तो एक वाल्मिकी…ही एक वाल्मिकी

-प्रभू राजगडकर

………………

फार पूर्वीची गोष्ट आहे. साधारण चार- साडेचार दशकापूर्वीची. म्हणजे ही गोष्ट आहे स्वरुपभाई नावाच्या माणसाची. त्याच्याभोवती फिरणारी. हे स्वरुपभाई मुंबईत आले असतील सत्तरच्या दशकात. रेल्वे आणि पी अँड टी…त्या काळातील नोकरीचा मुख्य स्रोत. रेल्वेत नोकरी मिळाली म्हणुन स्वरुप भाई मुंबईत.आता मुंबईत का तर लोकल ट्रेन,मेन लाईन ट्रेन अस विस्तारीत जाळे असल्याने बऱ्याच पोस्टींग मुंबईत होत असे.तर स्वरुप भाई मुंबईत आले. नव्या माणसाचे मुंबईत राहण्याचे  जसे वांधे होतात तसे स्वरूपभाईचेही झाले. ओळखीच्या माणसांसोबत कुठे कुठे राहीले.त्यांचं लग्नही मुंबईतील मुलीशी झालं.कालांतराने ते वसई, जि.ठाणे उपनगरात स्वतःचे घरी राहायला गेले.दोन अपत्य होती त्यांना.माणूस सावळाच पण देखणा.डोळयात सुरमा लावायचे.अत्यंत प्रेमळ.मृदू बोलणे.सर्वांशी स्नेहाची वर्तणूक.काही उत्तर भारतीयांमध्ये असतो तसा उर्मटपणा अजिबात नाही. त्यामुळे अधिका-यांशी चांगले संबंध. कार्यालयातील प्रत्येक कर्मचा-यांशी जिव्हाळयाने वागत.एवढेच नव्हे तर सिनेसृष्टीतील कित्येक कलावंत त्यांचे ओळखीचे. त्यामुळे सर्वच त्यांचा आदर करीत. प्रेमाने त्यांना ‘स्वरुपभाई’ म्हणत. त्यांच पूर्ण नाव माहीत नाही. पण स्वरुपचंद चौधरी असे लिहायचे. त्यांचा एक ‘प्रेमळ’दरारा होता.ते वसई-मुंबई सेंट्रल अपडाऊन करायचे. मुंबई सेंट्रल त्यांचं कामाचं ठिकाण.वसईमध्येच राहणारे त्यांचे सहकर्मचारी मित्र नेहमी सोबत असायचे. स्वरुपभाई उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील रहिवासी होते.

मी १९८१ला बदली होऊन मुंबई सेंट्रल स्टेशनला रुजू झालो.कार्यालय प्रमुख हेड टी.सी. असलेल्या स्वरुपभाईसोबत ओळख झाली. ते मला प्रेमाने ‘राजू’ म्हणायचे. राजगडकरच शार्टनेम. १९८०च्या दशकात मुंबईमध्ये शासकीय,निमशासकीय,खाजगी आस्थापना,कारखाने इत्यादीमध्ये ‘सत्यनारायणाची महापूजा’ करण्याच प्रस्थ अचानक वाढलं. का? कसं?कोणामुळे? माहीत नाही. पण कोणत्या ना कार्यालयात ही महापूजा सुरु असायची.मोठमोठयाने वाजणारे स्पिकर.कार्यालयातील सजावट. कर्मचाऱ्यांची लगबग .सोबत दैनंदिन काम सुरु.मग ते ठिकाण जीपीओ,सीटीओ,एखाद पोस्ट आफीस,एस.टी महामंडळाचे आगार किंवा वस्त्या,चाळी कुठेतरी महापूजा सुरु असायची .मुंबई सेंट्रल स्टेशनवरील हमालांनीही धुमधडाक्यात ‘सत्यनारायणाची महापूजा’ उरकून घेतली. मुंबईतील बहुतेक हमाल पश्चिम महाराष्ट्रातील.विशेषतः सांगली,सातारा,कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यातील.त्यांची मजबूत संघटना आहे.कष्टाळू लोक.

हे सगळं पाहून मुंबई सेंट्रलच्या चेकिंग स्टाफमधील काहींना वाटू लागले की, आपणही करु या सत्यनारायणाची महापूजा.एकदाची पूजेची तारीख ठरली.वर्गणी काढण्यात आली.आणि मग चर्चा सुरु झाली पुजेला कोणाला बसवायचं? पुजेला बसायचं ते जोडीने.अशा जोडीचा शोध सुरु झाला. माझे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.म्हणून मला विचारण्यात आले.मी पूजेला बसायचं साफ नाकारले.नाकारण्याच कारणही सांगितले.अशा थोतांडावर माझा विश्वास नसल्याचे, स्पष्ट केले. त्यामुळे माझा पिच्छा सोडण्यात आला.आणखी एक-दोघांना विचारले.त्यांनीही नकार दिला.पण त्यांचे नकाराचे कारण समजू शकले नाही.मग स्टाफमधील सिनीअर आर. बी. दामोदर किंवा वरळीकर  यांनी स्वरुपभाईचे नाव सुचवले.सर्वांनीच होकार दिला.आनंदही व्यक्त केला.

महापूजेच्या दिवशी कार्यालयातील टेबल -खुर्च्या बाहेर काढण्यात आले.पताका लावून कार्यालय सजवण्यात आले.स्पिकर लावण्यात आला.गाणे वाजू लागले.त्या दिवशी ड्युटीवर असलेले होतेच.ऑफ ड्युटीवालेही आवर्जून हजर होते.काही एकटे.काही कुटुंबासह.स्वरुपभाई पत्नी व दोन मुलासह आले. त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता.सर्वानी आनंदाने स्वागत केले. ते जोडीने पुजेला बसले. पुजाऱ्यानेपुजा सुरु केली.साधारण एक तास पूजा सुरु होती.तो पुजारी उच्चारत असलेले श्लोक,मंत्रोपचार कळतही नव्हते.त्या दिवशी मी ड्युटीवर असल्याने गेटवर उभा होतो.पूजा सुरु झाली. महाप्रसाद वाटप सुरु झाले. प्रत्येकजण मांडलेल्या पूजेसमोर पाया पडून दक्षिणाही ठेवत होते. मी आत-बाहेर करत होतो . तेव्हा बाहेर पडणाऱ्या शीलसिंग नावाचे सिनीअर टी.सी.ने  मला थांबवले.ते स्वरुपभाईसोबत नेहमी असायचे.वसईकडेच राहायचे.स्वरुपभाईचे घनिष्ठ मित्र. त्यांचे अनेकदा एकत्र खाणे-पिणे चालायचे. त्यांनी मला थांबवले आणि जवळ घेत म्हणाले,’चलो… आज एक का शुध्दीकरण हो गया !’

मला काही समजलेच नाही.कोणाबाबत बोलत आहे ते? मी शिलसिंगला पुन्हा विचारले ,’कौन शुध्द हो गया?’ तसे शिलसिंग उत्तरले,’ अरे जो आज पूजामे बैठे.उनकी शुध्दी हो गई.” ऐकून मी सुन्न झालो. जो माणूस स्वरुपभाई..स्वरुपभाई म्हणत पिंगा घालत असतो.सोबत प्रवास,खाणे-पिणे करत असतो, तो असे बोलतोय , हे ऐकून मी अस्वस्थ झालो . स्वरुपभाई हे शीलसिंगांचे बॉस.असे असतांना त्यांना स्वरुपभाईविषयी इतकी हीन भावना का बरे असावी? मला प्रश्न पडला.बराच वेळ अस्वस्थ होऊन विचार करुन करु लागलो.  आणि काही क्षणात ‘शुध्द हुआ’ या म्हणण्याचा अर्थ समजला.

स्वरुपचंद चौधरी ….सर्वांचे स्वरुपभाई हे उत्तर प्रदेश मधील ‘वाल्मीकी’ समाजाचे होते.म्हणजे ते अस्पृश्य होते.सफाई काम करणाऱ्यांमधील पददलित होते. शीलसिंग कायम त्यांच्यासोबत होते, पण ते त्यांची जात विसरू शकले नव्हते. आज चार_साडे चार दशकानंतर स्वरुपभाईच्या घटनेनंतर हाथरस बलात्कार प्रकरणामुळे मला तो प्रसंग आठवला. मला यात साम्य दिसतं. वाल्मिकी जातीतील मुलीवर  बलात्कार केला जातो. तिचे मनके तोडल्या जाते.एवढेच नव्हे तर जिभही कापून काढली जाते.तरीही उत्तर प्रदेश शासन पंधरा दिवस दखल घेत नाही.उलट तिचा मृत्यू झाल्यावर परस्पर विल्हेवाट लावली जाते.जाळून टाकले जाते.यात ती महिला अअसण्यासोबत  पददलित -वाल्मिकि असणे, हे मुख्य कारण आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ मध्ये Annihilation of caste  लिहून भारतीय जातीव्यवस्थेची चिकित्सा केली.त्याला ८४ वर्षे उलटून गेली.त् यांचेच नेतृत्वात लिहिल्या गेलेल्या भारताच्या संविधानात आर्टीकल १५ चा समावेश आहे. तरीही आमची जात-सरंजामशाही वृत्ती कमी होत नाही. अलिकडे तर ती अधिक प्रखर होत चालली.कोण खतपाणी घालतंय…सांगण्याची गरज आहे?

(लेखक प्रतिभावंत कवी व निवृत्त शासकीय अधिकारी आहेत)

9422191202
Previous articleहिंदुत्वाचे अनौरस शौर्य
Next articleगांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड (1914-1948)
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here