-प्रवीण बर्दापूरकर
सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून निवृत्त व्हायचा निर्णय घेतल्याचं वाचनात आलं . त्या भाजपच्या राजकारणातून निवृत्त झाल्या की एकूणच राजकारणातून , हे कांही अजून स्पष्ट झालेलं नाही . अलीकडच्या दीड-दोन वर्षात सूर्यकांता पाटील यांच्याशी ज्या कांही भेटी झाल्या त्यातून त्यांची झालेली घुसमट जाणवत होती . त्यामुळे भाजपच्या गोटातून तरी त्या आज-ना-उद्या बाहेर पडणार हे दिसत होतं . त्यामुळे हा निर्णय कांही अनपेक्षित आहे , असं म्हणता येणार नाहीच . सूर्यकांता पाटील यांचा ‘राजकीय डिएनए’ काँग्रेसचा आहे आणि अस्सल काँग्रेसी कधी राजकारणातून निवृत्त होत नाही , हा तर इतिहास आहे . त्यामुळे सूर्यकांता बाई काँग्रेसमध्ये परत जातील , की आणखी कांही नवं उभं करतील हे आज तरी सांगता येत नाही .
सूर्यकांता पाटील आणि माझ्यातलं मैत्र सख्ख आहे , नितळ आहे आणि या मैत्राला ‘अरे-तुरे’ची भरझरी झालर आहे . ( आमच्या मैत्रीबद्दल ६ ऑक्टोबर २०१९ला लिहिलेल्या स्तंभातील मजकूर शेवटी जोडला आहे . उत्सुकता असणार्यांनी तो आवर्जून वाचावा म्हणजे आमच्या मैत्रीची जात आणि कूळही समजेल ! ) माझे आणखी कांही सख्खे मित्र विविध पक्षांच्या राजकारणात आहेत . नुसते राजकारणात नाहीत तर , अविरत संघर्ष करुन सत्ता आणि पक्षात एक विशिष्ट ऊंची प्राप्त केलेले हे मित्र आहेत पण , त्यांचं राजकारण आणि माझी पत्रकारिता यासंदर्भात आम्हा परस्परांत आजवर कधीच चर्चा , वाद , मतप्रदर्शन झालेलं नाही . त्यांनी त्यांचं राजकारण सुखनैव करावं आणि मी माझी पत्रकारिता , पाहिजे तशी करावी अशी आमची त्यामागची अलिखित धारणा आहे . आमच्यातल्या निखळ मैत्रीवर त्याची छाया पडू न देण्याचं भान आम्ही कटाक्षांनं आम्ही पाळलेलं आहे . हे सांगायचं एवढ्यासाठी की , स्वत:च्या यशस्वी नेतृत्वाचा झेंडा एकहाती रोवणार्या ‘राजकारणी’ सूर्यकांता पाटील यांच्याविषयी आज प्रथमच लिहितो आहे .
