जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका

– प्रा.हरी नरके

जागतिक मानवाधिकार इतिहासात जे महत्व फ्रेंच राज्यक्रांतीला आहे तेच मोल भारतीय मानवमुक्ती आंदोलनात महाड परिषदेला आहे. महाड येथे ९३ वर्षांपुर्वी १९ व २० मार्चला [१९२७] भरलेल्या कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षपदावरून दिलेला हा विचार आजही कालबाह्य झालेला नाही. परिषदेला ३००० पेक्षा अधिक उपस्थिती होती. परिषदेचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम उर्फ दादासाहेब गायकवाड होते. [ नाशिकचे दादासाहेब गायकवाड वेगळे.] ज्यांनी आपल्या घरातील पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली त्या महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मशताब्दी वर्षात [१८२७-१९२७] महाडला ही परिषद भरवण्यात आलेली होती. परिषदेत बाबासाहेबांनी केलेले भाषण व मांडलेले ठराव आजही प्रेरणादायी आणि कालसुसंगत आहेत.

ही परिषद पंढरपूरला घ्यावी असा प्रस्ताव बाबासाहेबांसमोर होता. परंतु ही परिषद महाडला घेण्यामागे काही खास कारणे होती. त्यांचा उल्लेख बाबासाहेबांनी आपल्या भाषणात प्रारंभीच केलेला आहे.

एकेकाळी कोकण ही अस्पृश्यांची जागृत भुमी होती. महात्मा फुल्यांचे जिवलग मित्र गोपाळबाबा वलंगकर यांनी स्थापन केलेली ” अनार्य दोष परिहारक मंडळी” कोकणात स्थापन झालेली होती.

या संस्थेच्या बहुमोल योगदानाचा बाबासाहेबांनी आवर्जून उल्लेख केलेला होता. बाबासाहेबांचे बालपणाचे काही दिवस दापोलीला गेलेले होते. त्यांचे मूळगाव आंबावडे [ आंबाडवे ] हे महाडपासून जवळच होते. त्यामुळे आपला परिसर हाही आपुलकीचा भाग होताच. सत्यशोधक आमदार सी. के. बोले यांच्या विधीमंडळातील ठरावानुसार महाडचे चवदार तळे सर्वांना खुले केल्याचा निर्णय महाडचे नगराध्यक्ष सुरबानाना टिपनीस यांनी घेतलेला होता. सुरबानाना महाडचे असल्याने या तळ्यावरच सत्याग्रह करावा असा त्यांचा व त्यांचे मेहुणे चित्रे यांचा आग्रह होता. बाबासाहेब नुकतेच आमदार झालेले होते. कायद्याची अंमलबजावणी करावी, मानवाधिकार स्थापन करावा आणि आपले गुरू जोतीराव फुले यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करावे असे अनेक उद्देश महाडची निवड करण्यमागे होते.

महाड सत्याग्रहापर्यंत बाबासाहेबांना महात्मा फुले परिचित नव्हते असे नरहर कुरूंदकर म्हणतात. ते कुरूंदकरांचे अज्ञान होय. कुरूंदकरांनी ३ एप्रिल १९२७ चा बहिष्कृत भारत वाचला असता तर त्यांनी असले निराधार व असत्य विधान केले नसते. या अंकात बाबासाहेबांनी महाड परिषदेचा सविस्तर वृत्तांत छापलेला आहे. त्यात बाबासाहेब जोतीरावांचा गौरवपुर्ण उल्लेख करतात. [ पृ.६ ] वलंगकरांनी अ. दो. प. मं.या संस्थेमार्फत अस्पृश्यांच्या फक्त अडचणी दूर केल्या नाहीत तर लेखनाद्वारे पुष्कळ जागृती निर्माण केली. सत्यशोधक समाजाचे अध्वर्यू जोतीराव फुले यांचे अनेक खरे साथीदार व उत्साही शिष्य या संस्थेचे संचालक होते. गोपाळबाबांनी केलेली जागृती अनुपम होती असे बाबासाहेब सांगतात. दीनबंधूंच्या फायली त्याच्या साक्षीदार असल्याची नोंद बाबासाहेब करतात.

अस्पृश्यता आणि जातीनिर्मुलन करण्यासाठी आंतरजातीय विवाह केले पाहिजेत, सार्वजनिक पाणवठे सर्वांना खुले असावेत, मेलेली जनावरे ओढण्याचे व मृतमांस खाण्याचे बंद केले पाहिजे, शिक्षण व दारूबंदी सक्तीची करायला हवी, आचार, विचार आणि उच्चार यांची शुद्धी व्हायला हवी, अनिष्ठ विचारांचा मनावर बसलेला गंज साफ करायला हवा, सरकारी नोकरीत शिरले पाहिजे, शेतीचा व्यवसाय करायला हवा, सहकारी बॅंका स्थापन करायला हव्यात, सहकारी पतसंस्था स्थापन करायला हव्यात, सरकारी पडीक जमिनी ताब्यात घेऊन त्या कसल्या पाहिजेत, लष्कर, पोलीस, शाळाखाते अशा महत्वाच्या जागांवर अस्पृश्यांची नेमणुक व्हायला हवी, महारकी सोडली पाहिजे, मुलगा २० वर्षांचा व मुलगी १५ वर्षांची झाल्याशिवाय लग्नं करू नयेत, शाळा, वसतीगृहे, शिष्यवृत्त्या सुरू कराव्यात आदी मुद्दे आजही मार्गदर्शक ठरावेत असेच आहेत.

लिहिताना आणि बोलताना बाबासाहेब भीडभुर्वत बाळगीत नसत. एक मुलगा बी. ए. झाल्याने समाजास जसा आधार होईल तसा एक हजार मुले चौथी पास झाल्याने होणार नाही, सरकारी नोकरीचे महत्व फक्त ब्राह्मण, मराठे व मुसलमान यांनाच समजलेले आहे. सरकारी नोकर म्हणजे सरकारचे हृदय होत. तेव्हा अस्पृश्यांनी सरकारी नोकर्‍या मिळवाव्यात. आपल्यापेक्षा आपल्या मुलाबाळांची परिस्थिती काकणभर सुधारलेली असावी असे ज्या आईबापास वाटत नाही ते आणि जनावरे यात फरक नाही. सद्गृहस्थहो, स्वत:साठी नाही तर किमान आपल्या संततीच्या उज्वल भवितव्यासाठी तरी माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या असे बाबासाहेब कळकळीने सांगतात.

बाबासाहेब द्रष्टे होते. ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती, स्त्रीपुरूष समता, आंतरजातीय विवाहातून जातीनिर्मुलन, समाजजागृतीसाठी, मानवाधिकारासाठी आंदोलने ही पायाभुत भुमिका या परिषदेत त्यांनी मांडली. रूजवली. परिषदेच्या समारोपात चित्रे यांनी मांडलेल्या पुर्वनियोजित ठरावानुसार तळ्यावर जाऊन पाणी पिण्याचा क्रांतिकारक कृतीकार्यक्रम राबवण्यात आला. या ओंजळभर पाण्याने जागृतीचा अग्नी पेटवला. तो आज विझूविझू झालाय. तो पुन्हा पेटवण्याची गरज आहे.

बाबासाहेबांची वाणी आणि लेखनी किती धारदार होती त्याचा आजच्या मरगळलेल्या मनांना परिचय व्हावा यासाठी पुढील उतारा नक्की वाचा-

” आज अस्पृश्य वर्गात समाविष्ट होणार्‍या जातींपैंकी ***जात म्हणजे एक भिकार लोकांचा तांडा आहे असे म्हणावयास काही हरकत नाही. दररोज हक्काने दारोदार शिळे तुकडे टोपल्याच्या टोपल्या गोळा करून चरितार्थ चालवण्याची या जातीला सवय पडून गेलेली आहे. ह्या प्रघातामुळे या जातीला मुळी गावात इज्जत नाही. मान, मरातब नाही. या रिवाजामुळे या जातीचा स्वाभिमान नष्ट झालेला आहे. काहीही म्हणा! जोड्यात वागवा! पण मला तुकडा वाढा अशी या जातीची वृत्ती बनून गेलेली आहे. या रिवाजामुळे या जातीला स्वतंत्रतेने आपल्या उन्नतीचा मार्ग आक्रमणे शक्य नाही. अशारितीने शिळ्या आणि उष्ट्या तुकड्यांसाठी आपली माणुसकी विकणे ही गोष्ट मोठ्या लाजेची आणि शरमेची आहे.” [ पृ.७]

” पेशवाईत अस्पृश्यांना चालताना स्पृश्यांवर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावे लागत असे. थुंकीने रस्ता विटाळेल म्हणून गळ्यात गाडगे अडकवून हिंडावे लागत असे व ऒळख पटावी म्हणून हाताला काळा दोरा बांधावा लागत असे.” [पृ.५, जो प्रसंग आम्ही “एक महानायक” या हिंदी मालिकेमध्ये कालच दाखवलेला आहे.]

-(लेखक फुले -आंबेडकरी साहित्य व विचारांचे अभ्यासक आहेत)

[email protected]

Previous articleकिसानपुत्रांची अनोखी लढाई
Next articleतिन्ही ‘लोक’ आनंदे कसे भरतील?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here