‘अशा’ घटनात प्रलोभन हा कळीचा मुद्दा आहे आणि त्याला बळी पडण्याचं जास्त प्रमाण स्त्रियांचं आहे , ही वस्तुस्थिती आहे . ‘लिव्ह इन’ नावाचा सापळा , स्वतंत्र घरं , मोठ्या प्रमाणात धन , मूल जर झालं तर त्याला नाव म्हणजे अधिकृत दर्जा आणि नाव न दिलं तर आणखी धन अशी प्रलोभनाची व्यापकता आहे . या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार आणि दोस्तयार निशिकांत भालेराव याची एक पोस्ट अशी-“आमच्या मराठवाड्यात हे फार कॉमन आहे . चुकीचे आहेच . २५ वर्षांपूर्वी मी शेगाव पाथर्डी भागात कोल्हाटी समाजाच्या काही महिलांवर स्टोरी करण्यासाठी काही महिला कार्यकर्त्या समवेत मेळाव्याला गेलो होतो . दोन तीन भगिनीच्या घरी चहा पिण्यास गेलो तेव्हा त्या काळातील आमच्या भागातील बहुतेक पुढार्यांचे फोटो दिवाणखान्यात पाहून मला फारच आशर्य वाटले . पण , काही जणींनी तिथे खेळणाऱ्या मुलांकडे पाहून चक्क सांगितले हा यांचा त्यो त्येंचा वैगेरे . मी फार अस्वस्थ होतो त्या प्रकाराने . आज पाथर्डी-शेगाव ऐवजी बॉलिवूड असते एव्हढेच काय ते ! सार्वजनिक जीवनात असल्यावर हे प्रकार नकोच. प्रश्न खाजगी नाही असू शकत .” निशिकांतच्या या अनुभवाला पुष्टी देणार्या राजकीय नेते , प्रशासकीय अधिकार्यांच्या अनेक हकिकती सांगता येतील .