शेवाळकर नावाचे माणूसपण…

– शैलेश पांडे

माणसं कशाने मोठी होतात, या प्रश्नाचे अत्यंत मार्मिक उत्तर माँटेस्क्यूने दिलेले आहे. तो म्हणायचा, “तुम्ही स्वतःच्या दृष्टीने कितीही मोठे असा, ग्रेट असा…तुम्ही लोकांच्या वर असाल तरी तुम्ही मोठे नाही. त्यांच्यापासून दूर असाल तरी तुम्ही ‘ग्रेट’ नाही… तुम्ही ‘लोकांमध्ये’ असाल आणि त्यांना तुम्ही मोठे वाटत असाल तरच तुम्ही मोठे…तरच तुम्ही ग्रेट !”

माणसं मोठी होतात, स्वतःच्या नजरेत. स्वतःचे मोठेपण कुरवाळत राहतात, पण स्वहस्तेच. माणूस जितका विद्वान, तितका तो माणसांपासून दूर जातो. तशी रीतच असते म्हणे. एखाद्याच्या काव्यप्रतिभेचे कढ त्याला माणसांपासून दूर ठेवतात. कुणाचा एकांताचा हव्यास त्याच्या ठायी एकारलेपण निर्माण करतो आणि काहींना प्रतिभेचा-विद्वत्तेचा अहंगंडच एवढा चढतो, की त्यांना सारे जग क्षुल्लक वाटू लागते. अशी माणसं जगापासून दूर राहतात. सामान्यांपासून विभक्त राहतात… आणि मग सामान्य माणसंही त्यांना फारसा भाव देत नाहीत. तो हुशार आहे, मोठा आहे, पण माणूसघाणा आहे, अशी टिप्पणी सामान्य माणसाच्या तोंडून एखाद्याच्या संदर्भात निघते तेव्हा दोष त्या मोठ्या माणसाचाच असतो. अन्यथा, सामान्यांना तर मोठ्यांच्या मोठेपणाचे कौतुकच असते आणि ते अनुभवण्याची इच्छाही त्यांना असते. एखादा मोठा माणूस याला अपवाद. एरवी अशांच्या विद्वत्तेच्या झुलीखाली त्यांचे माणूसपण झाकले जात असते.

आपण काहीही असू, कोणत्याही पदावर असू, कितीही विद्वान असू, कितीही पैसेवाले असू…सर्वात महत्त्वाचे असते ते हे की, माणूस म्हणून आपण कसे आहोत आणि इतरांना तुमच्यातल्या माणुसकीचा प्रत्यय कसा येतो. सध्याचे दिवस ‘इझ्म’चे अन् वेगवेगळ्या रंगांच्या वैचारिक झेंड्यांचे. वैश्विक सत्याचा आविष्कार जणू आपल्यालाच झालेला आहे, अशा तोर्यात कोणत्याही विषयावरील आपले मत दडपून मांडण्याचे आणि त्याच्या मान्यतेसाठी दुराग्रही होण्याचे. अशात प्राचार्य राम शेवाळकरांसारखा उत्तुंग विद्वान-व्यासंगी समाजात सहजी मिसळून जातो, अखेरपर्यंत तसाच राहतो आणि तो सुद्धा कोणत्याही ‘इझ्म’विना!… खरोखर आश्चर्य वाटते.

शेवाळकर डावे, उजवे की मध्यममार्गी हे कुणालाच सांगता येणार नाही. तसा प्रयत्न ज्यांनी केला, ते पराभूत झाले. शेवाळकर हे शेवाळकर राहिले. याचा अर्थ, विचारधारा, राजकीय मत, सांस्कृतिक मत हे सारे शेवाळकरांना लागू नव्हते, असा होत नाही. त्यांची मते होती आणि ती ठाम होती. गांधी, विनोबा, साने गुरुजी, सावरकर हे त्यांच्या निष्ठेचे विषय होते. परंतु, यातल्या कशातही ते अडकले नाहीत. ‘ईझ्म’ची पट्टी त्यांनी डोळ्यावर बांधली नाही. राम शेवाळकर हे अंतर्बाह्य माणुसकीचे रसायन होते. त्यांचे मोठेपण हे त्यांच्या सभोवतालच्या माणसांना जाणवायचे. कारण त्यात कोणताही अभिनिवेश नव्हता. होती ती आपुलकी आणि माणुसकी, आणि ती सुद्धा निरपेक्ष.

सुरुवातीला शेवाळकरांचा विद्यार्थी म्हणून, पुढे साहित्य व सांस्कृतिक वर्तुळात वावरणार्या मोठ्या माणसांशी संपर्क ठेवणारा पत्रकार म्हणून आणि नंतरच्या टप्प्यात समाजजीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या अशा विविध प्रकारच्या माणसांच्या वर्तनाचा निरीक्षक म्हणून वावरताना अनुभवाला आले ते लोकविलक्षण होते- आहे. पंधरा-वीस कवितांचा काव्यसंग्रह काढून ‘कवी’ झालेल्या आणि एखाद्या सवंग सुखांतिकेची चोपडी कादंबरीच्या स्वरुपात छापून ‘साहित्यिक’ झालेल्यांच्या मांदियाळीत हे रसायन वेगळेच भासायचे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होण्याची चिन्हे दिसत असताना काहींनी, त्यांच्यातल्या वक्त्याने, त्यांच्यातल्या लेखकावर मात केली असल्याने ते साहित्यिक ठरत नाहीत, असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेवाळकर बधले नाहीत. वाणीवैभवाच्या साहित्य मूल्याविषयीचा बिनतोड तर्क मांडून त्यांनी विरोधकांना गप्प केले. खरे तर हा त्यांचा स्वभाव नव्हता. एखादा सांगायचा की, अमक्यानं तुमच्या नावानं बोटं मोडली. त्यावर शेवाळकर सर गंमतीने म्हणायचे, “जाऊ दे त्याचीच बोटं दुखतील…आणि हो एक लक्षात ठेव, हीच त्याची ‘खासीयत’ आहे.” इतरांच्या दुर्गुणांना सुद्धा ‘खासीयत’ ठरविण्याएवढी रसिकता या मर्मज्ञाच्या ठायी होती.

एकेकाळी शेवाळकरांनीच लाडावलेल्या माणसांनी त्यांच्यावर दुगाण्या झाडण्याचा प्रयत्न केला. आपले विद्यार्थी म्हणून अर्धा-एक डझन ‘छापाचे गणपती’ सभोवताली गोळा करायचे आणि इतरांवर तोंडसुख घेण्यात विकृत आनंद घ्यायचा, अशी त्यांच्या काही समकालीन ख्यातकीर्तांची सवय होती. त्या गोष्टी कळल्या की शेवाळकर दुखावत, पण बोलत नसत. वाईट बोलणं त्यांना जमतच नसावं. जिव्हेत ज्ञानेश्वर आणि अंतःकरणात माऊली, कृतीत गांधी- विनोबा आणि विचारांत सावरकर, व्यासंगात विवेकानंद आणि तर्कात चाणक्य भासावे, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. परंतु, यातल्या कशाचाही तोरा कुठेच दिसायचा नाही. मी त्यांचा विद्यार्थी होतो. आमच्या वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्राचार्य शेवाळकर सायकलने यायचे. ज्युनियर कॉलेजच्या मास्तरांनी सुद्धा स्कुटरवर येणे हा त्या काळी प्रतिष्ठेचा मापदंड असताना आमचे प्राचार्य मजकूर सायकलवर उभा गाव पालथा घालायचे. हे साधेपण, ही माणुसकी एकीकडे आणि कमालीची विद्वत्ता व लोकप्रियता दुसरीकडे असे हे रसायन अंतःकरणात भारतीय संस्कृतीतले सनातन सहिष्णूपण जोपासत जगले, हे आता कळते. त्यामुळेच त्यांच्या संपर्कातला प्रत्येक जण त्यांचा नातेवाईक नव्हता तरी हळहळला. ज्यांनी शेवाळकरांना दुषणे दिली, तेही रडले. शेवाळकरांना लहान करण्याच्या कसरतीत स्वतःचाच कणा मोडून बसलेली अनेक माणसं नंतर गहिवरली. ज्यांनी त्यांचा जाहीर उपमर्द करण्याची एकही संधी सोडली नाही, ते ‘जाती’वंत पुरोगामीही आतल्या आत उसवून गेल्याचे त्यांच्या मृत्यूच्या दिवशी जमलेल्या गर्दीतल्या चेहर्यांना न्याहाळताना जाणवले.

एखाद्याचे असणे अनेकांच्या आत्मिक तृप्तीचे आणि त्याचे नसणे भीषण अशा तृष्णेचे कारण कसे ठरू शकते, हेही त्यादिवशी लक्षात आले. अनेकांची जगण्यातली तृप्ती त्यादिवशी क्षणात कशी संपून गेली हेही अनुभवता आले. नागपुरात राहण्याचे आणखी एक कारण संपले, असे एका ज्येष्ठ साहित्यिकाचे वाक्य यासंदर्भात येथे नोंदविले पाहिजे. माणसे जन्माला येतात, तशी मरतातही. शेवाळकर या नियमाला अपवाद असण्याचे कारण नव्हते. परंतु, त्यांनी आपल्या सहवासातल्या माणसांना जो लळा लावला, तो अद्वितीय असा होता. त्यामुळेच त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली हळहळ ही कौटुंबिक राहिली नाही किंवा ती एका विशिष्ट वर्तुळापुरती मर्यादितही राहिली नाही. ती हळहळ समस्त मराठी जगताला कासावीस करून गेली आहे. राम शेवाळकर नावाच्या सरस्वतीपुत्राचे जाणे अकाली नव्हते. तरीही त्यांच्या जाण्याचे दुःख असंख्य सनाम-अनामांच्या काळजावर रप्पदिशी चिरा पडावा तसे ठसठसते आहे.

शेवाळकर पुण्या-मुंबईचे नव्हते. मराठवाडा आणि नंतर विदर्भ ही त्यांची कर्मभूमी. पण या सरस्वतीपुत्राला अवघ्या बृहन्महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता मिळाली, ती व्यासंगाच्या अन् वाणीच्या बळावर. पु.लं.च्या नंतर एवढा लोकप्रिय माणूस मराठी सारस्वताच्या कोणत्याही दालनात सापडणार नाही. पुण्याच्या अलुरकर म्युझिक हाऊसनं शेवाळकरांच्या व्याख्यानाच्या कॅसेट्स काढल्या तेव्हा मी एक लेख लिहिला होता. त्यातला एक उल्लेख त्यांना खूप भावला होता. मास्तरांचं विद्यार्थ्यांनीही ऐकू नये अशा या काळात दरवर्षी शैक्षणिक सत्रारंभी होणार्या प्राचार्याच्या अभिभाषणानिमित्त राम शेवाळकर नावाच्या एका मास्तरांना ऐकायला सारे गाव महाविद्यालयात येते हे दृश्य अद्भूत होते, असा तो उल्लेख होता. सर म्हणाले होते, “मी बाहेर भाषणं देतो. वणीत फारशी देत नाही. त्यांना वर्षातून एकदाच ऐकायला मिळतं ना!…”

सरांचे म्हणणे खरे नव्हते. त्यातले वास्तव असे होते की, शेवाळकरांना ऐकणे हा दैवी अनुभव असायचा. साध्या-साध्या शब्दांची अन् अत्यंत गहिर्या अर्थाची माळ ते गुंफत न्यायचे आणि श्रोत्यांनाही त्यात बांधून टाकायचे, हा अनुभव असंख्य लोकांनी घेतला असेल. त्यामुळेच त्यांच्या रसाळ वाणीत न्हाऊन निघण्याच्या आनंदाचा पुनःप्रत्यय उर्वरित महाराष्ट्रातले लोक जसा वारंवार घेत, तसा तो वणीच्या लोकांनाही वारंवार घ्यावासा वाटे. त्यात नवल नव्हते. नवलाई एवढीच होती की, आपल्या वाणीवर उभा महाराष्ट्र फिदा असल्याची जाणीव होऊनही शेवाळकर स्वतःवर फिदा झाल्याचे कधीच दिसले नाही. स्वांत सुखाय् जगणे त्यांना जमले नाही. शिष्योत्तमांचा गोतावळा जमवून कुचाळक्या करण्याचा छंद जोपासण्यापेक्षा, नव्या प्रतिभा बहरत राहाव्यात यासाठी त्यांना मदत करण्याचा उपक्रम आयुष्यभर त्यांनी चालविला. स्वतःला इतर क्षेत्रांमध्येही गुंतवून घेतले. त्यांच्यामुळे स्थापन झालेल्या, उभ्या झालेल्या, पुनरुज्जीवित झालेल्या आणि चालत असलेल्या संस्थांची यादी खूप मोठी होईल. लोकनायक बापूजी अणे ते काल-परवा ऐन उमेदीत (किंवा अप्रकाशित अवस्थेतच म्हातारपण आल्यामुळे…) गेलेला एखादा चांगला लेखक-कवी या सार्यांच्या साहित्याचे संपादन आणि प्रकाशन यासाठी शेवाळकरांनी घेतलेले कष्ट कुणालाही विसरता येणार नाही. त्यांनी वाणीतून सरस्वतीची पूजा बांधली अन् कृतीतून ‘अक्षर’ असे काम उभे केले.

संस्थात्मक कार्य आणि संपादने या दोन गोष्टी त्यांनी केल्या असत्या तरी ते शेकडो वर्षे स्मरणात राहिले असते. परंतु, तेवढ्याने त्यांच्यातल्या संघटकाची, गुणग्राहकाची, लोकसेवकाची भूक भागणारी नव्हती. त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत शेवाळकर काम करीत राहिले. काही लोक नावे ठेवत… सर कुणालाही प्रस्तावना देतात, असे म्हणत. पण, ते नवोदितांच्या पुस्तकांना प्रस्तावना देत राहिले. त्यांना लिहिण्यासाठी प्रोत्साहित करीत राहिले. छोट्याशा गोष्टीची मोठी शाबासकी देणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्याकडून शाबासकी मिळणार्यांना आणखी नवे काम करण्यासाठी ऊर्जा मिळायची आणि त्या ऊर्जेवर मोठे काम सहज होऊन जायचे. आपल्या ऊर्जेतून, पाठबळातून मोठेपण मिळवणार्यांच्या आनंदातल्या सहजी सहभागाची दिलदारी म्हणजे शेवाळकर सर.

एरवी महावृक्षाखाली तृण वाढत नसते. परंतु, या महावृक्षाच्या सभोवताली सर्व आकाराच्या वनस्पतींनी मूळ धरले आणि बहरही अनुभवला. विशेष म्हणजे शेवाळकरांसारख्या मोठ्या माणसाने सभोवतालच्या छोट्यांचे किरकोळ आनंदही त्यांच्या बरोबरीने मोठे समजून उपभोगले, अनुभवले. मोठेपणासाठी जसा मोठा लोकसंग्रह लागतो, तशी मोठेपणासोबत येणारी जबाबदारीही मोठी असते. अशा असंख्य जबाबदार्या शेवाळकरांवर आपसूक येऊन पडत आणि कशालाही नकार न देता त्या पार पाडण्यात त्यांचे संघटन कौशल्य अनेकदा खर्ची पडे. फडके, खांडेकरांच्या पठडीतल्या लेखकांनाच नव्हे तर दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, जनसाहित्य, आदिवासी साहित्य अशा सर्व साहित्य प्रवाहांशी नाते सांगणार्यांना शेवाळकर जवळचे वाटत. केवळ साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रातल्याच नव्हे, तर सामाजिक व राजकीय क्षेत्रातल्या सर्व विचारांच्या लोकांनाही ते आपले वाटत. ही आपुलकी शेवाळकरांना कधी प्रयत्नपूर्वक रुजवावी लागली नाही. त्यांच्या अंतःकरणातला पाझरच इतका गहिरा होता की, कुणीही यावे नि त्या आपुलकीत मनसोक्त डुंबून घ्यावे. तोच ओलावा त्यांनी मागे सोडला आहे. कारण एरवी संकुचित, उथळ समजले जाणारे ‘मराठीपण’ त्यांनी एखाद्या महासागराएवढे खोल आणि व्यापक करून ठेवले आहे!

(लेखक ‘तरुण भारत’ च्या डिजिटल आवृत्तीचे संपादक आहेत)

9689917803

Previous articleवणीत भाऊसाहेब शेवाळकर व्यासपीठाचे लोकार्पण
Next articleआपण, जग आणि चार्वाक : उत्तरार्ध
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here