या काय काय शिक्षा असू शकतात, याच्या या अणकुचीदार जाणिवेने माझा जीव कळवळून गेला.
पेपरातल्या घटना वाचून, जातधर्म ठरवून लोक निषेध करत असतील, पण ज्यांच्या यतीम योनीवर गीता, कुराण, बायबल, गुरुग्रंथसाहेब या सगळ्यांची एकत्रित घाण साठलेली असते ना, त्यांच्यासाठीही व्यथित व्हावंसं वाटत असेल, तर अशांनी इथल्या स्त्रियांची दुःखे जवळून जाणून घ्यावीत. त्यांचे अनेक गैरसमज दूर होतील. जगाला माहीत न होणाऱ्या अनामिक वेदना आणि दुःखांसाठी जे झटतात, त्यांना निषेधाची ही अथांग अधर्मलिपी निश्चित उमगते.
*****
कालीबाई आणि कांती
1982,
कामाठीपुरा, मुंबई
कांतीच्या धंद्याच्या पहिल्या रात्रीची घटना अत्यंत भीषण होती.
गुराहून अधिक मारहाण करून सगळे पैतरे अजमावून झाल्यावर अर्धमेल्या कांतीची नथ उतरवली होती. अर्धवट अचेतन अवस्थेतील कांतीचे वय तेव्हा चौदा असावे.
पाशवी पद्धतीने तिची नथ उतरवून झाल्यानंतर त्याच रात्री आणखी चारेक जणांनी तिला उपभोगले होते.
त्या रात्री तिच्यावर शेवटी जो अधम स्वार झाला होता, त्याने तिच्या कोवळ्या ओठातून त्याचा जबडा आत घालत तिच्या जिभेला इतक्या जोराने चावा घेतला की, जिभेचा तुकडा पडला.
ती वेदना इतकी तीव्र होती की, ती तत्काळ शुद्धीवर आली आणि जीवाच्या आकांताने तिने इतकी गगनभेदी किंचाळी फोडली की, तिच्या देहावर आरूढ झालेल्या नरपशुचे घाबरून वीर्यपतन झाले, तो कसाबसा कपडे चढवून पळून गेला.
तेव्हाच्या बिहारमधून (आताचा झारखंड) विकत आणलेली कांती या घटनेमुळे कायमची तोतरी बोलू लागली.
‘तोतरी’ कांती म्हणून ती अल्पावधीत कुप्रसिद्ध झाली.
मात्र, काही वर्षांनी तिने स्वतःला इतकं बदलवलं की, तिने अनेकांच्या अनेक ठिकाणी चावे घेतले होते.
दोन दशकांच्या काळात तिने स्वतःचा कुंटणखाना उभारला होता, नागपाडा पोलिस स्टेशनला त्या काळात तिचे किस्से चवीने चर्चिले गेले होते.
कांती एड्सने मरण पावली, तेव्हा कळले की तिच्याकडे जी संपत्ती होती, त्याचं तिने मृत्यूपत्र करून ठेवलं होतं.
बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या तिच्या परिचयातील काही डॉक्टरांना तिची संपत्ती दिली गेली.
बाईने जन्मच घेऊ नये, असे त्या वेड्या स्त्रीला वाटत होते !
जांभळ्या सावळ्या रंगाच्या कांतीला मी भेटू शकलो नाही, पण साठीपार केलेल्या बायकांकडून तिच्याबद्दल ऐकू शकलो.
एक शिडशिडीत बांध्याचा तेजतर्रार तरुण तिच्यावर इतका फिदा झाला होता की, त्याने तिच्यावर बरीच दौलतजादा केली होती आणि त्यातून तिने स्वतःचा अड्डा खोलला होता.
तो तरुण लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या एनकाउंटरमध्ये मारला गेला, दिलीप बुवा (खरे नाव दिलीप कोहक) त्याचं नाव.
माया डोळसच्या टोळीचा तो सर्वात शार्प शूटर होता. १९९१ मध्ये तो मरून गेला, पण कांतीचं भलं करून गेला.
उफाड्या अंगांच्या कांतीचा कमनीय देह अखेरच्या काळात खंगून गेला होता आणि कमावलेली सगळी दौलत तिने अशी चिल्लर खुर्दा वाटावी तशी वाटली होती.
मरताना कांतीचे वय चाळीशीहून कमी होते. रेड लाईट एरियात आयुष्य कंठताना तिच्या डोक्यात किती आणि कसले विचार आले असतील, या विचाराने अस्वस्थ व्हायला होते.
कांती म्हणजे रेड लाइट एरियातली अद्भुत आख्यायिकाच होय. तिचं आयुष्य अन्य बायकांच्या मानाने अगदी हटकं असंच राहिलं; मात्र तिच्या जिंदगीवर जशी तिची कमांड नव्हती, तसंच तिच्या मृत्यूवर देखील तिचे नियंत्रण नव्हते!
कांती आणि कालीबाई समकालीन होत्या. दोघींचा संबंध अंडरवर्ल्डशी आला, मात्र दोघींच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. कालीबाईची स्वप्ने कांतीसारखी प्रेमोदात्त नव्हती, हाच काय तो फरक होता.
एकोणीसशे ब्याऐंशीचं वर्ष असावं. कामाठीपुऱ्यातील कालीबाईकडे एक रिक्षावाला यायचा. काली ही नाकीडोळी नीटस असणारी चुणचुणीत पोरगी. चकाकता काळा रंग, शेलाट्या अंगाची शिडशिडीत उंच बांध्याची. काळेभोर लांबसडक केस आणि त्यात खोवलेल्या हेअरपिन्समध्ये मोगऱ्याच्या कळ्या आणि अबोलीची फुले एकाआड एक गुंफलेली असत. गळ्याजवळ काहीसं सैल आणि बाह्यापाशी आवळ असलेलं पोलकं आणि अंगावर प्लेन सिंगल कलर्ड जॉर्जेटच्या साड्या, तर कधी त्यावर सॅटिन पट्टेही असत. पारदर्शी लाल निळ्या खड्यांची सर तिच्या गळ्यात असे. आवाजात एकदम माधुर्य. बोलताना खांदे उडवून आणि हातवारे करून बोलण्याची भारी खोड होती तिला. त्यामुळे ती बोलू लागली की, आधी बांगड्यांची किणकिण कानी येई मग तिचा मंजुळ आवाज! आपल्या उभट भाळावर फिकट चॉकलेटी रंगाचं कुंकू लावे. तिच्या कपाळावर केसांची महिरप कायम खुली असे. भांगेत कुंकवाचा रंग चढलेला असे, नेमका तोच रंग कालीच्या ओठांचा होता. एकदम नाशिली चीज होती ती. मनमौजी छंदीफंदी. खास कस्टमर आलं की, दारू सिगारेट सगळं कसं तब्येतीनं करायची ती. तिचा एकच प्रॉब्लेम होता, ती सणकी होती. तिच्याकडे येणाऱ्या हरेक गिऱ्हाईकास ती होकार देत नसायची. जे गिऱ्हाईक तिला ठीकठाक वाटे, त्यालाच तिच्या खोलीचे दरवाजे खुले असत.
अंडरवर्ल्डमधली काही मंडळी तिला न्यायला रिक्षा, टॅक्सी पाठवत. कुणी पाठवलं याची खात्री करूनच मनाला पटलं, तर ती जायची. एकदा राजन नायरच्या हाताखालच्या काही सी ग्रेड भडभुंज्यांनी तिला नेलेलं. तिथं गेल्यावर तिने शय्यासोबतीस नकार दिला तेव्हा तिला कुत्र्यासारखं मारलेलं. तिने ही बातमी तिच्या खास गिऱ्हाईकाला दिली. त्याने त्याच्या बॉसला ही माहिती दिली. ज्याने राजन नायरच्या त्या गुंडांना धडा शिकवला. नंतर कालीला त्या बॉसचं चांगलंच वेड लागलं. बॉससोबत कालीची नस जुळण्यामागं आणखी एक कारण होतं. ते दोघंही केरळी होते. कालीचं खरं नाव मार्था होतं, तर त्याचं नाव होतं अब्दूल लतीफ कुंजू. त्याला स्मिता पाटील आवडायची. त्यानं कालीला कधीच काली म्हणलं नाही, तो स्मिता म्हणायचा. तिला मात्र ते आवडत नव्हतं. नंतर त्या कुंजूसोबत एक रिक्षावाला तिला दिसू लागला. काली त्याच्यावर जाम लट्टू होती. पण, त्याला तिच्याशी काही देणं घेणं नव्हतं.
१९८८ मध्ये अतिमद्यप्राशन केल्यानं नशेच्या अंमलात काली सज्ज्यातून खाली कोसळली. मेंदूला मार लागून रक्तस्त्राव झाला. काही दिवसांतच तिचा मृत्यू झाला. नेहमी मोजून मापून पिणाऱ्या कालीचं शेवटच्या काळात संतुलन ढासळलं होतं. ती बेहिशोब दारू ढोसू लागली होती. वास्तवात ती मोडून पडली होती. तिला जीव लावणाऱ्या कुंजूची राजन निकाळजेच्या गुंडांनी ऑगस्ट १९८७ मध्ये हत्या केली. यानंतर काही दिवसातच छोटा राजनच्याच हस्तकांनी काली ज्या रिक्षावाल्यावर भाळली होती, त्याचीही हत्या केली. कुंजू नामचीन गुंड होता. रिक्षावाला मात्र सराईत गुन्हेगार नव्हता. बहिणीच्या लग्नासाठी त्याला काही रक्कम हवी होती. मदतीच्या बदल्यात कुंजूने त्याला गंडवले. त्याच्या हातात रिव्हॉल्वर देऊन एकाला खलास करण्याची टीप दिली. ती टीप कुणा ऐऱ्यागैऱ्याची नव्हती, तर थेट राजन नायरची होती. त्याला पंधरा दिवस ट्रेनिंग दिलं. मर्डरच्या आदल्या रात्री त्याच्या हाती लाख रुपये टिकवण्यात आले. बहिणीच्या लग्नापायी दारोदार भटकत असणाऱ्या त्या भणंग माणसानं मागचापुढचा विचार न करता गेम वाजवली. राजन नायर खलास झाला. त्याचा बदला घेण्यासाठी छोटा राजनने कुंजूसह त्या रिक्षावाल्यासही खलास केलं. त्या रिक्षावाल्याचं नाव होतं चंद्रशेखर सफालिका!
सामान्य सभ्य जगात एखाद्या स्त्रीचं मन दुभंगलं, तर तिला सावरायला तिचं कुटुंब, भाऊबंद, आप्तेष्ट, मित्र, समाज सोबत असतो. पण, ज्या स्वतःच बेवारस असतात अशा स्त्रिया कोलमडून गेल्यावर त्यांना हात देणारं कुणी नसतं. म्हणूनच या बायका आपली असलीयत लपवत असतात, कुणावर जीव लावत नसतात. चुकून लावलाच, तर तो त्यांच्या जिवावरच बेततो. कदाचित यामुळेच यांच्या मिठीत ते सुख कधीच जाणवत नाही, जे अस्सल प्रेमात जाणवतं. पण, कालीसारख्या बायका याला अपवाद असतात. म्हणूनच चमडीबाजारच्या लेखी त्या महान ठरत नाहीत. त्यांचे किस्से मात्र अलवारपणे काळजात जतन केले जातात. ज्या जागी कालीचा प्रवास संपला होता, तिथं कित्येक दिवस एक सुगंधी परिमळ जाणवत होता. तिच्या ठायी घुमणाऱ्या मंद वासाच्या खास अत्तराचा तो दरवळ होता. खेरीज तिथे कोनाड्यात तिची विदीर्ण स्वप्नेही पडून होती.
या बायका अन्य स्त्रियांपेक्षा हटके होत्या, मात्र त्यांचं आयुष्य शापित यक्षिणीसारखं होतं. सुखाचा नुसता आभास होता. वास्तवात दुःखानेच त्यांना बळ दिलं आणि मोक्षही दिला. सभ्य पापी संसारी मंडळींना देखील मोक्ष लाभत नसतो. जरी या बायकांच्या जिंदगानीची लक्तरे झाली असली, तरीही या बायका अफाट ग्रेट होत्या हे नक्की.
रेखाटने – सुनील यावलीकर, अमरावती (९४०४६८९५१७)
साभार : ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२२
(लेखक नामवंत स्तंभ लेखक व ब्लॉगर आहेत.)
8380973977
…………………………………….
Great stories….there are no words.