सोशल मीडिया वापरायला लागल्यापासून आणि त्याचा अभ्यास करायला लागल्यापासून सतत एक प्रश्न पडत आला आहे, तो म्हणजे लोक ट्रोलिंग का करतात? आपल्याला माहित असलेल्या किंवा नसलेल्या व्यक्तीला दुखावून एखाद्याला काय मिळतं? एखाद्याला शारीरिक इजा करण्याबद्दल बोलण्याने एखाद्याला कुठल्या प्रकारचं समाधान मिळतं. एखाद्या स्त्रीवर कसा बलात्कार करेन हे तपशीलवार लिहिताना एखाद्या पुरुषाला नक्की कसली उद्दीपना मिळते. स्वतःला निरनिराळ्या संदर्भात ‘चार्ज’ करण्यासाठी दुसऱ्याला नामोहरम करण्याची, अपमानित करण्याची, दुसऱ्याचा छळ करण्याची आणि त्याला त्रास देण्याची मानसिकता नक्की काय अधोरेखित करते?
परिचित, माहितीची आणि सभ्य वाटणारी माणसं जेव्हा ट्रोलिंगच्या गटारीत उतरतात तेव्हा सगळ्यात जास्त चकित व्हायला होतं. माणसांचा आपल्याला माहित असणारा चेहरा आणि ट्रोलिंगच्या दलदलीत उतरल्यानंतरचा चेहरा यातला फरक भीतीदायक असतो. माणसाचं असं का होत असेल? ट्रोलिंग करणाऱ्या माणसाची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करत आले आहे. जगभर ट्रोल्सच्या मानसिकतेचा अभ्यास सुरु आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या क्रांतीनंतर माणसांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीत जे आमूलाग्र बदल झाले आहेत, त्यातला एक ठळक बदल आहे ट्रोलिंग. माणसं हमरीतुमरीवर येऊन एरवीही चर्चा करत होतीच, चहाच्या टेबलावर किंवा पानटपरीवर, किंवा पारावर चालणाऱ्या चर्चा ह्या गरमागरम असायच्या, पण आभासी जगात होणाऱ्या चर्चा नुसत्याच गरमागरम नसतात तर त्याला ट्रोलिंगचा तडका मिळालेला प्रत्येकवेळी दिसतो.
सिलीब्रीटी, सर्वसामान्य वापरकर्ते, स्त्रिया यांच्याविषयी ज्या पद्धतीने लिहिलं जातं ते अनेकदा वाचवत नाही. कॅनडामधल्या काही संशोधकांनी २०१५ मध्ये १२१५ ट्रोल्सवर एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणानुसार या १२१५ मधल्या ५.६ टक्के ट्रोल्सनी हे मान्य केलं होतं की दुसऱ्याला त्रास देण्यात त्यांना मजा येते. गम्मत, मनोरंजन म्हणून ते ट्रोलिंग करतात. एखादीचा बलात्कार कसा केला जाईल, एखाद्याला कसं मारलं जाईल याचं तपशीलवार वर्णन, किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल अतिशय गलिच्छ शब्दात लिहिणं, त्याच्या कुटुंबीयांविषयी वाईट साईट लिहिणं, एखाद्याचा अपमान करणं, एखाद्याला जिणं नकोसं होईल अशा पद्धतीने सातत्याने ट्रोलिंग करत राहणं ही गोष्ट ट्रोल्स मज्जेसाठी करतात. मनोरंजनासाठी करतात हे वास्तव भयावह तर आहेच पण समाज म्हणून आपण विविध स्तरांवर किती प्रचंड अधोगतीला लागले आहोत हेही दर्शवणारं आहे. पूर्वी म्हटलं जायचं इतरांच्या सुखात आपलं सुख शोधा आणि दुःखात सहभागी व्हा. आता दुःखाचे कारण बनून स्वतः सुखी व्हा असं म्हणण्यापर्यंत आपण माणूस नावाची जात पोचलो आहोत. म्हणूनच ट्रोलिंग विषयी गांभीर्याने बोलण्याची आज गरज आहे.
ट्रोल्स निरनिराळ्या प्रकारचे असतात.
काही राजकीय ट्रोल्स असतात. प्रसिद्ध पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांच्या आय एम ट्रोल या पुस्तकात त्यांनी बीजेपीच्या आयटी सेलमध्ये काम करणाऱ्या ट्रोल्सविषयी लिहिले आहे. राजकीय ट्रोल्स नावाची एक जमात गेल्या पाचसात वर्षात जोमाने उगवली आहे. स्वाती चतुर्वेदी यांच्या पुस्तकानुसार या राजकीय ट्रोल्सना ट्रोलिंग करण्यासाठी पैसा मिळतो. ज्यांना आपण पगारी ट्रोल्स म्हणू या. असे पगारी ट्रोल्स हल्ली सर्वत्र तयार झालेले दिसतात. काही माणसे अचानक ट्रोलिंग करायला लागली की ट्रोलिंगसाठी त्यांना पैसे मिळत असावेत अशी शंका घ्यायला जागा निर्माण होते. तर काही पगारी ट्रोल्स असतात. या ट्रोल्सना आपण कुणाला ट्रोल करतोय, का ट्रोल करतोय या कशाशीही काहीही देणं घेणं नसतं. त्यांना पगार मिळत असतो, आणि वरून सांगितलं जाईल त्यांना हे पगारी ट्रोल्स ट्रोल करून येतात. पण राजकीय ट्रोलिंग करणारे सगळेच पगारी नोकर नसतात. त्यातले काही हे स्वयं प्रेरणेने ट्रोलिंगच्या दलदलीत उतरलेले असतात. आवडत्या नेत्याची भलावण करण्यासाठी, पटलेल्या राजकीय विचाराचे समर्थन कार्यासाठी, आवडत्या नेत्याला अथवा विचारधारेला विरोध होऊ नये म्हणून ही आम जमता ट्रोलिंगचे चेहरे ओढून घेते आणि सुसाट वेगात अद्वा तद्वा बोलत सुटते. आपण जे काही करतोय ते आपल्या नेत्यासाठी, विचारधारेसाठी अशी त्यांची पक्की धारणा असते. समोरचा ट्रोलिंगच्या दलदलीत रुतत चालला असेल तर बाजूला होण्याऐवजी अनेक लोक त्यात हिरीरीने उड्या मारतात आणि एकमेकांना सभ्य किंवा गलिच्छ शब्दात ट्रोल करण्याचा सिलसिला सुरु होतो.
पगारी ट्रोल्सबद्दल काय बोलायचं, पैसे मिळतात म्हणून काम करणारी माणसं ती, पोटार्थी. सगळ्यात काळजी करण्यासारखी परिस्थिती स्वयं प्रेरणेने ट्रोलिंग करायला सरसावणाऱ्यांची असते. पगारी ट्रोल्स पंचवीस असतील पण हे पंचवीस जण अशी भाषा आणि असं एक्स्प्रेशन घेऊन येतात कि उरलेल्या ७५ स्वयं घोषित ट्रोल्सना ऑनलाईन चर्चा करायची तर गलिच्छ भाषा, दुसऱ्याचा अपमान हे आवश्यक गुण वाटायला लागतात. आणि त्यांच्याही नकळत ते त्यांच्या ‘असण्याला’ ट्रोलिंगच्या चिखलात माखवून घेतात.
काळजी वाटते ती या ७५ जणांची.
दुसरा प्रकार असतो तो म्हणजे वैयक्तिक खुन्नस काढण्यासाठी ट्रोलिंग करणारी माणसांच्या कातडीतली जनावरे. त्यांनी लिहिलेलं वाचल्यानंतर किळस येते. कुणी कलाकार असतो, कुणी लेखक असतो, कुणी व्यावसायिक असतो, कुणी सामाजिक कामात गुंतलेला असतो, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ते काम करत असतात, लोकांची वाहवाह घेत असतात, पण सोशल मीडियावरच त्यांचं लिखाण वाचलं की ही तीच माणसं आहेत का असा प्रश्न पडतो.
ही माणसं कालपर्यंत अशी नव्हती? कि फक्त अशी आहेत हे दिसत नव्हतं असा प्रश्न मग उभा राहतो.
माणसं ट्रोलिंग का करतात हा प्रश्न अधिकच तीव्र होत जातो.
मग पुन्हा प्रश्न उभा राहतो माणसं ट्रोलिंग का करतात.
या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी आजवर जेवढ्या लोकांशी बोलले आहे. जितकं काही वाचाल आहे त्यातून ट्रोलिंग करण्यामागची काही कारणं मला ठळकपणे दिसतात. (यापेक्षा अधिक असू शकतील.) ती मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
भयं न लज्जा उर्फ ऑनलाईन डीसइन्हिबिशन इफेक्ट
सर्वसाधारणपणे माणसं जेव्हा एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधतात, चर्चा करतात, वाद घालतात तेव्हा काही अलिखित नियम पळाले जातात. हे नियम कुठल्याही समाज वर्तनाच्या पुस्तकात लिहिलेले नसतात. किंवा असंच वागलं पाहिजे असा काही लिखित नियम नसतो. पण प्रत्येक समाज स्वतःचे काही अलिखित नियम करुन वर्तनाच्या पद्धती निर्माण करत असतो. एकमेकांशी बोलताना, चर्चा करताना प्रत्यक्षात माणसे क्वचित हमरीतुमरीवर येतात. आली तरीही लगेच मारहाण सुरु होत नाही. शिव्या देणं हा त्यातल्या त्यात आलेल्या रागाचा निचरा करण्याची पद्धत असते. पण ज्यावेळी माणसे ऑनलाईन असतात काही माणसांमध्ये ‘डीसइन्हिबिशन इफेक्ट’ दिसायला लागतो. म्हणजेच अशा माणसांना कशाचे काहीही वाटेनासे होते. एरवी वावरताना भावनांची एक अदृश्य भिंती आपण स्वतःभोवती उभी केलेली असते. ही भिंत आपले निरनिरळ्या संदर्भात रक्षण करत असते. हे कवच ऑनलाईन जगतात पाऊल ठेवल्याबरोबर ही माणसे काढून टाकतात आणि मनाला येईल तसे वागायला सुरुवात करतात. नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठातील प्रो. मार्क ग्रिफिथ्स अशा ट्रोल्सच्या प्रकाराला नाव दिलंय डीसइन्हिबिशन इफेक्ट. ते म्हणतात, “अशा माणसांचा समज असतो की आपण कुणाशीही कशाही भाषेत बोललो तरी चालतं. प्रत्यक्षात वागणार नाही असं ही माणसे वागायला सुरुवात करतात. कारण आपल्या वर्तनाबद्दल त्यांच्या मनात कसलीही लाज लज्जा उरत नाही. एखादी गोष्ट करावी अगर नाही याबद्दल आपलं मन आपल्याला जे काही सांगत असतं ते या लोकांना ऐकू येईनास होतं. माणसं एकटी असतात तेव्हा वेगळी असतात आणि समूहात वेगळी होतात.”
अनामिक असण्यातून मिळणारे स्वातंत्र्य
ओळख लपवण्यातून मिळणारे स्वातंत्र्य काही लोकांना प्रचंड आकर्षित करत असते. तर काही लोकांची अशी धारण असते की ऑनलाईन जगतात तुम्ही वागू शकता. काहीही बोललं तरी चालतं, कुणी तुम्हाला काहीही करू शकत नाही. अनेक न्यूज पोर्टल्स, चॅटिंग रूम्स, फोरम्स, रेडीट आणि ट्विटर सारख्या व्यासपीठांवर तुम्हाला तुमची खरी ओळख लपवून खातं तयार करण्याची सोय असते. तुमचा प्रत्यक्ष आयुष्यातला चेहरा लपवून आभासी जगासाठीचा निराळा चेहरा घेऊन वावरण्याची सोय असते.
डीसइन्हिबिशन इफेक्टमध्ये अनामिक असण्याला प्रचंड महत्व आहे. डीसइन्हिबिशन इफेक्ट थिअरी नुसार विकृत वर्तनाला अनामिक असल्याने खतपाणी मिळते. आणि आपल्या वर्तनाची जबाबदारी घ्यायची नसल्याने माणसे अधिकाधिक विकृत होत जातात. मुळात आपल्या वर्तनाची जबाबदारी आपली नाही ही भावना एकदा का मनात पक्की झाली की माणसांचे वर्तन बदलते. आपण काहीही बोललो, कितीही घाणेरडे वागलो, कुणाला कितीही त्रास दिला तरी प्रत्यक्ष आयुष्यावर त्याचा परिणाम होणार नाही याची खात्री असल्याने माणसं अनामिक चेहर्या आडून मनसोक्त विकृत वागायला लागतात आणि त्यांच्यातला ट्रोल जन्म घेतो.
संवादाचे नियम आहेत कुठे?
वर म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष संवाद साधताना, बोलताना माणसं काही अलिखित नियम सांभाळतात. कुणाशी कसं बोलायचं याचे प्रत्येक समाजात काही नियम असतात. स्त्रियांशी कसं वागावं बोलावं, वयाने मोठ्या व्यक्तीशी कसं वर्तन करावं, लहान मुलांशी वागण्याच्या पद्धती प्रत्यक्ष जगात आपण पाळत असतो. पण ऑनलाईन जगात वागण्याच्या पद्धती, ज्याला मॅनर्स म्हणतात ते लिखित नाहीत. ऑनलाईन चर्चेत कसं वागलं पाहिजे याचं भान अनेकदा अनेकांना असतं. याही मागे माध्यम शिक्षणाचा अभाव हे महत्वाचं कारण आहे. आपल्या हातात असलेलं माध्यम कसं वापरलं पाहिजे, आपण तिथे जे काही करतो ते का करतो याचा विचार बहुतेक माणसं करताना दिसत नाही. रोजच्या धकाधकीच्या जगण्याला उतारा म्हणून ऑनलाईन जगाकडे बघत असताना आपण अनेकदा सभ्यतेची रेषा ओलांडतो हेही लक्षात येत नाही. किंवा आलं तरी त्यातही कसलं तरी धाडस आणि थ्रिल वाटत असतं. मुळात आपले शब्द, वाक्य, आपलं व्यक्त होणं या सगळ्याचा गांभीर्याने विचार केलेला नसतो त्यामुळे आपण जे काही वागतोय ते चूक आहे हेही लक्षात येत नाही. शिवाय पगारी ट्रोल्सचा आदर्श पुढ्यात असतो. आपल्याला न आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल पांगरी ट्रोल्स जर अश्लील आणि असभ्य भाषेत बोलत असतील तर तेच वर्तन प्रमाण मानून तशाच पद्धतीने बोलायला इतरही माणसं सुरुवात करतात आणि आपल्याही नकळत आपण ट्रोल बनलो आहोत हे लक्षात येत नाही. राजकीय चर्चांमध्ये हा प्रकार सर्रास दिसून येतो. आपल्या विरोधात कुणीही काहीही मत मांडलं की त्या व्यक्तीला शिव्या देणं, अतिशय हीन शब्दात प्रतिक्रिया देणं, स्त्री असेल तर तिला वेश्या म्हणणं, बलात्काराच्या धमक्या देणं या गोष्टी सुरु होतात. संवादाचे लिखित किंवा अलिखित कुठलेही नियम माध्यमात वावरताना लागू होतात हा विचारच गावी नसल्याने माणसं असभ्य वर्तनाकडे चटकन वळतात.
ट्रोलिंग म्हणजे टोकाचा छळवादच
शाळा कॉलेजमध्ये काही वांड मुलं असतात. ती सातत्याने इतर मुलांना त्रास देत असतात. काही काही वेळा त्रास देण्याची पातळी इतकी पुढे जाते कि त्रास झेलणाऱ्याच्या जीवावर बेतते. सोशल मीडियातही अशी काही वांड मंडळी असतात. ज्यांना आपण ट्रोल म्हणतो. आणि ही माणसे जे काही करतात तो टोकाचा छळवादच आहे. फक्त हा छळ मानसिक पातळीवर मांडला जातो. एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा करण्याची धमकी देणं, बलात्काराची धमकी देणं. बलात्कार कसा केला जाईल याचं वर्णन करणं, लैंगिकतेवरून ताशेरे ओढणं, जातीवाचक बोलणं, धर्मावरुन एखाद्याशी असभ्य भाषेत चर्चा करणं, लैंगिक संबंधांची मागणी करणं या आणि अशा अनेक गोष्टी छळ या प्रकारात मोडतात. छळ म्हणजे दरवेळी शारीरिक मारहाण, त्रास, उपाशी ठेवणं असा नसतो. याबरोबरच मानसिक पातळीवर दिला जाणारा त्रास हाही छळवादच आहे. पण मानसिक पातळीवरच्या त्रासाकडे अजूनही आपण पुरेसं लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे ट्रोल करणाऱ्या व्यक्तीचं फावतं. आपण कितीही गलिच्छ पद्धतीने व्यक्त झालो तरी कुणी आपल्याला काहीही करू शकत नाही ही भावना त्यामागे शाबूत असतेच.
कुप्रसिद्धी ही प्रसिद्धीच
हे तत्व ट्रोलिंगमध्ये अतिशय महत्वाचं आहे. ट्रोलिंग करणाऱ्या व्यक्तीला फॉलो करणारेही पुष्कळ असतात. त्यांनी दिलेल्या धमक्या, वापरलेले अपशब्द, शिव्या हे सगळं कसं बरोबर आहे आणि ‘त्या’ समोरच्या व्यक्तीशी तशाच भाषेत बोलणं किती योग्य आहे असं म्हणत ट्रोल्सची तळी उचलणारे, त्यांची वाहवा करणारे, स्तुतिपाठक ऑनलाईन जगात भरपूर बघायला मिळतात. आपण जे काही बोलतोय त्याला लोक दुजोरा देत आहेत ही भावना ट्रोलिंग करण्याचं बळ आणखीन वाढवते. आपल्या पाठीशी लोक आहेत यातून एक विचित्र आत्मविश्वास तयार होतो. जो अधिक गलिच्छ पातळीवर जाऊन ट्रोल करण्याची इच्छा तीव्र करतो. पुढे पुढे या सगळ्या प्रकारातून मजा यायला लागते. ट्रोलिंगचीही एक प्रकारची किक असते. समोरचा माणूस दुखावला गेला आहे आहे लक्षात आलं की ट्रोलचा आणि त्याला समर्थन करणाऱ्या व्यक्तीचा उन्माद वाढतो. आपण जे करतोय ते चूक आहे ही भावनाच नाहीशी होते आणि आपलं शब्द, आपल्या धमक्या योग्य वाटायला लागतात. माणसं या उन्मादात महिनोन्महिने असतात. एखाद्या व्यक्तीला टार्गेट करण्यात ट्रोल आणि समर्थक सगळ्यांनाच मजा यायला लागते. हळूहळू हा विकृत खेळ बनतो आणि त्याची नशा सगळ्यांवरच चढते. आय एम द बेस्ट हा दृष्टिकोन अनेक ट्रोल्सचा असतो. एकमेकांच्या पाठबळावर सगळे ट्रोल्स मोठे होतात. मुळात आजूबाजूच्या इतर ट्रोल्समुळेच ट्रोल्सना आपण महत्वाचे आहोत, समाजाला आणि लोकांना वठणीवर आणण्यासाठी आवश्यक आहे असं वाटायला लागतं. ट्रोल्स मिळून एकमेकांचं महत्व वाढवण्याच्या कामात नेहमीच गुंतलेले दिसतात.
कसली शरम?
एकदा का ट्रोलिंगची नशा चढली की कुठल्याही प्रकारचा गिल्ट उरत नाही. शरम वाटत नाही. अनेकअभ्यासकांच म्हणणं आहे की ट्रोलिंग करणारे सायकोपॅथ असतात. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं. यु आर नॉट अ गॅजेट या पुस्तकाचे लेखक आणि कम्प्युटर सायंटिस्ट जॅरॉन लॅनिअर यांच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन असलेला कुणीही ट्रोल बनू शकतो. लॅनिअर यांनी स्वतः हे मान्य केलं आहे की काहीवेळा त्यांनीही असभ्य वर्तन केलेलं आहे. तुमचा खरा चेहरा लपलेला असल्याने आपल्या मर्यादा ओलांडून वागण्याचा मोह होतोच. कारण प्रत्यक्ष जगातल्या तुमच्या इमेजला त्यामुळे धक्का पोचणार नसतो. मलाही असे मोह झालेले आहेत. आपल्यापैकी कुणीही ट्रोल बनू शकतो.
एखादी व्यक्ती सायकोपाथ असते म्हणजे ती समाजहिताच्या विरुद्ध जाणीवपूर्वक वागत असते. सोशिओपाथ व्यक्तीही समाजहिताच्या उलट वागताना अनेकदा दिसते.
मानसोपचार तज्ञ डॉ. राबर्ट हरे यांनी जवळपास तीन दशक समाजकंटकांचा अभ्यास केला आहे. एखाद्या व्यक्तीला असं वागवस का वाटतं याचा त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांच्यामते, समाजहिताच्या विरुद्ध वागणाऱ्या व्यक्तीमध्ये काही व्यक्तिमत्वाची वैशिष्ठ्ये दिसतात. जसही सायकोपाथ व्यक्तीला चटकन कंटाळा येतो. त्यांना सतत काहीतरी करत राहण्यासाठी उत्तेजनेच्या गरज असते. उत्तेजनेशिवाय त्यांना काहीही करता येत नाही. त्यांना दीर्घकालीन ध्येय समोर ठेवता येत नाहीत. ते मॅनिप्युलेटिव्ह असतात. जुगाडू असतात. त्यांना सतत आजूबाजूच्या प्रत्येकाच्या जगण्याचे कंट्रोल्स स्वतःच्या हातात हवे असतात. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्या माणसांच्या जगण्यावर त्यांना सत्ता हवी असते. ते अतिशय भावनावश असतात. (इंपल्सिव्ह) वरवर पाहता ही माणसं अतिशय प्रसन्न दिसू शकतात, किंवा त्यांना काही आजार आहे असे वाटतही नाही मात्र त्यांना मानसिक आजरा असतो आणि ते जेव्हा जेव्हा वर्तनाचे संकेत मोडून मर्यादांच्या रेषांचे उल्लंघन करतात त्यांचा आजार ठळकपणे पुढे येतो.
सायकोपाथ सतत स्वतःची पाठ थोपटून घेत असतात. स्वतःविषयी त्यांना अनन्यसाधारण अभिमान असतो. इतरांना त्रास दिल्याने त्यांना आनंद आणि समाधान मिळतं. स्त्री आणि पुरुष दोघेही या आजाराचे बळी असतात पण सर्वसाधारणपणे हा आजार पुरुषांमध्ये अधिक आठळतो. सायकोपाथ व्यक्ती दुसऱ्याला त्रास देण्यात आनंद मिळवते यालाही काही कारण आहेत जी एम्पथी म्हणजेच सहानुभीतीशी संबंधित आहे. सायको आणि सोशिओपाथ व्यक्तीमध्ये सहानुभूतीची विलक्षण कमतरता असते. म्हणजे नक्की काय ते बघूया.
द एम्पथी फॅक्टर
ऑस्ट्रेलियामधील काही संशोधकांनी २०१७ मध्ये ४०० लोकांचा अभ्यास केला. हे सगळे ४०० जण ऑनलाईन ट्रोल्स होते. या ट्रोल्सना संशोधकांनी काही प्रश्नावल्या दिल्या होत्या. या प्रश्नावल्याच्या आधाराने संशोधकांनी काही गोष्टी अधोरेखित करून मांडल्या. त्यानुसार या ४०० ट्रोल्समध्ये भावनिकतेची कमतरता दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याच्या क्षमतेचा या ४०० जणांनाच स्तर अगदीच खालचा होता. त्याउलट सर्वसामान्य लोकांपेक्षा या ट्रोल्समध्ये बोध प्रक्रिया (कॉग्नेटिव्ह एम्पथी) विषयक समानुभूती अधिक होती. याचाच अर्थ असाही होतो की हे ट्रोल्स ज्या व्यक्तीचा छळ करत असतात त्या व्यक्तीबद्दल या ट्रोल्सना जराही सहानुभूती वाटत नाही असे मानसोपचारतज्ञ डॅनिअल गोलमन यांनी नमूद केलेले आहे. तर ऑस्ट्रेलियन संशोधक नोंदवतात, “ट्रोल्सना समोरच्या व्यक्तीला होणारा त्रास समजत नसतो असं नाही, त्याची जाणीव नसते असंही नाही मात्र त्याबद्दल कसलीही सहानुभूती नसल्यामुळे ते समोरच्या व्यक्तीच्या भावनांशी सतत खेळत राहतात आणि या खेळाची त्यांना मजा यायला लागते.”
सहानुभूतीलाही एक काळीकुट्ट बाजू असते हे समजून घेणं आवश्यक आहे. सहानुभूती दोन प्रकारची असते. एक भावनिक आणि दुसरी कॉग्नेटिव्ह. म्हणजेच आकलन. तसं बघायला गेलं तर हे दोन्ही सहानुभूतीचे प्रकार आकलनामध्येच मोडतात. तरीही त्यात पुष्कळ फरक आहे. हे दोन्ही प्रकार मेंदूच्या वेगवेगळ्या केंद्रांना उद्यपीत करतात.
भावनिक सहानुभूतीचेही अजून दोन प्रकार असतात.
पहिला प्रकार म्हणजे दुसऱ्याच्या भावना समजून घेणं. ज्याला आपण दुसऱ्याच्या चपलेत उभं राहून विचार करावा म्हणतो. याचाच अर्थ असाही होतो की जे दुसऱ्याच सुखदुःख आहे ते आपलं मानून व्यक्त व्हायला शिकणं. तर दुसऱ्या प्रकारात पहिल्या प्रकाराबरोबरच दुसऱ्याच्या भावना समजून घेत त्यावर योग्य पद्धतीने प्रतिक्रिया दिली जाते. पण सोशल मीडिया ट्रोल्समध्ये या दोन्ही गोष्टी गहाळ झालेल्या बघायला मिळतात. सोशल मीडियावर वावरणारे ट्रोल्स बहुतेक करून थंड डोक्याने दुसऱ्यांना त्रास देणारेच असतात.
ब्रोकन विंडो थिअरी
ब्रोकन विंडो थिअरी माणसांमधील विध्वंसक वृत्ती अधोरेखित करते. सभ्य समाजरचनेच्या बाहेर जात विध्वंसकपणे वागण्याची काही व्यक्तींची सवय असते. त्यांच्या व्यक्तिमत्वातच तो विध्वंस असतो. समाज शास्त्रज्ञ असं मानतात की ऑनलाईन जगात या विध्वंसक वृत्तीला खतपाणी मिळते. जर आजूबाजूला लोक जातपात, धर्म, वंशाच्या नावाने आरडाओरडा करत असतील, छाती बडवून बोलत असतील तर मुळात विध्वंसक वृत्ती असलेली लोकं याकडे सहज खेचली जातात आणि आपण जे काही वागतोय ते बरोबर आहे असं मानून ट्रोलिंगला सुरुवात करतात.
एकदा ट्रोल कायम ट्रोल ?
हे समीकरण मात्र बरोबर नाही. ट्रोलिंग करणारे कायम ट्रोल असतात असं नाहीये. काही माणसं अशीही असतात जी एरवी चांगल्या गप्पा, चर्चा करत असतात. मात्र काही विषयांच्या बाबतीत त्यांच्यामधला ट्रोल जागा होतो आणि एकदा का ट्रोल राक्षस जागा झाला की आजूबाजूचं सगळं गिळंकृत केल्याशिवाय तो शांत होत नाही. राजकीय संदर्भात असे ट्रोल्स बघायला मिळतात. आवडत्या नेत्याच्या, विचारधारेच्या समर्थनार्थ बोलताना ही माणसे कशी ट्रोलिंग करू लागतात त्यांचे त्यांनाही समजत नाही. एरवी हीच माणसे सभ्यपणे वावरतानाही आपण बघत असतो. तसं बघायला गेलं तर बहुतांशी ट्रोल्सच्या व्यक्तिमत्वात काही धोक्याचे संकेत असतातच पण याला अपवादही काही ट्रोल्स असतात असं दिसून येतं. ज्यांना एरवी आपण ट्रोल्स म्हणू शकत नाही पण काही संदर्भात त्यांचं वर्तन अतिशय गंभीर आणि विध्वंसक असतं.
संवादाचा एकतर्फी मार्ग
एका गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, आपण जेव्हा प्रत्यक्ष संवाद करत असतो तेव्हा आपल्या क्रिया ह्या प्रतिक्रिया स्वरूपाच्या असतात. तो प्रतिसाद असतो. आपण गप्पा मारत असतो तेव्हा कुणाच्या तरी बोलण्यावर प्रतिसाद म्हणून आपण काही गोष्टी बोलत असतो. या सगळ्या प्रतिक्रिया देण्याच्या प्रक्रियेत समोरच्याचे शब्द, देहबोली यांचा मोठा सहभाग असतो. आपण समोरच्या व्यक्तीच्या नजरेत बघत बोलत असतो. आपल्याला देहबोलीतून काही गोष्टी समजत असतात ज्या शब्दातून व्यक्त होत नाहीत. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपण आपल्या प्रतिक्रिया देत असतो. पण ऑनलाईन संवादात, चर्चेत हे काहीच घडत नाही. प्रतिसाद टाईप करताना समोरचा माणूस काय विचार करतोय, त्याची देह बोली काय सांगु बघतेय, त्याचे डोळे काय सांगतायत यातलं काहीही आपल्याला समजत नाही. त्यामुळे अनेकदा समोरच्या माणसाला म्हणायचं असतं एक आणि आपण घेतो दुसरंच. बहुतेकदा चर्चेत प्रत्येक व्यक्ती जो अर्थ काढत असतो तो ज्या त्या व्यक्तीच्या त्या वेळच्या मानसिकतेनुसार काढत असतो. एखादा वैतागलेला असेल तर सगळ्या प्रतिक्रिया मुद्दामून अपमानित करण्यासाठी लिहिल्या आहेत असं वाटण्याची दाट शक्यता असते. त्यातून गैरसमज होतात आणि कुणीतरी एक जण पातळी सोडून बोलायला लागतो. ट्रोलिंग सुरु होतं. मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे, ऑनलाईन होणारा संवाद हा अपूर्ण संवाद आहे. समोरची व्यक्ती काय मानसिकतेत आहे, प्रतिक्रिया लिहिताना ती नेमक काय करते आहे हे कहीही आपल्याला ठाऊक नसताना निव्वळ शब्दांच्या आधारावर अनेकजण मत बनवून आणि ठोकून मोकळे होतात. आणि गैरसमजांचं बी पेरलं जातं.
अस्पष्टतेचा गोंधळ
अनेक लोकांना ऑनलाईन जगात वावरताना तिथल्या अनेक गोष्टी माहित नसतात. फेसबुक वर लिहीत असताना आणि स्वतःच्याच नावाने लिहीत असताना आपल्या पोस्ट आणि कमेंट्स पब्लिक असतात, त्या प्रायव्हेट केल्या तरच प्रायव्हेट राहतात याबाबत स्पष्टता नसते. त्यांना असं वाटत असतं कि त्यांच्या पोस्ट आणि प्रतिक्रिया त्यांच्यापुरत्या किंवा त्यांच्या मित्रपरिवारापुरत्या मर्यादित आहेत.
समूहाची मानसिकता
ऑनलाईन जगतात लोक ट्रोलिंग का करतात यामागे समूहाची मानसिकता हाही खूप महत्वाचा घटक असतो. मी वर म्हटल्याप्रमाणे माणसं एकटी असतात तेव्हा वेगळी असतात, समूहात ती वेगळी होतात. एखादी व्यक्ती, संघटना, पक्ष, संस्था जर एखाद्या व्यक्तीला आवडत नसेल तर तो जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याविरोधात बोलायची किंवा ट्रोल करण्याची त्याची हिम्मत होत नाही. पण तेच समविचारी समूहात जेव्हा तो जातो त्याचा पवित्रा बदलतो. समूहाच्या मानसिकतेप्रमाणे तो वागायला लागतो. आजूबाजूचे चार ट्रोल्स जे काही करत असतील तेच करण्याकडे त्याचा असतो. समूह जेव्हा बरोबर असतो तेव्हा एकट्या दुकट्या माणसालाही त्याची चुक बरोबर वाटायला लागते. आणि गैरवर्तन योग्य. ट्रोलिंग मध्ये इतर ट्रोल्स खूप महत्वाची भूमिका बजावत असतात.
प्रत्यक्ष वेगळं आणि आभासी वेगळं
अनेक माणसांच्या बाबतीत सरळ सरळ दोन वेगळी व्यक्तिमत्व तयार झालेली असतात. प्रत्यक्ष आयुष्यात आंनदी, सभ्य आणि सुसंस्कृत असणारी व्यक्ती ऑनलाईन जगात गेल्यावर वेगळीच असते.
प्रत्यक्ष जगात राजकारण, देशभक्ती, धर्म, जात, वंश, पाठ, संस्कृती या सगळ्याबद्दल चकार न काढणारी व्यक्ती ऑनलाईन मात्र त्याविषयी टोकाची मतं मांडताना बघायला मिळते. हे स्वत्व गमावणं जे आहे ते ऑनलाईन समूहांचा परिणाम असतो अनेकदा. समूहाच्या मानसिकतेत स्वतःला फिट्ट बसवण्याची अनेकांची धडपड असते. वाऱ्याच्या बरोबर वाहण्यासाठी धडपडण्याच्या नादात काही माणसे वारा नेईल त्या दिशेने फोलफटासारखे वाहवत जातात. मग आपण ट्रोलिंग का करतोय, आपण दुसऱ्याला त्रास का देतोय, हे करून आपल्याला काय मिळणार आहे हे सगळे विचार मागे पडतात. आणि समूह जे करेल ते करण्याकडे कल वाढतो. कारण अशी माणसे स्वतःलाही कुठेतरी शोधत असतात. हा शोध घेत असताना स्वतःला योग्य पद्धतीने सिद्ध केलं पाहिजे हा विचार मागे पडतो आणि ट्रोल्सच्या समूहात उठून दिसण्याची धडपड सुरु होते. हा ट्रोल जितकं वाईट बोलला असेल त्याच्या अजून पाचपट घाण मी बोलणार अशी जणू नकळत स्पर्धा सुरु होते आणि स्वतःचा शोध राहतो मागे, माणसे दुसऱ्याच कुणाच्यातरी हातातले बाहुले बनून राहतात. ट्रोल्स ही ऑनलाईन जगातली गुलामगिरी आहे ती म्हणूनच.
जगाला अक्कल शिकवा
काही माणसे सतत जगाला अक्कल शिकवा मोडमध्ये असतात. त्यांना वाटतं असतं त्यांना जगापेक्षा जास्त कळतं, जास्त माहित आहे. इतरांपेक्षा ते वरचढ आहेत असा त्यांचा सातत्याने समज असतो. यातून होतं काय तर इतरांना त्रास देण्याचा एक सिलसिला सुरु होतो. सतत कुणावर तरी राग काढण्यात अशा माणसांना गम्मत यायला लागते. आपल्यापेक्षा बुद्धीने, पैशाने, साधन सामुग्रीने कमी असणाऱ्या लोकांना नामोहरम करण्याचा छंदच जणू या लोकांना लागतो आणि त्यातून ट्रोल्स जन्म घेतात. अशी माणसे कुठेही व्यक्त होताना स्वतःचे फिल्टर्स स्वतःला लावत नाही. मनात आलं ते बोललं. त्याचे समोरच्यावर काय परिणाम होतील, समोरच्या व्यक्तीला त्रास होईल का, यातना होतील का या कशाचाही विचार त्यात नसतो. कारण ते स्वतःला इतरांपेक्षा वेगळे आणि सरस समजत असतात. त्यामुळे स्वतः पलीकडे बघण्याची अशा लोकांची अजिबात तयारी नसते. हा वर्चस्ववादाचाच एक प्रकार आहे. सतत इतर कुणावरतरी वर्चस्व ठेवण्याची भूक इतकी बळावते की त्यातून आपण इतरांना त्रास देतो आहोत हेही लक्षात येत नाही. अशी माणसं मागितलेलं नसेल तरी आपलं मत ठोकून मोकळी होतात. चर्चेचं आमंत्रण नसलं तरीही चर्चेत शिरून चर्चेचा सूर बिघडवतात. कारण चर्चेत कोण काय म्हणताय या पेक्षा ते स्वतः काय म्हणतायेत यालाच त्यांच्या लेखी महत्व असतं. आपण बरोबरच आहोत, योग्यच आहोत आणि बाकी सगळं जग चुकतंय या धारणेने ही माणसे वावरत असतात. त्यामुळे त्यांना प्रतिवाद, प्रतिप्रश्न आवडत नाही. तसं करणाऱ्यांना ट्रोलिंग करून त्रास देताना मग ही माणसे पुढेमागे बघत नाहीत.
परिणामांची चिंताच नाही
सोशल चेंज थिअरी असं सांगते की संवाद आणि नात्यांच्या बांधणीत आपण नेहमीच संवादासाठी आणि नात्यांसाठी मोजावी लागणारी किंमत आणि त्याचे फायदे याचा विचार करत असतो. संवाद, प्रतिक्रिया, मत मांडणी या सगळ्याचे काही परिणाम असतात. त्यासाठी काही किंमत मोजण्याची वेळ प्रत्येकावर येतेच. स्वरूप वेगळे असले तरीही. पण अनामिक राहून स्वतःची ओळख लपवली की परिणामांची चिंता राहत नाही असा एक सर्वसाधारण समज असतो. समजा तुमच्या वर्तनामुळे काही लोक जरी दुखावले गेले असले तरी तुमचा मित्रपरिवार तुमच्या सोबत असतो, शिवाय तुमची ओळख खुली झालेली नसते, अशावेळी मर्यादा ओलांडली तरी चालते, ती मर्यादा आपण ओलांडली आहे हे जगाला माहित नसल्याने परिणाम भोगण्याची वेळ आपल्याला येणार नाही याची खात्री असते. त्यामुळे आपण ज्यांना त्रास देतो आहोत त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगली नाही तरी चालते असाही समज यातून पक्का होतो. आणि माणसे अनामिक नावाने किंवा स्वतःच्या खऱ्या ओळखींसकट ट्रोलिंग करायला सुरुवात करतात. अशावेळी जे कुणी त्यांना ट्रोलिंग करण्यापासून, दुसऱ्यांना त्रास देण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात ते मित्र, नातेवाईक या ट्रोल्सच्या दृष्टीने वाईट ठरायला लागतात. असे मित्र आणि नातेवाईक दुश्मन वाटायला लागतात. जे आपल्याला सहन करत नाहीत ते आपले मित्र नाहीत, स्नेही नाहीत, हितचिंतक नाहीत असं सरळ गणित घालून ही माणसं मोकळी होतात. खरंतर ट्रोलिंगच्या दलदलीतून बाहेर येण्यासाठी जी माणसं हात पुढे करत असतात, त्यांची मदत घेण्याऐवजी ट्रोल्स त्यांचा हात सोडून देतात, झिडकारतात. आणि ट्रोलिंगच्या दलदलीत आणखीनच खोल रुतत जातात.
स्त्री पुरुषांची समानता
ट्रोलिंग करणारे सगळेच पुरुष असतात असं अजिबात नाही. स्त्रियांनीही संख्या ट्रोलिंगमध्ये पुष्कळ आहे. पण प्रमाण बघितलं तर पुरुषांच अधिक आहे.
स्त्रिया स्त्रियांबद्दल, धर्माबद्दल, राजकारणाबद्दल, नातेसंबंधांबद्दल किंवा अजूनही कशाही बद्दल मत मांडत असतील तर पुरुष तिने मांडलेल्या मतावरून तिच्याच वॉलवर येऊन तिच्याबद्दल असभ्य बोलायला सुरुवात करतात. धमक्या देतात. लैंगिक ताशेरे मारतात. एखादीने तिचे फोटो टाकले तर त्यावरून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. एखादीने सरकारच्या एखाद्या योजनेवर टीका केली तर तिला मारून टाकण्याची किंवा तिच्यावर बलात्कार करण्याची जाहीर धमकी देतात. एखादीने स्त्रियांच्या समस्यांविषयी लिहिले तर तिला बाजारू म्हणून मोकळे होतात. एखादीने समाजातल्या चुकीच्या प्रथांवर भाष्य केले तर तिच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याची परवानगी मिळाल्याप्रमाणे काही पुरुष वागायला लागतात. अश्लील मेसेज करतात. तिच्या मुलाबाळाबद्दल काय वाट्टेल ते बोलण्याचे लायसन्स मिळाल्यासारखं वागणाऱ्या पुरुषांची इथे कमतरता नाही.
‘ऍम्नेस्टी इंटरनॅशनल’ ने एक सर्वेक्षण प्रसिद्ध केलं आहे. या सर्वेक्षणानुसार दर पाच स्त्रियांपैकी एकीला सोशल मिडिया अब्यूजला म्हणजेच छळाला सामोरं जावं लागतं. आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. चार हजार स्त्रियांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला होता. या सोशल मिडिया अब्यूजमध्ये लैंगिक ताशेरे, शारीरिक आणि लैंगिक हिंसेच्या धमक्या यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. विशेषतः स्त्रिया जेव्हा धर्म, पंथ, लैंगिक अग्रक्रम, राजकारण याविषयी लिहितात, किंवा त्यांचे फोटो शेअर करतात त्यावेळी अशा प्रकारच्या लैंगिक छळाला त्यांना सामोरे जावे लागते.
काही वर्षांपूर्वी इंटरनेट डेमॉक्रसी प्रॉजेक्टच्या वतीने एक सर्वेक्षण भारतात करण्यात आलं होतं. त्यात असे दिसून आले की सोशल नेट्वर्किंगच्या माध्यमातून स्त्रियांवर लैंगिक ताशारे मारणं, त्यांना धमकावणं , त्यांचा शाब्दिक छळ करणं, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं, अश्लील शेरेबाजी करणं, बलात्काराच्या धमक्या देणं असे प्रकार वाढत चालेल आहेत.
पुरुष स्त्रियांना ट्रोल का करतात हा मूलभूत प्रश्न आहे. त्यामागे पुरुषप्रधानतेची पक्की बीज आहेत. स्त्रीने मर्यादेत राहावे, तिने घर संसारात रमावे, तिने शक्यतो स्वतःचे मत मांडू नये या सगळ्या धारणा आजही पुरुषांच्या मनात पक्क्या आता. समाजाच्या मान्यताप्राप्त चौकटीत बसेल इतकंच आणि असंच सोशल मिडियावर लिहीणार्या स्त्रियांवर त्या मानाने हल्ले कमी होतात पण ज्या या चौकटीच्या बाहेर जाऊन लिहितात, फोटो शेअर करतात त्यांना ताबडतोप सोशल मिडिया अब्यूजला सामोरं जाण्याची वेळ येते. एखाद्या नाक्यावर उभं राहून एखाद्या स्त्रीची छेड काढणं आणि सोशल मिडियावर छेड काढणं यात फारसा फरक नसतो.
मुळात सोशल मिडियावर एका भिंतीच्या पलीकडून व्यक्ती वार करत असतो. त्यामुळे प्रत्यक्षात छेड काढण्यापेक्षा हे त्याला सोपं वाटतं. शिवाय बहुतेक स्त्रिया असा छळ झाल्यानंतर पोलिसांकडे न जाता त्या व्यक्तीला ब्लॉक करणे, अनफ्रेंड करणे किंवा स्वतःचा सोशल मिडिया वावर सीमित करून टाकणे हा पर्याय निवडतात. त्यामुळे बलात्काराची धमकी, लैंगिक ताशेरे, चारित्र्यहनन करणाऱ्या व्यक्तीला भीती वाटत नाही. आपण काहीही केलं तरी चालतं असा एक समज तयार होतो.
हे सगळं लिहिलं की सर्रास एक प्रतिवाद समोर येतो, पण स्त्रियांनी असं काही लिहावंच कशाला ज्यामुळे त्यांच्यावर हल्ले होतील? म्हणजे पुन्हा मुद्दा समाजमान्य चौकटीत स्वतःला सीमित करण्याचाच आला की! तिने उघडपणे समाजासाठी ‘आडचणी’ च्या मुद्द्यांवर बोलू नये ही पुरातन इच्छा आजही पुरेशी शाबूत आहे. तिने तिच्या लैंगिकतेबद्दल, तिच्या गरजांबद्दल बोलू नये, तिने राजकीय मत मांडू नयेत, तिने जाती व्यवस्थेवर बोलू नये, तिने समान हक्कांवर बोलू नये अशा अनेक मुद्द्यांबाबत समाजाची जी सुप्त इच्छा असते तीच अशा लोकांच्या वर्तनातून अनेकदा व्यक्त होत असते हे विसरता काम नये.
मुद्दा एका व्यक्तीने एका स्त्रीचा छळ करणं किंवा कुणा एका व्यक्तीचा छळ करणं हा नाहीये, मुद्दा आहे तो समाज म्हणून, समुदाय म्हणून आपल्या सोशल मिडिया वर्तनाचा. आपण सोशल मिडियावर काय बोलतो, कसे वागतो, कशा प्रतिक्रिया देतो याचा. आपण ट्रोलिंग का करतो हे समजून घेण्याचा. त्या दलदलीत आपण अडकत गेलो असू तर मदत घेऊन बाहेर पडण्याचा.
स्वतः सोडून इतर कुठल्याही माणसाला त्रास देण्यात ज्यांना मजा येते, ज्यांचं मनोरंजन होतं, ज्यांना अशा दुसऱ्याला दिलेल्या छळातून समाधान मिळतं अशी कुठलीही व्यक्ती मानसिक पातळीवर सुदृढ असत नाही. ट्रोल मनोरुग्णच असतो. मग ते कुठल्याही जाती धर्मांतले असोत, सधन निर्धन असोत, उच्च शिक्षित असोत किंवा नसोत.
ऑनलाईन जगात माणूस ट्रोल असतो किंवा नसतो.
आणि जो ट्रोल असतो त्यांची जात एकच असते, ट्रोलिंगची. आणि त्याची भाषाही एकच असते, असभ्य.