लग्न करून हस्तिनापुरी गेल्यावर पहिला द्यूताचा प्रसंग. वस्त्रहरण. त्यावेळी कर्णाने तिला वेश्या म्हंटलं, दुर्योधनाने तिला धोतर वर करून मांडी दाखवली. त्यानंतर देश-निकाला. मग दुसऱ्यांदा द्यूत. त्यात हरल्यावर बारा वर्षाचा वनवास, एक वर्षाचा अज्ञातवास. वनवासात कौरवांची सख्खी बहीण दु:शलाच्या नवऱ्याने – जयद्रथाने तिला पळवून नेलं. पुन्हा अपमान. भीमाने तिला सोडवलं. अज्ञातवासात कीचकाने तिच्यावर वाईट दृष्टी ठेवली. ती आपल्याला बधत नाही हे बघून त्याने भर दरबारात तिच्या दोन मांड्यांच्या मधे लाथ मारली. तिथे हजर असलेला युधिष्ठिर तिला म्हणाला तू आत जा, पण भीमाने त्या रात्री कीचकाचा वध केला. ती बघत होती, तिच्यासाठी नेहमी भीमच धावून येत होता. नंतरच्या निर्णायक युद्धात भीमानेच दु:शासनाची छाती फोडली आणि तिथलं रक्त द्रौपदीच्या मोकळ्या ठेवलेल्या केसांना लावून तिची प्रतिज्ञा पूर्ण केली. दुर्योधनाने जी मांडी दाखवली ती मांडी भीमानेच फोडली. स्त्रीला प्रौढत्व आल्याशिवाय कुणावर प्रेम करावं ते कळत नाही. नंतर मात्र द्रौपदीने भीमावर जीवापाड प्रेम केलं आणि जीव सोडतांना त्याला सांगितलं, “पुढच्या जन्मी थोरला हो!” पण हे ती असत्या आयुष्यी बोलू शकली नाही. एवढी दु:खं, एवढे अपमान कुठल्या स्त्रीच्या वाट्याला आलेले माहीत आहेत??
प्रत्येकाला द्रौपदी अभिमानिनी वाटते. तशी ती होतीच, पण एक स्त्री म्हणून तिच्या मनाचा विचार केव्हा, कुणी केला? ‘माझ्या पाची मुलांशी तू लग्न करायचं’ असं जेव्हा कुंतीने सांगितलं तेव्हा कुणी होतं तिच्या बाजूने? ती तर तेव्हा तिच्याच बापाच्या राज्यात होती. त्यानेच तिची पाच लग्न लावून दिली. कुरु राज्याशी संबंध येणार, एवढा एकच विचार केला ना त्याने? ‘मला अर्जुनाने जिंकलं आहे. मला तोच जास्त आवडतो,’ हे बोलू शकली द्रौपदी? नाही! त्यानंतर रोज एकासोबत रात्र घालवतांना तिचं शरीर थकलं म्हणून कुंतीने हा नियम एका वर्षाचा केला. पहिली दोन वर्षे धर्म-भीमासोबत काढून तिसऱ्या वर्षी अर्जुन तिच्या वाट्याला आला. ते वर्ष झाल्यावर, आता काही पुन्हा ही आपल्याला चार वर्षे मिळणार नाही, हे बघून अर्जुन सरळ चालता झाला. उलूपी आणि चित्रांगदाशी लग्न करून त्यांना एक-एक अपत्य देऊन, द्वारकेत जाऊन सुभद्रेशी लग्न करून तिला घेऊन परत आला. सुभद्रा शहाणी. मी फक्त तुझीच पत्नी बनून राहीन, या एकाच अटीवर तिने अर्जुनाशी लग्न केलं. ही अर्जुनाची वाट पाहत होती आणि तो अर्ध्या वयाच्या दुसऱ्या बायकोला घेऊन आला, तेव्हा द्रौपदीच्या मनाचा विचार झाला? इतर सगळ्यांनी जाऊच दे, कृष्ण तर तिचा जिवलग होता, सखा होता. तिच्या प्रिय अर्जुनाला सुभद्रेशी लग्न करण्यासाठी त्याने चक्क उचकवलं होतं. तेव्हा त्याने तरी केला द्रौपदीच्या मनाचा विचार??