–प्रवीण बर्दापूरकर
आपण समजतो , तसं नसतं ; माणसाला अन्य माणूस एका दमात नाही आणि पूर्ण तर कधीच समजत नाही . अनेक प्रसंग आणि येत जाणाऱ्या सहवासातून आपल्याला माणूस समजत जातो . ही प्रक्रियाही तुटक तुटक असते . या तुटक तुटकतेतून माणसाची निर्माण झालेली प्रतिमा जगण्याच्या पुस्तकाच्या पानावर आकार घेत जाते आणि तो जो आकार असतो , तो आपल्याला समजलेला समोरचा माणूस असतो . रक्ताच्या , मैत्रीच्या , औपचारिकता-अनौपचारिकतेच्या , अशा वेगवेगळ्या बंधातील माणसं त्यात असतात . यातली काही माणसं पक्की स्मरणात राहतात तर काही कालौघात अनेकदा विरुन/ विसरुन जातात , तर काही येऊन-जाऊन असतात . आपल्या जगण्यातलं हे प्रत्येक पान सर्व प्रकारच्या भावनांचंही अविष्करण असतं . सुमारे चाळीस वर्षांपूर्वी अटलबहादूर सिंग नावाच्या एका पगडीधारी शिखानं माझ्या जगण्याच्या पुस्तकात कायमचं स्थान मिळवलं . अत्यंत उमदं , एकाच वेळी हळवं आणि बिनधास्तही , कनवाळू आणि परखड , संवेदनशील , सामाजिक बांधिलकी जपणारं , असं ते अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं . आजवर अतिशय अभिमानानं मिरवलेलं ते पान गेल्या आठवड्यात अलगद गळून पडलं . अटलबहादूर सिंग यांच्या पश्चात किती चल-अचल संपत्ती आहे हे माहिती नाही मात्र , अनवाणी ते मर्सिडिजमधून फिरणाऱ्या असंख्यांची दुआ मिळवणारा तो नागपूरकर आहे हे नक्की .
आयुष्यात काही माणसांच्या भेटी अटळ असतात . अटलची भेटही जणू अटळच होती . अन्यथा नागपूर महानगरपालिकेच्या राजकारणात ‘किंगमेकर’ असलेल्या अटलबहादूर सिंगची भेट होण्याचं आणि ती दोस्तीत व पुढे अकृत्रिम सलगीत रुपांतरित होण्याचं काहीच कारण नव्हतं . कारण महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचं वृत्तसंकलन मी कधीच केलेलं नाही पण , अटलबहादूर सिंग केवळ राजकारणी नव्हते तर विविध कला गुणांच्या विस्तारलेला फांद्यांचा तो महावृक्ष होता आणि त्या वृक्षाची छाया नागपूरवर दाट पसरलेली होती . त्या छायेत इतर अनेकांप्रमाणे आपसुकच मलाही वावरता आलं .
राजकारण , समाजकारण , साहित्य , कला , चित्र , संगीत अशा विविध प्रांतात अटलबहादूरला रुची होती आणि या सर्वच प्रांतात अटलबहादूर सिंग यांचा एक गुणग्राहक रसिक आणि अबोल दाता म्हणून संचार होता . नागपूर हे तसं बहुभाषक शहर . महाराष्ट्राची उपराजधानी असलं तरी या शहराचा कारभार मराठी शिवाय चालू शकतो . मराठी माणूस रस्त्यावर उतरला की , सहजगत्या हिंदी बोलतो . अन्य भाषकही असंच करतात ; मग ते बंगाली असो , तेलगू का कानडी . अटलबहादूर सिंगची तर इंग्रजी , उर्दू , पंजाबी , हिंदी भाषांवर जबरदस्त पकड . वाचनही अफाट . मराठीत कवीश्रेष्ठ सुरेश भट , ग्रेस पासून असंख्य लेखक , कवी अटलबहादूर सिंगला तोंड पाठ . अशा या बहुभाषकतेमुळे अटलचं भाषण असो की एखाद्या कार्यक्रमाचं सूत्र संचालन म्हणजे कलास्वाद म्हणा की मधुर गाणंच ! शेरोशायरी , काव्यपंक्ती , अनु भव , हकिकती ,किस्से शिवाय भाषणात कंटेंटही भरपूर कारण या माणसाचं जगणं हा अनुभवाचा , क्वचित दाहकतेचाही सागर होता . मात्र ही दाहकता म्हणा किंवा त्या भोगण्याची धग अटलनं समोरच्याला कधी लागू दिली नाही . एक मात्र खरं , अशा वेळी अटलनं विरोधकांना काढलेले बोचकारे मोठे खुमासदार असत .
देशाच्या फाळणीच्या भळभळत्या जखमा घेऊन जी कुटुंब देशाच्या विविध भागात स्थिरावली त्यापैकी अटलबहादूर सिंग एक . परराज्यातून नागपुरात येऊन दोन माणसं नागपूरवर घनदाट पसरली ; त्यात एक पश्चिम बंगालमधून आलेले ए . बी . बर्धन आणि दुसरे अटलबहादूर सिंग . या दोघांनीही रक्ताच्या मायेनं नागपूरवर आणि नागपूरकरांनी या दोघांवर हळवेपणानं प्रेम केलं . बर्धनसाहेब कम्युनिस्ट तर अटलबहादूर सिंग लोहियावादी पण , या दोघांचही नातं मानवतावादी . त्यांनी कुणाशीही केलेल्या मैत्रीत राजकीय मतभेद कधीच आले नाहीत . हिंदुत्ववादी सुमतीताई सुकळीकर यांच्याशी असलेलं राखीचं नातं या दोघांनीही निगुतीनं निभावलं . बर्धनसाहेब आणि अटलबहादूर या दोघांच्या मैत्रीचे नजारे हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे .
पंजाबी अटलबहादूर सिंग किती ‘अट्टल’ नागपूरकर झाले हे , ते दुसऱ्यांदा महापौर झाले तेव्हा मला अनुभवायला मिळालं . तेव्हा मी ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृत्तीचा मुख्य वार्ताहर होतो आणि महापालिका बीट सुरेश भुसारी करत असे . तेव्हा किमान अर्ध्या नागापूरनं तरी , ‘अपना अटल महापौर बन गया’, अशी भावना अभिमानानं व्यक्त केली ! दोस्ती पक्की कशी असावी , तर महापौर झाल्यावर रात्री उशिरा हा मित्र विदेशी मंतरलेल्या सोनेरी पाण्याच्या शीशा घेऊन सहा जिने चढून आमच्या घरी आला . सुषमा आणि प्रकाश देशपांडे , बेगम मंगला आणि मला कडकडून भेटला . पंचतारांकित अन्न सोडून आलेला हा माणूस आमच्या टीचभर घरात मंगला आणि सुषमानं केलेलं जेवण चवीनं खाता झाला . का ? तर , महापौर झाल्यावर पहिली पार्टी तुझ्यासोबत करेन असं या उमद्या माणसानं मला कबूल केलेलं होतं . पत्रकार सहनिवासच्या माझ्या आणि प्रकाशच्या टेरेसवर अटलनं अनेक संध्याकाळी हे सोनेरी पाणी आणि गप्पांची मैफिल आस्वादली आहे . पत्रकार सहनिवासमधली आमची टिचुकली घरं तेव्हा अटलच्या उमद्या प्रकाशात न्हाऊन निघालेली अजूनही आठवतात .
अटलनं किती लोकांना कशी मदत केली आणि कधी तिची वाच्यताही केली नाही याच्याही असंख्य हकिकती आहेत . त्यात गरीब , शोषित , तळहातावर जगणं असणारे बहुसंख्येनं होते . त्यापैकी काही मलाही ठाऊक आहेत . १९९६ च्या ऑक्टोबरमध्ये माझी मुंबईला बदली झाली तेव्हा अटलनं निरोप आणि शुभेच्छाची पार्टी मला आणि धनंजय गोडबोलेला दिली . गप्पाच्या ओघात माझ्या लेकीचा विषय निघाला कारण लेक हा माझा कसा कच्चा दुवा आहे आहे हे , अनेकांना तेव्हा ठाऊक होतं . अटल म्हणाला , ‘पगले तू , कैसा जियेगा रे , बेटी के बिना ?’
मग माझ्या आणि सायलीच्या नात्याच्या उजळणीचं कथापठन झालं . दुसऱ्या दिवशी सकाळी अटलचा चालक एक पेजर आणि ते पेजर त्या कंपनीनं अटल ऐवजी माझ्या नावानं करावं , हे पत्र घेऊन घरी आला . ( त्या पेजरचा वापर मी कधीच केला नाही , हा भाग वेगळा ! ) तेव्हा पेजर हे संपर्काचं अत्याधुनिक आणि किंमती माध्यम होतं .
अटलला फोन केला तर तो म्हणाला , ‘अबे , कम से कम सायली से टच में तो रहेंगा ।’
मी म्हटलं ,’ही भेट फारच भारी आहे .‘
तर अटलचं उत्तर होतं , ‘ये दोस्ती निभाने का एक सरदार का तरीका है !’
अबे , गधे , पगले आणि क्वचित च्युतिये या अटलसाठी शिव्या नव्हत्या तर त्या ओव्या होत्या . त्यांची मुक्त उधळण तो करत असे आणि ते श्रवण करताना अटल काही वावगं करतो आहे असं कुणालाही वाटत नसे . आम्ही वयानं लहान ; त्यामुळे तर आमच्यावर ‘अकल के अंधे’ असाही बोनस मारा अनेकदा होत असे .
विषय निघालाच आहे तर अशाच आणखी दोन वैयक्तिक आठवणी . तेव्हा ‘लोकसत्ता’चं कार्यालय रवीनगर चौकात होतं . त्या काळात अटलबहादूर सिंगमुळे दर रविवारी दुपारी घरी जाताना लॉ कॉलेज चौकात अर्धा ग्लास तरी बिअर पिण्याचा रिवाज अटलबहादूर सिंगनं सुरु केला होता . नागपूर सुटलं आणि तो रिवाजही सुटला . आता तर अटलही नाही…
दुसरी आठवण अटलबहादूर सिंगच्या सुसंस्कृतपणाशी निगडीत आहे . विदर्भ आवृत्तीच्या निवासी संपादकपदाची सूत्र स्वीकारल्यावर माझी आणि अटलची पहिली भेट एका सार्वजनिक कार्यक्रमात झाली . मी जरा झुकून पायलागू केल्यासारखं केलं तर अटलची प्रतिक्रिया होती , ‘अबे , क्या कर रहा है तू ? संपादक बन गया और वो भी ‘लोकसत्ता’ का . ‘लोकसत्ता’ का संपादक झुकता नहीं है कभी किसी के सामने ,’ आणि तेव्हापासून भेट झाल्यावर अटल मला मिठीत घेत असे .
स्वत:चीच टर उडवून घेणं ही एक अटलबहादूर सिंगची खासियत होती . सरदारजीवर एखादी कमेंट तो करत असे आणि नंतर उसळलेल्या हशाच्या कल्लोळातही सहभागी होत असे . असं करणारी माणसं त्यांची वैयक्तिक आणि कौटंबिक दु:ख लपवून ठेवतात आणि हसत-खेळत वावरत असतात . आपल्या टीचभर दुखण्याचं आभाळभर भांडवल करणारी सतत भेटणारी माणसं अशावेळी फारच खुजी वाटतात . अटलनं त्याची आभाळभर कौटुंबिक सल , त्याचं एकाकीपण कधीच कुणाला जाणवू दिलं नाही . तरी क्वचित त्याच्या डोळ्यांतून ते डोकावत असे . ( माझ्या या मताशी श्रीपाद भालचंद्र जोशी नक्कीच सहमत होईल ! ) पण , ते असो . अटलच्या हजरजबाबीपणाची एक हकिकत अशी – एकदा कुठल्याशा विषयावर आमच्यात आणि अटलमध्ये मतभेद होते , त्यावर घनघोर चर्चा सुरू होती आणि तो निर्णय लगेच होऊ शकत नव्हता . तो प्रसंग निभावण्यासाठी अटलनं अचानक विचारलं ‘अरे गधो , कितने बज रहे देखा क्या ?’
आम्ही घड्याळात बघितलं तर बाराला पाच-सात मिनिटं कमी होते . ते सांगितल्यावर खुर्चीतून उठत अटल म्हणाला , ‘बारा बजे कोई सरदार ठीक से डिसीजन ले सकता है क्या , चलो बाद में मिलेंगे और चर्चा करेंगे . ‘
अटलबहादूर सिंग सर्वार्थानं अजातशत्रू होता . तो कुणालाही केव्हाही आणि कसाही भिडू शकायचा . पण , या अशा वागण्यातून तो कधीच कुणाच्याच संदर्भात कडवट झाला नाही . माघारी अटलवर टीका करणाऱ्या अनेकांना अटलकडून हक्कानं मदत स्वीकारताना मी अनेकदा अनुभवलं आहे . मदत करणं आणि त्याची वाच्यता न करणं ही अटलची एक खणखणीत खासीयत . अनेक कलावंत , लेखक-कवी त्याचे लाभार्थी होते .
चित्रकार चंद्रकात चन्नेच्या बसोली ग्रुपच्या वार्षिक निवासी शिबिराचा अटलबहादूर सिंगचा कधीच प्रकाशात न आलेला दाता आज सांगून टाकतो . एका वर्षी कबूल केलेल्या दोन मोठ्या देणगीदारानी ऐनवेळी पाठ फिरवल्यावर शिबिराची अर्थव्यवस्था चांगलीच कोंडीत आली . चंद्रकांत आणि मी अटल समोर जाऊन गुमसुमसे बसलो . पंधरा दिवस दररोज सकाळ , संध्याकाळ सुमारे तीनशे लोकांचं जेवण , नाष्ता , चहा असा मोठ्या खर्चाचं आव्हान समोर होतं . बसोली आणि चंदूची विश्वासार्हता खणखणीत होती . काय झालं ते आम्ही सांगितलं . अटलनी आम्हाला सांगितलं, ‘आता पैसे नाहीत माझ्याकडे पण , तुम्ही जा , मी करतो काही तरी .’
संध्याकाळी शिबीर स्थळी खाण्याच्या प्रत्येक वस्तूचा पंधरा दिवस पुरेल एवढा शिधा पोहोचला . धन्यवाद द्यायला अटलला फोन केला तर , ‘गधो को अकल नहीं होती जैसे थँक्यू क्या बोल रहे हो ,’ असं म्हणत अटलनं आम्हाला आणखी काही मदत लागली तर नक्की सांगा हेही बजावलं . आज ही हकिकत मी पहिल्यांदाच सांगतो आहे .
विशेषत: लता मंगेशकरांचा नागपूरकरांवर काही रोष होता . त्याच्या तपशिलात जात नाही पण , लताबाईंना एकदा नक्की नागपुरात घेऊनच येईन अन तो रोष कायमचा संपवेन , असं अटलबहादूर सिंगनं ठरवलं आणि सुरेश भटांच्या मदतीनं ते यशस्वीही करुन दाखवलं . ती सारी उलाढाल मला जवळून ठाऊक आहे . लताबाई नागपूरला आल्या . दोन दिवस मंगेशकर कुटुंबियांचं ‘माहेरपण’ अटलनं निभावलं , त्यांचा जंगी सत्कारही केला . या सुरील्या प्रयत्नात सोबत करणाऱ्या जिवलग मित्र सुरेश भट यांनाही अटल विसरला नाही हे महत्त्वाचं .
महापालिकेत भाजपाचा प्रभाव निर्माण होण्याआधी अटलची सत्ता असायची . प्रत्येक निवडणुकीत अठरा वीस नगरसेवक अपक्ष म्हणून पण , अटलच्या गटाचे निवडून आलेले असायचे आणि त्यांच्या भरवशावर तब्बल २५ वर्षे अटलनी ‘किंगमेकर’ची भूमिका निभावत ‘ॲक्रॉस द पार्टी’ अफाट लोकप्रियता संपादन केली . नागपूर महापालिका म्हणजे अटलबहादूर असं समीकरणच त्या काळात रूढ झालेलं होतं . राज्याच्या सत्तेतही अगदी मुख्यमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून बसण्याइतकं अटलचं महत्त्व वाढलेलं होतं पण , राज्याच्या सत्ता केंद्रात कामगिरी बजावण्याची संधी अटलला मिळालीच नाही . नितीन गडकरी यांच्या आग्रहाखातर भाजपचा उमेदवार म्हणून अटलनं लोकसभा निवडणूक लढवली पण , भाजपाच्याच मतदारांनी अटलबहादूर सिंगचा ‘चिवडा’ केला तरी नितीन गडकरीशी असलेले अटलचे संबंध शेवटपर्यंत कायम राहिले . त्याप्रसंगी ओलावलेले अटलचे डोळे आजही आठवतात…( ती हकिकत मागे एकदा मी लिहिली आहे .)
सणसणीत सहा फूट उंची , लख्ख उजळ गव्हाळ वर्ण , मध्यम अंगकाठी , स्वच्छ परिटघडीचे तलम पांढरे शुभ्र कपडे , डोक्यावर सहसा लालच पगडी , काळेशार , काहीसे खोडकर व समोरच्यांचा ठाव घेणारे डोळे आणि अखंड उत्साहानं खळाळणारा झरा म्हणजे अटलबहादूर सिंग . त्या खळाळत्या झऱ्यातल्या शीतल पाण्यानं अनेकांची तृष्णा भागवली ; त्यात मीही एक आहे .
गेले काही वर्ष असाध्य रोगांशी अटलची झुंज चालू होती तरी त्याचा हजरजबाबी आणि उमदेपणा मुळीच कमी झालेला नव्हता . येणारा जाणारा कुणीही गरजू त्याच्याकडून रिक्त हातानी परतला नाही . मी दिल्लीत असताना एकदा नागपूरला गेलो तेव्हा गड्डीगोदाममधल्या घरी अटलला भेटायला गेलो तर , ‘साले , मै जिंदा हूँ क्या ये देखने के लिये आया क्या ?’ असं म्हणत अटलनं मारलेली मिठी आणि त्याचा तो स्पर्श त्याच्या मृत्यूची बातमी आल्यावर सर्वांत पहिले आठवला आणि मग आठवणींची गर्दी झाली . त्या भेटीत खूप गप्पा झाल्या . गिले-शिकवे झाले . परततांना जिन्याच्या पायऱ्या उतरताना लक्षात आलं , आपले पाय जड झाले आहेत .
एका वाक्यात सांगायचं तर , अटलबहादूर सिंग हे नागपूरच्या समाजमानवर राज्य करणारं ‘मॅग्नेटिक’ व्यक्तिमत्व होतं ! असे जिंदादिल अटलबहादूर सिंग प्रत्येक गाव आणि शहरात असतात . आपल्याला ते हुडकता आले पाहिजेत . बस्स इतकचं .
+919822055799
( ■छायाचित्र विवेक रानडे , नागपूर )
(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९
…………………………………………………………………………………………