बहिरम बोवा

-प्रा. मधुकर केचे

पूर्ण काळ्यागोऱ्या वर्षाचा शिणवटा घालवण्यासाठी खेडूतांना एक दिवसाची जत्रा हवी. देवतेच्या नावाने केलेले नवस फेडणे, वर्षाचा अप्रूप बाजारहाट उरकून घेणे आणि जलसे-तमाशे-कुस्त्यांची इनामी दंगल यामध्ये मन रमवून घेणे, यासाठी फार तर दोन किंवा तीन दिवसांची जत्रा पुरावी. हा नियम महाराष्ट्रातच नव्हे तर जवळजवळ अवघ्या भारतानेच मान्य केलेला आहे.

त्याला अपवाद केवळ विदर्भाचा. इथे यात्रा महिनाभर चालतात. कधी कधी दीड महिनाही. आम्ही जन्माला येण्याआधीपासून या जत्रा चालल्या आहेत. यात्रेच्या तोंडात मारतील असे रंगीत समृद्ध बाजार आता अगदी दारासमोर आले ! करमणूक तर नको म्हणता म्हणता थेट घरातच ती टी. व्ही. रेडिओच्या रूपाने शिरली! तरीही या यात्रा चालू आहेत. बाजारहाट आणि करमणूक ही दोन प्रमुख कारणे गेली, तसेच धर्माचेही कारण खलास झाले. नवस-विवस आजकाल यात्रेमध्ये पूर्वी- सारखे फेडले जात नाहीत. दर दहा किलोमीटरला एक असे रेडिमेड साधू उपलब्ध आहेत! त्यामुळे नवस फेडायला कोणी जत्रेची वाट पाहात नाही.

एवढी सारी कारणे गेली, तरी या दीर्घकालीन जत्रा चालूच आहेत. भीकबाळी आणि पागोटवाल्या आजोबा पणजोबांची परंपरा आजचा पॅट-बुशशर्टवाला नातू आज्ञाधारकपणाने चालवतो आहे. काही यावचे- ध्यायचे नसताना आणि विशेष म्हणजे नवस वगैरे करायचे नसतात तरीही! तर अशी लंब्या ऐसपैस यात्रावली. आमच्याकडची गावे आहेत ऋणमोचन आणि बहिरम तसे तिसरे एक सालबर्डीही. पण सालवडीं शिवरात्रीच्या आगेमागे दोन-दोन दिवस अधिक रंग धरते. खरे ते ऋणमोचनच आणि ते बहिरम.

ही तीनही ठिकाणे शंकराची, भैरवाची, मुदगलीची. विदर्भात विठोबाचीही भक्ती आहे. पण यात्रेसाठी आम्ही पंढरपूरला पायी जातो. बद्रीनारायण काशी इथेही जातो. पण आमच्या अंगणातल्या जत्रा मात्र केवळ शंकराच्याच ! बहिरम हाही शंकरच. ह्याचे खरे भक्त गोंडकोरकू, अर्थात आर्य- अनार्य या दोहोंना सारखीच प्रियपूज्य अशी देवता शंकरच. गोंडांच्या स्वतःच्या शंकर सोडून इतरही देवता आहेत. बहिरम मात्र शंकरच असावा. विश्वकोशापासून संस्कृतीकोशापर्यंत कुठेही एवढ्या मोठ्या देवतेचा, तिच्या प्रदीर्घकालीन यात्रेचा व तिच्या निमित्ताने होणाऱ्या एका आगळ्या बाजाराचा उल्लेख नाही! केवळ त्या शब्दाचा अर्थ तेवढा एका ठिकाणी मोठ्याच मुष्किलीनं दिलेला आहे. तो म्हणजे बहिरम-भैरव.

विदर्भाची काळी कसदार सोने-चांदी ओकणारी जमीन. तिची वर्धे- पूर्णेच्या कुशीत बागडणारी लेकरे. तो आषाढीला “हरी मुखे म्हणा,” “हरी मुखे म्हणा” करीत, पंढरपूरला जाणार. “महादेवा जातो गा ऽऽ” करीत चौऱ्या गडाला किंवा लहानग्या देवाला म्हणजे सालबर्डीला जाणार. पण सातपुड्याखालचा अमरावती जिल्हा नेमका ऋणमोचन किंवा बहिरमलाच जाणार. संस्थानिकांशी बरोबरी करणारे इकडचे तेव्हाचे तळवेळ-वरखेडचे जमीनदार, यात्रा महिन्यावर आली की, बंडचा भरभरून त्यांचे सामान बहिरमला जाणार. तिथं मग पूर्ण महिनाभर तंबूडेरा !

पहाडावरचे देव सामावण्याएवढं देऊळ सोडले तर बहिरमला बांध- काम असे नाहीच. दुपार टाळायची तर घनदाट वृक्ष मात्र भरपूर. तसा सातपुडा हा सागासाठी प्रसिद्ध सागाला खूप मोल आणि इज्जत असली, तरी त्या झाडाला सावली नाही. पण सातपुड्याला पायथ्याशी आंबे, चिच, महू अशा गहन, भोर व्यक्तिमत्वाच्या झाडांची किनार आहे. जत्रा दुपारी विसावते ती त्या झाडांखालीच.

पहाडीची मोकळी हवा, सागवनाचे ते भव्य विलोभनीय दृश्य हे वर्ष- भराच्या वन्हाडी कास्तकारी जीवनाला नाविन्य देते. ऋणमोचन वाटावे, असेच महिन्या-पंधरावड्याचे रंगीत जीवन. पण पूर्णामाईचा थंडावा आणि नेहमीची शेती व्यापार तिथे अपूर्वाई नाही. बहिरम हा रुचि पालटच. जत्राबाजार किंवा देऊळ तिथे नसते. तरीही शिणशिकारी- साठी तिथे जावे अशी तिथली रमणीयता, जवळच म्हणजे सातपुड्या- च्याच कुशीत मुक्तागिरी नावाचे अतिरम्य निसर्ग ल्यालेले जैनांचे मंदिर आणि त्याच्याच काहीसे बाजूला इंग्रजांनी उन्हाळी निवासा- साठी निवडलेले चिखलदरा ! गोरा कलेक्टर तिथे उन्हाळयात आपली राजधानीच न्यायचा. आज तो इंग्रज नाही. उन्हाळी राजधानीही तिथे आता जात नाही. तरीही लोक नेमाने जातात. कारण निसगनि आपल्या लतावृक्षांच्या रंगीत घनदाट वैभवाच्या जोडीलाच काही खास अशी चमत्काराची खेळणी तिथे ठेवली आहेत. तो मंकी पॉईन्ट त्यात- लाच. तिथे वारा नेहमीसारखा वागतच नाही. एकदम मूड बदलल्या- सारखा माकड होऊन तुमच्या अंगावर येतो!… तुम्हाला गुदगुदल्या करतो आणि तुम्ही प्रेयसीला एक हाक मारली तर त्या हाकेच्या पाच हाका करून तुम्हाला वेडावून दाखवणारा पंचबोल हा दरीचा थट्टेखोर भागही एकदम तुमच्या आवडीचा होऊन जातो! जवळच वैराट डोंगरात देवीच्या घुमटीजवळून जो सूर्यास्त दिसतो तो तर अपूर्वच. इतका रंगत रेंगाळत होणारा सूर्यास्त !

अशा या खेळकर, खोडकर सातपुड्याचा हा पायथा. कित्येक शतका- पासून इथे दरसाल महिनाभर आधी लोक येतात. केवळ दिवसभरा- साठी आलेले झाडाखाली दुपारी विसावतात. जोडीला रानडहाळयांचे मांडव घालून सावली केलेली दुकाने व हॉटेले असतातच. ही माणसे बहिरमबोवाचे दर्शन आटोपून आणि जुजबी वाजारहाट उरकून छकड्या बैलाने जवळपासच्या गावी निघून जातात. त्यातला कोणी रात्रीच्या जलशातमाशाला मुक्कामीच असला तरी त्याचे छपरावाचून अडत नाही. कारण जळगावकरणीची संगीत वारी ऐकताना त्याला झोपायची सवडच उरत नाही !…

पण असे हे टेम्पररी उपरे या यात्रेत फारच थोडे. संपूर्ण महिना-दीड महिना इथे राहणारेच बहुसंख्य. अगदीच कमी ऐपत असली तर लहानसा छकडा भरून ती चार-पाच माणसे इथे महिन्याच्या मुक्कामी येतील. तंबूडेरा नसतोच. छकड्यातला दडप्याचा तडव दोनजण उच- लून धरतात. सातपुड्याच्या अंगावर केसांच्या विपुलतेने वाढणारा बांबू विकत घेऊन तो तडवाखाली आधाराखाली बांधतात. झाला मग अस्थायी तंबू आणि त्या पालातच दोन गोटे मांडून चहा-स्वयंपाकही ! पण तालेवारांची गोष्टच न्यारी. आपले वैभव दाखविण्याची स्पर्धा लागलेले ते सारे पाटील, देशमुख, राहुटचा, तंबू, डेरे यांचे मोहल्लेच त्या पहाडात उभे करतात. वाडयात द्याव्या तशा परस्परांना आपापल्या तंबूत मेजवान्या देतात. नुकत्याच विकलेल्या कापसाच्या रकमा ‘सदा रंग लाल तुझ्या भांगात गुलाल’ म्हणत पेटी तबल्यावर ठुमकणाऱ्या कोण्या चटकचांदणीवर उधळल्या जातात. करंजगावकरांपेक्षा गोरेखेडकरांनी दौलतजादा जास्त दिला ही स्तुतीवार्ता मग एव्हरेस्ट विजयाच्या गुमानाने दिवसभर फिरत राहाते !

डेऱ्या-राहुटद्यात महिनाभर पंगती झडतात. या यात्रेत एक सोय आहे. देवालाच नैवेद्य वकऱ्याचा हवा. त्यामुळे ॐ कार माधांना इथल्या यात्रेसारखा सोवळेपणा इथे नाही. मांधानाला तर महशूर पंजाबी हॉटेलदेखील मटनाचा मसाला घालून आळू रस्सा बनवतात. पण इथे बहिरामी सारा नळधाबोट्यांचा सुकाळ. दोन्ही सांजा मटण ! आणि कोणीही कोणाच्या पंगतीत जावे. बिनाआवतनाने देखील ! रांधणहाट याही खानावळी नावाच्याच. पर्मनन्ट जत्रा ही राहुटद्यांतल्या पंगतीतच जेवणार. जोडीला मग नवसाच्या पंगती आहेत. देवधर्माच्या नावाने केलेली अन्नदाने, भिकारीभोजने होतात ती वेगळीच.

आता ही तालेवार माणसे आपला लवाजमा आणि मुनीम-कारभार घेऊन महिन्याच्या मुक्कामी इथे येणार याची दखल इंग्रजांनीही घेतली. तहशीलदार (मामलेदार) मग इथेच मुक्कामी. महिनाभर कोर्टही इथेच भरणारे. शहरासारखे दिसणारे. एक झगमग स्वप्न इथे महिनाभर मुक्कामाला येणार. ते संपले की, जणू काही झालेच नाही असे सांगणारी पहाडाची गर्द झाडी नेहमीसारखी भगव्या खरीप पाषाणाशी कानगोष्टी करीत उभी !

आजही महिनाभराची जत्रा आहे. कारण विव्याची फळे (भिलावा) केवळ इथेच मिळतात. दुकानदार आदिवासी. देशातल्या इतर वाजारां- पेक्षा एकदम उलटा कारभार. इथे गिन्हाईक दुकानदारापेक्षा हुशार. बिब्याची फुले म्हणजे जर्दाळूच्यापार रुचकर असा रानमेवा. शिवाय उत्तमोत्तम बोरे सुकवून जात्यात त्याची साले भरडायची. बोरकूट म्हणून मिळणारा हा पदार्थ मग वर्षभर संपूर्ण विदर्भाच्या जेवणात तोंडी लावणे म्हणून राज्य करतो.

बासे बांबू विकले जातातच. त्यांचे लहान भाऊ म्हणजे हाती धरायच्या, कास्तकारीच्या, काठचा, मस्त भाजून नक्षी वगैरे काढलेल्या. त्याही मिळतात आणि बांबूपासून तयार होणारी बुरडी.. हस्तकला घ्यावी ती इथेच. पाटिशनसाठी बांबुचे जाड तट्टे बनतात. आमची मोर्शीची शाळा तर संपूर्ण तट्टद्याचीच. बाहेरच्या भितीही तट्टया- च्याच. तट्टद्याच्या भितीवर आवाज आदळला तर तो घुमत नाही. आमची शाळा तट्ट्याची म्हणून तिला विटा-सिमेन्टसारखे पाणी लागले नाही. जाड तट्टद्यापासून तर बैलगाडीच्या चोचदार घुमटी छपरापर्यंत सारे बुरडी विभ्रम. आता तर बांबूपासून मनी पर्ससारख्या सुदर वस्तूही बनतात. बहिरमला किती तरी शतकांपासून बांबुच्या परडघा, फुलांच्या डालेटोपल्या, बनतात, पन्नास साठ पोती धान्य साठवायची कणगीही इथे विकत मिळे. हा बाजारच और.

एकदा मी ब्राह्मणवाडा थडी या गावी मित्रांसोबत मुक्कामी गेलो. कन्हाडच्या नदीयडीची आठवण व्हावी असा नदीचा भव्य परिसर, आणि त्याला लागूनच सुताराचे दोन भव्य मोहोल्ले ! सुतार हा कसबी बलुतेदार. तो गावाला हवाच. पण साऱ्या गावाच्या कास्तकारी गरजा तरी किती ? खेडयात सुतार हवा तो कास्तकारी अवजारे करण्यासाठीच. तिथे काही कोणी सोफासेट करणार नाही. कोणी चुकून टेबल खुर्ची वगैरे जवळच्या शहरातून आणलीच तर तिची दशा अगदी शत्रूचीही होऊ नये अशी ! म्हणजे टेबल चक्क अंगणात अंगावर पावसाळा झेलणार ! त्याचे चारही चरण सडयाच्या शेणाची नक्षी उमटून रंगणार. त्यावर बिछान्याचे गुंडाळे, दुभत्या जनावरांच्या अलपाचे मेवण घमेले असे काहीबाही ठेवले जाणार ! हा बसाय-उठायला मोठा तस्तपोस हवा. आता गावाचा वाढी ऊर्फ सुतार तेवढा जोरदार असलाच तर त्याच्याकडून ती थोराड चीज बनवून घेतली जाणार. बाकी नेहमीचा कायदा म्हणजे सुताराने शेतीला लाग- णारी वखरे, डवरे, दुडे तयार करायचे.आणि असा सुतार गावाला फार तर एक लागतो, कधी कधी तर दोन-तीन गावं मिळून एक सुतार असतो. आता तुम्ही जर एखाद्या गावात एकदम पाच सहा घरे सुतारांची बघायला लागला तर सहजच दचकणार ! ब्राह्मणवाड्याला तर चक्क दोन मोहोल्लेच त्या मंडळींचे !

सहज म्हणून आठवले. वर्धा जिल्ह्याचा काही भाग, चंद्रपूर आणि भंडारा या साऱ्या विभागात तुमच्या लक्षात एक गोष्ट येऊन जाते. विदर्भ हा शेतीप्रधान. तेव्हा खेडी आवर्जून शेतमजुरांची वस्ती घेतलेली. स्वतःला मराठा म्हणवणारे व पूर्वीपासून ज्यांना लोक तिरळे, धनोजे, मराठी, लोणारी, जाधव इत्यादी कुणबी म्हणून ओळखतात ते लोक बहुसंख्येने आढळतात. पण विदर्भात सर्वत्र दिसणारी ही कुणब्या- मराठ्यांची बहुसंख्या चंद्रपूर वगैरे ठिकाणी मात्र कुठेतरी गायव झालेली आहे.

आणि या चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात मग बहुसंख्येने कोण दिसावे ? तर तेली जमात ! आता सुतार तसाच तेली. गावाला लागून लागून तेल किती लागणार? आणि तेवढे तेल काढायला तेली किती हवेत ? शिवाय आणखी एक गंमत आहे. आमच्या अमरावती, अकोला वगैरे जिल्ह्यात तीळ, भुईमूग, जवस ही तेलबियांची पिके खूप होतात. त्यांचे तेल काढण्यासाठी आम्हाला गावागणिक एक तेली आजवर पुरला. शिवाय चंद्रपूर, भंडारा हे विभाग गळिताची धान्ये पिकवणारे नव्हते. म्हणजेच काय की तिकडे एका गावात एक हेसुद्धा तेल्याचे प्रमाण नको. प्रत्यक्षात मात्र ते सत्तर टक्के आहे. मी चंद्रपूरचे खासदार पोटदुखे यांच्याशी बोललो. त्यांची तेली जमात. वास्तविक तेल गाळणारी ती तेली नसून वेगळी आहे, असा मुद्दा मांडला. तिकडे तांदळाची शेती आहे. धानाला खूप पाणी लागते. त्यामुळे जिकडे तिकडे तलाव आहेत. तलेये- तलाववाले- या शब्दाचे रूप तेली झाले असावे.

ब्राह्मणवाड्याला हेही म्हणण्याची सोय नाही. सुतारकाम करणारे, आजही आपली जात व तिचे काम न सोडलेले सुतार तिथे आहेत व तेही दोन मोहल्ले भरून,आणि त्याचे कारण बहिरमच. बहिरम हे बोरकूट, बिव्याची फुले व फळे, वासे काठ्या, वाशाचे बुरुडकाम या वस्तूंची विक्रीपेठ आहे- सातपुड्यात सडे घालणारी आवळा, विहाडा, हिरडा यांची झाडे इकडे विपुल. तर ती व इतरही औषधी फळ जडीबुटी तिथे विक्रीला येते. पण बहिरम खरे प्रसिद्ध आहे ते चाकजोड्यांसाठी. बंडी, छकडे, पायटांग्यारेंग्या, दमण्या या सर्व प्रकारांची सागवानी चाके घ्यायची ती बहिरमलाच. नुसत्या चाकजोड्याच नव्हे, संपूर्ण बंडीही इथेच घ्या. छोट्या ट्रकची आठवण करून देणारी अवाढव्य मजबूत अंगाची बंडी केवळ इथेच मिळणार. आणि बैलगाड्यांमधील फियाट, अम्बेसडर अशी दमणी, तुमची श्रीमंती सिद्ध करण्याइतकी रेशमी गाद्यांची, मऊ उशांची, डौलदार नक्षीदार दमणी, तीही इथेच.

या सर्व चाकजोड्या आणि बैलगाडी, दमण्या, बंडीचे सर्व आकार- प्रकार वर्षभर तयार होत असतात जवळच्याच ब्राह्मणवाडा थडी या गावात. चोरलेले आणि उजागरीचे सागवानी लाकूड फसणीच्या रस्त्याची धास्ती न ठेवता आणण्याची सोय इथे आहे. नदी इथे येते, ती पहाडातूनच. माहेराहून सुनेने लाडवांचा डवा आणि सोन्याचे डबोले घेऊन यावे तशी ती आषाढापासून श्रावणापर्यंतच्या सर्व पुरांमध्ये उत्तमोत्तम सागवानाची ओंडकी बल्ल्या वाहून आणते ! तो सारा माल इथे पकडला जातो व त्यावर ही सर्व कारागिरी चालते.या बैलगाड्यांच्या दडण्यासाठी पिढीजात तडव, पलंगासाठी मजबूत घट्ट नेवार आणि घरच्यांसाठी रजईचे मध्य प्रदेशातले कापड इथेच घ्यावे आणि निमाड जिल्ह्याचे कष्टाला न घाबरणारे काटक देखणे बैल घ्यायचे तर तेही इथेच.

आता आम्ही पूर्वीसारखे मध्यप्रदेश- वन्हाड नावाच्या प्रदेशात राहात नाही. संयुक्त महाराष्ट्र या प्रदेशातले पुण्या-मुंबईचे लोक सध्या आमच्याशी निगडीत आहेत. आजच्या पिढीला तर आमचे जबलपूर, छिंदवाडा, रामपूर वगैरे गावे व तेथील लोक यांच्याशी परवापर्यंत संबंध होते हेही माहीत नाही. कटणी, मुरवाडा, होशंगाबाद ही नावे आता आमच्या मुलांना चौथीच्या भूगोलात पाठ करावी लागत नाहीत.आम्ही मात्र याच कारणाने अस्वस्थ होतो. बहिरमला आमचे जुने नाते जोडले जाते. विदर्भाचे शंभर वर्षापूर्वीचे स्थिर जीवन तिथे उभे असते. मध्यप्रदेशाशी तिथल्या शुक्ला मित्राशी आमचे कैक शतकांचे संबंध तिथे आजही अबाधित आहेत. “कहा जावत है” वगैरे खास हिंदी तिथे भेटायला येते.

परवा बहिरमला गेलो. साग, गहू, पळस ही झाडे पाहिली की, जुना मध्यप्रदेश भेटल्याचा आनंद झाला. बहिरमची अर्धी जत्रा वन्हाडात तर उरलेली अर्धी मध्यप्रदेशात. तंबूत मेजवानीचे, नवसाचे मटण मसा- ल्याच्या रस्यासोबत उकळया घेत नाचत असते आणि जेवणाची तयारी म्हणून दोन पावले मध्यप्रदेशात टाकून महू किंवा पळसाची पाने आ ही घेऊन येतो. त्या पानांचे डोणे, पत्रावळया तयार करणे हा एक महिनाभर पुरणारा उद्योग. गावोगावच्या समर्थाचे मुक्काम कुठे पडणार त्याच्या जागा ठरलेल्या. त्यांच्या तंबूसाठी स्थायी ओटे तयार. त्यांच्या मटण पंगतीत जशी वन्हाडाची पाव्हणे मंडळी येणारच, तशी हक्काने ती मध्य प्रदेशची मंडळीही येणार.

आताशा नवसाचे मटण हा काही डोळे दिपवणारा प्रकार राहिला नाही. पूर्वी फारच होता म्हणतात. कलकत्त्याला कालीच्यासमोर जेवढी मुंडकी पडत, तेवढीच बहिरमबुवासमोरही ! दर्शनासाठी टेकाड चढ- णारांचे पाय बकऱ्यांच्या रक्ताने ओले होऊन जात ! वरून खाली येणारा तो रक्ताचा प्रवाह लांबीने एखाद्या थोराड नाल्यासारखा असे !

संत गाडगेबाबांनी ही जीवहत्या बंद केली. देवाबद्दलच्या या चुकीच्या क्रूर कल्पना पुढे नामजपभजनामध्ये परावर्तित झाल्या. जीवहत्या ही आपले दानशूरत्व दाखविण्यासाठी आणि जिभेचे लाड पुरविण्यासाठी होत असे. ती मात्र कायम आहे. गाडगेबाबांनी आपली मुंडीच त्या बकरे बळीच्या वेदीवर ठेवली होती! गाडगेबाबांचा हा सारा अधर्म आहे, असे मानणारे ते नवसवाले भक्त जंगी मारामारी करणारे होते ! सारे दृश्य एकदा आम्हीच जागवले. गाडगेबाबांवर सिनेमा निघाला. डॉ. लागू गाडगेबाबांच्या पोशाखात त्या देवळासमोर उभे होते. शूटिंग- पुरती पाच दहा बकरी व फिल्मी खाटीकही जय्यत तयारीत होते. समर्थक आणि विरोधक परस्परांवर लाठ्या उगारून ‘तयार’ होते. प्रसंग सिनेमाचा म्हणून त्यात मीठमसाला वास्तवापेक्षा जास्तच असेल. डॉ. लागूंनी अभिनय गाडगेबाबांपेक्षाही जास्त परिणामकारी केला असेल. पण मूळ प्रसंगाची सर मात्र त्या दृश्याला नव्हती! कारण लोकांची उत्सुकता टांगणीला लावणारी अनिश्चित अवस्था इथे नव्हती. शिवाय एकच एक वाक्य खंडीभर वेळा उच्चारून त्याच त्या हालचाली करण्याचा तो साराच प्रकार एकदम कंटाळवाणा ! त्या दृशात वाक्य होते “मी सहन करणार नाही !” मीही त्याच आवेशाने ते वाक्य उच्चारून तिथून निघून आलो.

बाकी त्या शूटिंगसारखे काहीतरी तेथे दरसाल व्हायला हवे. बहिरम निसर्गरमणीय, ग्रामीण पहाडी, बाजारपेठेचे आगळे असे जत्रेचे ठिकाण. पण तिथले ते गहन थोराड वृक्ष, उंच पहाड आणि दमण्या, छकडे, बैल. या सर्व वातावरणावर आज विजेच्या प्रकाशाचा असर आहे. ते ट्यूब लाईट, लाऊडस्पीकरची फिल्मी गाणी, शहरी पोशाख मिरवणारे आजचे लोक हे सर्व मिळून बहिरमच्या जुन्या जत्रेची नरडी आवळत आहेत असे वाटते ! आजच्या वातावरणात त्या शूटिंगच्या निमित्तानं एकदम जुना काळ दिसला. टेंभे, हिलाल, डिटमारच्या बत्त्या, टिमटिमचे छोटे दिवे अशा जुन्या खानदानी प्रकाशात दुकानदार बसले आहेत. पटके, पागोटी, जरीच्या टोप्या, कलबूतच्या टोप्या, रेशीमकाठी धोतर, कोशाचे सदरे लेवून उत्साह भटकतो आहे. आणि लावण्याही भोंग्याऐवजी सरळ गळयातून निघताहेत असा तो काही काळ क्षणासाठी त्या शूटिंगमुळे उभा झाला. गाडगेबाबांचे म्हणजे डॉ. लागूचे कीर्तन झाले. त्याचे रिटेक् होईपर्यंत लोकांना गाडगेबाबांचाच भास झाला. लोक मग उमाळचाने जुन्या जत्रेची उगाळणी करू लागले. आठवणी वयोमानाप्रमाणे होत्या. दहा वर्षापूर्वीच्या घटना देखील आता ‘आठवणी’च बनल्या आहेत. कसे सारे झपाट्याने बदलते आहे. आता आता म्हणजे काल परवा इकडे दारूबंदी होती. अस्सल महूपासून बनवलेली ‘टायगर’ छाप मग वहिरामला मध्यप्रदेशातून येई. पाच पावले चालून गेले की, महाराष्ट्राच्या पोलि साला वाकुल्या दाखवत व हप्ता डुबल्याचे दुःख देत आणि एम. पी. पोलिसाच्या खांद्यावर हात ठेवून ती टायगरची बाटली कायदेशीरपणे तोंडाला लावता येत होती! तिकडून येणाऱ्या मोटार लॉयऱ्यांमध्ये जे फुगलेले टयूव स्टेपनीत घातलेले असत त्यात हवा नावाची बेइज्जतदार वस्तू न राहता चक्क टायगर, नारंगी ठासून भरलेली असे….

सांगणारी माणसे म्हातारी असलो तर साठसत्तर वर्षाच्याही आधीच्या आठवणी निघतात. अमक्या पाटलानी किती बकऱ्यांचा नवस फेडला इथपासून तर तमक्या पैलवानानं किती शेर बोट्या फस्त केल्या इथपर्यंत आणि तमाशातल्या बाया आपल्या तंबूत आणून दोस्तांना दारूच्या नशेत “गडे हो, तुमच्यासाठी नवी वहिनी आणली आहे” इथपासून तर “तुमच्यासाठी नवी माय आणली” असे आपल्या पोरांना सांगण्यापर्यंतच्या त्या आठवणी !…

आणि मुख्य म्हणजे तो बहिरमबुवा-तो फारसा कोणीच पाहिलेला नाही ! पाच पाच किलो लोण्याचे गोळे व शेंदुराचे पेण्ड थापले जातात. त्यात तो बिचारा दवला आहे. समोरच्या होमाच्या आचेत लोणी वितळते. ढीग खचतो. पण पुन्हा लोणी येतच राहते. शेंदूर येतो. बहुधा शेंदूर हा श्रद्धेपेक्षाही चिरायू असावा. घोडयावर बसलेली बहिरमबुवाची एक छोटीशी मूर्ति आहे म्हणतात. पण कित्येक वर्षांत शेंदुराच्या व लोण्याच्या ढिगाशिवाय तिथे काहीही दिसले नाही!…

बहिरमच्या मातीने एक चमत्कार दाखवला आहे. लोकांनी त्यामुळे काही बोध घेतलेला नाही. लोक परत जाताना रजईचे कपडे, नवे छकडे किवा निमाडी बैल व रानमेवा म्हणजे चारोळी, बिबे किवा जडीबुटी घेऊन जातात. इथेच विकत घेतलेल्या बांबूच्या ढोपल्यांमध्ये ते सामान असते आणि त्यातच कुठे तरी पाच सहा गोवऱ्याही असतात. एवढेच की त्या शेण्या नसतात. ती माती असते. या चुनासिमेंट मिळ- ण्याच्या काळात ही माती त्यांनी न्यावी याला कारणे आहेत.

जुन्या गढीच्या पांढऱ्या मातीच्याच गुणधर्माची ही माती. भुईच्या पोटात ती गुणी माती मिळते. तिच्यात कॅल्शियम नसतो. त्यामुळे बांधकामात वापरली तर ती वारंवार पाणी मागत नाही. तिला चुन्या- सिमेन्टसारखे तडे जात नाहीत. ती कितीही वेळा वापरता येते. एका ठिकाणची काढून दुसरीकडे उपयोगात आणताना ती सदा तयार असते. ती चुन्यासिमेन्टसारखी जुनी होत नाही. पण लोक इथून ती नेतात. कारण त्यांना ती फक्त रंगरंगोटीसाठी हवी असते. हिरवी, गुलाबी, पिवळी, गोरी अशा विविध रंगांची फिक्क्या नाजूक छटांची आणि निळी, भडक गडद छटांचीही जणू तयार रंगच आणि एकदम उजळ चमकदार ! कुंभार लोक तिची झिलई भांडयांनाही देतात.

भद्रावतीला चिनी मातीचीच कारागिरी आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे श्री. मिरमिरा तिथे त्या मातीत अडकून पडले आहेत. त्यांनाही बहिरमच्या या मातीची जाण आहे. कुंड्या, फुलदाण्या, शोभापात्रे आणि नित्योपयोगी भांडीही या मातीतून निर्माण करून भाजली तर जगभर ती प्रिय होतील असा तज्ञांचा भरोसा आहे. इकडचे आदिवासी आपल्या झोपड्यांच्या भिती या रंगीत मातीने अशा काही सारवतात की, शहरी रंगत त्यापुढे झक मारावी !

असा हा बहिरम. व-हाडी कास्तकारास रमवणारा. दिवाळी संपते. हेमंत ऋतू नवे सोने घेऊन येतो. मग पौष महिन्याच्या काळात बहिरमची जत्रा सुरू होते. गहू ओंब्यावर येतो. आम्रवृक्षाच्या झुंडीच्या झुंडी आपल्या मोहोराची वार्ता आभाळभर करतात. त्यावेळी कास्त- कारीतून मोकळे झालेले हात आणि भरलेला खिसा घेऊन व-हाडी कास्तकार महिन्याच्या बोलीने या स्वप्नात शिरतो.

बहिरमची यात्रा संपली तरी वऱ्हाडाला निराशा नसते. एकदोन हप्ते त्यानंतर ऋणमोचन रंगते. आणि तिथून दोनेक हप्त्यांनी येते मग सालवडीं ! सालबर्डीलाही मध्यप्रदेशाची जुनी माणसे भेटतात. जुने वातावरण भेटते. पण ते खरे व जास्त वेळ जास्त काळ भेटते बहिमलाच. मध्य- प्रदेशाचेच कशाला ? आमचेही जुने अजून तग धरून राहिलेले जीवन बहिरमलाच भेटते.

(छायाचित्रे – प्रवीण पाटमासे, अरविंद पोहरकर)

(लेखक हे नामवंत साहित्यिक होते. ‘पालखीच्या संगे’ (१९६५), ‘आखर आंगण’ (१९६७), ‘एक भटकंती’ (१९६८), ‘एक घोडचूक’ (१९७३), ‘वंदे वंदनम्’ (१९७९) हे ललित निबंधसंग्रह; ‘चेहरेमोहरे’ (१९६९), ‘वेगळे कुटुंब’ (१९६५) हे व्यक्तिचित्रसंग्रह; ‘झोपलेले गाव’ (१९७८), ‘माझी काही गावं’ ही प्रवासवर्णने, आणि ‘मोती ज्यांच्या पोटी’ ही कादंबरी असे साहित्य त्यांच्या नावावर आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here