गंगा – भागिरथी!

– शाहू पाटोळे

पूर्वी लग्नपत्रिकेत वा अन्यत्र कुठे एखाद्या स्त्रीच्या नावाच्या मागे ‘गंभा’ असा शब्द लिहिण्याची पद्धत होती. बरीच वर्षे मला त्या ‘गंभा’चा अर्थ माहीत नव्हता. जेव्हा त्या शब्दाचे पूर्ण रूप ‘गंगा-भागिरथी’ असून, तो शब्द विधवा स्त्रीसाठी योतात असे कळले, तेव्हा मला धक्काच बसला. पुढे चालून विधवा स्त्रीसाठी गतधवा, अभर्तृका, गतभर्तृका, रंडकी, बोडकी, विकेशा, पांढऱ्या कपाळाची, पांढऱ्या पायांची, हेही शब्द वाचून, ऐकून माहीत झाले. या शब्दांपेक्षा बहुजन समाजात विधवेसाठी वापरला जाणारा ‘गंगा-भागिरथी’ हा शब्द जरा ‘सन्मानजनक’ वाटत असला, तरी रांडवपणाशी ’गंगा-भागिरथी’ या हिंदू धर्मीयांसाठीच्या पवित्र नद्यांची नावे कुणी, कधी आणि का जोडली असावीत?

…………………………………………………….

एखाद्या पुरुषाची बायको वारली, तर त्याला आमच्या समाजात त्याला ‘रंडका’ झाला एवढा एकमेव शब्द वापरतात; आणि त्याचे दुसरे लग्न झाले, तर त्याच्या पत्नीला ‘दुसवट्यावर’ दिलीय, असं म्हणतात. तेच निधनोत्तर स्त्री-पुरुषांच्या नावांच्या आधी ते वारकरी सांप्रदायातील असतील तर, अवर्जून ‘वै.’ अर्थात वैकुंठवासी आणि अन्य असतील तर ‘कै.’ अर्थात कैलासवासी लिहीत असत. मुस्लिमांमध्ये स्त्री-पुरुषांसाठी ‘पै’ लिहीत असत, अर्थात पैगंबरवासी. अशात मुस्लिमांमध्ये असं लिहितात की नाही, हे माहीत नाही. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून पुरोगामी महाराष्ट्रात ‘विधवा प्रथा बंद करण्याबाबत जनजागृती’ कार्यक्रम होत असून, अनेक गावातील ग्रामपंचायतींनी तसे ठराव मंजूर केले आहेत. असे ठराव पास करणाऱ्या ग्रामपंचायतीतील स्त्री-पुरुष पुढारी वा कार्यकर्त्यांची नावे वाचली, तर त्या नावांमध्ये बहुजनांची संख्या लक्षणीय आहे.

सामाजिक अंगाने शोध घेत असता महाराष्ट्राच्या बाबतीत असे लक्षात येते की, विधवा स्त्रियांवरील सर्वात जास्त बंधने ही ब्राह्मण समाजात होती. अपवादात्मक सतीप्रथा, केशवपन, आलवण वापरणे, मिताहार घेणे, पुनर्विवाह न करणे वगैरे. काही क्षत्रिय स्त्रिया सती गेल्याची उदाहरणे सांगितली जातात. मूळ क्षत्रियांमध्ये काडीमोड झाल्यावर वा विधवा झाल्यावर पुनर्विवाह करण्याची प्रथा नव्हती. शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या सधन जातीतही स्त्रियांचे दोन्ही बाबतीत पुनर्विवाह केले जात नसत. समजा पुनर्विवाह झालाच, तर त्या घराला पुढे त्याच जातीतील लोकांकडून बरोबरीचा मान दिला जात नसे. रोटी व्यवहार होत असत, पण त्यांच्याशी विवाह संबंध जोडले जात नसत. आजही ही पद्धत उघडपणे पाळली जाते. ‘‘आम्ही एकाच जातीचे आहोत, पण ते खालचे आहेत,’’ हे आजही ऐकायला येते. ज्या जाती ब्राह्मणांचे अनुकरण करीत असत, त्या जातींतील विधवांना ब्राह्मण विधवांसारखीच वागणूक मिळत असे. ब्राह्मणेतरांमधील कोणत्या अशा जाती होत्या, ज्यांच्यामध्ये विधवांचे पुनर्विवाह केले जात नसत? किंवा पूर्वी विधवांचे विवाह करण्यास सामाजिक मान्यता होती, पण आपल्यापेक्षा तथाकथित वरच्या जातींचे बघून विधवा विवाह बंद केले असतील? अशा जातींमधील ‘सुजाण’ लोकांनी पुनश्च एकदा जुनी परंपरा स्त्रियांच्या सन्मानार्थ पुनरुज्जीवित केली असेल, तर त्याचे स्वागतच व्हायला हवे!

आमच्यात, अर्थात तथाकथित पूर्वास्पृश्य जातींमध्ये मात्र काडीमोड, पुनर्विवाह, विधवांचे विवाह ही सर्वसामान्य बाब होती; त्याला त्या-त्या समाजापुरती मान्यताही होती आणि त्यात काही तरी वेगळं करतोय, हा अभिनिवेशही नव्हता. समजा एखाद्या स्त्रीचा काडीमोड झाला, तर मुलं बहुतेक करून आई मागे जात असत. तरुण वयात विधवा झाली, तर ती पुनर्विवाह करीत असे. मुलं मोठी, अर्थात कळत्या वयाची असतील, तर ती वडिलांकडे राहात असत आणि ती मुलं आईमागे नवीन घरी लग्न होऊन गेली, तर त्यांना ‘गाई म्हागं वासरू गेलं किंवा आलं’, म्हणत असत. काही वेळा त्या मुलांचे नवीन वडील वा सावत्र बाप त्या मुलांना आपले नाव लावीत असत. त्या स्त्रीला दुसऱ्या पतीपासून आणखी मुलं झाली, तर ती सावत्र भावंडं गणली जात नसत, तर त्यांना ‘दूध पार्टी’ भावंडं म्हणत असत.

पुनर्विवाहाची पद्धतही खूप सोपी आणि सुटसुटीत होती. त्याला ‘गाठ मारणे’, ‘पाट लावणे’ किंवा ‘म्होतूर लावणे’ म्हणत असत. रात्रीच्या वेळी विवाहेच्छुकांना डालग्यात उभे करून समाजातील वयस्कर माणूस स्त्रीच्या पदराची पुरुषाच्या उपरण्याशी गाठ बांधीत असे. अशा पद्धतीने घरी आणलेल्या स्त्रीला ‘गाठीची’ म्हणत असत. पुनर्विवाह करणारी स्त्री जर अविवाहित पुरुषाशी लग्न करीत असेल, तर त्याला ‘पाट लावणे’ म्हणत. गाठीत स्त्री-पुरुष दोघांचाही दुसरा विवाह असे. त्यालाच थोडे हिणकसपणे ‘म्होतूर’ हा उपहासात्मक शब्द वापरतात. या विवाहविधीच्या प्रसंगी लहान मुलांना तिथं उपस्थित राहू देत नसत. या प्रकारचा विवाह केलेल्या स्त्रीला सवाष्ण स्त्रीचा मान त्या-त्या समाजात दिला जात नसे. बऱ्याचदा अशा जोडप्यांच्या कुटुंबांशी स्वत:ला त्यातल्या त्यात ‘कुलीन’ समजणारे विवाह संबंध जोडीत नसत. त्यांच्या संततीला ते ‘कडूचं हाय’ असं संबोधीत असत. पण पुढे-पुढे कुलीन कुटुंबं अल्पसंख्य ठरुन त्यांचे जवळच्या नात्यात ‘आतड्यात गुतडा’ होऊन विवाह होत असत.

तसेच पूर्वास्पृश्य जातींमध्ये मयत झाल्यावर स्त्रियांना धायऱ्यात, अर्थात स्मशानात जाण्यास मनाई नव्हती, नाही. (धायरा म्हणजे स्मशान, सोयराधायरा हा शब्द विभक्त केला की अर्थ लागेल). शिवाय, या जातींमध्ये दफन करण्याची पद्धत होती आणि मयतीच्या तिसऱ्या दिवशी माती सावडली की, थेट वर्षश्राद्ध केलं जात असे. हल्ली कुणाला मयत जाळण्याचं परवडत असेल, तरीही ते ‘मातीला चाललोय’ असंच म्हणतात किंवा ‘‘माती सावडायला चाललोय,’’ म्हणतात.
तर, मुद्दा असा आहे की, ब्रिटिशांच्या काळात सतीचा चाल बंद करण्यासाठी ज्यांनी चळवळ उभारली, ते राजा राममोहन रॉय हे जन्माने कायस्थ होते आणि महाराष्ट्रात ब्राह्मण स्त्रियांच्या केशवपनाविरुद्ध नाभिकांना सोबत घेऊन चळवळ चालविली, ती बहुजन असलेल्या महात्मा फुले यांनी. याला म्हणतात स्त्रियांचा कळवळा. दोघांनीही त्या स्त्रियांकडे ‘ब्राह्मण’ म्हणून बघितले असते तर?

या लेखाच्या निमित्ताने हेही सांगावेसे वाटते की, ‘विधवा प्रथा बंद करा’ या चळवळीची गरज आम्हा तथाकथित पूर्वास्पृश्यांना कधीच नव्हती. आम्ही ना आदिम जमातींमध्ये मोडत होतो, ना तथाकथित अभिजनांमध्ये मोडत होतो. त्यामुळे आम्हाला अशा प्रकारच्या चळवळीची आणि प्रबोधनाची कधीच गरज पडली नाही. उलट आमच्या या मानवीय प्रथा-परंपरांची खिल्ली उडविली गेली, त्या प्रथांकडे हीन म्हणून बघितले गेले. आमच्यातील जे साक्षर होत गेले, जे अभिजन होण्याच्या नादाला लागले, त्यांना आपल्या या प्रथा-परंपरांची लाज वाटायला लागली. जी गोष्ट आपल्याच आया-बहिणींना जगण्याचा हक्क देत होती, ज्या प्रथेने स्त्रियांच्या तना-मनाचा कोंडमारा केला नाही, त्यांना पुरुषांच्या बरोबरीचा हिस्सा मिळाला, भलेही त्यात सन्मान नसेल सुद्धा! पण, त्यांना संस्कृती, धर्म, रूढी, परंपरा यांच्या नावाखाली मन मारायला सक्ती केली नाही, की बाई माणूस म्हणून त्यांचे मुक्त जगणेच नाकारले! प्रबोधनाच्या चळवळीची दीर्घ परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आजही ‘विधवा प्रथा’ बंद करण्याची चळवळ सुरू होतेय आणि या चळवळीला ‘वैचारिक विरोध’ असल्याच्या बातम्याही कानांवर येतात, तेव्हा फुले दांपत्याला विरोध करणाऱ्या प्रवृत्ती आजही सामाजिक ’स्लीपर सेल’मध्ये जिवंत असल्याचे जाणवते. महाराष्ट्रातच ही परिस्थिती असेल, तर गायपट्ट्यात आणि भागवत कथेला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावणाऱ्या भागातील स्त्रियांची मानसिकता कशी असेल?

रेखाटने – सुनील यावलीकर

(साभार : ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२२)

(लेखक ‘भारत जोडो…उसवलेले दिवस’, ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ आदी गाजलेल्या पुस्तकांचे लेखक आहेत)

9436627944

Comments are closed.