काही गोष्टी आपण कधीच विसरू शकत नाही . खरं म्हणजे काही रूढी परंपरांसोबत आपण भावनिकरीत्या जुळलेलो असतो .
होळीच्या आठ पंधरा दिवस आधीपासून होळीची तयारी सुरु व्हायची . घरामागच्या अंगणाला लागून गोठा होता , भर दुपारी आम्ही बहीण भाऊ एक मोठ्ठा जुना लाकडी पाट घेऊन त्यावर शेणाच्या चाकोल्या थापत होतो . बोटांच्या मदतीने त्रिकोणी चौकोनी गोल आकार दिलेल्या चाकोलीच्या मधोमध छिद्र करून त्या कडक उन्हात वाळायला ठेवायचो . प्रत्येक घरात हा उपक्रम बच्चेकंपनी फार जोखमीचं काम आपल्याकडे आलंय अशाच अविर्भावात पूर्ण करायचे .
वाळलेल्या चाकोल्या सुतळीत ओवून त्याची माळ करून खुंटीवर टांगून ठेवत एक एक माळ करत होळीपर्यंत विविध आकाराच्या , कलाकृतीच्या कितीतरी माळा जमायच्या . दोघांच्याही माळा आपापल्या खुंटीवर वेगवेगळ्या असायच्या. तुझ्यापेक्षा मी जास्त केल्या अशी कुरबुर होईल आईला आधीच ठाऊक होतं त्यामुळे ती दोघांनाही दोन खुंटीवर माळा अडकवून ठेवायला सांगायची .
लक्षमबाईच्या देवळाजवळ मोठ्ठी होळी पेटायची . देऊळ लक्ष्मीचं होतं पण सगळे लक्ष्ममबाईच म्हणायचे .होळीसाठी गोळा केलेल्या लाकडांच्या भोवती ह्या माळा अर्पण करून शुद्ध मनाने प्रार्थना करून , होळीच्या पवित्र अग्नीत दुःख निराशा वाईट शक्तीचे दहन होऊ दे …सुख शांती समृद्धी येऊ दे . खरं म्हणजे आपला होळीच्या सणात इतका मोठा सहभाग आहे यातच फार मोठेपणा वाटायचा .थोडीशी राख चिमटीत उचलून कपाळाला आणि उरलेली तोंडात टाकल्याने रोगराई जाते असं ऐकलं होतं.
दुसऱ्या दिवशी धुईमाती म्हणजेच रंगपंचमी.सकाळी उठल्यावर चहा दूध झालं की आधी, आई हातापायाला खोबरेल तेल चोपडायची.
माझ्यासाठी अगदी टाकलेला जुना फ्रॉक आणि भावासाठी मनिला पॅन्ट काढून ठेवायची.
नुकताच घरी टी.व्ही.आला होता . आयताकृती शटरचा , त्याला ठेवायला भिंतीत एक कोनाडा करून घेतला होता अगदी त्याच्याच मापाचा .
काही दिवसांपूर्वीच रंगोली मधे रंगपंचमीची गाणी बघितली असल्यामुळे आमचं ज्ञान वाढलं होतं . रंगपंचमीला पांढरेच कपडे घालायचे असतात मग आई असे रंगीत आणि जुनाट का काढून देते . कदाचित आपल्याकडे पांढऱ्या रंगाचा फ्रॉक नाही म्हणून असावं पण कपडे खराब होतात तरी टी.व्ही.मधले लोक असे शुभ्रच का घालतात?
त्यांच्याकडे जुने कपडे नसतील म्हणून खिदळत, विषय आटोक्यात घेत ,दार अर्ध लावून घ्यायचं… दाराच्या आडोशाला उभं राहून गल्लीतून मुलं जातांना दिसली की रंगाचं पाणी केलेली बादली अंगावर टाकायची .एकदा बाहेर निघालो की बारा वाजेपर्यंत घराचं तोंड बघायचं नाव नाही . खेळून परत आल्यावर आई अक्षरशः रिन साबण लावून वेळ पडली तर कौलाच्या खापरोंडीने घासून घासून धुवून काढायची . जेवण झालं की दुपारी गाढ झोप लागायची .