माणसाने पृथ्वीपासून सर्वात दूरवर पाठवलेले यान कोणते?

-अमित जोशी

अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांचे शीतयुद्ध ऐन भरांत असतांना दोन्ही देशांमध्ये अवकाश स्पर्धाही( १९५७ -१९७५) जोरात सुरु होती. यापैकी एक स्पर्धा म्हणजे वेगवेगळ्या ग्रहांजवळ कृत्रिम उपग्रह – यान पाठवण्याची स्पर्धा. यानिमित्ताने Pioneer आणि Voyager या दोन महत्त्वकांक्षी मोहिमा नासाकडून आखल्या गेल्या.

Pioneer म्हणजे मुहूर्तमेढ रोवणारे. तर Voyager म्हणजे दूरचा प्रवास.

Pioneer मोहिमा १९५८ पासून चंद्रावर उपग्रह पाठवण्याच्या निमित्ताने सुरु झाल्या. या दरम्यान Pioneer – (१० मार्च १९७२) आणि Pioneer – (११ एप्रिल १९७३ ) ही दोन जुळी यानं ठराविक कालवाधीच्या अंतराने गुरु ग्रहाच्या दिशेने पाठवली गेली. गुरु ग्रहाजवळून पहिल्यांदा जाण्याचा मान जाणारा Pioneer – १० ला मिळाला. तर Pioneer – ११ ने गुरु ग्रहाजवळ जात गुरुत्वाकर्षणचा फायदा घेत शनि ग्रहाच्या दिशेने झेप घेतली आणि शनी ग्रहाच्या जवळ जाणारा पहिले यान म्हणून मान पटकावला. नंतर हे दोन्ही यान अवकाशाच्या अनंत अशा पोकळीत मार्गस्थ झाली.

याच वेळी विविध ग्रहांजवळ पोहोचण्याचा नासाचा Mariner कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमाद्वारे शुक्र आणि मंगळ ग्रहाजवळ जाण्याचा प्रयत्न नासा करत होती. या दरम्यान गुरु आणि शनी ग्रहाला भेटी देण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. याच कार्यक्रमा दरम्यान १९८०-९० दरम्यान कधीही भेट ने दिलेले ‘युरेनस’ आणि ‘नेपच्युन’ हे दोन ग्रहांजवळ जाणे शक्य असल्याचं नासाच्या लक्षात आलं आणि Mariner या कार्यक्रमाचे नासाने Voyager Program असं नामांतर केलं.

Voyager -१ (सप्टेंबर १९७७ ) तर Voyager -2 (ऑगस्ट १९७७) गुरु ग्रहाच्या दिशेने रवाना झाले. या दोन्ही यानांनी गुरु आणि मग शनी ग्रहाची जवळून अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे काढली. दरम्यान शनि ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा फायदा घेत ( जसे गोफणीने दगड गोल फिरवून जोराने – वेगाने फेकला जातो ) Voyager -१ ने आणखी वेग पकडला आणि विश्नाच्या अनंत पोकळीत रवाना झाला. तर Voyager -२ ने युरेनस, नेपच्युन या ग्रहाजवळून जात विश्वाच्या पसाऱ्यात रवाना झाले. आजही युरेनस, नेपच्युन या ग्रहांजवळून जाणारे Voyager – २ हे एकमेव यान ठरले आहे, हे विशेष.

सूर्यमालेतील सर्वात दूरवरचा ग्रह – प्लुटो ग्रह. याचा अभ्यास करण्यासाठी नासाने जानेवारी २००६ ला New Horizons ( नवी क्षितीजे ) नावाचा उपग्रह पाठवला. गंमत म्हणजे अर्धे अंतर पार केले असतांना प्लुटो ग्रहाची ग्रह म्हणून मान्यताच रद्द करण्यात आली होती. अर्थात यामुळे मोहिमेवर काहीच फरक पडणार नव्हता.  जुलै २०१५ ला प्लुटो ग्रहाजवळून जात त्याची उत्तम छायाचित्रे घेतली आणि New Horizons हे अनंत अवकाशाच्या पोकळीत मार्गस्थ झाले.

तर Pioneer -१० आणि ११ , Voyager -१ आणि २, New Horizons ही मानवाने पाठवेली सर्वात दूरवरची यानं ठरली आहेत. यापैकी दूरवरचे यान कोणते ? अनेकांना  सर्वात आधी रवाना झाल्याने  Pioneer हे दूरवरचे यान वाटते. मात्र  याचे उत्तर आहे Voyager – १ .  ग्रहांजवळून जातांना संबंधित ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा जास्तीत जास्त फायदा Voyager – १ ने घेतला.

 सध्या वर उल्लेख केलेली यानं कोणत्या वेगाने अवकाशात प्रवास करत आहेत ते पुढीलप्रमाणे…….

Voyager – १.१७ किमी प्रति सेकंद ( वेग अंदाजे )

New Horizons १६ किमी प्रति सेकंद

Voyager – २. १५ किमी प्रति सेकंद

Pioneer -१०,१२ किमी प्रति सेकंद

Pioneer -११.११ किमी प्रति सेकंद

यापैकी किती यानं संपर्कात आहेत ?  यानावर असलेल्या विविध उपकरणांद्वारे नियमित  संदेश मिळत असतील तर समजायचे की यान संपर्कात आहे. सध्या फक्त Voyager – २ आणि New Horizons ही दोन यानं संपर्कात आहे. बाकी सर्व यांनांचा संपर्क हा मोहिमेची सुरुवात झाल्यावर अगदी २०- २५ वर्षांपर्यंत किवा त्यापेक्षा अधिक काळ कायम होता, म्हणजेच मोहिमांचे उद्दीष्ट्य पूर्ण झाल्यानंतर सुद्धा होता. त्यामुळे या यानांची यापुढची वाटचाल कोणत्या दिशेने असेल, हे खात्रीलायक सांगता येतं.

अवकाशात ज्या दिशेने या यानांचा प्रवास सुरु आहे त्या मार्गावर लघुग्रह किंवा अन्य अडथळा येण्याची शक्यता नसल्याने यानांच्या वेगानुसार ते आपल्यापासून किती दूर असतील याचा अंदाज लावता येतो.

Voyager – १,१४८ AU ( अंदाजे )

Pioneer -१०,१२५ AU

Voyager – २,१२३ AU

Pioneer – ११,१०३ AU

New Horizons ४६ AU

आता AU म्हणजे काय तर Astronomical Unit. अवकाशातील अंतरे मोजण्याचे हे एकक आहे. सुर्य आणि पृथ्वी मधील अंतर हे एक Astronomical Unit ( 1AU ) समजलं जातं. किलोमीटरच्या भाषेत हे अंतर – 1 AU = सरासरी १४ कोटी ९५ लाख ९७ हजार ८७० किलोमीटर, एवढे भरते. आता याची तुलना वर उल्लेख केलेल्या यानाच्या अंतराशी करा. करत बसा आकडेमोड.

तर सर्वात दूर अंतरावर पोहचलेल्या यानाचा मान हा Voyager – १ कडे जातो. वर उल्लेख केलेल्या इतर चार यानांचा वेग लक्षात घेतला तर अंतराच्या बाबातीत Voyager – १ ला मागे टाकणे हे शक्य नाही.

आता या सर्वांचा फायदा काय ? तर New Horizons वगळता सर्व यानं ही सूर्यमालेच्या बाहेर, सूर्याच्या प्रभाव क्षेत्राबाहेर गेलेली आहेत. यामुळे सूर्यमालेच्या बाहेर क्षेत्र नेमकं कसं असतं ? सूर्य आणि जवळचा तारा यामधला अवकाश नेमका कसा असतो ? कोणते भाररहित कण असतात वगैरे…..अशी अवकाश संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची माहिती मिळाली आहे.

अर्थात तंत्रज्ञानात माणूस आणखी प्रगती करेल, तेव्हा यापेक्षाही वेगाने आणि अधिकचे अंतर अतिशय वेगाने कापणारी यानं तयार होतील आणि वर उल्लेख केलेल्या यानांना सहज मागे टाकतील यात शंका नाही.

जाता जाता-.प्रकाशाचा वेग हा सेकंदाला सुमारे ३ लाख किलोमीटर आहे. सूर्यापासून निघालेला प्रकाश हा पृथ्वीवर साधारण ४९९ सेकंद म्हणजेच साधारण ८ मिनीटे ३१ सेकंदात पोहचतो. तेव्हा सर्वात दूरवर असलेल्या Voyager – १ यानाकडे आपल्या सूर्याचा प्रकाश पोहचायला जेमतेम १६ तास लागतात. सूर्य प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणारे यान जेव्हा तयार होईल तेव्हा कुठे माणसाचा खऱ्या अर्थाने विश्वात संचार सुरु होईल. तरीही विश्व एवढं मोठं आहे की प्रकाशाचा वेगसुद्धा कमीच पडेल. यावर नंतर कधीतरी.

(लेखक ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीत कार्यरत आहेत)

9833224281

Previous articleचमत्काराची जादूगिरी…२५ वर्षांची महामारी
Next articleडॉली, किट्टी और वो… बाईच्या सेक्शुअल डिझायर दाखविणारा चित्रपट
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here