गांधींचा अर्थविचार

-गांधी -150 – गांधी कथा

एका दिवस बिर्लांनी  गांधीजीना विचारलं ” तुमच्या मते प्रत्येक माणसाला खाणे, कपडालत्ता आणि सुखात राहण्यासाठी किती पैशात निर्वाह करता येईल ?”

गांधीजीनी उत्तर दिलं ” ज्यात सुखपूर्वक निरोगी राहून निर्वाह करता येईल तेवढ्या पैशात.”

बिर्ला म्हणाले ” म्हणजे डाळ,भात,पोळी,भाजी,फळे,तूप,दूध,सुती आणि गरम कपडे आणि जोडे.”

गांधीजी म्हणाले ” या देशात जोड्यांची आवश्यकता वाटत नाही. खडावा आवश्यक म्हणा. तूप जास्त नको.”

बिर्लांनी विचारले ” दंतमंजन, साबण, ब्रश इत्यादी?”

गांधीजी बोलले ” अरे याची काही आवश्यकता असते का?”

बिर्लांनी विचारलं ” घोडा?”

सर्वजण हसले . बिर्ला म्हणाले ” ते सर्व जाऊ दे. तुमच्या मते गरीब माणसाचं बजेट किती रुपयांचे असायला हवं? शंभर रुपयांपेक्षा कमी रकमेत कोण सुखानं जगू शकेल का? हे माझ्यासारख्या माणसाच्या बुद्धीच्या पलीकडलं आहे.”

हरिभाउ उपाध्याय तिथंच बसले होते. म्हणाले ” सर्वसाधारण माणसाचं बजेट बनवून पाह्यलं. दरमहा पन्नास रुपये खूप झाले.”

गांधीजीना पन्नास रुपये सुद्धा अधिक वाटले. ते म्हणाले ” महिना पंचवीस रुपये पुरेसे आहेत.”

बिर्ला म्हणाले ” हे अशक्य आहे.”

गांधी बोलले ” ठीक आहे. निरोगी राहण्यासाठी काय काय लागतं त्याची यादी करा. जर पंचवीसपेक्षा जास्त आला तर मला काय अडचण आहे. पण मला हे माहीत आहे की प्रत्येक माणसाला दरमहा पंचवीसपेक्षा जास्त रुपये खाण्यासाठी मिळाले तर इथे रामराज्य येईल.”

बिर्लांनी  विचारलं ”आणि जर कोणाला पन्नासपेक्षा जास्त मिळायला लागले तर ?”

गांधीजीनी उत्तर दिलं ” जास्त मिळायला लागल्यावर त्याचा उपभोग होईल. तो अनावश्यक खर्च असेल. अशा माणसाला मी त्यागाचा उपदेश देईन.”

बिर्लांनी परत विचारलं ” महात्माजी, समजा प्रत्येक माणसाचं उत्पन्न महिना दोनशेपेक्षा अधिक झालं तर तुम्हाला काही अडचण होईल का? ”

गांधीजी बोलू लागले ” मला अडचण होणार नाही. तशी अडचण होउ शकते. प्रत्येक माणसाला आवश्यक वस्त्र आणि जगण्यासाठी इतर गरजेच्या वस्तू सुखाने मिळाव्यात एवढंच निसर्ग निर्माण करतो. माणसाने उधळपट्टी करावी यासाठी निसर्ग नक्कीच निर्मिती करत नाही. याचा अर्थ एका माणूस आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिक उपभोग घेत असेल तर दुसऱ्याला उपाशी रहावं लागतं. त्याला मी लुटारूची उपमा देतो. आपल्यासाठी पन्नास रुपयांहून अधिक खर्च करतात ते सगळे लुटारू आहेत. इंग्लंड छोटासा देश आहे. तिकडच्या साडेतीन कोटी लोकांनी भोग विलासात रहावं म्हणून संपूर्ण आशिया खंड उध्वस्त होतोय. जर भारतातील ३२ कोटी लोकांनी दरमहा दोनशे रुपये किंवा त्याहूनही जास्त खर्च करायचं ठरवलं तर जगाची वाट लागेल. भारतीय माणसे इंग्रजांसारखी उपभोगी व्हावीत असा दिवस ईश्वराने आणू नये. समजा असं झालंच तर ईश्वरच रक्षण करू शकतो. साडेतीन कोटी लोकांची भोगवृत्ती शमविण्यासाठी हा देश मरत चाललाय. बत्तीस लोकांची भूक शमवायला तर जगाला मरावं लागेल.”

बिर्ला म्हणाले ” महात्माजी, जर दोनशे किंवा अधिक उत्पन्न मिळविणाऱ्यांना आपण लुटारू म्हणत असाल तर मारवाडी, गुजराथी, पारशी, शेट्टी हे सगळे लुटेरे आहेत ?”

गांधीजी गंभीरपणे म्हणाले ” यात काय शंका आहे का? वैश्य लोकांच्या हितासाठी प्रायश्चित म्हणून मी वैश्यवृत्ती सोडून दिली.”

सौजन्य – विजय तांबे

Previous articleमला समजलेला गांधी – डॉ. अभय बंग
Next articleपहिली गं भुलाबाई देवा देवा साजे !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.