
मुळात भारतीय जनसंघाचे व भारतीय जनता पक्षाचे नामकरण करणाऱ्या संस्थापकांना सुद्धा सर्वसमावेशकताच अभिप्रेत असणार; कारण आपल्या पक्षाचे नाव त्यांनी ‘हिंदू जनसंघ’ वा ‘हिंदू जनता पक्ष’ असे ठेवले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नावसुद्धा ‘हिंदू स्वयंसेवक संघ’ असे नाही. मंदिरांचे विध्वंस, फाळणीच्या वेळी झालेले भयंकर हत्याकांड, नंतरचा आंतरराष्ट्रीय इस्लामी दहशतवाद यामुळे दुखावलेल्या नि भयभीत झालेल्या हिंदू अस्मितेला खंबीर करणे कदाचित आवश्यक असेलही; आणि नेमके तेच करून भा.ज.प. व मोदींनी सत्ता संपादन केली – हिंदुत्वाचा नारा देत. परंतु आता संतुलन साधल्या गेले आहे आणि हिंदुत्वाचा अधिक आक्रमकतेने पुरस्कार करण्याची व तोच अजेंडा पुढे रेटण्याची गरज आज नाहीशी झाली आहे. बेरोजगारी व गरिबीचे उच्चाटन, शिक्षण व आरोग्य क्षेत्रांतील गुणवत्ता वाढवून खार्चिकता कमी करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि नित्यनव्या तंत्रज्ञानाचा सम्यक व कल्याणकारी उपयोग करणे यांसारख्या विषयांना आता प्राधान्य मिळाले पाहिजे.