#माणसं_साधी_आणि_फोडणीची (भाग पाच)
-मिथिला सुभाष
“दिदी, मेरी दुकान तो उसी दिन ‘खुल’ गई थी जिस दिन माझ्या विजापूरवाल्या मामाने मला..!” एक आवंढा गिळून मल्लिका म्हणाली, “बाहेर की दुनिया बहोत कुत्ती है.. मेरे पास ना शिक्षण, ना पैसा, डोक्यावर हात ठेवायला बाप-भाऊ नाही..आणि एक म्हातारी आई, दोन तरण्या शिकणाऱ्या बहिणी.. आणि माझं हे हजारात दिसणारं रूप! लोक म्हणतात, धुणीभांडी कर.. पण तिथेही घरात पुरुष असतात ना? ते धरतात कधीतरी.. काम साधल्यावर पन्नास-शंभरची नोट कुर्तीत कोंबतात. त्या पैशात घरभाडं, घरखर्च, बहिणींच्या शिक्षणाचा खर्च, आईच्या आजारपणाचा खर्च कसा भागवायचा?”
“अग पण ती आई आणि बहिणी सावत्र आहेत ना? त्या आईने खूप त्रास दिलाय ना तुला?”
“असू दे.. बाईची जात हायेत ना? मी जशी यतीम (अनाथ) झाली, तशा त्या पण यतीम झाल्याएत ना?? तिच्यात जोर होता तेव्हा ती ‘तिच्यासारखी’ वागली. मी आता ‘माझ्यासारखी’ वागते!
मी तिच्याकडे बघतच राहिले. मला क्षणभर वाटलं, रात्र पडायच्या आधीच माझ्या घरात चांदणं सांडलंय.. खिन्न.. उदास.. पण अपरिमित लावण्यवान!
************************************
“काय ग सारखी आरश्याच्या सामने उभी राहून नाचत असतेस?” असं म्हणून आईने दहा-अकरा वर्षाच्या मल्लीची वेणी ओढली आणि तिला जमिनीवर भिरकावून दिलं. तिकडेच दुपट्यावर दीड वर्षाची सना झोपली होती. मल्लीचा धक्का लागून ती जागी झाली आणि तिनं भोकाड पसरलं. अब्बा तिकडेच अखबार वाचत बसले होते. त्यांनी मान वर न करताच मल्लीवर सूर लावला, “अम्मीला तक़लीफ़ नको देऊ ग, दोन जीवाची हाये ना ती?” मल्लीने अब्बाकडे पाहिलं. आई दुसरी आली की बाप तिसरा होऊन जातो! ती मुकाट्याने जाऊन आपलं दप्तर भरायला लागली. अम्मीने तिचं दप्तर पायाने उडवलं आणि म्हणाली, “इस्कुलात जाऊन कलेक्टरीन व्हायची हैस का?? घरातली कामं कोण करणार..!” आणि मग नवऱ्याकडे बघून गरीब तोंड करून म्हणाली, “नाय होत हो माझ्याने.. ही बसने जाते इस्कुलमधे.. धा रुपये त्ये लागतात.. सवतीची हाये म्हणून उपाशी तर नाय ना ठेवता येत? खाण्याच्या सुट्टीत खायला पाच रुपये द्यायला लागतात. मोठी पण झालीये आता.. सलवारी शिवायला पायजे तिला.. चड्डीफराक घालेल एवढी ल्हान नाय ऱ्हायली आता मल्ली.. आता कशाला इस्कुल पायजे म्हणते मी.. एवढी खब्सूरत पोर.. कोणाची बुरी नजर पडली तर नाक कापंल..” अब्बाने मल्लीकडे पाहिलं. त्याची लेक खरंच आईच्या चंदनी रुपात गुलाल-लोणी कालवून गोरी-गुलाबी जन्माला आली होती. तरतरीत नाक, मोठे डोळे, लालचुटूक जिवणी.. अब्बाच्या छातीवर दगड आला. त्याची दुसरी बायको त्याला विचारात होती, “बच्चा आल्यावर खाना कोण बनवणार? दोन-दोन बच्चे सम्हालुन मीच की काय?”
मल्लीच्या अब्बाला पटलं.. तिची शाळा तातडीने बंद केली गेली. तिला सांगायचं होतं की ती चालत-चालत शाळेत जाते.. उशीर झाला तर दौडत जाते.. मधल्या सुट्टीत पाणी पिऊन खेळत राहते.. घरी आल्यावर आधी दुपारची भांडी घासते, त्यानंतरच तिला चाय मिळते. पण ती नाही बोलली. तिला माहित होतं, अब्बा दिवसभर हमाली करून थकतो.. त्याला सांगितलं तर तो रात्री दारू पिऊन आल्यावर अम्मीला मारेल आणि उद्या तो कामावर गेल्यावर अम्मी आपल्याला फोडून काढेल. ती मुकाट्याने स्टोला पंप करायला बसली. फ्रॉक गुडघ्याखाली ओढून घेतला. तिला अम्मीचे शब्द आठवले, “चड्डीफराक घालेल एवढी ल्हान नाय ऱ्हायली आता मल्ली..”
मल्लीची सख्खी आई ताप येऊन वारली आणि दोन महिन्यात अब्बाने नवीन अम्मी आणली. तेव्हा मल्ली नऊ-दहा वर्षाची होती. लग्नाला वर्ष व्हायच्या आत सना झाली. दुसऱ्यांदा मुलगा होईल याची खात्री होती अब्बाला.. आता मल्लिका घरातच राहायची. हळूहळू तिच्यावर सगळं घर येऊन पडलं. तक्रार करायची असते हे तिला माहितच नव्हतं. बापाने दुसऱ्याच दिवशी चार वार कापड आणलं आणि मल्लीसाठी दोन सलवारी शिवल्या गेल्या. अम्मी बाळंत व्हायला नगरपालिकेच्या इस्पितळात गेली आणि ‘तो’ आला. अम्मीचा धाकटा भाऊ. तोंडात पान, गळ्याला रुमाल, डोळ्यात सुरमा आणि दिसणं गुलछबू..!!
अम्मी हॉस्पिटलमधे. अब्बा हमाली करायला स्टेशनात. मल्लिका धाकट्या सनाला सांभाळत घरातलं सगळं करायची. बारा वर्षाची उमर. एक दिवस ती सगळी कामं आटोपून सनाला झोपवायला तिच्या शेजारी लेटली आणि तिला झोप लागली. थोड्या वेळाने तिला काहीतरी विचित्र वाटलं. ती पूर्ण जागी होऊन उठून बसणार तोच तिच्या नाकात पानाचा वास गेला. त्याचा हात तिच्या नवीन सलवारच्या नाडीपर्यंत पोचला होता. आपण ओरडलो तर सना जागी होईल आणि आपली सुटका होईल हे मल्लिकाला कळत होतं. पण त्याने तिचं तोंड गच्च बंद केलं होतं. जर्दा, क़िमामच्या वासाने तिला भोवळ आल्यासारखं झालं आणि त्याचवेळी तीव्र वेदना सुरीच्या धारेसारखी तिच्या ओटीपोटातून सर्वांगात भिनली. मल्ली बेशुद्ध झाली.
अम्मी हॉस्पिटलमधून नवीन बाळ घेऊन घरी आली तेव्हा मल्ली जुनी झाली होती. पाच-सहा दिवस हे सुरु होतं. तिची क़ैफ़ियत अम्मी ऐकणार नव्हती आणि अब्बाला सांगण्याची तिची इच्छा नव्हती. आई दुसरी आली की बाप तिसरा होऊन जातो!
**
तीच मल्लिका, मोठी झालेली, अधिक दिलक़श, देखणी झालेली मल्लिका, माझ्यासमोर बसून मला सांगत होती-
“दिदी, मेरी दुकान तो उसी दिन ‘खुल’ गई थी जिस दिन माझ्या विजापूरवाल्या मामाने मला..!” एक आवंढा गिळून मल्लिका म्हणाली, “बाहेर की दुनिया बहोत कुत्ती है.. मेरे पास ना शिक्षण, ना पैसा, डोक्यावर हात ठेवायला बाप-भाऊ नाही..आणि एक म्हातारी आई, दोन तरण्या शिकणाऱ्या बहिणी.. आणि माझं हे हजारात दिसणारं रूप! लोक म्हणतात, धुणीभांडी कर.. पण तिथेही घरात पुरुष असतात ना? ते धरतात कधीतरी.. काम साधल्यावर पन्नास-शंभरची नोट कुर्तीत कोंबतात. त्या पैशात घरभाडं, घरखर्च, बहिणींच्या शिक्षणाचा खर्च, आईच्या आजारपणाचा खर्च कसा भागवणार होते मी?”
“अग पण ती आई आणि बहिणी सावत्र आहेत ना? त्या आईने खूप त्रास दिलाय ना तुला?”
“असू दे.. बाईची जात हायेत ना? मी जशी यतीम (अनाथ) झाली, तशा त्या पण यतीम झाल्याएत ना?? तिच्यात जोर होता तेव्हा ती ‘तिच्यासारखी’ वागली. मी आता ‘माझ्यासारखी’ वागते!
मी तिच्याकडे बघतच राहिले. मला क्षणभर वाटलं, रात्र पडायच्या आधीच माझ्या घरात चांदणं सांडलंय.. खिन्न.. उदास.. पण अपरिमित लावण्यवान! आणि ती खिन्न नजरेने हसत म्हणाली,
“गूच खायचा तर कुत्र्याचा कशाला? त्याने ना माझं पोट भरणार, ना माझ्या कुटुंबाचं. त्यापेक्षा हत्तीचा खाते ना.. सगळे सुखात! माझं जे व्हायचं ते झालेलंच आहे. भांडं एकदा फुटलं काय आणि शंभर वेळा फुटलं काय, त्याची किमत दोन कौडीच!”
‘बाईची अब्रू काचेच्या भांड्यासारखी असते’ वगैरे गोष्टी थोतांड असतात हे तिला सांगण्याचा प्रयत्न केला मी. ती हसत राहिली. शेवटी म्हणाली, “नवऱ्याच्या, बाप-भावाच्या पंखात सुरक्षित बसून हे सगळं बोलता येतं. आधार तुटला तरी तुझ्याकडे शिक्षण आहे दिदी.. हातात हुनर आहे.. मी फक्त नाचू शकते.. आणि नाचतेय.. पूर्वी माझ्यासारख्या मुली कोठ्यावर नाचवल्या जायच्या, आता मी हिरोईनच्या मागे घोळक्यात नाचते. त्यासाठी पण मला माझ्या शरीराचं दुकान उघडून द्यायला लागतं. काम मिळतं, भरपूर पैसा मिळतो पण एका जिंद्या-जिवंत मुलीचं ‘दुकान’ होऊन गेलंय दिदी!”
“अग पण तुम्हा लोकांच्या युनियन असतात, त्याचं कार्ड असतं ना तुमच्याकडे?” मी मूर्ख प्रश्न केला. मल्लिकाने तिथलं राजकारण सांगितलं. रोज काम मिळावं म्हणून युनियनवाल्यांना खुश ठेवावं लागतं. डान्स मास्टर्सची खुशामद करावी लागते. दिग्दर्शकाच्या असिस्टंटची मर्जी संपादावी लागते.. वगैरे.. वगैरे.. आणि यासाठी मल्लिकासारख्या मुलीकडे काय होतं? तिचं रूप!
मल्लिका आत्ता कुठे तिशीत आलीये. तिच्या त्या मामानेच तिला अब्बा मेल्यावर एक्स्ट्रामधे नाचण्याचा रस्ता दाखवला. अम्मीला आता कॅन्सर झालाय. मल्लिका नाचायला लागली तेव्हा ती ठणठणीत होती. आता सनाच्या लग्नाच्या गोष्टी सुरु आहेत, धाकटी तस्लिमा उच्चशिक्षण घेतेय. सनाचं ग्रॅज्युएशन झालंय. अब्बा गेला तेव्हा मल्लिका चौदा-पंधराची होती. आपल्या भावाचं घरात येणं-जाणं का होतंय हे अम्मीला कळत होतं. पण ती काही बोलली नाही. मल्लिका पोटची पोर थोडीच होती! त्यानिमित्ताने घरात पैसा देत होता मामा. खर्च जसा वाढायला लागला तसा मामाचा पैसा अपुरा पडायला लागला आणि त्याने एका मित्राच्या सल्ल्याने मल्लिकाला ‘सिनेमात घातलं!’ मोठ्या ओळखीशिवाय तिला काम मिळणं शक्य नव्हतं. इथे तिचा डान्स कामी आला आणि ती ग्रुप डान्सर झाली.
पावसाळे-उन्हाळे येत राहिले, जात राहिले. मल्लिकाचं कुटुंब बऱ्या घरात राहायला आलं. आपल्या वाट्याला जे आलं ते आपल्या बहिणींना करावं लागू नये म्हणून मल्लिका जपत होती. जीवाचं रान आणि शरीराची घाण करून घेत होती. दोघी बहिणी देखील तिच्यावर जीव टाकायच्या. सनाने शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करायची म्हंटलं. पण मल्लिकाने तिला समजावलं, “माझ्या पायात जोर आणि अंगात रूप आहे तोपर्यंत तुम्ही दोघी लग्न करून आपापल्या घरी जा, अम्मीला मी बघेन!” अम्मीलाही सनाचं लग्नच व्हायला हवं होतं. अम्मी आताशा सारखी आजारी असायची. खोकल्याने हैराण व्हायची. वय काही फार नव्हतं तिचं. पण पाप लवकर उगवून येतं, पुण्याला फळ यायला वेळ लागतो! मल्लिकाचं पुण्य कधी फळाला येणार होतं कोणजाणे. आत्ता तर तिच्या अडचणीच वाढत होत्या. बहिण सिनेमात नाचणारी म्हणून सनाचं लग्न ठरत नव्हतं. तस्लिमाच्या शिक्षणाचा खर्च वाढत होता. तशात अम्मीला कॅन्सर झाला. औषधांच्या खर्चाची भर पडली. मल्लिका आता आपल्या पायावर उभी होती. नवीन घरात जातांना तिनं मामाला झाडूने मारून घरातून हाकललं. ‘आता माझा धंदा मी करू शकते, मला भडव्याची गरज नाही,’ असं सांगितलं त्याला. चौघीजणी नवीन घरी राहायला आल्या तेव्हा आसपासच्या लोकांना मल्लिकाबद्दल प्रश्न पडायचे. पण कॅमेऱ्यासमोर नसेल तेव्हा मल्लिका अगदी साधी असायची. सालस वागायची. तिने लोकांना खरं ते सांगितलं.. अर्थात अर्धसत्य! मी ग्रुप डान्सर आहे. स्वत:चे फोटो दाखवले. लोक तिला स्क्रीनवरही ओळखू लागले. तिचं आणि तिच्या कुटुंबाचं सोसायटीतलं राहणं सुखाचं झालं. मी तिला म्हंटलं, लोकांना ग्लॅमरच्या जगाचं आकर्षण असतं. मल्लिका नेहमीसारखी गूढ हसून म्हणाली-
“एवढंच नाहीये दिदी.. माझ्या लहानपणी लोक पैसा ‘कुठून’ आला ते बघायचे. कितीही श्रीमंती असली तरी वाईट धंदे करणाऱ्यांना इज्जत नसायची. आता फक्त ‘पैसा आहे’ एवढंच बघतात. तो कुठून का आलेला असेना. सोसायटीत माझी जागा पक्की करायला मी पण पैसा खर्चला. लोकांना जेवण दिलं. ईद-दिवाळीत शीर कुर्मे आणि मिठाया पाठवल्या. बर्थडे, लग्नात भारी गिफ्ट्स दिले. आणि लोकांनी मला, माझ्या कुटुंबाला स्वीकारलं!”
सनाच्या लग्नातही मल्लिकाने पान्यासारखा पैसा खर्च केला. त्याशिवाय ते लग्न होणारच नव्हतं! तस्लिमाला उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवलं, तिने तिथेच लग्न केलं आणि ती स्थायिक झाली. परवा मल्लिका मला सांगत होती-
“दिदी, आता माझं आयुष्य खूप शांत झालंय. मी चांगली डान्सर म्हणून नाव कमावलंय. आता मला काम मिळवण्यासाठी ‘दुकान’ उघडावं लागत नाही. हल्ली डान्सर्सना पैसा पण चांगला मिळतो. महिन्यातून एखादा तरी डान्स असा मिळतो जिथे वयस्कर डान्सर असते.. ती काहीतरी खट्याळ प्रश्न विचारते. असा एक डान्स मिळाला तरी माझी दोन महिन्याची बेगमी होते. अम्मी पण आता चांगली वागते. मी सुखात आहे!”
मी तिला विचारलं, “तुझ्या आयुष्याचं काय? म्हातारपणाचा विचार केलायस?”
ती म्हणाली, ‘झालंच की आता, पन्नाशी आली. आणि दिदी, रानफुलं देवाला वाहत नाहीत, मजारीच्या चादरीवर पण रानफूल नसतं. ते कितीही खूबसूरत आणि खुशबुदार असलं तरी त्याच्या नशिबात फुलणं आणि कोमेजून गळून जाणं एवढंच असतं. त्याला आणून कोणी घरातल्या फुलदाणीत लावत नाहीत!’
मल्लिकाचं म्हातारपण कसं असेल मला माहित नाही. मी तिला सेव्हिंग, गुंतवणूक वगैरेचे धडे दिलेयत. ते ती करतेय. पण नेहमी म्हणते, ‘मला संसार करायचा होता दिदी.. पण माझ्यासारखीशी कोण लग्न करणार? ज्याने फक्त रूप बघून केलं असतं त्याला माझा इतिहास माहित असता.. आणि मागणी घालून कोणी करेल असं माझ्याकडे काहीच नव्हतं. शिक्षण नाही, डोक्यावर बाप-भाऊ नाही, धड माहेर नाही.. कोण कशाला करेल माझ्याशी लग्न? रूपावर पुरुष भाळतो, त्याचे कुटुंबीय नाही!’
मल्लिका कधीतरी मला भेटायला घरी येते. जातांना साईबाबांच्या मूर्तीसमोर उभी राहून नमस्कार करते. वळते तेव्हा तिच्या डोळ्यात धुकं दाटलेलं असतं. मला कायम असं वाटतं की ती देवाला म्हणत असेल,
संसार मी करते मुका, दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी.. (विंदा करंदीकर)
(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)
………………………………………………..