उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या प्रकरणातील कारचे मालक मनसुख हिरेनच्या संशयास्पद मृत्यूच्या संदर्भामध्ये जो काही हल्लाबोल सभागृहामध्ये झाला तोही विरोधी पक्षाच्या दृष्टीकोनातून विचार जर केला तर तो अपेक्षितच आणि योग्य होता . मुळात सचिन वाझे हे वादग्रस्त पोलिस अधिकारी आहेत . त्यांची अनेक एनकाऊंटर्स वादाच्या भोवर्यात सापडलेली आहेत . नंतरच्या काळामध्ये ख्वाजा युनूसच्या मृत्यू प्रकरणात त्यांचं नाव थेट आरोपी म्हणून चर्चेत आलेलं होतं . ख्वाजाचा पोलिसांनी एन्काउंटर केला असा आरोप ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलेला होता त्यात एक सचिन वाझे आहेत . पुढे त्यांना याच आरोपाखाली पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं . ते प्रदीर्घ काळ निलंबित होते . या निलंबनाच्या काळातच ते शिवसेनेत गेले आणि पुन्हा ते पोलीस सेवेत आले ; खरं तर त्यांना परत ‘आणण्यात’ आलं , असं म्हणणं जास्त योग्य होईल . माझे ज्येष्ठ मित्र आणि मुंबई उच्च न्यायालयाचे एक सेवानिवृत्त न्यायमूर्ती म्हणाले , निलंबनाच्या काळामध्ये कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला सक्रिय राजकारणात भाग घेता येत नाही कारण निलंबित असतांनाही तो शासकीय सोयी सवलती घेत असतो . म्हणजे तो शासकीय सेवेतच असतो . सत्तेच्या राजकारणात उद्धव ठाकरे हे नवीन असल्यामुळे त्यांना कदाचित हे माहीत नसावं पण , त्यांच्या सल्लागारांना तरी हे माहीत असायला हवं होतं . निलंबन काळात सचिन वाझे राजकारणात सक्रिय झाले त्याबद्दल कारवाई होण्याऐवजी त्यांना सन्मानानं ( ? ) म्हणजे नियम बाजूला सारुन सेवेत घेण्यात आलं हे उघड आहे आणि ते कधी ना कधी महागात पडणार होतं व तस्सच घडलंही . मग सभागृहात ‘तुमचा अर्णब तर आमचा सचिन’ हा खेळ रंगणं , यालाच राजकारण म्हणतात .
विधिमंडळ वृत्तसंकलनाशी माझा संपर्क आला तो साधारण १९७८पासून . त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राम मेघे होते . मग ज्येष्ठ समाजवादी नेते ग. प्र. प्रधान , त्यानंतर रा . सू . गवई त्यापदी आले-तिथंपासून ते धनंजय मुंडे अशी परिदेतील विरोधी पक्षनेत्यांची कामगिरी एक पत्रकार म्हणून बघता आली . विधानसभेत तेव्हा गणपतराव देशमुख विराधी पक्ष नेते होते मग उत्तमराव पाटील आणि त्यानंतर प्रतिभा पाटील नेत्या झाल्या . दि . बा. पाटील , शरद पवार , गोपीनाथ मुंडे , मनोहर जोशी , छगन भुजबळ , नारायण राणे , नितिन गडकरी , एकनाथ खडसे , यांच्यासारख्या दिग्गजांनी गाजवलेला काळही अनुभवता आला , त्याचं वृत्तसंकलन करता आलं . त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाकडून सत्ताधार्यांना अडचणीत आणलं जात असे त्या कालखंडाची आठवण करुन देणारे देवेंद्र फडणवीस यांचे हे हल्ले होते , ते हल्ले हल्ला चढवताना देवेंद्र फडणवीस एखाद्या विरोधी पक्ष नेत्याला जसं वागायला हवं तसं वागले यातही काही शंका नाही . देवेन्द्र फडणवीस यांच्या भाषेसंबंधी कांही हरकत घेता येईल पण , त्याबाबतीत सारेच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत !