गोठणगावातील निर्वासितांचा श्वास तिबेट, ध्यास तिबेट…

 

– नितीन पखाले

तिबेट म्हटले की, आपल्या नजरेसमोर क्षणार्धात येतात ते दलाई लामा, बौद्धधर्मीयांची प्रार्थनास्थळे, उबदार स्वेटर व शाल विकून उदरनिर्वाह करणारे तिबेटी नागरिक. निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण केलेल्या तिबेटला चीनने दडपशाही, बळजबरीने १९५९ मध्ये बळकावले. बुद्धांच्या त्या शांतताप्रिय भूमीतील हजारो तिबेटींनी तेव्हापासून भारतात आश्रय घेतला आहे. भारतात त्यांच्या सात वसाहती आहेत. त्यापैकी एक वसाहत महाराष्ट्राच्या पूर्व टोकाला, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे आहे. या तिबेटी वसाहतीची ही खबरबात.

……………………………………………………………

नागपूरपासून दीडशे किलोमीटरवर गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगाव येथे गेलो, तर आपणास तिबेटमध्ये आल्याचा भास होतो. घनदाट जंगलातील निमुळते रस्ते, सर्वत्र हिरवाई, वनराई आणि इटियाडोह धरणाचा डावा-उजवा कालवा, रस्त्यावर जागोजागी दिसणारी खास तिबेटी पद्धतीची रंगबिरंगी तोरणं, सर्वत्र तिबेटी भाषेतील अक्षरं, कौलारू बसकी पण टुमदार घरं (आता काही ठिकाणी सिमेंट काँक्रिटच्या इमारती उभ्या झाल्या आहेत), तिबेटी पेहरावात हसतमुख स्वागत करणाऱ्या महिला, पुरुष, भिक्खूंच्या पोषाखातील शाळकरी मुले-मुली, त्यांचे निरागस हास्य… जणू आपण तिबेटमध्येच असल्याचा फिल येतो. मात्र, भारतीयांसाठी अनुकूल असलेला येथील निसर्ग, थंड प्रदेशातील तिबेटी नागरिकांकरिता तसा प्रतिकूलच. अशा प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत बर्फाळ प्रदेशातून आलेल्या तिबेटी नागरिकांनी हजारो किलोमीटरवर उष्ण, दमट प्रदेशातील महाराष्ट्रात प्रतितिबेट निर्माण केले आहे. येथे केवळ तिबेट निर्माण करून हे नागरिक थांबले नाही, तर तेथील संस्कृती, भाषा, सण, उत्सव, परंपरा एवढ्या वर्षांनंतरही जपून ठेवल्या आहेत. तिबेटी मूळ कायम ठेवत भारतीय संस्कृतीसोबतही जुळवून घेत येथील भाषा, परंपराही त्यांनी आत्मसात केल्या आहे.

तिबेटी नागरिकांना येथे येऊन ५० वर्षे झाली आहे. २०२२ हे वर्ष गोठणगाव तिबेटी वसाहतीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. तरीही, या तिबेटियन्सचे मन मात्र अद्यापही इकडे रमले नाही. ते शरीराने या निर्वासित छावणीत राहत असले, तरी मन आजही सात दशकांपूर्वी मागे सोडून आलेल्या आठवणींसह आपल्या मायभू तिबेटमध्येच आहे. १४ वे दलाई लामा यांना ‘देव’ मानून येथील प्रत्येक माणूस आपला तिबेट आज ना उद्या चीनच्या तावडीतून नक्कीच स्वतंत्र होईल, हा आशावाद बाळगून आहे. भविष्यात बलाढ्य चीन तिबेटमधून नक्कीच माघार घेईल आणि आपल्या देशात पुन्हा स्वातंत्र्याची पहाट उगवेल, हा आशावाद गोठणगावातील प्रत्येक तिबेटी नागरिकांच्या बोलण्यात जाणवतो. वर्तमानात जगण्यासाठी चाललेल्या संघर्षासोबत त्यांनी आता मैत्री केली आहे. मात्र, भूतकाळात चीनने दिलेल्या जखमांची सल त्यांच्या मनात कायम आहे.
गोठणगाव ही तिबेटियन्स नागरिकांची महाराष्ट्रातील एकमेव वसाहत आहे. नसानसांत देशाभिमान भिनलेले हे तिबेटियन १९७२ पासून गोठणगावात वास्तव्यास आहेत. अतिथंड प्रदेशातून ते महाराष्ट्रात, त्यातही पूर्व विदर्भातील कोरड्या, उष्ण वातावरणात वास्तव्यास आले, तेव्हा त्यांच्या मनावर आणि विशेषत: शरीरावर झालेले परिणाम सांगताना आजही या तिबेटियन नागरिकांचे डोळे पाणावतात. तिबेटी नागरिकांचा महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात स्थायिक होण्याचा प्रवासही मोठा रंजक आहे. याबाबत बोलताना गोठणगाव येथील ‘तिबेटियन सेटलमेंट ऑफिसर’ धोंडूप सँगपो म्हणाले, ‘‘चीनच्या आक्रमणापूर्वी तिबेट हा ६० लाख लोकसंख्येचा स्वतंत्र देश होता. मात्र, ७ आक्टोबर १९५० रोजी चिनी सैनिकांनी हा शांत प्रदेश बेचिराख केला. सर्व जगाने चीनच्या या आक्रमणाची निंदा केली, मात्र बेमुर्वत चीनच्या हृदयाला पाझर नाही फुटला. आमचा विरोध मोडीत काढून, आमच्या हजारो बहीण, भावांना, लहान मुलांना जिवानिशी ठार मारून चीनने क्रूरतेची सीमा ओलांडली. हा संघर्ष नऊ वर्षे सुरू असताना १० मार्च १९५९ रोजी ‘ऑपरेशन तिबेट’ पार पडले. त्यानंतर १७ मार्च १९५९ रोजी आमचे गुरु चौदावे दलाई लामा तेंझिन ग्यात्सो यांनी तिबेट सोडून भारतात आश्रय घेण्याचा निर्णय घेतला. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दलाई लामांसह तिबेटी नागरिकांना भारताची दारं आश्रयासाठी खुली करून दिली. सुमारे ८० हजार तिबेटी नागरिकांना सोबत घेऊन दलाई लामा भारतात आले. प्रारंभी हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथे दलाई लामांनी निर्वासित तिबेट सरकार अस्तित्वात आणले. त्यानंतर लाखो तिबेटी निर्वासितांच्या वसाहतींसाठी भारतातील योग्य प्रदेशांचा शोध सुरू झाला. हिमाचल प्रदेश, अरुणाचल, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, मध्यप्रदेश (आताचे छत्तीसगड), ओरिसा, कर्नाटक या राज्यांत वसाहतींसाठी जागांचा शोध घेण्यात आला. उत्तर-ईशान्य भारतातील थंड प्रदेशांमध्ये तिबेटी नागरिकांचे वास्तव्य नैसर्गिक होते. मात्र, महाराष्ट्रातील उष्ण, दमट गोठणगावात वसाहत निर्माण करणे, हा अनेकांच्या आकलनापलीकडचा विषय ठरला. ही वसाहत हिमाचल प्रदेशातून येथे आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरणाच्या आधाराने ही वसाहत उभी राहिली असावी. १ ते ३ फेब्रुवारी १९७२ या कालावधीत जवळपास एक हजार तिबेटी नागरिक गोठणगावात दाखल झाले. तेव्हा नुकत्याच उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्या होत्या. एप्रिल-मे महिन्यात तर गोरेपान आणि नाजूक कांती असलेल्या तिबेटियन्सची त्वचा अक्षरश: भाजून निघत होती. उन्हाच्या काहिलीने अनेकांना जगणे असह्य झाले. इटियाडोह धरणाच्या कालव्यात ते तासन्‌तास डुंबून पडायचे आणि जीव थंडा करायचे. हा एकमेव उद्योग काही महिने चालला. मात्र, तरीही उष्ण वातावरणामुळे दररोज एक, दोन तिबेटी नागरिकांचे मृत्यू होत होते त्यामुळे अनेकांनी हा प्रदेश सोडून पुन्हा हिमाचल प्रदेश गाठले. हा प्रकार जवळपास चार, पाच महिने चालला. नंतर येथील वातावरणाशी आमच्या पूर्वजांनी जुळवून घेतले आणि आमचे जीवन थोडे सुसह्य झाले,’’ धोंडूप सँगपो सांगत होते.

‘‘१९७२ मध्ये येथे आल्यानंतर तिबेटी इटियाडोह धरणाच्या आधाराने थंडावा शोधत तंबूत राहात होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने बुटाई क्रमांक एक नजीक या निर्वासितांचे पुनर्वसन केले. दोन कुटुंबांना एक घर मिळून दोन कॅम्प तयार झाले. ‘नॉरगेलिंग तिबेटियन सेलटमेंट’ असे या वसाहतीचे नाव आहे. या कॅम्पला स्थानिक नागरिक ‘वरची’ आणि ‘खालची’ वसाहत म्हणतात. वरची वसाहत म्हणजे २३८ क्रमांकाचा कॅम्प आणि खालची वसाहत म्हणजे २३९ क्रमांकाचा कॅम्प. या दोन्ही वसाहती मिळून जवळपास १६५ घरे येथे आहेत. साधाणत: १२०० नागरिक या वसाहतींमध्ये वास्तव्यास आहेत. शासनाने प्रतिव्यक्ती ६० डिस्मिल याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी शेतजमीन दिली. एकूण ६१२ एकर जमिनीत ही वसाहत आहे. यापैकी ४०५ एकर जमिनीवर भातशेती करून उदरनिर्वाह चालतो. दोन वसाहतींचे मिळून दोन सरपंच लोकशाही पद्धतीने निवडले जातात. दोन्ही वसाहतींचा प्रशासन प्रमुख हा ‘तिबेटियन सेटलमेंट ऑफिसर’ (टीएसओ) असतो. ‘तिबेटी रिहॅबिलेशन पॉलिसी’नुसार या कॅम्पचा कारभार ‘टीएसओ’ सांभाळतो. हा अधिकारी थेट धर्मशाळा येथील मुख्य प्रशासकीय भवनाशी समन्वय ठेवून दैनंदिन कामकाज, सोयीसुविधा, अडीअडचणी हाताळतो,’’ २३९ क्रमांकाच्या कॅम्पचे सरपंच जामयांग टेस्रीन वसाहतीच्या कामकाजाबद्दल माहिती देत होते.

तिबेटियन म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर स्वेटर येतं. आजही थंडीच्या दिवसांना सुरुवात झाली की, बहुतांश शहरांमध्ये ज्यांना आपण नेपाळी समजतो, ते तिबेटी नागरिक स्वेटर विक्रीसाठी दाखल होतात. आपण त्यांना नेपाळी, चपटे आदी विशेषणे लावून त्यांचा उपमर्द करत असलो, तरी हे तिबेटियन्स प्रचंड चिकाटी असलेले लोक आहेत. चार महिने स्वेटर विक्रीचा आणि इतर दिवसांत भातशेतीचा व्यवसाय येथील नागरिक करतात. स्त्रिया घराबाहेर फारशा पडत नाहीत. स्वेटर विक्रीच्या व्यवसायात मात्र त्या आघाडीवर आहे. इतरवेळी वसाहतीत मुख्य मंदिरात दोन वेळेस आरती आणि शांतिपाठासाठी महिला जमतात. दिवसभर घरगुती कामात त्या व्यस्त राहतात. शेतीची कामे पुरुष करतात. गोठणगाव वसाहतीत राईस मिलसुद्धा आहे. भात हेच मुख्य पीक असल्याने दैनंदिन आहारात भाताचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, शाकाहारी आणि मांसाहारी अशी दोन्ही प्रकारच्या भोजनाची आवड येथील नागरिकांना आहे. हे लोक अत्यंत कष्टाळू वृत्तीचे आहेत. त्यामुळे कोण काय म्हणतं, याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष ठेवणे, हे जास्त महत्त्वाचे समजतात. गोठणगावात जाण्यापूर्वी या गावात स्वेटर निर्मिती किंवा विक्री केंद्र असल्याचा आपला समज होतो. मात्र, हे नागरिक हिमाचल प्रदेश, दिल्ली, लुधियाना आदी ठिकाणांहून स्वेटर मागवून त्याची गावोगावी विक्री करतात. पूर्वी येथे हस्तनिर्मित गालिचे, कारपेट तयार केले जायचे. ते महाराष्ट्रात प्रसिद्धही होते. त्यामुळे स्थानिक विणकरही खूष होते. मात्र, कालांतराने गालिच्यांची मागणी कमी झाली आणि हा व्यवसाय आता पूर्णत: बंद झाला आहे. त्यामुळे गावातील अनेक तरुण, तरुणी रोजगाराच्या शोधात वसाहतीतून बाहेर पडले आहेत. मुंबई, नागपूर, गोंदिया, रायपूर, दिल्ली आदी शहरांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंटसह इतर ठिकाणी काम करून हे तरुण पैसे कमवत आहेत. दलाई लामांच्या वाढदिवसाला ते वसाहतीत आपल्या घरी येतात. हिवाळ्याच्या चार महिन्यांत स्वेटर विक्रीच्या व्यवसायात मदत करतात.

गोठणगावातील सांस्कृतिक, धार्मिक उत्सवाबद्दल माहिती देताना सैन्यातून निवृत्त झालेले फौजी सोनम म्हणाले, ‘‘ही भूमी दलाई लामा यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. तिबेटियन संस्कृती ही समृद्ध वारसा लाभलेली आणि बुद्धांचे तत्त्वज्ञान जगणारी आहे. तिबेटी नागरिक बौद्ध धर्म मानतात. मात्र, भारतात मिळालेल्या आश्रयानंतर हिंदू धर्माचाही तेवढाच सन्मान ठेवतात. भारतात, इथे महाराष्ट्रात सर्वधर्मीय नागरिक एकमेकांच्या धर्मांचा सन्मान ठेवत, एकमेकांच्या सण, उत्सवांत आनंदाने सहभागी होतात. हीच तर बुद्धांची सर्वसमावेशकत्वाची शिकवण आहे. त्यामुळेच आम्हाला येथे परक्यासारखे वाटत नाही. या वसाहतींत सर्व सण, उत्सव उत्साहात साजरे केले जातात. दलाई लामा यांना १० डिसेंबर १९८९ रोजी शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार मिळाला. हा दिवस आम्ही दरवर्षी उत्साहात साजरा करतो. शिवाय, दलाई लामांचा वाढदिवस, ६ जुलै म्हणजे आमच्यासाठी दिवाळी. तिबेटियन्सचे नववर्ष ‘लोसर’ हे फेब्रुवारी-मार्च महिन्यात येते. हा दिवसही उत्साहात साजरा केला जातो. १० मार्च हा ‘ऑपरेशन तिबेट’ दिन स्मृतिदिवस म्हणून पाळला जातो. तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी शांतीच्या मार्गाने लढताना १५४ नागरिक शहीद झाले. त्यांच्या स्मृती आम्ही वसाहतीत जपल्या आहेत. आम्ही येथे उभारलेला शहीद स्तंभ तिबेटियन्स नागरिकांच्या अहिंसक मुक्तिलढ्याची कायम आठवण करून देत असतो. या शिवाय भारतीयांचे दिवाळी, होळी हे सणही वसाहतींत उत्साहात साजरे केले जातात. भारतीयांनी दिलेले प्रेम आणि संरक्षणाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिबेटी वुमेन्स असोसिएशनच्या महिला अर्जुनी मोरगाव व परिसरातील नागरिकांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधतात,’’ फौजी सोनम सांगत होते.

‘‘गोठणगावात बौद्ध धर्माची शिकवण देणारे गुरुकुल आहे. बौद्ध धर्माच्या अध्यापनासाठी विविध वसाहतींमधून येथे विद्यार्थी येतात. आज घडीला नेपाळचे १५, तर आसाममधून आलेले पाच विद्यार्थी येथे ज्ञानार्जन करीत आहेत. येथील दोन्ही वसाहतींसाठी केंद्र सरकारच्या वतीने एक सेंट्रल तिबेटियन स्कूल चालविले जाते. मात्र, येथे केवळ पाचवीपर्यंतच शिक्षणाची सुविधा आहे. पुढील शिक्षणासाठी इतर राज्यातील वसाहतींमध्ये जावे लागत असल्याने उच्च शिक्षणाबाबत येथील विद्यार्थ्यांमध्ये फारशी उत्सुकता दिसत नाही. मात्र सैन्यभरतीबाबत प्रचंड ओढ आहे. या वसाहतीतील एका घराआड प्रत्येक कुटुंबातील एक तरी तरुण सैन्यात दाखल होतो. खालच्या वसाहतीत मुख्य प्रार्थनास्थळ आहे. या मंदिरात गौतम बुद्धांची मूर्ती विराजमान असून, दलाई लामा यांचे मोठे कटआऊट पूजास्थानी आहे. या ठिकाणी दररोज सकाळी आठ आणि सायंकाळी पाच वाजता वसाहतीतील सर्व नागरिक प्रार्थनेकरिता एकत्र जमतात. येथेच अनेक विषयांवर चर्चा होतात. दलाई लामा ज्यावेळी गोठणगाव येथे येतात, तेव्हा याच प्रार्थनाघरात त्यांचा मुक्काम असतो. येथेच ते नागरिकांना संबोधित करतात. याच प्रार्थनाघरात गौतम बुद्धांनी उपदेश दिलेल्या १०० पोथींचा संग्रह आहे. या पोथींचा संस्कृत भाषेतून तिबेटी भाषेत अनुवाद केला आहे. तिबेटियन्सचे १५ वे धर्मगुरू पेंचिम लामा यांची प्रतिमा या मंदिरात आहे. १४ वे दलाई लामा तेंझिन ग्यात्सो यांच्यानंतर पेंचिम लामा हे तिबेटी धर्मगुरू होत. मात्र, ते अवघ्या सहा वर्षांचे असताना चीनने त्यांचे अपहरण केले. आजही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. दलाई लामांप्रमाणे पेंचिम लामांप्रति आम्हाला प्रचंड आस्था आणि श्रद्धा आहे,’’ अशी माहिती येथे बौद्ध धर्माची शिकवण देणारे शिक्षक पेमा वासेर यांनी दिली.

‘‘वसाहतीतील ६० वर्षांवरील वृद्धांसाठी स्वित्झर्लंड व जपान येथील तिबेटी नागरिकांच्या आर्थिक साहाय्यातून वृद्धाश्रम चालवल्या जातो. १९७२ मध्ये येथे आलेले दोन नागरिक आजही या वृद्धाश्रमात आहेत. दिवसभर नामजप आणि प्रार्थना, गप्पागोष्टींत या वृद्धांचा वेळ जातो. वसाहतीतील तरुण महिला, पुरुष या वृद्धांची काळजी घेतात. वसाहतीत प्राथमिक आरोग्य केंद्र, जडी-बुटी आयुर्वेदिक दवाखाना, युनियन बँक, पोस्ट ऑफिस अशा सुविधा उपलब्ध आहेत. बहूद्देशीय तिबेटियन को-ऑपरेटिव्ह संस्था, भारत-तिब्बत संघ, तिबेटियन यूथ व वुमेन्स असोसिएशन या सामाजिक संघटना येथे कार्यरत आहेत. गावातील रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सोयीसुविधांकडे महाराष्ट्र शासन लक्ष देते. वसाहतीतील तरुण, तरुणींचे विवाह भारतात विविध ठिकाणी वसलेल्या तिबेटी वसाहतींमध्येच जुळविले जाते. शक्यतो आई-वडिलांच्या पसंतीने ‘अरेंज मॅरेज’ला तिबेटी युवक-युवती पसंती देतात. मुलासाठी २८, तर मुलीसाठी २३ ते २५ हे येथील लग्नाचे वय आहे. बालविवाह, हुंडाप्रथा नाही. कोणी हा प्रयत्न केलाच, तर त्याला कठोर शिक्षा सुनावली जाते. वसाहतीतील तरुण-तरुणींना वसाहतीबाहेर कोणाच्या प्रेमात पडता येत नाही. महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. लग्न झालेल्या महिला पारंपरिक पोषाख करतात. आपल्याला या महिला ‘ॲप्रन’सारखा प्रकार घातलेल्या दिसतात. हे ॲप्रन म्हणजे या महिला विवाहित असल्याचे चिन्ह आहे. (जसे आपल्या संस्कृतीत मंगळसूत्र घालतात) याला तिबेटी भाषेत ‘छुपा’ म्हणतात, अशी माहिती नव्यानेच विवाहबंधनात अडकलेल्या व हिमाचलमधून पतीसह गोठणगाव येथील वसाहतीत आपल्या आप्तेष्टांना भेटायला आलेल्या पंगदेंग या तरुणीने दिली.

आजच्या घडीला भारतात एक लाखांवर तिबेटियन्स विविध वसाहतींमध्ये वास्तव्यास आहेत. हिमाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, अरुणाचल, सिक्कीम, छत्तीसगड, ओरिसा, जम्मू काश्मीर या राज्यांत १५ शेती आधारित, तर हिमाचल, उत्तराखंड व पश्चिम बंगाल राज्यात १४ ठिकाणी हस्तव्यवसाय व उद्यमशील वसाहती आहेत. आपण निर्वासित आहोत, याची भळभळणारी जखम आज ५० वर्षानंतरही येथील तिबेटी नागरिकांच्या मनात ताजी आहे. ५० वर्षांपासून भारतात निर्वासित असले, तरी त्यांनी अद्यापही भारताचे नागरिकत्व स्वीकारले नाही. कारण आमचा तिबेट नक्कीच स्वतंत्र होईल आणि आम्ही सन्मानाने परत जाऊ असे या नागरिकांना वाटते. त्यामुळे भारतात निर्वासित म्हणून का असेना, परंतु येथील सरकारने, जनतेने सन्मानाने आमचा स्वीकार केला, हीच आमच्यासाठी लाखमोलाची गोष्ट आहे. या सन्मानापुढे आम्हाला काहीही नाही मिळाले तरी चालेल, अशी येथील नागरिकांची भावना आहे. बहुतांश तिबेटींकडे भारतीय नागरिकत्व नाही. अशा परिस्थितीत येथील तिबेटींचे व्यवहार कशाच्या आधारावर चालतात, हा प्रश्न आपल्याला पडतो. याबाबत माहिती देताना सेटलमेंट ऑफिसर धोंडूप सँगपो म्हणाले, ‘‘आमचे व्यवहार भारत सरकाने दिलेली ‘आरसी’ (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) व ‘आयसी’ (आयडेंटी सर्टिफिकेट) या दोन प्रमाणपत्रांवर चालतात. नागरिकत्व नसले, तरी जन्माचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पासबुक, विजेचे बिल ही सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. त्यामुळे सरकारी पातळीवर आमचे कोणतेही काम अडत नाही.’’ आमच्या वसाहतीत पाचवीनंतर शाळा नाही, येथील मुलांना उच्च शिक्षणासाठी इतर वसाहतींमध्ये जावे लागते, त्यामुळे शिक्षणाचा दर कमी आहे. इच्छा असूनही उच्च शिक्षित तिबेटी तरुण भारतातील स्पर्धा परीक्षा देऊ शकत नाही, येथे जमीन, चल, अचल संपत्ती घेऊ शकत नाही, येथील निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार नाही, अशी व्यथा तेंझिंग छोईंग या तरुणाने मांडली. मात्र, भारताने आम्हाला निर्वासित म्हणून का होईना, परंतु आमचा स्वीकार करून जगण्याचे बळ दिले, हेही खूप आहे, अशी कृतज्ञताही छोईंग व्यक्त करतो.

#’मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२२

(लेखक ‘मीडिया वॉच’ चे सहसंपादक आहेत.)

 ९४०३४०२४०१

 

Previous articleमी पाहिलेला बिहार
Next articleस्त्रीशिक्षणाचा पाया आणि ख्रिस्ती मिशनरी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.