भटकता आत्मा नव्हे, महाराष्ट्राचा राखणदार !

-विजय चोरमारे

पक्ष फुटला होता. सख्ख्या पुतण्यासकट ज्यांच्या राजकीय कारकिर्दीला आकार दिला असे डझनभर सहकारी सोडून गेले. नुसते गेले नाहीत, तर विरोधकांच्या इशाऱ्यावर काही बाही आरोप करू लागले. शरद पवार या माणसाच्या प्रतिमेच्या चिंधड्या उडवायच्या, महाराष्ट्राच्या मनातून तो उतरला पाहिजे अशी टीका करायची हे उद्दिष्टच त्यांना दिलं होतं. अनेकजण त्यानुसार कामाला लागले होते. बाहेरच्यांचे हल्ले परतवून लावता येतात, परंतु आपल्याच आधारानं वाढलेली घरातली माणसं जेव्हा फितूर होतात तेव्हा ती वेदना अधिक घायाळ करणारी असते. पण शरद पवार विचलित झाले नाहीत. हृदय विदीर्ण झालं असलं तरी चेहऱ्यावर दाखवलं नाही. दाखवला तो लढण्याचा निर्धार. त्यांना जेव्हा विचारलं की सगळे सोडून गेले आता तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? तेव्हा त्यांनी त्याच निर्धारानं उत्तर दिलं – शरद पवार!

लोकसभा निवडणूक प्रचार काळात आणि निकालानंतर सिद्धही झालं, की शरद पवार हाच राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा आहे. राष्ट्रवादीचाच नव्हे तर महाराष्ट्राचा आश्वासक चेहरा ८४ वर्षांचे शरद पवार हेच आहेत! शरद पवार आता थकलेत असं वाटत असताना प्रत्येक निवडणुकीत पवार नव्या उत्साहानं मोहिमेवर निघतात. चांद्यापासून बांद्यापर्यंत आडवा तिडवा प्रवास करतात. रणरणतं उन्ह असो, धो धो कोसळणारा पाऊस असो, नाहीतर कडाक्याची थंडी. हेलिकॉप्टर असो किंवा खाचखळग्यांचे रस्ते असोत. पवारांचा प्रवास न थकता, न थांबता सुरू राहिला. त्यांची वाट कुणीच अडवू शकलं नाही. श्रीकृष्णानं करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून घ्यावा, त्याप्रमाणं शरद पवार सगळी निवडणूक आपल्या हातावर तोलून धरतात. सगळी निवडणूक त्यांच्याभोवती फिरत राहते. यंदाची निवडणूक तर अनेक अर्थांनी ऐतिहासिक होती. प्रचाराचे ओझे काही प्रमाणात खांद्यावर घेणारे बहुतेक सगळे सहकारी सोडून गेले होते. एकटे जयंत पाटील सोबतीला होते. त्यांच्यासह उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या सोबतीनं त्यांनी लोकसभा निवडणुकीची मोठी मोहीम पार पाडली.

रणरणत्या उन्हात दोन महिन्यांहून अधिक काळ राज्यभर अविश्रांत भटकंती हे ये-या गबाळ्याचं काम नव्हे. धडधाकट तरूणही आठवडाभरात गळाठून जातात. पण ८४ वर्षांचा योद्धा न थकता न थांबता भटकत राहिला. त्याचे वर्णन करण्यास एरव्ही शब्दही सापडले नसते. त्यासाठी तेवढीच उत्तुंग प्रतिभा हवी आणि ती फक्त एकाच व्यक्तिकडे होती, ती म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांनी अचूक शब्दात त्यांचं वर्णन केलं – भटकता आत्मा!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा झाली ती भटकत्या आत्म्याची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत शरद पवार यांना भटकता आत्मा असे संबोधले. पंतप्रधानपदावरील व्यक्तिने कोणत्या पातळीपर्यंत खाली उतरायचे , त्याच्या सगळ्या मर्यादा नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच पार केल्या आहेत. परंतु ज्या व्यक्तिचे बोट धरून आपण राजकारण शिकलो, असे तेच ज्यांच्याबद्दल बोलले होते, त्या शरद पवार यांच्यासंदर्भातील त्यांचे हे विधान अनेकांना खटकणारे होते. ते त्यांच्या अंगलट येणारे होते आणि तसे ते आलेही. आपल्यावर विरोधकांनी केलेली टीका हीच संधी मानून यापूर्वी अनेकदा त्याचे भांडवल करणा-या मोदी यांना या निवडणुकीत ती कला साधली नाही. किंबहुना त्यांनी विरोधकांवर केलेली टीका अनेकदा त्यांच्या अंगलट आल्याचे पाहावयास मिळाले. त्यांचा कुठलाही मुद्दा प्रभावी ठरला नाही. याउलट मोदींनी केलेल्या टीकेवर स्वार होऊन पवारांनी प्रचारात नव्याने भरारी घेतली. तो एवढ्या टिपेला पोहोचला की, अखेरच्या मुंबईतल्या सभेत, `हा भटकता आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही`, असा इशारा दिला. आणि चारशेच्या बढाया मारणाऱ्यांना पवारांनी महाराष्ट्राच्या मदतीनं २७२ च्या आत रोखलं.

काय म्हणाले होते मोदी?

पुण्यात पवारांच्या होम ग्राऊंडवरील सभेत मोदी म्हणाले, `ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, असे काही भटकते आत्मे असतात. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता होत नाही म्हणून ते दुस-यांचा खेळ बिघडवण्याचे काम करतात. महाराष्ट्रात ४५ वर्षांपूर्वी अशाच एका भटकत्या आत्म्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून सातत्याने अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले. आता तो आत्मा देशाला अस्थिर करण्याचे काम करतो आहे. हा आत्मा केवळ विरोधकांना अस्थिर करतो असे नाही, तर आपला पक्ष आणि आपल्या कुटुंबालाही सोडत नाही.`

पवारांचे सडेतोड उत्तर

मोदींच्या टीकेवर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. परंतु दुस-याच दिवशी पवारांनी जाहीर सभेच्या माध्यमातून उत्तर देताना सुनावले की, होय मी अस्वस्थ आत्मा आहे, पण स्वतःसाठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी अस्वस्थ आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. हे संस्कार माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही”

फुटीनंतरची पहिली निवडणूक

भारतीय जनता पक्षाने यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले होते. उद्धव यांना टार्गेट करताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लोभाने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केलेली आघाडी, भाजपशी युती तोडली म्हणजे हिंदुत्वाशी केलेली तडजोड, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी केलेली प्रतारणा वगैरे मुद्द्यांचा समावेश होता. ते त्यांचे व्यक्तिगत मुद्दे होते. याउलट शरद पवार यांच्यावर टीका करताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भाषा अधिक आक्रमक होती. पवारांच्या प्रतिमेवर हल्ले करणारी होती. एकीकडे मोदी-शाह थेट पवारांवर टीका करीत होतेच, परंतु त्यांच्या इशा-यावरून पवारांना किमान डझनभर नेते पवारांना टार्गेट करीत होते. शरद पवार यांचे प्रतिमाभंजन हा त्याचा मुख्य हेतू होता. शरद पवार हे विश्वासघातकी नेते आहेत. शरद पवार हे स्वार्थी नेते आहेत. शरद पवार हे लोकशाही न मानणारे नेते आहेत. शरद पवार हे आपल्या सहका-यांना तोंडघशी पाडणारे नेते आहेत. अशा अनेक आरोपांचे मोहोळ त्यांच्या एकेकाळच्या सहका-यांकडून उठवण्यात आले. जुन्या सहका-यांनी आरोपांचा धुरळा उडवायचा आणि दिल्लीहून येऊन नरेंद्र मोदी-अमित शाह यांनी घाव घालायचा अशी रणनीती होती. प्रारंभीच्या टप्प्यातच अमित शाह यांनी पवारांच्या कर्तृत्वासमोरच प्रश्नचिन्ह उभे केले. शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले आणि शरद पवार यांनी शेतक-यांसाठी काय केले, असे प्रश्न विचारण्याचे धाडस अमित शाह यांनी महाराष्ट्रात येऊन केले. पवारांच्या पाठिराख्यांना विचलित करण्याचा उद्देश त्यामागे नसावा. परंतु पवारांना विरोधकांची जी सहानुभूती मिळण्याची शक्यता होती, ती मिळू नये असा त्यामागचा उद्देश होता. ‘भटकता आत्मा’ हा कळसाध्याय होता!

मोदी-शाह यांना माहीत आहे की, महाराष्ट्र् काबीज करण्याच्या मोहिमेमध्ये शरद पवार हाच मोठा अडसर आहे. दिल्ली आणि महाराष्ट्राच्या मधे शरद पवार नावाचा पहाड आहे. त्याला सुरुंग लावला की, पुढची लढाई अवघड नाही. शरद पवार मागे नसतील तर उद्धव ठाकरे यांची ताकद अर्ध्याहून कमी होते. त्यामुळे टार्गेट पवार हीच भाजपची रणनीती राहिली. आणि पवार त्याविरोधात खंबीरपणे उभे राहिले. नुसते उभेच नव्हे, तर एकांड्या शिलेदारासारखे लढत राहिले. स्वतःच्या पक्षापुरते नव्हे, तर शिवसेना आणि काँग्रेससाठी लढत राहिले. काँग्रेससाठी ते २०१९ची विधानसभा निवडणूकही लढले होते.

असे सांगतात की, २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर पवारांनी उद्धव ठाकरेंना एका मुद्द्यावर आपल्याकडे वळवले होते. भाजप सत्तेवर आली तर दिल्लीतले दोन्ही गुजरातील मुंबईच नव्हे, तर अख्खा महाराष्ट्र लुटून नेतील, या पवारांच्या भीतीला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. ते कोसळल्यानंतर ज्या रितीने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले त्यावरून पवारांची भीती किती रास्त होती, याची खात्री पटली. मोदी-शाह यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस आहे आणि महाराष्ट्राचे, मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. केंद्रीय संस्था महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्याबरोबरच नैसर्गिक आपत्तींच्या काळातील दुजाभावापर्यंत अनेक प्रसंगांत त्याची प्रचिती येते. त्यांचे ऐकणारे सरकार असेल तर त्यांची मोहीम सोपी बनते आणि त्यांना हव्या त्या गोष्टी विनासायास करता येतात. भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखे राज्यपाल हा त्यांच्या रणनीतीचाच भाग होता. यावेळच्या लोकसभा निवडणुकीला अशा सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी होती.

त्याचमुळे पवारांनी लोकसभेची लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई बनवली. देशात दुस-या क्रमांकाच्या जागा असलेला महाराष्ट्र दिल्लीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे त्यांनी ओळखले होते. त्याचमुळे महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीतही जागावाटपावरून रणकंदन सुरू असताना आपल्यासाठी केवळ दहा जागा घेतल्या. अनेकांना वाटत होते, पवारांची बरीचशी ताकद बारामतीमध्येच खर्ची होईल त्यामुळे त्यांना महाराष्ट्रासाठी वेळ देता येणार नाही. बारामतीमध्ये त्यांना नेहमीपेक्षा अधिक वेळ द्यावा लागला. छोट्या-छोट्या सभाही घ्याव्या लागल्या. पण म्हणून त्यांच्या राज्याच्या दौ-यात खंड पडला नाही किंवा सभांमध्ये कपात झाली नाही. एरव्ही पंतप्रधानांचा दौरा असेल तर त्यांचे विमान उतरण्याच्या तासभर आधी आणि उड्डाणानंतर तासभर हवाई वाहतूक बंद केली जाते. यावेळी मोदींचे दौरे अधिक होतेच. शिवाय त्यांच्या दौ-यांदिवशी संपूर्ण दिवसभर हवाई वाहतूक बंद करण्यात येत होती. परिणामी त्या दिवशी पवारांना हेलिकॉप्टर वापरता येत नसे. रणरणत्या उन्हात त्यांना रस्तामार्गे प्रवास करावा लागे. त्याचाही परिणाम त्यांच्या सभांच्या संख्येवर झाला. पण हेलिकॉप्टर नाही म्हणून त्यांनी कुठला दौरा स्थगित केला नाही. साठ जाहीर सभा, १९ मेळावे ही अन्य कुणाही नेत्याच्या तुलनेत सरस कामगिरी म्हणावी लागेल. वर्ध्याच्या अमर काळेंपासून साता-यात शशिकांत शिंदेंपर्यंत अनेकांचे अर्ज भरण्यासाठीच्या मिरवणुकीत पवार सहभागी झाले. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस वगैरेंच्या टीकेचा समाचार घेण्यात प्रतिवाद करण्यात शरद पवारच आघाडीवर राहिले.

मोदींनी पवारांना भटकता आत्मा म्हटले असले तरी पवारांची महाराष्ट्रासंदर्भातील भूमिका त्यापलीकडची आहे आणि ती आहे राखणदाराची. होय राखणदाराची!स्वच्छ आणि स्पष्ट वैचारिक भूमिका घेऊन पवार ही राखणदाराची भूमिका बजावर राहिले. खेड्यापाड्यांत सामान्य कष्टकरी, शेतकरी राखणदाराची संकल्पना बाळगत असतात. ती काल्पनिक शक्ती असते. कुणी त्याला अंधश्रद्धा म्हणतात. पण निसर्गावर अवलंबून असणारी माणसं राखणदाराला मानत असतात. शेताजवळून वाहणारा ओढा असेल, वा-या वादळापासून रक्षण करणारा डोंगर असेल, एखादा झरा असेल, एखादं झाड असेल.. संकटांपासून आपलं संरक्षण करणारी कुणीतरी अज्ञात शक्ती असल्याची लोकांची भावना असते. माणूस निसर्गाच्या सानिध्यात जगत असतो, त्याला सुरक्षित ठेवण्याचं काम राखणदार करीत असतात, हे राखणदार चराचरामध्ये पसरलेले आहेत, अशी लोकांची धारणा असते. पवारांच्या बाबतीत बोलायचं, तर पवार महाराष्ट्राच्या राखणदाराची भूमिका गेली अनेक वर्षे बजावत आहेत. वीस वर्षांपूर्वी विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढल्या तेव्हा त्या रोखण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने सत्तर हजार कोटींचे पॅकेज घेऊन येणारे शरद पवारच होते. कोकणाला वादळाचा तडाखा बसल्यावर सर्वप्रथम तिथे धाव घेणारे पवारच असतात, दुष्काळाच्या काळात शरद पवारच शेतक-यांच्या बांधावर जाऊन धीर देण्याचे काम करतात आणि महापुराच्या काळातही गावागावात जाऊन लोकांना दिलासा देण्यात पवार आघाडीवर असतात. त्यांच्याकडं सत्ता असतेच असं नाही किंवा त्यासाठी त्यांना सत्तेची गरज नसते. विरोधासाठी विरोध कधी करीत नाहीत. पुणे अपघातात सगळीकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत असताना त्यांनी आपली भूमिका नीट बजावल्याचे सांगणारे पवार असतात. आणि मोदींच्या रोड शोला अनुपस्थित राहिल्यामुळे प्रसारमाध्यमांनी अजित पवारांच्या संदर्भाने अफवांच्या वावड्या उडवल्यानंतर, ‘अजित पवार खरोखर आजारी आहेत’, असं सांगणारे शरद पवारच असतात. मोदींनी दिलेलं दूषण हे भूषण म्हणून मिरवण्याची किमया शरद पवारच साधू शकतात!

कुणी काही म्हटलं तरी पवार हे महाराष्ट्राचे राखणदार आहेत आणि महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत आपल्या या राखणदाराच्या झोळीत मतांचे भरभरून दान टाकले आहे!

(लेखक नामवंत पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत)

9594999456

Previous article‘मुंबई इंडियन्स’ रसातळाला का गेला?
Next articleफर्स्ट इंप्रेशन – भाजपचा नक्षा उतरवणारा कौल !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.