भाजपचे एकेकाळचे दिग्गज एकनाथ खडसे आता जरी राष्ट्रवादीत गेले असले तरी एकनाथराव भाजप-सेना मंत्रिमंडळात दोन्ही वेळा मंत्री होते ; विधानसभेचे ते विरोधी पक्ष म्हणून वावरले तेव्हाही भाजपतच होते . ते भाजपत असतांनाच त्यांच्या सूनबाई रक्षा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आणि त्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या . भाजपनं एकनाथ खडसे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली ( देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान करुन नंतर ते भाजप सोडून गेले ! ) पण , त्यांच्या कन्येला पक्षानं उमेदवारी दिली . ‘दाजी’ या नावानं ओळखले जाणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही त्यांच्या पुत्राला राजकारणात आणून पक्षांतर्गत विरोधकांच्या नाकावर टिच्चून विधानसभेची उमेदवारी मिळवून दिली आणि विजयी करुन दाखवलेलं आहे . भारतीय जनता पक्षातील राष्ट्रीय स्तरावरील ‘हेवी वेट’ प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यावर त्यांची कन्या पूनम महाजन-राव यांना उमेदवारी देणं ही राजकीय घराणेशाहीच आहे . त्या उत्तर- मध्य मुंबई मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर विजयी झाल्या आहेत आणि त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची अंधुक का असेना संधी आहे . पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या शाखांवरही त्यांनी काम केलेलं आहे . विद्यमान कॅबिनेट मंत्री विजय गावित यांची कन्या हिना ( नंदुरबार ) आणि एक आप्त राजेंद्र (पालघर ) हे दोघेही भाजपचे खासदार आहेत . पक्षाची राष्ट्रीय तिजोरी प्रदीर्घ काळ सांभाळलेले वेदप्रकाश गोयल आणि त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र पियूष गोयल , हे दोघेही भाजपचे खासदार म्हणून वावरले . पियूष गोयल तर २०१४ पासून केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत .