रामेश्वरम 

-राकेश साळुंखे

  निसर्ग तसेच श्रध्दा यांचा जणूकाही संगम म्हणजे रामेश्वरम. हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांनी चारही बाजूंनी वेढलेले शंखाच्या आकाराचे हे द्विप असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे पवित्र स्थान मानले जाते . तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील हे शहर आहे .

       रामेश्वरम द्विपाला पंबन बेट असेही म्हणतात. पंबन बेट हे भारताच्या मुख्य भूमीला पंबन पुलाने जोडले गेलेले आहे. रामेश्वरमला रेल्वे तसेच रस्ता मार्गाने ही जाता येते. येथील रेल्वेस्थानकावर मदुराई व चेन्नई येथून येणारे रेल्वे मार्ग  संपतात . पंबन रेल्वे पूल हा भारतातील सर्वात पहिला सागरी पूल आहे. पूर्वी चेन्नई ते धनुष्कोडीपर्यंत रेल्वेने जाता येत होते, परंतु 1964 मध्ये झालेल्या वादळानंतर रामेश्वरपर्यंतच जाता येते.रेल्वे पूल व मोटार वाहतुकीचा पूल या दोघांना एकत्रितपणे पंबन पूल म्हणतात. एकमेकांशी समांतर हे दोन्ही पूल आहेत.मोटार वाहतुकीचा पूल उंचावर तर रेल्वेचा पूल थोडा खाली आहे.  रामेश्वरमला या पुलावरून जाता येते.

आठ वर्षांपूर्वी पहिल्यांदा रामेश्वरमला माझे वडील, मी व मुलगा गेलो होतो. त्यानंतर पुन्हा एक वर्षापूर्वी दुसऱ्यांदा जाण्याचा योग आला. रेल्वेमधून पंबन पुलावरचा प्रवास मला अनुभवायचा होता. परंतु माझे दुर्दैव म्हणा किंवा काही म्हणा मला दोन्ही वेळा या पुलावरून जाता आले नाही. पहिल्यांदा आमची खाजगी मोटार होती तर दुसऱ्यांदा त्या पुलाची डागडुजी करण्यासाठी तो पूर्णतः बंद ठेवला होता. मात्र मोटर रस्त्याने सुद्धा आपण छानसा अनुभव घेऊच शकतो.

      2019 ला मी व माझा मित्र मदुराईवरून रेल्वेने रामेश्वरमला गेलो होतो. त्यावेळी रेल्वेचा  पूल बंद असल्याने आम्ही अलीकडील स्टेशनला उतरून बसने रामेश्वरमला गेलो. पहाटे तेथे पोहोचलो. एखाद्या हॉटेलवर फ्रेश होऊन तेथूनच रामेश्वरम फिरण्यासाठी निघायचे असे आमचे ठरले होते. तेथे पोहचल्यावर चांगलेसे हॉटेल पाहून आम्ही फ्रेश झालो. नंतर  त्या हॉटेलवरच  सकाळी नाश्ता केला. त्या नाश्त्याची आठवण म्हणजे नाश्त्याला आम्ही पोंगल हा खास साऊथ इंडियन पदार्थ मागवला होता. इडली-डोसा यापेक्षा वेगळे  काही तरी वेगळे  म्हणून पोंगल खायचे आम्ही ठरवले होते. दक्षिण भारतात नाश्त्यासाठी हा पदार्थ खाल्ला जातो. तांदूळ व डाळ यांचा वापर करून गोड तसेच तिखट अशा दोन्ही प्रकारे पोंगल बनवला जातो. यापूर्वीही मी एक दोन ठिकाणी ही डिश खाल्ली होती परंतु येथे खाल्लेल्या पोंगलची चव अजूनही आठवणीत राहिलेली आहे.

     या हॉटेलपासून जवळच रामेश्वरमधील सुप्रसिद्ध रामनाथ स्वामी मंदिर असल्याने आम्ही प्रथम मंदिरामध्येच गेलो. सकाळची वेळ असल्याने गर्दी थोडी कमी होती. वातावरणही  छान प्रसन्न होते. शेकडो खांब असलेल्या या मंदिराला हजारिका मंदिर असेही म्हणतात. या  मंदिराला पुढे तीन गोपुरे  म्हणजेच प्रवेशद्वार आहेत.  भारतीय स्थापत्य कला व शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले असे  हे मंदिर आहे. या मंदिरातील खांब लांबून एक सारखेच दिसतात, परंतु जवळून पाहिले तर प्रत्येक खांबावर वेगवेगळी नक्षी पाहायला मिळते. पूर्वी जेव्हा मी या मंदिरात गेलो होतो तेव्हा त्याची रंगरंगोटी केली नव्हती. मूळ स्वरूपातील मंदिर त्या वेळी मनाला खूपच भावले होते. परंतु आता ते भडक रंगांनी रंगवलेले असल्याने खूपच डोळ्यावर येते. त्याचे मूळचे नैसर्गिक सौंदर्य आता मात्र हरवल्यासारखे वाटले.

       मंदिर पाहून बाहेर पडलो. आता थेट धनुषकोडीला जाऊन परत येताना वाटेतील स्थळं पाहायची असे आमचे ठरले. त्यानुसार आम्ही भारतीय उपखंडाचे शेवटचे टोक / भूशिर पहाण्यासाठी निघालो. धनुषकोडीपासून पुढे थोड्याच अंतरावर रस्ता संपतो व हेच भारतीय उपखंडाचे शेवटचे टोक आहे.  दुतर्फा पाणी आणि मध्ये धावणारा रस्ता जणूकाही आपण पाण्याला चिरत जात आहोत असे  वाटते. रस्त्याच्या एका बाजूला बंगालचा उपसागर तर दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर असून त्यांच्या पाण्याचा रंगही वेगवेगळा आहे. हा रस्ता म्हणजे निसर्ग आणि मानव दोघांची कमाल आहे. जेथे हा रस्ता संपतो तेथे गाडी पार्क करून थोड्या पायऱ्या उतरून खाली समुद्राकडे जाता येते. येथे आपल्याला दोन सागर संगमाचे सुंदर दृश्य पाहता येते. आम्ही सुद्धा या सागरांच्या भेटीचा आनंद घेतला. येथील किनारा एकदम स्वच्छ आहे. सोनेरी वाळू, नितळ पाणी सागरी सौन्दर्यात आणखीनच भर घालते. समुद्र उथळ असल्याने हा किनारा सुरक्षित मानला जातो. येथे पर्यटक भरपूर असले तरी परिसर स्वच्छ होता. बहुदा येथे हॉटेल्स नाहीत त्यामुळे असावे. तेथून मागे फिरून आम्ही धनुषकोडी ला आलो.

    सध्याचे भग्नावस्थेतील हे गाव त्याच्यावर ओढवलेल्या संकटाची जणूकाही गोष्ट सांगत आहे असे वाटते.  येथे काही इमारती भग्न अवस्थेत उभ्या दिसत होत्या. येथील समुद्र किनारा खूपच सुंदर आहे. परंतु , तेथील गूढ शांतता मनाला अस्वस्थ करत होती. धनुषकोडी हे पूर्वी एक गजबजलेले गाव होते. रामेश्वरमपासून इथपर्यंत रेल्वे सेवाही होती. परंतु 1964 च्या चक्रीवादळात हे सर्व गाव रातोरात नष्ट झाले व  वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.

       रामायणात  लंकेवर स्वारी करण्यासाठी समुद्रामध्ये जेथून सेतू बांधला असे मिथक आहे ते हेच ठिकाण  असे म्हणतात. समुद्रात नजर टाकली तर एका रेषेत मोठाले दगड,टेकड्या दिसतात यालाच अवशेषरूपी सेतू म्हटले जाते. अजून एका मिथकानुसार  लंकेवरील विजयानंतर रामाने धनुष्याच्या कोटीने म्हणजे टोकाने हा सेतू मोडून टाकला म्हणून या स्थानाला धनुषकोडी हे नाव पडले. श्रद्धाळू लोक काशी यात्रा केल्यावर धनुषकोडीला स्नान करून रामेश्वरमला जातात व मगच काशी यात्रा पूर्ण झाली असे मानतात. रामेश्वरमपासून धनुषकोडी पर्यंतचा प्रवास खूपच सुंदर आहे परंतु संध्याकाळी पाच नंतर या मार्गावर प्रवास करण्यास मनाई आहे.

      रामेश्वरमची ट्रीप अब्दुल कलाम यांच्या आठवणीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही . अब्दुल कलाम यांचं हे जन्मगाव आणि इथेच त्यांचे बालपण गेले आहे.  त्यांच राहत घर संग्रहालयात रूपांतरित करण्यात आलेले आहे.  तसेच त्यांची कबर ज्या ठिकाणी आहे ती जागा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे.येथील संग्रहालयात अब्दुल कलामांच्या  जीवनाशी तसेच त्यांच्या संशोधनाशी निगडित वस्तू पहायला मिळतात. त्यांच्या जीवनातील काही महत्वाच्या प्रसंगांचे फोटो, लिखित स्वरूपातील माहिती व शिल्पे ही येथे आहेत.   हे सर्व पाहताना अभिमानाने आपला ऊर भरून येतो .

         रामेश्वरमच्या परिसरात बरीचशी प्राचीन मंदिर आहेत. ती सुद्धा भारतीय प्राचीन संस्कृती व शिल्पकलेचा उत्तम नमुना आहेत. ज्ञान,विज्ञान, भक्ती, नैसर्गिक सौंदर्य या सर्वांचा मिलाफ असणार हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते.

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Previous articleपटोलेंच्या मार्गावरील पाचरी !
Next article‘कीमिया’गिरी: साहिर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here