-मुग्धा कर्णिक
रक्ताने भरलेले इनसॅनिटरी फडके
चालतेय आमच्या देवाला.
कुणाकुणाचं रक्त सांडलेलं…
कुणाकुणाचे टाहो फोडत वाहिलेलं.
रक्त लाल गुठळ्यांचं
या रक्ताने भिजते देवांच्या बुडाखालची भूमी
रामाच्या नावे रक्ताने भिजते
तरीही दुभंगून जात नाही.
मस्त देत राहते आणखी जागा देवळांना.
रक्तात भिजलेले ते फडके असते कपाळाला बांधलेले-
कषायरंगी… गेरुआ…
फडके असते गळे आवळणारे
रंगीबेरंगी
मग होतो अवघा रंग एकच
रक्ताचा फडक्याफडक्यांवर!
रक्ताने भरलेले सॅनिटरी फडके…
त्यावर कुणाचेही रक्त सांडलेले नसते
ती असते नव्या रक्ताच्या ट्यांहाची
पाझरलेली नियमित सज्जता
पस्तीसचाळीस की जास्त हजार वर्षांपासून
मानवी माद्यांच्या जन्मोत्सवी रक्ताला
जिरवत आलेली भूमी…
तिच्यावर गेल्या हजार वर्षांत सुजत गेलेले देव-
आणि त्यांचे कडू भक्त-
नाकारतात या रक्ताला!
युगायुगांच्या रजस्वला माता नारी
डोळ्यांत रक्त उतरवून
पाहात आहेत,
कृतघ्नतेचा आणखी एक आविष्कार,
षंढ देवाच्या आवारात.
त्याचे देवत्व संपायचा काळ जवळ येतो आहे.
त्याचे शून्यत्व लक्षात येते आहे.
उद्ध्वस्त होईल तो.
रजरक्ताने भिजलेल्या भूमीला मिळून जाईल तो.
आणि ‘ते’ सगळेच.
(कवयित्री इंडियन स्टडी सेंटर ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत)
जबरदस्त !